शनिवारची प्रसन्न पहाट. समाधी मंदिरातलं भावतन्मयता विकसित करणारं वातावरण. सामूहिक स्वरात उतरत असलेली सात्त्विकता. हृदयाला संस्कारित करीत असलेल्या आरत्या. अखेरीस ‘गोविंद राधे गोविंद’च्या तालावर घातल्या जात असलेल्या फुगडय़ा. द्वैत मोडून एका गोविंदाच्या स्मरणात राधाभावानं जणू मग्न करून टाकणाऱ्या. मग ब्रह्मानंदांनी सांगितलेल्या मोक्षप्राप्तीच्या रहस्याचं वाचन. अखेरीस लोणीसाखरेचा प्रसाद. मंदिरासमोरच्या टपरीवर गरम दूध पिता पिता कर्मेद्र म्हणाला..
कर्मेद्र – इथलं वातावरण आहे फार प्रसन्न. या टपरीवरची कांदाभजीही काय ताजी आहेत..
योगेंद्र – आता खाण्यापिण्याची आवड दोन दिवस तरी सोडू आणि चिंतनाकडे वळू.. (तोच एक प्रौढसा प्रसन्न चेहऱ्याचा माणूस समोर उभा ठाकला. हृदयेंद्रचा चेहराही आश्चर्यानं विस्फारला होताच.)
हृदयेंद्र – अचलदादा! किती महिन्यांनी भेटलात.. आनंदाचा धक्काच आहे माझ्यासाठी.. (आपल्या मित्रांकडे पहात) हेच माझे ज्येष्ठ गुरूबंधू अचलानंद दादा. (हृदयेंद्रनं आपल्या मित्रांचीही ओळख करून दिली मग म्हणाला) पण तुम्ही इथे कसे?
अचलदादा – एका कौटुंबिक समारंभासाठी साताऱ्याला आलो होतो. वाटलं, इतक्यात गोंदवल्यास पुन्हा येणं होणार नाही. सोबत पत्नीही आहे, पण तिलाही तिच्या तीन मैत्रिणी इथं भेटल्यानं ती त्यांच्यात रमली आहे. दुरून तुम्हाला पाहिलं आणि अपार आनंद झाला. पहा महाराजांनी कसा योग जमवलाय..
हृदयेंद्र – अगदी खरं..
अचलदादा – अहो भगवंत आवडणारी माणसं एकत्र येणं हाच खरा योग.
हृदयेंद्र – दादा तुम्ही आलात त्याचा आनंद दुहेरी आहे, कारण आम्ही या वर्षी जेव्हा-जेव्हा भेटणार आहोत तेव्हा-तेव्हा एकेका अभंगाच्या आधारानं आध्यात्मिक चिंतन करणार आहोत. आताचा अभंग ठरला आणि त्यावर चर्चा सुरू करण्याआधीच तुम्हीही आलात, ही श्रीमहाराजांची कृपाच म्हणायची. (ज्ञानेंद्रचा चेहरा थोडा प्रश्नांकित आहे. दादा मात्र हसले. म्हणाले-)
अचलदादा – तुम्ही महाराजांची कृपा म्हणालात ना, मला महाराजांचंच वाक्य आठवलं. म्हणायचे, माझी कृपा आहेच आता तुम्हीही थोडी स्वत:वर कृपा करा!
हृदयेंद्र – (हसत) अगदी खरं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न हीच स्वत:वरची खरी कृपा आहे..
अचलदादा – तेव्हा चर्चा जरूर करावी, पण ती जगण्यात येते का, इकडेही लक्ष पाहिजे. आणि खरं सांगू, तीर्थस्थानी हाच अभ्यास केला पाहिजे. लोक तीर्थस्थळी जातात आणि चर्चा काय करतात? त्या अमक्याच्या मुलीच्या घटस्फोटाचं काय झालं? तमक्याच्या मालमत्तेचा वाद संपला का? सून नीट वागते का? सासू छळते का? सगळी औट घटकेच्या संसाराचीच चर्चा.. (हृदूचा चेहरा भावनेनं ओथंबतो).
ज्ञानेंद्र – हृदू तू म्हणालास, आताचा अभंग ठरला.. कोणता आहे तो?
हृदयेंद्र – काल ते बुवा गात होते ना? रूप पाहता लोचनी!
अचलदादा – व्वा! फार छान!! सद्गुरूंशी कसं एकरूप व्हावं, हे सांगणारा त्या ऐक्यतेचा परमलाभ सांगणारा अभंग आहे हा.
योगेंद्र – पण हा रूपाचा अभंग आहे ना?
अचलदादा – अहो हा स्वरूपाचा आणि स्वरूपस्थितीशी ऐक्यता कशी साधावी हे सांगणारा अभंग आहे हा!
हृदयेंद्र – दादा तुमची ही गोष्ट मला फार आवडते. तुम्हाला त्याच शब्दांतला गूढार्थ सहज उकलतो आणि मांडताही येतो. मीही तुमचीच कधीकधी नक्कल करतो बरं का!
अचलदादा – तुमच्यावर काय कमी कृपा आहे?
ज्ञानेंद्र – हे मात्र खरंच आहे हं! हृदू भावनेच्या डोळ्यांनीच वाचतो, ऐकतो, पाहतो..
अचलदादा – नकळत, पण काय सुरेख रूपक वापरलंत हो तुम्ही! आताच्या ‘कल्याण’ मासिकाच्या सेवा विशेषांकात पं. मदनमोहन मालवीय यांच्यावर त्यांच्या एका तत्कालीन सहकाऱ्याने लिहिलेला लेख पुनर्मुद्रित केला आहे. त्यात तो म्हणतो की, मालवीयजींचं शरीर म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत फक्त हृदयच!
हृदयेंद्र – विलक्षण! अवघा देह करुणाभावानं व्यापलेला.
अचलदादा – तसं भावनेच्या डोळ्यांनी पाहणं, हेच खरं पाहणं आहे हो! तरच ‘सुख झाले वो साजणी’चा अनुभव साधणार..
चैतन्य प्रेम

Story img Loader