दोन अभिकल्पक जेव्हा अभिकल्पाबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या गप्पांत अभिकल्प प्रक्रियेचा विषय आवर्जून निघतोच. अभिकल्प प्रक्रिया नक्की कशी असावी यावर मात्र अनेक मते आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानेच अभिकल्पक तितक्या अभिकल्प प्रक्रियांच्या अभिव्यक्ती असतात.
दिवाळी सरली आणि वर्षांखेरीचे वेध लागले. २०१६ च्या सुरुवातीला ‘लोकसत्ता’च्या संपादकांच्या सांगण्यावरून ‘डिझाइनवर लिहू काही’ असा वसा उत्साहाने घेतला होता. आमच्यापकी अनेकांना मराठीत अभिकल्पावर लिहायची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे थोडीफार धास्तीही होती. पण दर वेळी लेख जमत गेला. पाहता पाहता वर्ष सरत आले. अचानक दिवाळी आली. आमच्या लक्षात आले, की अभिकल्पावरील आपली ही पहिलीवहिली पाक्षिक लेखमाला लवकरच संपणार. तेव्हा आजवर काय काय लिहिले याचा आढावा घेतला. महत्त्वाच्या एखाद्या पलूवर बोलायचे राहून जाऊ नये म्हणून.
या लेखांतून आतापर्यंत आपण वस्तूंचे रूप, त्या रूपांतून मिळणारे सुप्त संदेश, वस्तूंची वापरयोग्यता, त्यांचे योग्य स्थानिकीकरण असे अभिकल्पाचे निरनिराळे पलू पाहिले. खेळांपासून अक्षरांपर्यंत, टंकांपासून टंकलेखनापर्यंत, नकाशांपासून घरांपर्यंत आणि अन्योन्यक्रियेपासून सेवांपर्यंत अभिकल्पाची व्याप्ती पाहिली. लहान-थोर, श्रीमंत-गरीब, विद्वान-निरक्षर अशा सर्वासाठी अभिकल्पाची उदाहरणे पाहिली. मात्र एका गोष्टीवरची चर्चा राहूनच गेली होती. अभिकल्पक इतक्या विविध कार्यक्षेत्रांत काम करतात कसे? नवनव्या आव्हानांवर सर्जनशील तोडगे शोधतात कसे? अभिकल्प घडतो तरी कसा?
दोन अभिकल्पक जेव्हा अभिकल्पाबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या गप्पांत अभिकल्प प्रक्रियेचा विषय आवर्जून निघतोच. अभिकल्प प्रक्रिया नक्की कशी असावी यावर मात्र अनेक मते आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानेच अभिकल्पक तितक्या अभिकल्प प्रक्रियांच्या अभिव्यक्ती असतात. त्यांपकी एक पुढे देत आहे.
चित्रात दाखवल्याप्रमाणे चार कळीच्या प्रश्नांतून मी अभिकल्प प्रक्रिया व्यक्त करतो आहे. पहिला प्रश्न ‘‘महत्त्वाचे काय आहे?’’ हा तसा व्यापक प्रश्न आहे. तो अभिकल्पकाला सद्य:परिस्थितीकडे समग्रपणे पाहायला लावतो. एकदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या एका मित्राशी मी या प्रश्नाविषयी बोलत होतो. प्रश्न ऐकून झटकन तो म्हणाला, ‘‘अच्छा, म्हणजे प्रायोजकांना काय हवे आहे?’’ (‘‘व्हॉट इज रिक्वायर्ड?’’). हा प्रश्न इतका सोपा नाही. जेव्हा एखादी कंपनी अभिकल्पकाला एक प्रकल्प देते, तेव्हा त्या कंपनीला त्या अभिकल्पकाशी (किंवा त्याच्या कंपनीशी) एक करार करावा लागतो, ही गोष्ट खरी आहे. प्रकल्पाअंती अभिकल्पक कंपनीला काय देणार (रिक्वायरमेंट्स) आणि त्याबदल्यात कंपनी अभिकल्पकाला काय मोबदला देणार असे त्या कराराचे स्वरूप असते. करार हे अपरिहार्यपणे अरुंद, संकुचित असतात. मात्र पुढे अभिकल्पकाला संकुचित दृष्टिकोन ठेवून चालत नाही. अभिकल्पक एखाद्या परिस्थितीचा, एखाद्या समस्येचा जेव्हा खोलात जाऊन अभ्यास करतो, तेव्हा त्याला तिची व्याप्ती, तिथली गुंतागुंत कळू लागते. तोडगे शोधण्याआधी असा खोलातला अभ्यास केला, तरच समस्या खऱ्या अर्थाने सुटू शकतात. योग्य निदान झाल्याशिवाय कुठले तरी औषध घेतले तर फायदा होत नसतो.
जर अभिकल्पक एखाद्या क्षेत्रात अनुभवी असेल, तर काय महत्त्वाचे आहे याची जाण त्याला आधीपासूनच असते. मात्र अभिकल्पकाला परिस्थितीचा तेवढा अनुभव नसला तरी तो खोलात जाऊन अभ्यास करू शकतो. रोगाचे निदान जसे निरनिराळ्या पद्धती वापरून करणे शक्य आहे, तसेच अभिकल्पकही महत्त्वाचे काय आहे हे अनेक पद्धतींनी शोधू शकतात. माझ्या मते त्यातली सर्वात उपयुक्त पद्धत म्हणजे संदर्भात्मक चौकशी (काँटेक्स्चुअल एन्क्वायरी). प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखती व विश्लेषण यांच्या साहाय्याने अभिकल्पकाला उपयोक्त्यांच्या खऱ्या अडचणी, त्यांच्या गरजा, त्यांची उद्दिष्टे यांचे सखोल ज्ञान होत जाते. तसे केल्याने समस्यांवर अनेक सर्जनशील कल्पना सुचत जातात. संधी दिसत जातात. रोगाचे योग्य निदान करणे हे जसे डॉक्टरांचे आद्यकर्तव्य असते, तसेच खऱ्या समस्यांचे विश्लेषण करणे हे अभिकल्पकांचे कर्तव्य असते.
महत्त्वाचे काय आहे, ते सिद्ध झाल्यावर त्याला ‘‘प्रतिसाद कसा द्यावा?’’ हा दुसरा प्रश्न पुढे येतो. हादेखील एक समग्र, व्यापक असाच प्रश्न आहे. तोडगा कोणता निवडावा यावर अभिकल्प, तंत्रज्ञान आणि व्यवसाय अशा तीनही दृष्टींनी एकाच वेळी विचार करावा लागतो. अभिकल्पकाकडे कल्पना अनेक असू शकतात, पण प्रत्येक कल्पनेला समग्र तोडग्यात जागा असेलच असे नाही. कल्पना सुचवताना ‘‘किती कल्पना पुरतील?’’ असला कंजूष सवाल अभिकल्पकाने करू नये. टी-ट्वेंटीच्या मॅचमध्ये फलंदाज जसा बनतील तेवढय़ा धावा बनवत जातो, तसेच सुरुवातीला अभिकल्पकाने सुचतील तेवढय़ा कल्पना सुचवत जावे. मात्र जेव्हा अंतिम तोडग्याबद्दल निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा एकमेकांना पूरक, सर्जनशील कल्पनाच निवडाव्यात. निवडलेल्या कल्पना तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य असाव्यात, उपयोक्त्यांच्या समस्या सोडवणाऱ्या असाव्यात, त्यांच्या संस्कृतीत चपखल बसाव्यात, त्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या असाव्यात. या तोडग्यातून एका नव्या वस्तूची एक व्याख्या तयार होते आणि सोबत प्रायोजक कंपनीला व्यवसायवाढीसाठी नवीन मार्ग मिळतो.
ढोबळ प्रतिसाद ठरला की मग, ‘‘त्या नव्या वस्तूचे कांगोरे कसे अभिकल्पित करावेत?’’ हा तिसरा प्रश्न पुढे येतो. या प्रश्नावर अभिकल्पक आणि अभियंत्यांनी संघवृत्तीने काम केले तर अभिकल्प खूप चांगला होतो. ढोबळ व्याख्या ठरली तरी वस्तूचा रंग, रूप, बारकावे, साहित्य, पदार्थ यांच्या अभिकल्पाकरिता अनेक पर्याय असू शकतात. ते पडताळून मगच निवड करण्याची गरज असते. कधी ती निवड वस्तूच्या कार्याप्रमाणे ठरते, कधी ती पदार्थ किंवा बनवण्याची प्रक्रिया असल्या तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असते, तर कधी ती कलात्मकतेवर किंवा वस्तूच्या इच्छित अभिव्यक्तीवर आणि अनुभूतीवर. या टप्प्याअंती एक अभिकल्पित वस्तूचे एक आदिरूप (प्रोटोटाइप) साकार होते.
अभिकल्प प्रक्रियेचा चौथा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ‘‘हे कितपत जमले?’’ कुठलेही आदिरूप बनवण्यामागे एकच हेतू असतो- त्याचे मूल्यमापन करणे. अभिकल्प व तंत्रज्ञान जर नावीन्यपूर्ण असेल, तर अभिकल्पाच्या पहिल्या आवर्तनात घेतलेले सर्व निर्णय अचूक निघण्याची शक्यता कमीच असते. अभिकल्पाचे निर्णय तपासण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. वस्तू तांत्रिकदृष्टय़ा समाधानकारक आहे का? वस्तूची वापरयोग्यता कितपत आहे? वस्तू लोकांना पसंत पडते का? ती विकत घेण्यासाठी लोक किती किंमत मोजू इच्छितात? चाचण्यांतून जसजसे दोष सापडत जातात, तसतसे अभिकल्प सुधारत न्यावे लागते. अभिकल्पकाचा अनुभव, तिची सर्जनशीलता जितकी जास्त, तितक्या कमी आवर्तनात अभिकल्पाची उद्दिष्टे गाठता येतात. मात्र कधी कधी अनेक आवर्तने गेली तरी मनाजोगे अभिकल्प निष्पन्न होईलच असे नाही.
तर अशी ही अभिकल्प प्रक्रिया. काम करतेवेळी जर अभिकल्पक कुठे अडला, तर त्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभिकल्प प्रक्रियाच त्याच्या कामी येते. म्हटली तर साधी, सरळ. म्हटली तर चक्रव्यूहासारखी गोल, फसवी. भौतिक वस्तू, खेळ, टंक, टंकलेखन साधने, नकाशे, घरे, अन्योन्यसक्रिय वस्तू, सेवा इत्यादी अभिकल्पाच्या विविध प्रभागांना एकवटणारा दुवा.
अनिरुद्ध जोशी
anirudha@iitb.ac.in
लेखक हे आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.