प्रपंच मोहळात गुंतलेलं मन नाममोहळात गुंतलं तर बंधनातून मुक्त होईल, असं म्हणत हृदयेंद्रनं सहजच कर्मेद्रकडे नजर टाकली. त्याच्या विचारमग्न चेहऱ्याकडे त्यानंही प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. कर्मेद्रचंही हृदयेंद्रकडे लक्ष गेलं आणि तो म्हणाला..
कर्मेद्र – ज्या चोखोबांच्या अस्थिंमधूनही विठ्ठलाचं नाम निघत होतं आणि हे विठ्ठलानंच सांगितलं. तर मग चोखोबांच्या अस्थि आणायला पाठविण्याऐवजी ती तटबंदी कोसळत असताना त्यांना वाचविण्यासाठीच विठोबानं धाव का नाही घेतली? (हृदयेंद्र उसळून काही बोलू पहात असतानाच) हे बघं.. तुझा नेहमीचा युक्तिवाद मला सांगू नकोस की नाम हे निष्काम भावनेनंच घ्यायचं असतं.. कारण नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहे, अशी ग्वाही भगवंत देतो, म्हणून नाम घ्या, असा प्रचार तुम्हीच करता.. मग इथे देव त्याच्यामागे का उभा राहिला नाही?
ज्ञानेंद्र – वा वा.. हृदू कर्मूच्या बोलण्यात तथ्य आहे.. म्हणजे इथं विठ्ठलानं काहीतरी चमत्कार करून चोखोबांना वाचवायला हवं होतं, असं मला म्हणायचं नाही. पण जे घडणार असतं तेच घडतं तर मग ते घडू नये यासाठी साधनेत मन विलीन करा, या प्रचाराची गरज काय?
योगेंद्र – पण साधनेत सकामता नसलीच पाहिजे.. योग हा परिस्थिती नव्हे आपल्यात पालट घडवतो..
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. साधना ही मृत्यू टाळण्यासाठी आहे, असं कुणी कधी म्हटलंय? साधना ही संकट टाळण्यासाठी आहे, असं कुणी कधी म्हटलंय? साधनेनं खरं भान येतं. आपल्याच जगण्याकडे अंतर्मुख होऊन पाहाता येतं. साधनेनं परिस्थिती पालटत नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहाण्याची मनाची दृष्टी पालटते. मृत्यू टळत नाही, पण मनातली मृत्यूची भीती लोप पावते. जो जन्मला आहे त्याला मृत्यू अटळ आहे.. पण जो जन्मला आहे, त्याच्या जगण्याला साधनेनं अर्थ येतो.. बरं ही घटना घडली म्हणून सोयराबाई, बंका, कर्ममेळा यापैकी कुणीही विठ्ठलावर दोषारोप केलेला नाही.. याचं कारण जगण्याचं आणि मरणाचं वास्तवही चोखोबांकडूनच त्यांच्यात उतरलं होतं.. चोखोबांचा एक फार छान अभंग आहे.. तोच ऐका..
फुलाचे अंगा सुवास असे। फूल वाळलिया सुवास नासे।। मृत्तिकेचे घट केले नानापरी। नांव ठेविलें रांजण माथण घागरी।। विराली मृत्तिका फुटलें घट। प्राणी कां फुकट शोक करी।। चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं। विवेकी तये ठायीं न गुंतेची।।
योगेंद्र – वा! पहिला चरण तर फारच सुंदर आहे..
हृदयेंद्र – पहिलाच नव्हे, प्रत्येक चरण सुंदर आहे.. फुलात सुगंध असतो, पण कधीपर्यंत? तर फूल जिवंत आहे तोपर्यंत! फूल वाळलं की सुवास गेला.. मातीची अनेक प्रकारची भांडी घडवली जातात.. आपण त्यांना नाव ठेवतो.. हा रांजण.. हा माठ.. ही घागर.. भांडं जुनं झालं.. माती विरू लागली की घट फुटतात.. त्यांचा कुणी शोक का करतो? कालपरत्वे वस्तुची झीज झाली वा नाश झाला तर माणसाला थोडं दु:खं होतं, पण त्यासाठी कोणी शोक करीत नाही, आक्रोश करीत नाही.. माठ फुटला, तर त्याचा काही उपयोग आहे का? मातीच आहे झालं.. मातीतच टाकून देतात.. मातीचं भांडं फुटलं, मग तो रांजण असो, माठ असो की घागर असो.. शेवटी त्या सगळ्यांची किंमत एकच.. माती! मग ही जाणीव ‘माणूस’ गेल्यावर का ढासळते? माझा मुलगा गेला.. माझी बायको गेली.. माझा अमुक गेला.. माझा तमुक गेला.. किती आक्रंदन? किती पोकळी?
ज्ञानेंद्र – जे. कृष्णमूर्ती म्हणत की माणूस गेल्यावर आपण रडतो ते त्याच्यासाठी नव्हे! ते रडणं आपल्याचसाठी असतं.. आधार गमावल्याचं दु:खं अधिक असतं..
हृदयेंद्र – पण जो विवेकी आहे त्याला सर्व जगच मृगजळवत् वाटत असतं.. एकदा मृगजळाची जाणीव झाली की ‘पाणी आहे’, म्हणून आनंदही होणार नाही की ‘पाणी नाही’, या जाणिवेनं दु:खंही होणार नाही! तसं माणूस गेल्याचं वास्तव तो सहजतेनं स्वीकारेल..
कर्मेद्र – म्हणजे तो दगडी मनाचाच असेल..
हृदयेंद्र – नव्हे.. तो जो गेला आहे त्याच्या हितासाठीच प्रार्थना करील आणि जो आहे त्याच्या हिताची चिंता वाहील! जन्माचं खरं हित भगवंताचं होण्यात आहे.. हे हित प्रत्येकाला साधता यावं, यासाठीच तो जगत राहील आणि त्याचं मरणही तीच प्रेरणा देईल..
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा