या कृष्णरूपी सद्गुरूची भक्ती कशी करायची हे पुढल्या ओवीत सांगितलं आहे, असं म्हणून बुवांनी ती ओवी वाचली.. मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। मात्र विचारमग्न असलेल्या हृदयेंद्रनं बुवांची विचारसाखळी तोडत विचारलं..
हृदयेंद्र – आपली एक चर्चा अपुरी राहिली आहे.. दादा, बुवा या सगुण-निर्गुणाच्या अनुषंगानं तुम्ही क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुषाबद्दल काहीतरी म्हणालात..
बुवा – गीतेत अर्थात ज्ञानेश्वरीतही क्षर-अक्षर व उत्तम पुरुषाचं तपशिलात वर्णन आहे.. एक मात्र स्पष्ट केलं पाहिजे की, क्षर-अक्षर आणि उत्तम पुरुषाचं जे विवरण गीतेत आहे आणि त्यायोगे ज्ञानेश्वरीत आलं आहे, त्याची सांगड ‘सगुण’, ‘निर्गुण’ आणि ‘कृष्णमूर्ती’ या रूपकांशी घालणं फार नाजूक काम आहे.. याचं कारण ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।।’’ मध्ये सगुण, निर्गुण आणि कृष्ण या तिन्हींना माउली सद्गुरूरूपात पाहतात, तर गीतेत क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुषातला भेद हा केवळ ज्ञान, अज्ञान आणि पूर्णज्ञानाच्या पातळीवर आहे.. तरी एक गोष्ट खरी की सगुणाचा अर्थात आकाराचा प्रभाव असलेले जीव, निर्गुणाचा अर्थात आकाराचा प्रभाव मावळलेले जीव या जगातच असतात आणि हे दोघं जोवर ‘कृष्णमूर्ती’कडे, ‘पुरूषोत्तमा’कडे म्हणजेच सद्गुरूकडे पोहोचत नाहीत, तोवर वैकुंठाची खरी नित्य सुखपर्वणी शक्य नाही.. दादा तुम्ही एकदा क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुषाचं विवरण कराच..
अचलदादा – क्षर म्हणजे झरणारं, नष्ट होणारं अर्थात साकार-सगुण.. आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणारं, अर्थात निराकार.. निर्गुण! आणि यानंतर गीता ‘उत्तम पुरुषा’चं वर्णन करते.. तो पुरुषोत्तम म्हणजे सद्गुरूच! गीतेत भगवंत सांगतात, ‘‘द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च। क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते।।’’ माउली सांगतात.. ‘‘मग तो म्हणे गा सव्यसाची। पैं इये संसारपाटणींची। वस्ती साविया टांची। दुपुरुषीं।।.. अरे अर्जुना, या संसाररूपी नगरातील वस्ती स्वभावत:च अल्प अशा दोन पुरुषांची आहे.. ज्याप्रमाणे लख्ख सूर्यप्रकाशित दिवस आणि घन अंधकाराची रात्र ही येथेच अनुभवता येते.. हेच आकाश दिवसा सूर्यप्रकाशित आणि रात्री अंध:कारानं भरलेलं भासतं.. ‘‘जैसी आघवांचि गगनीं। नांदतें दिवोरात्री दोन्हीं।।’’ तसे या जगातच हे दोन पुरुषही एकाच ठिकाणी नांदत आहेत! ‘‘तैसे संसार राजधानीं। दोन्हीचि हे।।’’ हे दोन पुरुष म्हणजे क्षर आणि अक्षर.. साकार आणि निराकार.. सगुण आणि निर्गुण! ही सारी सृष्टी पहा.. दोनच मुख्य भेद तिच्यात आहेत. स्थूल आणि सूक्ष्म! जड आणि चेतन! जीवही जडच आहे.. वस्तुमात्रवत्च आहे.. म्हणूनच त्यात बदल, परिवर्तन, घट, झीज आणि नाश आहे.. हा ‘क्षर’ पुरुष कसा आहे? माउलींचे शब्द आहेत, ‘‘आंधळा वेडा पंगु!’’ तो ज्ञानदृष्टीहीन आहे. त्यामुळेच अज्ञानामुळे ‘मी’ आणि ‘माझे’चं वेड त्याला लागलं आहे. या ‘मी’ला जोपासणाऱ्या आणि ‘माझे’पणा वाढविणाऱ्या वस्तु, नावलौकिक, भौतिक स्थिती याशिवाय तो पंगु आहे! ‘अक्षर’ पुरुष कसा आहे? ‘‘सर्वागे पुरता चांगु।’’ त्याच्यात दृष्टीहीनता, भ्रम आणि उपाधींचं ओझं नाही.. तो ‘मध्यस्थ’ आहे, असं म्हटलंय.. क्षर म्हणजे देहबुद्धीचा साधक, अक्षर म्हणजे आत्मबुद्धीसाठी तळमळणारा मुमुक्षू आणि या दोहोंहून वेगळा.. ‘तिजा पुरुष’ जो आहे, तो म्हणजे परमात्मा.. सद्गुरूच!
बुवा – गीतेत भगवंत सांगतात, या दोहोंव्यतिरिक्त एक तिसरा उत्तम पुरुष आहे, त्याला परमात्मा म्हणतात.. पुढे भगवंत थेट सांगतात, ‘‘यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि च उत्तम:। अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोत्तम:।।’’ या क्षर आणि अक्षर यांच्याही मी अतीत आहे म्हणून मीच पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे! ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति!!’’..
क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष या अंगानं जो विचार केला, त्याची सगुण-निर्गुण आणि कृष्णमूर्तीशी सांगड घालणं सोपं नाही, असं हृदयेंद्रला वाटत होतं. त्यानं जिज्ञासेनं विचारलं.. ‘‘क्षर आणि अक्षर हे दोन्ही या सृष्टीच्या कक्षेतही आहेत.. त्याच्या अतीत असल्यानं परमात्मा उत्तम पुरुष आहे, हे खरं.. पण सगुणाप्रमाणेच निर्गुणही या सृष्टीच्या कक्षेत कसं? निर्गुण अर्थात निराकार हे सृष्टीपलीकडे नाही का?’’
चैतन्य प्रेम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा