मोबाइल फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे, की कामचलाऊ इंग्रजी वाचता आले तरी ते पुरेसे असते. याउलट अस्खलित मराठी बोलणाऱ्या अनेकांना ते ज्ञान फोनवरचा संवाद समजण्यासाठी अपुरे पडते.
२००७ सालची गोष्ट. माझ्या आईला एक मोबाइल फोन घ्यायचा होता. मी विचार केला की, आईसाठी फोन छोटा हवा. त्यावरची अक्षरे मात्र मोठी हवीत. फोन चालू राहिला की बंद झाला ते लगेच कळायला हवे. शक्यतो फोन ‘घडीचा’ हवा होता म्हणजे ठेवायला छोटा, वापरायला मोठा, उघडला की चालू, बंद की बंद आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फोनचा संवाद (इंटरफेस) मराठीत साधता यावा. अनेक दुकाने धुंडाळून शेवटी एक मनासारखा फोन मला सापडला. फोन भेट दिल्यानंतर दोन दिवसांनी आईला विचारले, फोन आवडला का? आई म्हणाली, ‘‘फोन मस्तच आहे रे. फक्त त्याचा मेन्यू तेवढा इंग्रजीत करून दे. हे मराठी संवाद मला समजतच नाहीएत.’’
झाले? माझी आई पुण्यात रहाणारी, नियमितपणे मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचणारी, रोज मराठी मालिका पहाणारी, मराठी माध्यमात शिकलेली, मराठीत संतवाङ्मय हा विषय घेऊन एम. ए. झालेली, अशी अस्सल मराठी उपयोक्ती आहे. इंग्रजीपेक्षा मराठीवर तिचे जास्त प्रभुत्व आहे. मग फोनवरचे मराठी संवाद तिला अवघड का जात होते?
फोन, संगणक, टॅब्लेट, इंटरनेटवरील संकेतस्थळे व अन्य अन्योन्यसक्रिय (इंटरॅक्टिव्ह) वस्तू जगभर विकल्या, वापरल्या जातात. प्रत्येक बाजारपेठेच्या स्थानीय गरजांप्रमाणे त्यांचे अभिकल्प (डिझाइन) बदलले जाते. या प्रक्रियेला स्थानिकीकरण (लोकलायझेशन) असे म्हणतात. रंगसंगती, अभिव्यक्ती, सणवार, सुट्टय़ा इत्यादी अनेक गोष्टींचे स्थानिकीकरणात महत्त्व असले, तरी संवादांत वापरलेल्या शब्दांचे योग्य, सुलभ भाषांतर ही स्थानिकीकरणाची पहिली पायरी आहे. भारतीय बाजारात भाषांतर न झालेल्या अनेक अन्योन्यसक्रिय वस्तू तर उपलब्ध आहेतच; पण ज्या वस्तू स्वत:ला ‘भारतीय बाजारपेठेसाठी स्थानिकीकृत’ म्हणवतात त्यांची वापरयोग्यता (युजेबिलिटी)देखील समाधानकारक नाही.
आमच्या चमूतल्या काही संशोधकांनी या विषयावर संशोधन सुरू केले. पुढे आम्ही ‘मोबाइल फोनवरील शब्दांच्या सुलभ मराठी भाषांतराची तत्त्वे’ या शीर्षकाचा एक शोधनिबंधदेखील लिहिला. त्या शोधनिबंधातील काही मुद्दे या लेखाच्या निमित्ताने परत मांडत आहे.
संशोधनाच्या सुरुवातीला एक सर्वेक्षण केले. महाराष्ट्रातील ६ गावांतील ४० मोबाइलधारकांशी आम्ही बोललो. त्यात इयत्ता चौथीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या लोकांपासून पदवीधरांपर्यंत सर्व स्तरांपर्यंत शिकलेले लोक सहभागी होते. सर्व जणघरी मराठी बोलत. फक्त ९ जण घराबाहेर (कामासाठी वगरे) इंग्रजी बोलत. ३३ जणघरी वृत्तपत्रे घेत, पण त्यापकी फक्त तिघेच इंग्रजी वृत्तपत्र घेत. टीव्हीवरील बातम्या ३५ जणबघत, त्यापकी चारच जण इंग्रजी बातम्या बघत. मात्र याच्या अगदी उलट मोबाइल फोनचा वापर होता. ४० पकी ३२ जण आपला फोन इंग्रजीत वापरत होते. त्यात दहावीपेक्षा जास्त शिक्षण असलेले सर्व २० जणआपला फोन इंग्रजीत वापरत होते. उरलेल्यांपकी फक्त ७ जण आपला फोन मराठीत आणि एक जण िहदीत वापरत होते. २७ लोकांनी इंग्रजीव्यतिरिक्त कुठलीही भाषा फोनवर एकदादेखील वापरून पाहिलेली नव्हती. ज्या १३ जणांनी पाहिली होती, त्यापकी ५ जणांनी फोन परत इंग्रजीत वापरायला सुरुवात केली होती.
या सर्वेक्षणावरून असा निष्कर्ष निघतो की, इतर व्यवहारांत प्रामुख्याने मराठी पसंत करणाऱ्या अनेक लोकांना फोनशी मात्र इंग्रजीतच संवाद साधावा लागतो. फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे, की कामचलाऊ इंग्रजी वाचता आले तरी ते पुरेसे असते. याउलट अस्खलित मराठी बोलता, वाचता येऊनदेखील अनेक लोकांना ते ज्ञान फोनवरचा संवाद समजण्यासाठी अपुरे पडते.
संशोधनाची पुढची पायरी म्हणून आम्ही एक प्रयोग केला. बाजारात उपलब्ध असलेल्या मोबाइल फोनवरील ३०० मराठी शब्दांची आणि वाक्प्रचारांची यादी आम्ही बनवली. प्रयोक्त्यांना ते शब्द आणि वाक्प्रचार समजायला अवघड का जात होते आणि त्यावर जास्त सुलभ प्रतिशब्द कोणते असू शकतात यावर विचारमंथन केले. मराठी उपयोक्त्यांच्या साहाय्याने त्यातील काही शब्दांच्या वापरचाचण्या घेतल्या. या चाचण्यांत वापरयोग्य ठरलेल्या शब्दांचे विश्लेषण करून सुलभ भाषांतराची तत्त्वे शोधून काढली.
पहिले तत्त्व हे की, अन्योन्यसक्रिय वस्तूंत शक्यतो बोली भाषेत रूढ असलेले शब्द वापरावेत- औपचारिक किंवा संस्कृतप्रचुर शब्द टाळावेत. उदाहरणार्थ, एका फोनवर ‘कळफलक सक्रिय’ असा स्थितीसूचक वाक्प्रचार होता. आम्ही त्याचा ‘कुलूप काढले’ असा सोपा अनुवाद केला. अनेक फोनवर ‘विकल्प’ हा शब्द होता. हा शब्द िहदीत जरी रूढ असला, तरी तो मराठीत तेवढा रूढ नाही. त्याचा आम्ही ‘पर्याय’ असा अनुवाद केला.
दुसरे तत्त्व हे की, अनुवादित करायचा शब्द नाम म्हणून वापरला आहे की क्रियापद म्हणून हे संदर्भानुसार पडताळून मगच भाषांतर करावे. बहुतेक अन्योन्यसक्रिय संवाद हे आधी इंग्रजीत लिहिलेले असतात व मग त्यांचे भाषांतर इतर भाषांमध्ये केले जाते. ते करताना इंग्रजी व्याकरणाविषयी एक वैशिष्टय़ ध्यानात ठेवले पाहिजे. इंग्रजीतील बरीच सामान्य नामे ही क्रियापद म्हणून खपू शकतात (टेबल, चेअर, बुक, पेन, कॅच इत्यादी). उदाहरणार्थ, फोनचा ‘कॉल’ हे एक नाम आहे; पण जर तो शब्द एखाद्या मेन्यूमध्ये असेल तर तो तिथे क्रियापदाच्या रूपात वापरला गेला आहे (‘कॉल’ = ‘मेक अ कॉल’). अशा ठिकाणी आम्ही त्याचा अनुवाद ‘फोन करा’ असा केला.
मूळ शब्द जर रूपकात्मक किंवा अनौपचारिक (‘कूल’) असतील तर ते सहजासहजी भाषांतरित होणार नाहीत. शब्दाला प्रतिशब्द देत जर भाषांतर केले तर त्यांचा अर्थ लावणेच कठीण जाईल. असले शब्द कोणत्या अर्थाने वापरलेले आहेत हे पडताळून मगच त्यांचे भाषांतर करणे हे तिसरे तत्त्व. उदाहरणार्थ, एका फोनच्या मुख्य पटावर इंग्रजीत ‘गो’ शब्द असलेलं बटण होतं. त्याचे ‘जा’ असे मराठी भाषांतर केले होते! जाणार कुठे? आम्ही त्याचा ‘शॉर्टकट’ असा ‘अनुवाद’ केला, कारण त्या बटणामागे अनेक उपयुक्त शॉर्टकट असलेला मेन्यू येत असे. तसेच फोन वाजत असताना इंग्रजीत ‘आन्सर’ लिहिलेले बटण आपण पाहिलेच असेल. याचे भाषांतर ‘उत्तर’ असे करणे म्हणजे विचित्रच. त्याऐवजी आम्ही त्या बटणावर ‘फोन घ्या’ असे लिहिले.
काही ठिकाणी इंग्रजी शब्द नुसते लिप्यंतर करून देवनागरीत लिहिलेले असतात. उदाहरणार्थ ‘अनलॉक’. वाचता येऊनदेखील अनेक लोकांना त्यांचा अर्थ कळत नाही. चौथे तत्त्व हे की, गरज नसलेले, रूढ नसलेले इंग्रजी शब्द टाळा. ‘अनलॉक’ या क्रियापदासाठी ‘कुलूप काढा’ असा सोपा मराठी पर्याय आम्ही लिहिला.
याउलट पाचवे तत्त्व हे की, रूढ असलेले इंग्रजी शब्द अन्योन्यसक्रिय संवादात आवर्जून वापरा. मराठीत आपण तारीख, दप्तर, खास असे फारसी धाटणीचे शब्द वापरतो. साबण, अननस, बटाटा, पाव असे पोर्तुगाली शब्द वापरतो. मग मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दांचा वापर आपण का बरे टाळावा? एका लोकप्रिय फोनवर ‘लाऊडस्पीकर’ या इंग्रजी शब्दाचा अनुवाद मराठीत चक्क ‘ध्व.क्षे.’ असा केलेला होता. आम्ही त्याचा अनुवाद ‘स्पीकर’ असा केला. इंग्रजी ‘कॉन्टॅक्ट्स’चा अनुवाद ‘संपर्क’ असा शब्दश: न घेता ‘डायरी’ असा केला. अनेक लोक फोन नंबर डायरीमध्ये लिहून ठेवत असत. बहुधा ‘कॉन्टॅक्ट्स’बरोबर असलेले चिन्हदेखील डायरीच दाखवते. तसेच ‘एडिट नंबर’चा ‘संपर्क संपादन’ऐवजी ‘नंबर बदला’ असा जास्त सोपा अनुवाद केला.
सहावे तत्त्व म्हणजे अनुवादाअंतर्गत सुसंगतता राखली पाहिजे. यात मूळ इंग्रजी शब्दांशी प्रतारणा झाली तरी चालेल, पण भाषांतरित मराठी शब्द एकत्र चपखल बसले पाहिजेत. बहुतेक लोक ‘या शब्दाला इंग्रजीत काय म्हणत होते बरे?’ असा विचार करत बसणार नाहीत; पण संवादात एका ठिकाणी जर एक शब्द वापरला असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याच्याशी निगडित शब्दच वापरला गेला पाहिजे. बटणावर ‘कुलूप काढा’ असे म्हटले असेल तर त्यानंतरच्या स्थितिसूचक संवादात ‘कुलूप काढले’ असेच म्हटले पाहिजे. ‘फोन करा’, ‘फोन घ्या’ असे सगळीकडे लिहिलेले असताना अचानक ‘कॉल समाप्त’ असे म्हणून चालणार नाही- ‘फोन ठेवला’ असेच म्हटले पाहिजे.
शेवटी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. तुम्ही म्हणत असाल, ‘स्वत:च्या लेखात मात्र ‘अन्योन्यसक्रिय’, ‘अभिकल्प’ किंवा ‘उपयोक्ता’ असले अवजड, न रुळलेले शब्द बिनधास्त वापरता. तत्त्वांत मात्र रुळलेले, सोपे, बोली भाषेतले शब्द वापरायला सांगता. हा कसला दांभिकपणा?’ तर ऐकून घ्या. अभिकल्पावरील ही लेखमाला एका विशिष्ट वाचकवर्गासाठी लिहिलेली आहे. मराठीमध्ये अभिकल्पाबद्दल वैचारिक देवाणघेवाण व्हावी, मराठीत अभिकल्पकाविषयी बोलण्यासाठी व्यावसायिक परिभाषा तयार व्हावी, अशा व्यवसायविकासाच्या आणि भाषाविकासाच्या दृष्टीने लिहिलेली आहे. याउलट मोबाइल फोन, संकेतस्थळे या वस्तू सर्वसामान्य उपयोक्त्याला सहज वापरता येण्याजोग्याच अभिकल्पित केल्या गेल्या पाहिजेत. तिथे भाषाविकासापेक्षा वापरयोग्यता जास्त महत्त्वाची. तसे केले नाही तर लोक ‘नको रे बाबा मराठी!’ असे म्हणत इंग्रजी संवाद वापरणे पसंत करतील, नव्हे करीत आहेत.
अनिरुद्ध जोशी, गिरिश दळवी
लेखकद्वय आयआयटी, मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी – इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांचा ई-मेल anirudha@iitb.ac.in
girish.dalvi@iitb.ac.i