ज्ञानेंद्र धीरगंभीर स्वरात बोलत होता. सोनेरी काडीच्या चष्म्यातून त्याचे डोळे जणू तेजानं चकाकत होते. त्याच्या चौकोनी नितळ गोऱ्या चेहऱ्यावरही आत्मप्रभा विलसत होती. ज्ञानेंद्र बोलू लागला..
ज्ञानेंद्र – जेव्हा आपण अशाश्वत अशा गोष्टींतच गुंतून आहोत, आपला वेळ आणि शक्ती नाहक वाया जात आहे, हे कळतं तेव्हाच ना मन केंद्रित होऊ लागतं? विवेकाशिवाय कोणतीही साधना शक्य नाही आणि सार काय, असार काय, याची निवड हाच जर विवेक असेल तर सार आणि असार काय, हे ठरवण्यात बुद्धीचा अर्थात ज्ञानाचा सहभाग अनिवार्य आहे! या विवेकाच्या जोरावर जसजसं अशाश्वत गोष्टींतलं गुंतणं थांबतं आणि त्यापाठोपाठ हवेपणातला फोलपणाही समजू लागतो, तेव्हाच जे आहे त्यात समाधान वाटू लागते. जे आहे त्यात समाधान वाटण्याची कला मनाला काय क्षणार्धात साधते? त्या िबदूपर्यंत येण्यासाठी मन जे जे प्रयत्न करतं, स्वत:ची जी जी समजूत घालतं त्यात बुद्धीचा सहभाग नसतो? जगाची ओढ हृदयातून ओसरणं आणि तिथं परमतत्त्वाची ओढ रूजणं, यात ज्ञानाचा सहभाग नसतो? हृदूच्या म्हणण्याप्रमाणे तर विशुद्धचक्रात आलेल्या साधकाची घसरण ही निव्वळ अज्ञानाने भ्रमित झाल्यानेच तर होते! सद्गुरूंच्या आज्ञेत साधक का स्थिर होत नाही? कारण त्याचंच अज्ञान ‘ज्ञाना’चा मुखवटा घालून त्याला भुलवत असतं! मग सांगा आत्मशक्तीचा हा प्रवास ज्ञानावरच तर टिकून आहे ना? आणखी एक गंमत पहा हं, भक्त असो की योगी सर्वाना आत्मज्ञान मात्र हवंच आहे!
कर्मेद्र – ग्रेट ग्रेट ज्ञान्या.. या दोघांची तोंडं बंद करणं काही सोपं काम नाही.. आता मी शेवटची सिगारेट ओढतो, मग निघू..
डॉ. नरेंद्र – मी एक विचारू?
कर्मेद्र – मला? अहो मी काय ज्ञानी, योगी, भक्त नाही..
डॉ. नरेंद्र – पण प्रश्न तुमच्यापुरताच आहे..
कर्मेद्र – विचारा..
डॉ. नरेंद्र – प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेमात पडलात तरी सिगारेटवरचं प्रेम का संपलं नाही?
कर्मेद्र – (हसत) अहो उलट दुसऱ्या प्रेमानं ती अधिकच जवळ आली आहे! (डॉक्टरांच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे खटय़ाळपणे पाहात) मी अनुराधाच्या म्हणजे आता ख्याति आहे ती, तर ख्यातिच्या प्रेमात पडलो. तिच्या घरच्यांना हावडय़ाला जाऊन भेटलो. कुणाचाच विरोध नव्हता. मग तिची आई म्हणाली, ‘जमाईबापू, हिच्या एका आत्यानं आणि एका काकानं होकार दिला तर आमचा काही विरोध नाही!’ झालं! प्रेमात पडण्याआधीच त्या दोघांना का विचारलं नाही, असा जळजळीत प्रश्न मनात आला होता. पण मी तो दाबून टाकला. आत्याबाईंकडे दैवानं अशी साथ दिली की त्या म्हातारीनं आधी ख्यातिलाच ओळखलं नाही. ओळखलं तेव्हा तिला वाटलं आम्ही लग्न करून आशीर्वाद घ्यायला आलोय, तर तिनं थेट आशीर्वादमुद्रा केली. पण काका मात्र खडूस होता. तरुणपणी कम्युनिस्ट चळवळीत होता. विषय कुठून सुरू करावा, मला काही कळेना. त्यानं ‘गेले ते दिन गेले’चा सूर आळवायला सुरुवात केली. कॉमरेड डांगे आणि नंबुद्रीपाद यांच्यातील मतभेद. त्यातून आधीच फुटून स्थापन झालेल्या कम्युनिस्ट पक्षातली फाटाफूट. या चिरफळ्यांनी औदासिन्य आलेल्या तरुणांपैकी हे एक. मला त्यातलं काहीच समजत नव्हतं. अचानक त्यांनी विचारलं ‘‘तू काय करतोस?’’ मी बावचळून म्हणालो, ‘‘कारखाना..’’ तर म्हणाले, ‘‘कामगार आहेस?’’ लाल निशाणासमोर मनानंच नतमस्तक होत म्हणालो, ‘‘मालक फार खाष्ट आहे. दिवसरात्र मला राबवायला पाहातो. मी त्याच्याविरोधात सतत झगडत असतो.’’ त्यांनी विचारलं, ‘‘युनियन नाही?’’ मी म्हणालो, ‘‘ती बापडी या वादात पडतच नाही, पण मी संघर्ष सोडणार नाही.’’ त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. त्यांनी विचारलं, ‘‘यंग मॅन, वुड यू लाइक टू स्मोक?’’ टेबलावरचा ब्रॅण्ड तर कधीपासून खुणावत होताच. मी लगेच हात पुढे केला आणि बारीक नजरेनं हसत ख्यातिच्या मोठ्ठय़ा डोळ्यांना डोळा भिडवला! म्हातारा म्हणाला, ‘‘मी या लग्नाला आनंदानं परवानगी देतो!’’ बिचाऱ्याला नंतर कळलं, तो मालक माझा बापच होता आणि मी धंद्यात लक्ष घालावं म्हणून तो दिवसरात्र माझं डोकं खात होता! पण ख्यातिच्या काकांमुळे सुरू झालेली सिगारेट काही सुटली नाही!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा