रविवारची प्रसन्न सकाळ. समुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते. विठ्ठलदादांकडे पाहत योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र : हं बुवा, आज अखेरचा चरण.. ‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।’
बुवा : या चरणाचा विचार करण्याआधी हा अभंग
हृदयेंद्र तुम्ही परत एकदा म्हणा..
हृदयेंद्र : (टिपलेल्या अभंगाचा कागद हाती घेत गंभीर स्वरात पारंपरिक चालीत म्हणू लागतो..) ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट! नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।’ (काही क्षण नीरव शांतता पसरते. तिचा भंग करीत..) यात ‘नित्यता’ हा शब्द दुसऱ्या आणि चौथ्या चरणात, असा दोनदा आला आहे!
बुवा : बरोबर! आणि या प्रत्येक चरणाला, त्या चरणात वर्णिलेल्या स्थितीला चढत्या क्रमाचा स्पर्श आहे! (हृदयेंद्र, योगेंद्रचा चेहरा प्रश्नार्थक बनला आहे.) बघा. वैखरी,मध्यमा, पश्यन्ती आणि परा ही वाणीची चार अंगं आहेत. वैखरी म्हणजे व्यक्त. आपण जी उच्चारतो ती. हे वाणीचं सर्वात स्थूल रूप असलं तरी तिचा उगम सूक्ष्मात असतो! दिसताना दिसतं की या तोंडातून उच्चार होत आहे, पण तरी तिचा उगम आत कुठे तरी आहे, हे जाणवतंच. तर या अभंगाचा पहिला चरण हा वैखरी स्थितीचा आहे! सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सावळी विराजे कृष्णमूर्ति!! भगवंताचं मनोहर रूप दिसतंही आहे, पण त्या चेहऱ्यावरच्या दिव्यत्वाला आकार नाही! त्या रूपातून प्रस्फुटित होत असलेल्या माधुर्याला, प्रसन्नतेला आकार नाही.. चौकट नाही.. मर्यादा नाही!
हृदयेंद्र : वा!
बुवा : पुढची स्थिती मध्यमेची. म्हणजे तोंडातून उच्चार नसतो, पण मनात, अंत:करणात शब्दरूप उमटत असतं. ‘‘मन गेले ध्यानी कृष्णचि नयनी। नित्यता पर्वणी कृष्णसुख।।’’ नामाचा उच्चार सुरू नाही, पण आतल्या आत त्या नामाचं, त्या सद्गुरूचं दिव्य स्मरण अखंड सुरू आहे.. ध्यानात मन रमलंय.. आणि हे ध्यान म्हणजे एका जागी बसून केलेलं नव्हे बरं का.. चालतं बोलतं ध्यान आहे हे..
कर्मेद्र : चालतं-बोलतं ध्यान? म्हणजे?
बुवा : अहो माणूस प्रेमात पडलाय किंवा काळजीत पडलाय तर सर्व व्यवहार सुरू असतानाही त्या प्रेम विषयाचं किंवा चिंतेचं अवधान अंत:करण व्यापून असतं ना? तसं ध्यान.. त्या ध्यानात मन गेलंय, इंद्रियांना होणारी प्रत्येक जाणीव सद्गुरुमय आहे, ही मध्यमेची स्थिती.. ती नित्य टिकली, स्थिरावली तर कृष्णसुखाची पर्वणी आहे!
हृदयेंद्र : आता तिसरी स्थिती पश्यन्तीची!
बुवा : पश्यन्ती कशी असते? वैखरी ही व्यक्त आहे, मध्यमा ही बाह्य़त: नसली तरी आत व्यक्त होत आहे. पश्यन्ती ही स्फुरण मात्र आहे! आध्यात्मिकदृष्टय़ा हृदयातून स्फुरण होतं ना? म्हणून पश्यन्तीची स्थिती तिसऱ्या चरणात आहे.. ‘‘हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।’’ हृदय आणि सर्व इंद्रियं, अंत:करण जिथं एकवटलं आहे असं मनाचं जे मंदिर आहे, मनाचा जो गाभारा आहे तिथं सद्गुरू प्रेम बिंबलं आहे! सद्गुरू प्रेम, सद्गुरू भक्ती स्फुरत आहे.. आणि परा ही सर्वापलीकडची सद्गुरू ऐक्यतेची अखंड स्थिती! आपल्या मूळ स्वरूपाशी अखंड ऐक्य होणं.. एकच एक होणं.. ही परेची स्थिती चौथ्या चरणात आली आहे म्हणून तिचा प्रारंभच सद्गुरू स्पर्शित आहे.. ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट।’ सद्गुरूंनी प्रपंचप्रवृत्त अशा मला निवृत्त केलं आहे आणि आत्मज्ञानाची सोपी वाट खुली करून दिली आहे.. त्यामुळे आता नुसती पर्वणी नव्हे ‘वैकुंठा’ची नित्यता जगण्यात पदोपदी, कणाकणांत भरून राहिली आहे!
– २५०. चार चरणांची स्थिती!
समुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 23-12-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stage of four steps