हृदयात देवाचं चिंतन हाच अवघा शकुन आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचवेळी तेच तुकाराम महाराज ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।।’ असंही का सांगतात, असा प्रश्न आणि त्यापाठोपाठ तो अभंगही चौघांसमोर उभा ठाकला.
ज्ञानेंद्र – इथे मुख्य प्रश्न असा की ‘देव’ म्हणजे नेमका कोण? बघा हं लहानपणापासून आपण देवावर विश्वास ठेवायलाच शिकत असतो. नव्हे, अशी सारी शिकवण म्हणजेच संस्कार असंही आपण मानतो. त्यातून स्तोत्रं पाठ करू लागतो, मंदिरात जातो, उपवासही करतो, पण खरंच ‘देव’ म्हणजे कोण आणि तो खरंच आहे का, याचा विचारही करीत नाही. त्याच्या अस्तित्वावर शंकाही घेत नाही.
कर्मेद्र – इतकंच नाही, तर जो चराचरात आहे म्हणतात त्याचं दर्शन मात्र म्हणे सहज घडत नाही! आता हा खिडकीबाहेर समुद्र दिसतोय.. आता तो तिथे ‘आहे’ म्हणूनच दिसतोय ना? हे टेबल, ही खुर्ची, ही पुस्तकांची कपाटं.. हे सारं ‘आहे’ म्हणूनच दिसतंयही ना? मग जर तो देवही ‘आहे’ तर दिसत का नाही? असं काही विचारलं की हृदू सांगणार, तो देव या डोळ्यांना दिसणारा नाही! अरे वा! मग देव जर या डोळ्यांना दिसणारा नाही तर याच शरीरातील हृदयात त्याचं चिंतन का साधावं? याच हातांनी त्याची पूजा तरी का व्हावी? याच तोंडानं त्याचं नाम तरी का घेता यावं?
हृदयेंद्र – पण म्हणूनच तर मी म्हणतो की खरा देव कोण, हे तर ओळखता आलं पाहिजे! बघा समर्थ रामदासही ‘मनाच्या श्लोका’त हेच स्पष्ट सांगतात की ‘जेणे मानिला देव तो पूजिताहे’! आपल्या मनाच्या आवडीनुसार, आकलनानुसार जो तो देवाला पूजतो आहे, पण खरा देव कोण, हे कुणी शोधतच नाही!
कर्मेद्र – आता गुरू खरा किंवा भोंदू असतो, हे ऐकलंय. देवातही खरा आणि खोटा, असा भेद आहे का?
हृदयेंद्र – आहे तर! तुझ्या प्रश्नातही त्याचा संकेत आहे.
कर्मेद्र – काय?
हृदयेंद्र – म्हणून तर निदान ‘देव’ या शब्दाचा अर्थ तरी काय? तर देतो तो देव! आता हे दान मात्र असं असलं पाहिजे की देण्याची गरजही उरू नये! म्हणजेच जे शाश्वत आहे, ते जो देतो तोच खरा देव आहे. जे अशाश्वत आहे ते देणारा आणि अशाश्वताचं माझं मागणं वाढवत नेणारा तो खरा देवच नव्हे!
कर्मेद्र – पण असे दोन ‘देव’ आहेत कुठे?
हृदयेंद्र – तूच नाही का उल्लेख केलास? खरा सद्गुरू हाच खरा देव म्हणजे खरा दाता आहे, भोंदू गुरू हा खोटय़ाचं, अशाश्वताचं दान देण्याची ग्वाही देणारा खोटा देव आहे! समर्थही सांगतात, ‘जगी थोरला देव तो चोरलासे!’ हा जो खरा देव आहे ना? खरा सद्गुरू आहे ना? तो चोरुन राहतो, लपून राहतो.. तो बाजार मांडत नाही, अध्यात्माच्या नावावर धंदा करत नाही.. हा जो खरा सद्गुरू आहे ना त्याच्या सहवासाचा लाभ घेता येतो, त्याचा बोध ऐकता येतो, त्याच्याशी बोलता येतं, मनातली खळबळ शमवता येते, अशाश्वताच्या झंझावातानं अशांत झालेल्या मनाला शांती मिळवता येते! अरे ‘तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।’ या अभंगात हाच अर्थ आपण जाणला होता की!
योगेंद्र – आता थोडं थोडं लक्षात येतंय.. सद्गुरू नेमके कसे आहेत, हे कधीच ठामपणे सांगता येत नाही. कोणत्या क्षणी ते काय करतील, कोणाला कशा पद्धतीनं आत्मबोध करवतील, काही सांगता येत नाही. एकाच वेळी कुणाला ते उग्र भासत असतील, तर दुसऱ्याला ते करुणासिंधु भासत असतील..
हृदयेंद्र – अगदी बरोबर! म्हणूनच ते असे असे आहेत, असं आपण तोंडानं म्हणत असलो तरी ते असेच आहेत, असं नव्हे, हे ठाम जाणून असा, हाच भाव ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा’ या चरणात आहे! साईबाबा, अक्कलकोट महाराज.. कुणाच्याही चरित्रात असे अनंत दाखले मिळतील. असा खरा देव तर याच डोळ्यांना दिसतो ना कर्मू? मला सांगा, शिर्डीत बाबा वावरत होते तेव्हा जे त्यांच्या जवळ होते त्यांना किती निर्भयता, किती निश्चिंती आणि किती आनंदाचा सहज लाभ होत होता!! ज्ञान्या शिर्डीचं एकवेळ सोड, जे निसर्गदत्त महाराज, जे. कृष्णमूर्ती, अशा ज्ञानमार्गी सद्गुरुंबरोबर होते त्यांनाही याच निश्चिंतीचा अनुभव आला होता ना? तरी कृष्णमूर्ती काय किंवा निसर्गदत्त महाराज काय, त्यांना एका ठरावीक साच्यात बसवता येतं का?
चैतन्य प्रेम
६४. आहे ऐसा.. नाही ऐसा!
हृदयात देवाचं चिंतन हाच अवघा शकुन आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचवेळी तेच तुकाराम महाराज ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी।
आणखी वाचा
First published on: 02-04-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara sant tukaram thought