कर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा. मग पत्रातली आधीची वाक्य डॉक्टर पुन्हा वाचू लागले. कर्मेद्रनं लिहिलं होतं.. ‘‘माझंही मन दगडीच झालंय की काय या जाणिवेनं मी अस्वस्थ होऊ लागलो ते या गप्पा सुरू झाल्या तेव्हा. हृदूच्या डोळ्यातून जेव्हा सहज आसवं गळत तेव्हा अभंगातली तीच वाक्यं मी पुन्हा पुन्हा वाचून पाही आणि मला नवल वाटे की माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी यावं इतकं त्या शब्दांत जे आहे ते मला का जाणवत नाही? त्यानंतर एकदा अचानक मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो. आम्हा काही मित्रांच्या ट्रस्टनं तिथं मोठी देणगी दिली होती. पण तिथं जातानाच जाणवलं समाजानं वाळीत टाकल्यागत शहरापासून अगदी दूर ही वस्ती आहे. प्रत्येकाची स्वत:ची कर्मकहाणी आहे आणि तिला निराशेचं, वैफल्याचंच अस्तर आहे. दररोज एकमेकांना पाहून जणू ही निराशाच त्यांच्या मनात खोलवर रुजत आहे. कुणीतरी भेटायला आलंय, या एकाच जाणिवेनं सगळे वृद्ध उत्सुकतेनं बाल्कनीत जमले होते. त्यांच्या डोळ्यांतले भाव पाहून मी थिजून गेलो. अस्वस्थ मनानं मी घरी परतलो. दोन दिवस सतत तेच चेहरे डोळ्यासमोर येत होते. तोच एक घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आमच्या एका भूखंडाचा वाद गेली कित्येक र्वष सुरू होता. त्याचा त्याच आठवडय़ात निकाल लागला आणि भूखंड माझ्या ताब्यात आला. मी ख्यातिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली. तिलाही ती खूप आवडली. माझ्या कल्पनेला मूर्त रूप आलं तर त्या जागेवर आता चार मजली प्रशस्त इमारत उभी राहील. तिच्या तळमजल्यावर सभागृह असेल. जे छोटे समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांना देता येईल. त्यातूनही उत्पन्न मिळेल. आवारात मुख्य रस्त्यालगत काही दुकानं असतील. ज्यात औषधं, पुस्तकं, केशकर्तनालय, घरगुती भोजनालय अशांना प्राधान्य मिळेल. पहिल्या मजल्यावर मिनी थिएटर आणि प्रशिक्षण केंद्र असेल. दुसऱ्या मजल्यावर पाळणाघर असेल. चौथ्या मजल्यावर वृद्धाश्रम असेल. शहराच्या मध्यवस्तीत! लोकांपासून न तुटलेला.. इथले वृद्ध मनात आलं तर मिनी थिएटरमधल्या दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकतील. पाळणाघराच्या माध्यमातून त्यांना दिवसा का होईना ‘नातवंडां’चं सुख मिळेल आणि चिमुकल्यांनाही आजी-आजोबांचं! प्रशिक्षण केंद्रात एखाद्या आजीबाई पुरणपोळीपासून विसरल्या गेलेल्या पदार्थापर्यंत काय-काय शिकवू शकतील. लहान मुलांचे संस्कार वर्ग, स्तोत्र शिकवणं, हेही कुणी कुणी करू शकेल. या सर्व उपक्रमांत प्रशिक्षक आणि सेवकवर्ग असेलच, पण आश्रमातल्या आजी-आजोबांनाही त्यात स्वेच्छेनं सहभागी होता येईल. त्यामुळे समाजापासून दुरावल्याचं नैराश्य त्यांच्यापासून दुरावेल, असं वाटतं. आणि हो, मी दिवास्वप्न कधीच बघत नाही. या सगळ्या योजनांचे आणि इमारतीचे आराखडेही तयार आहेत. ही योजना हृदयेंद्रलाही खूप आवडली. मला मिठी मारत तो म्हणाला, कम्र्या गाथांची पारायणं करूनही जी माणुसकी मी शिकलो नाही ती तुझ्यात उतरल्ये! पण खरंच.. माणुसकीसाठी पैसाच लागतो का हो? उलट गरिबातल्या गरीब माणसातली माणुसकी मी पाहिल्ये. माणुसकी हा मनाचाच धर्म असतो ना? आणि त्याच धर्माचा काय तो लोकांना विसर पडलाय समाजात धर्मप्रेम उतू जातंय, पण माणुसकी आणि खरी शुद्ध श्रद्धा वेगानं ओसरतेय. माझा एक डॉक्टर मित्र गोंदवल्यात जातो. तिथं त्याच्या शस्त्रक्रियेनं वाचलेला एक खेडूत समोरून येत होता. मंदिरातल्या सेवेकऱ्यानं त्याला सांगितलं, ‘‘तुला याच डॉक्टरांनी वाचवलंय.’’ तो खेडूत म्हणाला, ‘‘साहेब, यांनी ऑपरेशन केलंय, वाचवलंय महाराजांनी!’’ हा प्रसंग ऐकून मला वाटलं खरंच अडाणी माणसातही जी श्रद्धा आहे ती विद्वानांत का नाही? मी अडाणी आहे म्हणून हे म्हणतोय, असं मानू नका! जाऊ दे.. मी खूप भरकटलोय.. पण बघू. पुढच्या वर्षी हा वृद्धाश्रम सुरू झाला तर आमच्या वर्षभरातल्या गप्पांतून मी काहीतरी शिकलो, असं मला वाटेल. बाकी परमेश्वराची इच्छा..’’
कर्मेद्रचं पत्र संपलं. नरेंद्रांना खूप समाधान झालं. ‘‘माझ्याप्रमाणेच तुम्हीही तुमचं आयुष्य खरं जगू लागलात तर मला आनंद होईल’’, असं तेच कधीतरी कर्मेद्रला म्हणाले होते. त्याचं हे कृतीशील उत्तर होतं!
चैतन्य प्रेम

Story img Loader