गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। हा चरण हृदयेंद्रनं धीरगंभीर स्वरात म्हटला. तो म्हणताना आपलं लक्ष प्रज्ञाकडे होतं आणि सूक्ष्म वेदनेची रेष तिच्या चेहऱ्यावर उमटून गेल्याचंही त्याला जाणवलं. क्षणभर डोळे मिटून तो बोलू लागला..
हृदयेंद्र – गर्भ! माणसाच्या जीवनात आनंदाच्या म्हणून ज्या ज्या गोष्टी मानल्या जातात ना, त्यात मुलाचा जन्म, ही सर्वात मोठी आनंदाची आणि ते न होणं, ही सर्वात मोठी दु:खाची गोष्ट मानली जाते.. आज समाज प्रगत झाल्याचा किती का आभास असेना.. माणसाच्या सुख-दु:खाच्या कल्पनांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.. माणूस आयुष्यात सुखाच्या, आनंदाच्या गोष्टी तरी कोणत्या मानतो? शिक्षण पूर्ण होणं, नोकरी लागणं, लग्न होणं, पगार वाढणं, बढती मिळणं, नवं घर घेता येणं, मोटार घेता येणं.. याच आजही सुखाच्या कल्पना आहेत आणि या सर्वात सुखाची मोठी कल्पना कोणती? तर बाळाचा जन्म होणं.. अगदी त्याचप्रमाणे शिक्षणातल्या अडचणी, नोकरीतल्या अडचणी, लग्न जमण्यातल्या अडचणी, घर-गाडी घेता येण्यातल्या अडचणी.. याच दु:खाच्या कल्पना आहेत, पण त्यातही मूलबाळ न होणं, ही दु:खाची मोठी कल्पना आहे.. मूलबाळ झालं की घरादारातले असा काही उत्सव साजरा करतात की पृथ्वीतलावरचं हे पहिलंच मूल आहे आणि एखाद्याला मूलबाळ झालं नाही की असे शाब्दिक वेदनेचे कढ काढतात की जणू काही अवघी मनुष्यजातच आता लयाला चालली आहे!
योगेंद्र – पण आज दत्तक प्रथाही किती सकारात्मकतेनं स्वीकारली गेली आहे.. काहींनी तर मूल झालं तरी एक मूल दत्तक घेण्याची प्रथाही निर्माण केली आहे..
कर्मेद्र – हृदू, पण ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा शिरकाव आपल्याकडेही झाला असताना ही चर्चासुद्धा तुला बालीश वाटत नाही का?
हृदयेंद्र – पण आजही लग्न ही गोष्ट सार्वत्रिक आहे, तू सांगतोस त्या गोष्टी नव्हेत..
कर्मेद्र – पण लग्न झालेल्या जोडप्यापेक्षा अशा रिलेशनशीपमध्येही अधिक प्रेम असू शकतं की..
हृदयेंद्र – कर्मू, आपल्या चर्चेचा रोख प्रेम आणि लग्न किंवा लग्नाशिवायचं प्रेम हा नाही.. त्यावर स्वतंत्रपणे खूप चर्चा करता येईल.. काम आणि प्रेम याविषयी ‘भावदिंडी’ पुस्तकात चैतन्य प्रेम यांनी केलेली चर्चाही त्यासाठी तू जरूर वाच.. पण आपला आताचा मुद्दा प्रेम हा नाही, मूल हा आहे! तू सांगतोस त्या प्रथा सर्वमान्य किंवा सार्वत्रिक नाहीत, पण लग्न आहे! आणि त्यामुळेच लग्नाला चिकटलेल्या ज्या-ज्या गोष्टी आहेत त्याही कायम आहेत.. लग्नापाठोपाठ मूल होणं वा न होण्याशी जखडलेली माणसाची सुखाची आणि दु:खाची कल्पनाही कायम आहे.. सुनेला दिवस गेले की घरादारात काय आनंद निर्माण होतो! जणू असा आनंद या घरानं पूर्वी कधी अनुभवलेलाच नाही! मग तोवर सासूची भूमिका जगणारी स्त्रीही आईच्या भूमिकेत अलगद शिरते आणि आईपेक्षाही अधिक प्रेमानं सुनेचं लाडकोड पुरवू लागते.. आपल्याला अगदी चिरपरिचित या घटनेचाच आधार घेत तुकाराम महाराज अगदी वेगळ्या वाटेवर घेऊन जात आहेत.. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।।
कर्मेद्र – म्हणजे पोटातल्या बाळाच्या आवडीप्रमाणे आईला डोहाळे लागतात.. हे जर खरं असेल तर माझ्या आवडीप्रमाणे डोहाळे आईला लागायला हवे होते आणि तसं झालं असतं तर तिचं काही खरं नव्हतं! (सर्वचजण हसतात) पण तसं काही झालं नाही, त्यामुळे मला काय वाटतं की आवडीचे पदार्थ बसल्या जागी मनसोक्त खाता यावेत म्हणून बायकांनीच ही टूम काढली असावी! (पुन्हा सगळे हसतात आणि सिद्धी काहीतरी लटक्या रागानं सुनावतेही तोच खोलीत आलेल्या ख्यातिकडे पाहात कर्मेद्र म्हणतो..) आणि सुरुवातीला आईची आणि ख्यातिची तर भाषेची बोंब होती.. त्यामुळे हिनं काहीही खायची इच्छा व्यक्त केली ना की आई आनंदानं मोहरून जायची.. तिला बिचारीला सुरुवातीला माहीत नव्हतं की खादाडपणा हीच हिची खरी ख्याति आहे!
ख्यातिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सर्वाना हसू येतं त्याचवेळी हृदयेंद्र गंभीरपणे म्हणतो..
हृदयेंद्र – आता हसणं आवरा आणि थोडं गंभीर व्हा..!
कर्मेद्र – सॉरी.. सॉरी.. गंभीर व्हा रे.. आनंदावर चर्चा करायची आहे!!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा