नेपाळातील उत्पाताची समोरची दृश्यं पहावत नव्हती.. निसर्गाच्या रौद्र तडाख्यानं माणसाच्या भावविश्वाचं क्षणार्धात कसं अभावविश्व होतं, हेच वास्तव त्या दृश्यांतून जाणवत होतं.. डॉक्टरसाहेबांशी संपर्क होत नसल्यानं चौघा मित्रांची मनं अस्थिर झाली होती.. एकतर तिथलं घर आणि माणसं मागे ठेवून या देशात कामधंद्यानिमित्त आलेला जो-तो घरी संपर्क साधण्यासाठी धडपडत असणार, जगभरातून या ना त्या कारणानं अशा संपर्कयत्नांमध्ये प्रमाणाबाहेर वाढ झाली असणार.. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क होत नाहीये, असं मनाचं समाधान चौघांनी करून घेतलं होतं.. पण जोवर त्यांचा आश्वासक आणि आत्मीय आवाज कानावर पडत नाही, तोवर जीव भांडय़ात पडणार नव्हता.. तोच दारावरची घंटा घणघणली.. तिचा मंदावत जाणारा स्वर विरत असतानाच सखारामनं दार उघडलं.. प्रज्ञानं घरात प्रवेश करताच इतक्या पाहुण्यांना पाहून मंद स्मित केलं.. दादासाहेब आणि त्यांच्या मित्रांशी अगदी अदबीनं बोलत असतानाच योगेंद्र, हृदयेंद्र आणि कर्मेद्रची तिनं मनमोकळी विचारपूस केली..
ज्ञानेंद्र – आमची जेवणं आत्ताच आटोपलीत.. तू जेऊन घे.. (ज्ञानेंद्रचा सूर आज नेहमीसारखा नव्हता.. त्यातला तुटकपणा तिलाही जाणवला. समोरच्या तांडवाकडे पाहताना तिलाही आठवण झाली..)
प्रज्ञा – अरे तुमचे डॉक्टर नरेंद्र तिथेच गेल्येत ना?
ज्ञानेंद्र – हो.. पण फोन लागत नाहीये..
प्रज्ञा – लागेल.. मला त्यांची काळजी वाटत नाही.. माणसाच्या भल्यासाठी इतकं काम करताहेत ते.. त्यांना काही होणार नाही.. तुम्ही चौघं आधी नेहमीसारखे व्हा बघू! सगळं ठीक होईल.. बरं मी थोडंसं खाऊन घेते.. तुम्ही बोला.. अरे हो, सध्या कोणता अभंग सुरू आहे? मला पण ऐकायला आवडेल हं.. (प्रज्ञाच्या बोलण्यानं वातावरणातला कोंडलेपणा थोडा कमी झाला खरा. तरी चौघांच्या बोलण्यात उत्स्फूर्तपणा जाणवत नव्हता.. प्रज्ञा जेवायला गेल्यावर कर्मेद्र सतत वाहिन्या बदलत ताजी बातमी पाहात होता, मधेच मोबाइलवर डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे फेरप्रयत्न करून पाहात होता.. प्रज्ञा परतली आणि बातम्यांकडे पाहात उद्गारली..)
प्रज्ञा – खरंच होत्याचं नव्हतं म्हणजे काय ते डोळ्यांनी प्रथमच दिसतंय..
हृदयेंद्र – जग मिथ्या म्हणजे किती अशाश्वत आहे, याचा प्रत्ययच आहे हा..
कर्मेद्र – जगणं अशाश्वत असेल, पण जगणाऱ्या माणसातली माणुसकी, भावना शाश्वत आहे ना? त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा या खऱ्याच आहेत ना? खरंच हा भूकंप होण्याआधीच्या क्षणात कितीजणं किती विचारांत, किती स्वप्नांत, किती प्रयत्नांत दंग असतील.. भूकंपानं घरादारांचा चक्काचूर झाला, पण म्हणून त्या स्वप्नांचा चक्काचूर कसा होईल? त्यांच्या पूर्तीसाठी बळ एकवटावंच लागेल.. काय गरज होती डॉक्टरसाहेबांना आत्ताच तिथे जायची.. पण त्यांचीही स्वप्नं आहेतच ना? ती पूर्ण करण्यासाठी यातून सावरून पुन्हा दुसऱ्याला सावरण्यासाठी तेच उभे ठाकतील.. (कर्मेद्रला डॉक्टरसाहेबांच्या भेटीतलं शेवटचं वाक्य आठवलं, मी माझं जगणं जसं सत्कारणी लावतोय तसं तुम्हीही लावलंत तर मला जास्त आनंद वाटेल! त्या आठवणीनं कर्मेद्रच्या डोळ्यांत पाणी तरळलं..) खरंच डॉक्टरसाहेब तुम्ही परत या, मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करीन.. (हृदयेंद्रनं त्याच्या खांद्यावर हात थोपटला. बुवा उद्गारले..)
बुवा – हृदयेंद्र तुम्ही म्हणालात ना? ते खरं आहे.. अशा प्रसंगातून जीवनाचा क्षणिकपणा उमगतो.. आणि कर्मेद्र तुमचंही खरं आहे.. या क्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याची जाणीवही त्यातूनच येते.. मला संत नामदेवांचा अभंग आठवतो.. जीवन कसं क्षणभंगूर आहे आणि त्या क्षणातच ते कसं सार्थकी लावता येतं हे त्यातून जाणवतं..
हृदयेंद्र – कोणता अभंग आहे हा?
बुवा – जळी बुडबुडे देखतां देखतां। क्षण न लागता दिसेनाती।। तैसा हा संसार पाहतां पाहतां। अंत:काळी हाता काय नाही।। गारुडय़ाचा खेळ दिसे क्षणभर। तैसा हा संसार दिसे खरा।। नामा म्हणे तेथे काही नसे बरे। क्षणाचे हे सर्व खरे आहे।। क्षण एक मना बैसोनि एकांती। विचारी विश्रांति कोठे आहे।। दुर्लभ आयुष्य मनुष्य देहीचे।। जातसे मोलाचे वायाविण।।
-चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा