औद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते. त्यापैकी की-लेख, सरल, स्वरचक्र आणि टपाटप या चार प्रकल्पांची माहिती..
१९८०च्या दशकापासून भारतीय भाषांसाठी अनेक कीबोर्ड उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व कीबोर्ड मूळ रोमन दहएफळ मांडणीच्या पायावर बसवले होते. भाषेत जास्त वापरली जाणारी अक्षरे नेहमीच्या कळांवर आणि कमी वापराची अक्षरे शिफ्टवर अशा मांडण्या होत्या. त्या मांडण्यांचा लिपीच्या वर्णमालेशी विशेष संबंध नव्हता व त्यांच्या वापरयोग्यतेवर पुरेसे संशोधन झाले नाही. एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये विकसित झालेली कीबोर्ड मांडणी तिथल्या लिप्यांसाठी साजेशी होती. मात्र देवनागरीसह अन्य भारतीय लिप्या अबुगिदा आहेत, त्यांची रचना वेगळी आहे. त्यांच्यासाठी दहएफळमांडणी साजेशी नाही. भारतीय भाषांसाठी अभिनव टंकलेखन यंत्रणांच्या संशोधनाची गरज आहे, हे आपण मागील लेखात पाहिले. त्यासाठी औद्योगिक अभिकल्प केंद्रातील विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी जे प्रयोग आणि प्रकल्प केले, त्यातील काही आपण या लेखात पाहू.
२००० सालाच्या आसपास भारतातील सर्वसामान्य लोक संगणक, मोबाइल फोन, इंटरनेट व अन्य माहिती तंत्रज्ञान वापरू लागले. त्यासोबत त्यांची भारतीय भाषांत टंकलेखनाची गरज वाढू लागली. आम्ही उपलब्ध कीबोर्डच्या चाचण्या घ्यायला सुरुवात केली. कीबोर्डची चाचणी सामान्यपणे दोन निकषांवर घेतली जाते- वेग आणि चुका. वेग जास्त हवा आणि चुका कमी. मात्र चाचण्यांत आम्हाला असे आढळले की, सर्वसामान्य उपयोक्ते पहिल्याच पायरीवर अडखळतात- टंकलेखन कसे करायचे हेच त्यांना कळत नसे. त्यामुळे चुका किंवा वेग तपासण्याचा प्रश्नच उद्भवत नसे.
याची तीन प्रमुख कारणे आहेत. एक तर भारतीय लिप्यांत अक्षरांची संख्या रोमन लिप्यांपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे हवे ते अक्षर शोधणे व त्यांच्या सुसंगत नसलेल्या जागा लक्षात ठेवणे कठीण जाते. दुसरे असे की, काही बाबतीत दृश्यक्रम आणि टाइप करायचा क्रम वेगळे असतात, उदा. देवनागरीत ऱ्हस्व वेलांटी दिसायला आधी (म्हणजे डावीकडे) दिसते. संगणकावर मात्र ‘णि’ टाइप करताना आधी ‘ण’ टाइप करावा लागतो व नंतर वेलांटी द्यावी लागते. तिसरे कारण जोडाक्षरे, पहिल्या व्यंजनाचा पाय मोडून दुसरे व्यंजन टाइप केले की संगणक त्या जागी त्या दोन व्यंजनांचे जोडाक्षर दाखवतो. उदा. ‘स्त’ लिहिताना आधी ‘स’ लिहिला, मग त्याचा पाय मोडला (स्) आणि शेवटी ‘त’ लिहिला की होतो ‘स्त’. हवे असलेले जोडाक्षर कोणत्या दोन व्यंजनांनी तयार होते व त्यांचा क्रम कोणता हे उपयोक्त्याला माहिती असावे लागते. काही जोडाक्षरांची व्यंजने आणि त्यांचा क्रम ओळखायला सोपी असतात, उदा. ‘स्त’, ‘त्य’, ‘म्ह’, पण काही अवघड असतात (दृ, श्र, श्व) आणि काही अगदीच अवघड असतात (क्र, र्क, ऱ्ह, स्त्र, क्ष, ज्ञ इत्यादी). हे सर्व लक्षात घेऊन टाइप करणे लोकांना कठीण जाते.
२००२ साली अमित राठोड या आमच्या विद्यार्थ्यांने या विषयातला प्रथम अभिकल्प केला. कीबोर्ड दिसताक्षणी टंकलेखन कसे करायचे हे उपयोक्त्याला प्रशिक्षण न घेता समजले पाहिजे असे ध्येय त्याने ठेवले. त्याने अनेक संकल्पना बनवल्या. त्यापैकी एक संकल्पना प्राथमिक चाचण्यांत यशस्वी ठरली. तिची मांडणी देवनागरीच्या वर्णमालेसारखी होती. त्यामुळे अक्षरे शोधणे सोपे झाले. या संकल्पनेचं नाव की-लेख. प्राथमिक प्रयोगांत की-लेखची संकल्पना उपयोक्त्यांना जरी आवडली, तरी त्यात व्यंजनांच्या सात रांगा होत्या. त्यामुळे मनगट टेबलावर टेकवले असता सर्वात वरच्या कळांपर्यंत बोटं पोचू शकत नव्हती. ही समस्या सोडवण्याकरिता आम्ही मांडणी बदलली. परत आदिरूप (प्रोटोटाइप) बनवून उपयोक्त्यांबरोबर तपासली. त्यातून आणखी काही समस्या दिसल्या, कल्पना सुचल्या. परत मांडणी बदलली. अशी एकूण सहा आवर्तने केली. त्यातून मनासारखी मांडणी तयार झाली. त्याची स्वीकारार्हता तपासण्यासाठी विद्यापीठाच्या परिसरात टायपिंग स्पर्धा आयोजित केली. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, शाळकरी मुले इत्यादी सर्व थरांतील लोकांनी भाग घेतला आणि टाइप करून बघितले. ती त्यांनी त्यांच्या मातृभाषेत टाइप केलेली पहिली वाक्ये होती.
२००७ सालाच्या आसपास मोठय़ा पडद्याचे मोबाइल उपलब्ध होऊ लागले. मात्र त्यांच्या बारा कळांच्या कीपॅडवर भारतीय भाषांत टाइप करणे आणखीनच कठीण होते. त्यांच्या एकेका कळीवर चक्क ५ ते १७ अक्षरे होती. त्यामुळे त्यांची वापरयोग्यता जवळजवळ शून्य होती! या समस्येवर अंशुमन कुमार या विद्यार्थ्यांने प्रकल्प केला. अनेक कल्पना पडताळून त्याने ‘सरल’ नावाची रचना तयार केली. तीदेखील दिसायला वर्णमालेसारखी होती. त्यात वर-खाली व डावी-उजवीकडे जाण्यासाठी मोबाइलवरील चार बाणांचा व निवडीसाठी मधल्या बटणाचा, असा एकूण फक्त पाच कळांचा वापर होत असे. चाचण्यांमध्ये बारा कळा वापरणाऱ्या तत्कालीन फोनमधील रचनांपेक्षा ही पाच कळांची रचना सरस ठरली.
की-लेख, सरल व २००९ सालापर्यंत आमच्या चमूने केलेले अन्य प्रयोग हे पूर्णत: संशोधनात्मक होते. बनवलेले आदिरूप चाचणीत किंवा प्रदर्शनांत दाखवण्यापुरते किंवा शोधनिबंध लिहिण्याइतपत मर्यादित होते. ते काम लोकांपर्यंत पोहोचवणे आमच्यासारख्या शिक्षणसंस्थेच्या आवाक्याबाहेर होते; परंतु त्यानंतर आलेल्या स्मार्टफोनमुळे ही परिस्थिती अचानक बदलली.
२००९ साली अनिकेत सारंगधर या विद्यार्थ्यांने स्पर्शपडद्यासाठी (टचस्क्रीन) कीबोर्डचा प्रकल्प केला. त्याने पाच वेगवेगळ्या रचना बनवल्या. नेहमीप्रमाणे आम्ही अनेक चाचण्या केल्या. त्यामध्ये स्वरचक्र नावाचा कीबोर्ड अनेक बाबतीत सर्वोत्तम ठरला. स्वरचक्र कीबोर्ड अबुगिदा लिप्यांच्या मूलभूत बांधणीप्रमाणे अभिकल्पित केलेला आहे. त्यात वर्णमालेप्रमाणे व्यंजने दाखवली आहेत. एखाद्या व्यंजनाला (उदाहरणार्थ ‘म’ला) स्पर्श केला की त्याभोवती एक चक्र तात्पुरते दिसते. त्यात त्या व्यंजनाची बाराखडी असते (म, मा, मि, मी, मु, मू). उपयोक्त्याने बोट सरकवले की या एका कृतीत दोन अक्षरे टाइप होतात. जोडाक्षरे टाइप करणेदेखील स्वरचक्रमध्ये सोपे आहे. एखाद्या व्यंजनाचा पाय मोडला की त्याचे इतर सर्व व्यंजनांबरोबर जोडाक्षर कसे दिसेल याचे पूर्वदृश्य (प्रीव्हू) स्वरचक्र दाखवतो. मग हवे असलेले जोडाक्षर निवडणे सोपे जाते.
स्वरचक्र इतर विद्यार्थ्यांना व संशोधकांना आवडला. त्यापैकी अनेक जण स्वरचक्रच्या विकासासाठी पुढे आले. जून २०१३ मध्ये स्वरचक्रची पहिली आवृत्ती गुगल प्लेस्टोरमध्ये उपलब्ध झाली. आज बारा भारतीय भाषांसाठी स्वरचक्र उपलब्ध आहे. अजूनही त्यात सुधारणांचे काम चालूच आहे. उपयोक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. जून २०१६ पर्यंत स्वरचक्रला डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या दहा लाखांवर जाईल. शिवाय पहिल्या वर्षी लोक दरडोई दरमहा १० ते १२ शब्दच टाइप करीत असत. दुसऱ्या वर्षी तो वापर वाढून ११० शब्द झाला. स्वरचक्र कीबोर्ड हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअर आहे. स्वरचक्रचा विकास, त्यातील सुधारणा, विस्तार व देखभाल हे अनेक लोकांच्या श्रमदानाने होते.
स्मार्टफोनमुळे भारतीय भाषांमधील टंकलेखनाचे चित्र आज बदलू पाहात आहे. वर्णमालेवर आधारित कीबोर्ड अभिकल्पांमुळे ‘उपयोक्ते टाइप करू शकतील का?’ हा प्रश्न आता जुना वाटत आहे. पुढची पायरी म्हणजे टंकलेखनाचा वेग वाढवणे व चुका कमी करणे. ही गरज ओळखून कौस्तुभ लिमये या विद्यार्थ्यांने २०१५ साली टपाटप नावाचा एक मोबाइल खेळ संकल्पित केला. टपाटप वापरून उपयोक्ते अनेक मराठी कीबोर्ड शिकू शकतात आणि खेळता खेळता आपल्या टंकलेखनाचा वेग वाढवू शकतात. आमचा चमू स्वरचक्रच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने टपाटप याच महिन्यात गुगल प्लेस्टोरवर सादर करत आहोत.
डिजिटल माध्यमांद्वारे आपले विचार आपल्याच मातृभाषेत व्यक्त करण्याची अनेक लोकांची सुप्त इच्छा इतकी वर्षे जणू काही दबून राहिली होती. असे वाटते की तो बांध आता फुटत आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत डिजिटल साक्षरता प्राप्त व्हावी. डिजिटल क्षेत्रात सर्व भारतीय भाषांचा उपयोग झपाटय़ाने वाढत जावो, हीच इच्छा.
संगणकासाठी टंकलेखन यंत्रणांचे अभिकल्प
औद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-06-2016 at 02:54 IST
मराठीतील सर्व अभिकल्प बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit bombay research on indian languages typing technology