हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे.. या चरणाचे तरंग सर्वाच्याच मनात पुन्हा उमटले.. एखाद क्षण शांततेत सरला.. मग सर्वाकडे नजर टाकत बुवा म्हणाले..
बुवा – आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे, या चरणार्धाचा उलगडा करताना ‘ज्ञानेश्वरी’तल्या ओव्या का सांगितल्या? तर आमच्या हृदयपरिवारात, आमच्या मनोमंदिरात, आमच्या देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण का बिंबत नाही आणि सद्गुरूमय साधकाच्या ‘माजघरा’त तो का बिंबतो, याचा थोडा तरी उलगडा व्हावा! देहात असूनही देहबुद्धीत फसून आपला घात करून घेणं टाळायचं असेल तर केवळ एका सद्गुरू आधारानंच ते शक्य आहे.. हे समजावं..
अचलदादा – बुवा, ‘कृष्ण बिंबे’ हे शब्दसुद्धा फार अर्थगर्भ वाटतात.. त्यातही बिंब हा शब्द फार विलक्षण आहे.. बिंब हा शब्द एकटा कधीच नसतो.. बिंब म्हटलं की पाठोपाठ प्रतिबिंब आलंच!
योगेंद्र – ओहो! (बुवांच्या चेहऱ्यावरही समाधान आहे)
अचलदादा – आरशात आपलं प्रतिबिंब उमटतं.. पाण्यात चंद्रबिंबाचं प्रतिबिंब उमटतं.. थोडक्यात बिंबानुसारच प्रतिबिंब असतं.. जर देहरूपी अंत:करणात कृष्ण बिंबत असेल तर जीवनातही त्याचंच प्रतिबिंब उमटेलच ना?
बुवा – फार छान.. फार छान..
अचलदादा – आमची स्थिती कशी आहे? तोंडानं जप करतो, पण जगण्यात समाधान नाही.. ज्याचं बिंब असेल त्याचंच प्रतिबिंब उमटणं स्वाभाविक असेल तर याचा अर्थ त्या साधनेचं सुखही आमच्या अंत:करणात बिंबत नाही, हाच आहे.. साधना वरकरणी सुरू आहे, आतून मन अस्थिर, अस्वस्थ, अशांत आणि असमाधानीच आहे म्हणून त्या अस्थिरतेचंच, अस्वस्थतेचंच, अशांतीचंच, असमाधानाचंच प्रतिबिंब जगण्यात उमटत आहे.. आमच्या माजघरी कृष्ण बिंबत नाही, म्हणून जगण्यातही कृष्णसुखाचं प्रतिबिंब उमटत नाही!! म्हणून ‘‘नित्यता पर्वणी कृष्णसुख’’ ही स्थिती नाही.. कृष्णसुखाच्या पर्वणीत नित्य काय, क्षणभरही रमणं नाही..
हृदयेंद्र – बिंब आणि प्रतिबिंबाचं हे रूपक अनेक सत्पुरुषांनी योजलं आहे.. आपल्या चेहऱ्यावर डाग असेल तर आरशातल्या प्रतिबिंबावरचा डाग पुसण्यानं तो डाग जाणार नाही! आपली साधना, आपली धडपड ही आरशावरच्या आपल्या प्रतिबिंबात सुधारणा करण्यासाठी वाया जात आहे.. दोष आरशात नाही, आपल्यातच आहे, ही जाणीवच नाही.. त्यामुळे वरवरचे बदल, वरवरचा देखावा यातच काळ जात आहे.. आंतरिक बदलासाठी एक पाऊलही टाकलं जात नाही..
बुवा – खरा सद्गुरू आणि खरा सद्शिष्य यांनाच बिंब आणि प्रतिबिंबाची उपमा अगदी योग्य आहे.. जसे रामदास स्वामी आणि कल्याण.. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद..
हृदयेंद्र – गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद बुवा.. उमदीकर महाराज आणि अंबुराव महाराज..
अचलदादा – आणि खरा सद्गुरू आणि खरा सद्शिष्य यांनाच बिंब आणि प्रतिबिंबाचं रूपक चपखल असलं तरी अखेर कितीही झालं तरी प्रतिबिंब हे काही अंशी उणंच असतं, हे विसरू नका.. अखेर सद्गुरू तो सद्गुरूच.. आणि खऱ्या सद्शिष्याचीही तीच भावना असते, असलीच पाहिजे.. विवेकानंद काय, कल्याण स्वामी काय, ब्रह्मानंद बुवा काय किंवा अंबुराव महाराज काय.. हे कितीही उत्तुंग पदाला पोहोचले तरी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सद्गुरूशरणता कधीच तसूभरही ढळू दिली नाही.. सगळं कर्तेपण सद्गुरूंचंच हीच त्यांची भावना होती.. बिंबामुळेच प्रतिबिंब आहे.. बिंब आहे म्हणूनच प्रतिबिंबाचं अस्तित्व टिकून आहे.. बिंबाशिवाय प्रतिबिंबाला अर्थ नाही, अस्तित्वच नाही.. जर देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण अर्थात सद्गुरू बिंबत नसेल तर जीवनात त्यांचं प्रतिबिंब उमटणार तरी कुठून? जर जीवनात सद्गुरूमयतेच्या सुखाची नित्यपर्वणी हवी असेल तर अंत:करणातून जगसुखाची आस सुटलीच पाहिजे.. जर अंत:करणात जगसुखाची आस आणि आसक्ती असेल तर जीवनातही त्याचंच प्रतिबिंब उमटत राहणार..

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता