वाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही. तिला मजकुराच्या लक्षवेधी आशयाची जोडही आवश्यक असते. जेव्हा आकार आणि आशय हे मजकुरात एकरूप होतात तेव्हा आशय मनापर्यंत सहजपणे पोहोचतो.
काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने आपल्या कुटुंबीयांशी माझी देवनागरी मुद्राक्षरविद्य्ोत डॉक्टरेट संपादन केलेला म्हणून ओळख करून दिली. पण त्याच्या वयोवृद्ध वडिलांवर याचा फारसा प्रभाव पडलेला दिसला नाही, संशय व्यक्त करीत त्यांनी विचारले, ‘‘अक्षरांचे डॉक्टर? म्हणजे तुम्ही काय करणार? अक्षरांसाठी रुग्णालय उभारणार आहात की काय?’’ त्यांचा प्रतिसाद खोचक आणि मार्मिक होता आणि त्यांच्या विचारातल्या टोकाच्या उपयुक्ततावादाचे महत्त्व मला जाणवत होते. त्यांच्या विचारांतून एक गोष्ट स्पष्ट होत होती की, बहुतांश वाचकांना मजकुरातील अक्षराकारांची दृश्य वैशिष्टय़े जाणवत नाहीत आणि त्यामुळेच मजकुराच्या जुळणीसाठी कोणता टंक (फॉन्ट) वापरला आहे याने त्यांना फारसा फरक पडत नाही. किंबहुना बहुतांश लोकांचे टंकाच्या अक्षरआकारांकडे दुर्लक्षच होत असते. एखाद्या टंकात द ची गाठ लहान असली, क चे पोट मोठे असले किंवा त्याचा तोल गेलेला असला, ऱ्हस्व इकाराच्या मात्रा दंडापर्यंत पोहोचल्या नाहीत, उकाराच्या, एकाराच्या मात्रा दंडाला नीट जुळल्या नाहीत तरीही बहुतांश वाचकांच्या हे लक्षात येत नाही. आपल्या अक्षरांवर आपण अनेक आघात सहन करू शकतो, मजकूर वाचता आला की पुरेसे असते, कारण माणसाच्या मनात विकृतीकडे दुर्लक्ष करून टंकाच्या अक्षरआकारांचा बोध करण्याची क्षमता असते.
मुद्रण तंत्रज्ञान भारतात येऊन सुमारे ४५० वष्रे झाली, तरीही आजपर्यंत या व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या कार्यक्षेत्राला मराठी शब्दकोशात सर्वसंमत असे शब्दसुद्धा सापडत नाहीत. या क्रियेसाठी मुद्राक्षरकला, मुद्रणयोजन, अक्षररचना, मुद्राक्षरविद्या, मुद्रणकला असे वेगवेगळे शब्द आढळतात, तसेच या व्यक्तींना मुद्रारचनाकार, अक्षरमांडणीकार, मुद्राक्षरतज्ज्ञ, अक्षररचनाकार, अक्षरशैलीकार इत्यादी नावे दिलेली सापडतात. मूळ संकल्पनांच्या शब्दावलीतच इतका गोंधळ आहे तर इतर विवक्षित संकल्पनांना तर शब्दच सापडत नाहीत. अक्षरांशी संबंधित असलेल्या व्यवसायांसंदर्भातील अनुपयोजन, अज्ञान आणि शब्दावलीचा अभाव यांची ही शोकांतिका आहे. या व्यक्तींना काय म्हणावे यापेक्षाही त्या व्यक्ती कोणत्या तऱ्हेच्या प्रश्नांशी झटय़ा घेत असतात हे समजणे अधिक महत्त्वाचे आहे.
साधारणत: दोन प्रकारचे टंक आढळतात. मजकुरासाठीचे टंक हे प्राधान्याने लहान आकारमानात वापरण्यात येतात आणि ते मजकूर सलग वाचता यावा यासाठी तयार केलेले असतात. दर्शनी टंक हे मुख्यत्वे मोठय़ा आकारमानात वापरण्यात येतात आणि मजकुराच्या लहान अंशांसाठी (उदा. शीर्षके) वापरण्यात येतात. पुस्तकासाठीच्या मुद्राक्षररचनेत मुख्यत्वे मजकुरासाठीचे टंक वापरण्यात येतात आणि त्यांचा वापर हा भित्तिपत्रकांसाठीच्या अक्षरमांडणीहून किंवा नामफलकांच्या अक्षरमांडणीहून वेगळा असतो. सलग वाचन करताना लक्ष वेधण्याच्या हेतूने तयार केलेले दर्शनी टंक इथे कामाला येत नाहीत.
टंकांची निवड आणि मजकुराची मांडणी या गोष्टी कशा तऱ्हेने करतात?
स्थूलमानाने याबाबत दोन विचारधारा आढळतात. पहिल्या तऱ्हेचा विचार काहीसा सोपा आहे. हा आधुनिकतावादी, कार्यात्मक दृष्टिकोन आहे. मुद्राक्षरकलेतील आणि दृश्यकलेच्या रचनेतील तटस्थता, पारदर्शकता आणि अदृश्यता या तत्त्वांचा पुरस्कार करणारी ही विचारधारा आहे. शक्य तितक्या तटस्थपणे विचार, कल्पना, प्रतिमा एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे अक्षरे आणि मुद्रण यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे, असे हा कार्यात्मक दृष्टिकोन मानतो. लाघव (कमीत कमी गोष्टींचा वापर), स्पष्टता आणि सुवाच्यता यांना या विचारात विशेष महत्त्व आहे. रचना जितकी साधी तितकी ती उत्तम. हा सध्या प्राधान्याने प्रचलित असलेला विचार आहे. जाणता-अजाणता, प्रकाशक हे मूळ मजकुराच्या सुवाच्यतेवरच सर्वस्वी भर देतात तर अक्षरमांडणीच्या अभिव्यक्तीवर ते भर देत नाहीत.
आपण वाचत असतो तेव्हा आपण मजकुरात गुंगून जातो. आपले देहभान हरपते. केवळ भोवतालच्या जगाचीच जाणीव लोपते असे नाही तर शब्द, मजकूर आणि छापील पृष्ठे यांचेही भान हरपते. त्यामुळे वाचक हा मजकुरात सहजच दिसेनासा होतो आणि अक्षरेही दिसेनाशी होतात. ही वाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही. तिला मजकुराच्या लक्षवेधी आशयाची जोडही आवश्यक असते. जेव्हा आकार आणि आशय हे मजकुरात एकरूप होतात तेव्हा आशय मनापर्यंत सहजपणे पोहोचतो. आशय थेट पोहोचण्यासाठी अक्षरे शक्य तितकी तटस्थ असावीत; म्हणजे त्यांना स्वत:चा अर्थ असू नये, अर्थ हा मजकुराच्या आशयाला असणे अपेक्षित असते, अक्षराच्या आकारांना तो नसावा. रचना करताना आत्माभिव्यक्ती नव्हे तर तटस्थता हे रचनाकाराचे उद्दिष्ट असावे लागते. त्यामुळे अडथळा न आणता शक्य तितक्या लवकर मजकुरातून आशय थेट मनात पोहोचवण्याला साहाय्यभूत होऊन रचना विलीन झाली पाहिजेत हे या कार्यात्मक विचारधारेचे मूळ उद्देश व तत्त्व आहेत.
बाजूला दिलेली अक्षरे पाहावी, जर ही अक्षरे खोलीवरील पाटीवर लिहायची असतील तर वरीलपकी कोणता टंक निवडला याला बहुधा महत्त्व असणार नाही. अशा प्रसंगी खोलीची माहिती पुरवणे एवढेच उद्दिष्ट असते आणि अक्षरे मोठी, दिसण्याजोगी आणि सुवाच्य असली म्हणजे अक्षरांच्या निवडीचा प्रश्न उरत नाही (उरला तरी तत्त्वचच्रेपुरताच राहतो). पण अक्षरांचे आकार आणि मुद्राक्षररचना या खरोखरच तटस्थ असू शकतात का? हा प्रश्न आहे. उदाहरणच घ्यायचे तर यापकी एक टंक इमारतीच्या नामफलकासाठी निवडायचा ठरवला आणि ती इमारत एखाद्या भारतीय कलासंग्रहालयाची, पारंपरिक भारतीय वास्तुरचनेची इमारत असली तर वरीलपकी पारंपरिक, बोरूने काढलेल्या अक्षराच्या शैलीतला, उजवीकडचा टंक निवडण्यात येईल. ही निवड अगदी स्वाभाविक आणि सहजोत्स्फूर्त ठरेल. पारंपरिक पाश्र्वभूमीवर पारंपरिक वळणाचा टंक वापरणे आपल्याला अधिक औचित्यपूर्ण वाटते.
या साध्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की, कोणतीही रचना निवडणे हे सर्वस्वी तटस्थ असू शकत नाही. रचना ही व्यक्तिसापेक्ष असते आणि तटस्थ शैली निवडण्यालाही इतर काही अर्थ असतात आणि ते अर्थही कालानुरूप बदलतात. किंबहुना प्रत्यक्ष टंकाचा अर्थही पालटतो. हीच दुसऱ्या विचारधारेची प्रमुख भूमिका आहे. या भूमिकेला आधुनिकोत्तरवादी आणि अभिव्यक्तिवादी विचारधारा म्हणता येईल. या विचारधारेनुसार अक्षरांना स्वाभाविकपणे अर्थ असतात आणि आकार हे मजकुराच्या भावनिक आणि अभिव्यक्तिरूप पलूंचे वाहक आणि संवर्धक असतात. जर मुद्राक्षरकला आणि अक्षराकार हे अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा वेगळे अर्थ स्वभावत:च देतात, असे आपण मानत असू तर या अर्थावर नियंत्रण ठेवता येईल का? आपल्याला या कल्पक साधनांचा वापर मजकुरातून जे व्यक्त होते त्यापेक्षा अधिकचे काही व्यक्त करण्यासाठी करता येईल का? या भूमिकेत रचनाकाराला महत्त्व लाभते. तो अर्थनिष्पत्तीचा नियंता ठरतो. तो अर्थ संक्रमित करतो आणि संदेश-घडणीत आणि अर्थनिष्पत्तीत सहभागी असतो. तो मजकुराचा अर्थ लावतो आणि संदेशाचा आपल्याला आकळलेला अर्थ ठळक करण्यासाठी तो आकारांचा उपयोग करून घेतो.
अक्षरांच्या भावदर्शी गुणांची खूप उदाहरणे दर्शनी टंकांमध्ये पाहायला मिळतात. नाटकांच्या, चित्रपटांच्या नामफलकांवर व पुस्तकांच्या आणि मासिकांच्या मुखपृष्ठांवर आपल्याला ती दिसतात. दृश्य आकार आणि अर्थ यांच्यातील क्रीडेला नेटक्या व्याकरणाची आणि आगळ्या कल्पकतेची आवश्यकता आहे. एखाद्या सामाजिक परिस्थितीतील वापराच्या संदर्भाशी टंक स्वभावत:च अभिन्न असतात, असे म्हणून टंकांकडे पाहायला हवे आणि उपलब्ध सामाजिक-विचारांच्या बंधरचनेचा वापर करून घेतला पाहिजे किंवा तिला आव्हान दिले पाहिजे. काळाच्या विविध टप्प्यांवर आपण विविध माध्यमांचा लेखनासाठी वापर करीत आलो आहोत – पाषाण, झाडांच्या साली, धातूचे पत्रे, कापड, कागद आणि आता (विद्युत) पडदा; पण जर या सर्व माध्यमांतून लिहिण्याचा संवाद/ संप्रेषण हाच समान उद्देश असेल तर इथे उपस्थित केलेले प्रश्न जुन्या आणि नव्या अशा दोन्ही माध्यमांना लागू होतील.
काही रचनाकार सुवाच्यता हीच आपली मर्यादा मानतात. हा निर्णय ते जाणीवपूर्वक घेतात किंवा अजाणतेपणे. काही सुवाच्यतेलाच संवाद समजण्याची चूकही करतात, पण अधिक साहसी रचनाकार हे अक्षराकारांतील अर्थ हुडकण्यासाठी सतत झटत असतातच. किंबहुना आकारांचा पुरेसा वापर होत नाही याचे कारण केवळ कल्पकतेचा अभाव नसून तो अभिव्यक्तीचा अपुरेपणा आहे. मुद्राक्षरकलेचे क्षेत्र विस्तारायचे असेल तर या क्षेत्राविषयी अधिक जागृती व्हायला हवी. टंकांच्या क्षेत्रातील मिथके, विधिविधाने, परंपरा निर्माण करून त्याआधारे हे क्षेत्र विस्तारायला हवे आणि टंकांच्या विविध वापराच्या अधिकाधिक शक्यता पडताळून पाहायला हव्यात. अक्षराकारांच्या वापराच्या विविध शक्यता आणि त्यांतील अडचणी हेरणारी कल्पकता असलेले लेखक आपल्याकडे आहेत का? हाच एक प्रश्न आहे.
गिरीश दळवी
लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी – इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) प्राध्यापक आहेत.
girish.dalvi@gmail.com