नामाचं महात्म्य सांगताना चोखामेळा महाराज सांगतात की, नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी। पाप ताप नयनीं न पडेचि।। वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद। नामचि गोविंद एक पुरे।। नामानं वेदाचा अनुभवही येतो! बुवा भारावून म्हणाले..
बुवा – साधनेवरची काय तोडीची निष्ठा आहे पहा! मला सद्गुरूंनी जे साधन सांगितलं ते एकच साधन मी अत्यंत निष्ठेनं केलं.. त्या साधनेनं काय झालं? तर चोखामेळा महाराज सांगतात, वेदाचा अनुभव त्या नामानंच दिला.. शास्त्रांचा अनुवादही त्या नामानंच केला!
हृदयेंद्र – वेदाचा अनुभव एकवेळ समजतं, हा शास्त्रांचा अनुवाद काय असावा?
बुवा – वेदांना खरं काय सांगायचं आहे, शास्त्रार्थ खरा काय आहे, हे नामानं कळलं, हा अनुभव आहे त्यांचा! तुकाराम महाराजांनीही किती ठामपणे सांगून ठेवलंय की, वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वहावा भार माथां! हृदयेंद्र जरा तुकाराम महाराजांच्या गाथेत पहा बरं..
हृदयेंद्र – (तुकाराम महाराजांची गाथा हाती घेऊन मागील परिशिष्टातून अभंग क्रमांक शोधतो आणि मग वाचू लागतो..) हं १५४९व्या क्रमांकाचा अभंग आहे.. ऐका.. वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं। भार धन नाही मजुरीचे।। उत्त्पत्ति पाळण संहाराचे निज। जेणें नेलें बीज त्याचे हातीं।। तुका म्हणे आम्हां सांपडलें मूळ। आपणचि फळ आलें हातां।।
बुवा – चोखामेळा महाराज सांगतात, ‘‘वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद। नामचि गोविंद एक पुरे।।’’ एका नामानं वेदाचा अनुभव आम्हाला आला, शास्त्रांचा अनुवाद उमगला.. तुकाराम महाराज म्हणताहेत, वेदांचा अर्थ केवळ आम्हालाच उमगला, इतर व्यर्थ ज्ञानाचे भारे वाहवून अर्थ लावताहेत! तुकोबांना उमगलेला अर्थ आणि चोखोबांना आलेला वेदानुभव हे समान पातळीवरचेच आहेत..
कर्मेद्र – पण वेदांचा अर्थ असा आहे तरी काय? आमच्या घरी सातवळेकरांचे वेदाचे ग्रंथ होते.. त्यात श्लोकांचा अर्थ खाली दिला होताच..
बुवा – हा झाला सर्वसाधारण अर्थ.. पण वेदांचा जो गूढार्थ आहे, तो केवळ भगवंताशी जे अनन्यपणानं जोडले गेले, त्यांनाच उमगतो, ही तुकोबांची स्पष्ट घोषणा आहे! माणूस ज्या दिव्यत्वाचा अंश आहे त्या दिव्यत्वाकडे माणसाला वळवणे, हा वेदांचा हेतू आहे..
ज्ञानेंद्र – पण वेदांची काही अंगं अशीही आहेत ज्यात पूर्ण भौतिकता आहे.. भौतिक समृद्धीच्या प्रार्थना आहेत आणि अथर्ववेदात तर कथित संकटांवरचे दैवी उपायही आहेत आणि आयुर्वेदही आहे.. सामवेदात भारतीय संगीताचा उगम आहे, यजुर्वेदात विविध देवतांसाठी करायच्या यज्ञांचा तपशील आहे आणि ऋग्वेद हा तर विविध देवतांच्या स्तुतीमंत्रांनी भरला आहे.. थोडक्यात सगळे वेद हे त्या काळातील माणसाला कर्मकांड, प्रथा, दैवी उपाय आणि आरोग्य अर्थात शरीराची जोपासना हेच शिकविणारे होते..
अचलदादा – म्हणूनच तर वेदांचा अर्थ आणि अनुभव केवळ आम्हीच जाणला, असं संत सांगतात ना? कारण वरकरणी भौतिक वाटणाऱ्या बोधातही सखोल असा आध्यात्मिक अर्थ असतोच, नव्हे आहेच. हा आध्यात्मिक अर्थ उपनिषदांनी अधिक स्पष्ट करून सांगितला..
बुवा – म्हणून तुकाराम महाराजही काय सांगतात? ‘‘खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं। भार धन नाही मजुरीचे।।’’ खाण्यात जी गोडी आहे ती पदार्थ नुसता पाहण्यानं अनुभवता येत नाही! म्हणजेच पदार्थ पाहून त्याची गोडी कळत नाही, तो चाखूनच ती कळते..
हृदयेंद्र – पण ‘भार धन नाही मजुरीचे’ म्हणजे काय हो?
बुवा – (हसतात) म्हणजे एखाद्या श्रीमंताच्या सुवर्णमुद्रांच्या थैल्या एखाद्या मजुरानं कितीही वाहून नेल्या तरी त्याला त्याची मजुरी जी ठरली आहे तेवढीच मिळते! त्याला काही सुवर्णमुद्रा मिळत नाहीत.. तसा वेदांचा शाब्दिक अर्थ जे नुसता वाहून नेतात त्यांना त्याच्या अर्थानुभवाचा लाभ काही मिळत नाही!
हृदयेंद्र – श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत, आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशीयात्रेचे पुण्य मिळत नाही!
चैतन्य प्रेम
१९०. अर्थभार
नामाचं महात्म्य सांगताना चोखामेळा महाराज सांगतात की, नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी।
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 29-09-2015 at 00:15 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual