ज्ञान ताजवा घेऊन हातीं। दोन्ही अक्षरें जोखिती।। हृदयेंद्रनं पुन्हा हा चरण म्हटला. खिडकीतून आत येत असलेल्या वाऱ्याचं पाश्र्वसंगीत जणू त्याच्या गंभीर स्वराला लाभलं होतं.
योगेंद्र – ज्ञानाचा तराजू हा अर्थ समजतो, पण त्यानं जर अंत:करणाचा दागिना तोलायचा असेल तर मग ही ‘दोन्ही अक्षरे’ कोणती? आता आधीच्या चरणात नामाचा उल्लेख आहे, म्हणून रा म ही दोन अक्षरे आहेत काय? पण नरहरी महाराज रामाचे भक्त म्हणून काही परिचित नाहीत..
हृदयेंद्र – आता प्रत्येक संतानं रामनामाचा महिमाही गायला आहे, बरं का.. मग ते कोणत्याही इष्ट देवतेची भक्ती करीत का असेनात.. राम म्हणजे परमात्मा, असा साधा अर्थ त्यात अभिप्रेत आहे..
दादासाहेब – नरहरी महाराज हे कट्टर शिवभक्त होते. बरं राहात होते पंढरपुरातच! पण विठ्ठलाच्या दर्शनाला कधीच जात नव्हते. अख्यायिका अशी आहे की कोणा एका धनिकाला विठ्ठलाला सोन्याचा कमरपट्टा करण्याची इच्छा झाली. गावातलाच सोनार म्हणून नरहरी महाराजांकडे तो आला. नरहरी महाराज काय म्हणाले? मी शिवभक्त आहे, मी काही विठ्ठलाच्या मंदिरात जाणार नाही. तुम्हीच त्या मूर्तीच्या कमरेचं माप घेऊन या. त्यानं मापाची दोरी आणली. त्याप्रमाणे कमरपट्टा बनवला गेला, पण तो फारच सैल झाला. मग पुन्हा माप नेलं गेलं, कमरपट्टा घडवला गेला आणि आता तो अगदी घट्ट झाला. अखेर डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी महाराज स्वत:च माप घ्यायला विठ्ठलाच्या मंदिरात आले आणि हातानं चाचपतात तो काय? त्यांच्या हाताला शिवचिन्हांचाच स्पर्श होऊ लागला. गळ्यात सर्प आहे, डोक्यावर चंद्र आहे, हातात त्रिशूळ आणि डमरू आहे.. आश्चर्यानं त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली तर समोर कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा! शेवटी परमात्मा एकच आहे, हे त्यांना या प्रसंगातून जाणवलं.. तेव्हापासून ते विठ्ठलाचे भक्त झाले.. आणि असं म्हणतात की, त्यांच्या शिवभक्तीची पूर्ती म्हणून पंढरपुरच्या विठ्ठलाच्या डोक्यावरही शिवलिंग स्थापन झाले! तेव्हा ते मुळचे शिवभक्त, मग विठ्ठलमय झाले, पण अनेक अभंगात रामनामाचं महत्त्व त्यांनी गायलंच आहे..
योगेंद्र – मग ही दोन्ही अक्षरे म्हणजे रा आणि म हीच का? आणि दागिना जर अंत:करणाचा घडलाय तर ही अक्षरे ज्ञानाच्या तराजून तोलून बघायची म्हणजे काय?
हृदयेंद्र – मला तर अर्थाच्या अनेकानेक छटा जाणवत आहेत.. बघा आपण काय म्हणतो? जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. शिवापासून विभक्त झाल्यानं जीव हा दु:ख भोगतो आहे. आता जीव शिव कसा होणार? इथे आधीचा चरण मदतीला येतो.. मनबुद्धीची कात्री! मी स्वत:ला जीव मानतो आणि माझ्या संकुचित जगाला चिकटून जगत असतो त्यामागे माझं मन आणि बुद्धीच असते आणि त्या मन आणि बुद्धीपलीकडे गेल्यावर, अर्थात मनाचं उन्मन आणि बुद्धीची सद्बुद्धी झाल्यावर मी शिव होतो! म्हणजे दोन्हीकडे मन आणि बुद्धीचाच पाया आहे.. एकात संकुचित मन आणि बुद्धीमुळे जखडण आहे तर दुसऱ्यात मन आणि बुद्धी मावळल्यामुळे मुक्ती आहे! साधकाचं ते ध्येय आहे. तो अखेरचा मुक्काम आहे. जन्म आहे तोवर जीवन कधीच दुरावू शकत नाही. सामान्य माणूसही जगतो, साधकही जगतो आणि सिद्धही जगतोच. थोडक्यात प्रत्येकाच्या जीवनाची काही चौकट असते आणि ती मृत्यूपर्यंत कायम असते. फरक इतकाच की जीव हा बंधनात जगत असतो तर सिद्ध हा मुक्त जगत असतो! जन्माला येऊन ही मुक्तीच तर साधायची आहे. ती साधली की मगच अंत:करणाचा दागिना घडला, असं म्हणता येईल ना? तेव्हा आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही पातळ्यांवर साधक निर्लिप्तपणे जगत आहे की नाही, हे या ज्ञानाच्या तराजूनंच समजणार!
कर्मेद्र – पण हे ज्ञान कोणतं?
हृदयेंद्र – जगात ज्ञानाचा अनंत प्रकारे आभास होतो, पण खरं ज्ञान माणसाला गवसलंय का? जे ज्ञान माणसाला पशुवत बनवतं त्याला ज्ञान कसं म्हणावं? ज्या ज्ञानाच्
या जोरावर दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेता येतो, त्याला ज्ञान कसं म्हणावं? जे ज्ञान माझ्यातलं अज्ञानच वाढवतं ते ज्ञान कसं म्हणावं? ज्या ज्ञानाच्या जोरावर मी दुसऱ्याला खच्ची करतो, हीन ठरवतो, त्याला ज्ञान कसं म्हणावं?
चैतन्य प्रेम
१०२. ज्ञान ताजवा
ज्ञान ताजवा घेऊन हातीं। दोन्ही अक्षरें जोखिती।। हृदयेंद्रनं पुन्हा हा चरण म्हटला. खिडकीतून आत येत असलेल्या वाऱ्याचं पाश्र्वसंगीत जणू त्याच्या गंभीर स्वराला लाभलं होतं.
First published on: 26-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara knowledge