संकुचित वृत्तीनं जगत असलेल्या जिवाला व्यापक करण्याचं अविरत कार्य सद्गुरू करीत आहेत. ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरात या विराट कार्याचा मागोवा आपण घेतला आहेच. संक्षेपानं त्याचा विचार करू. ही सृष्टी कोणी निर्माण केली? ती भगवंताच्या इच्छेतून निर्माण झाली, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. आता काही धर्माचार्य ‘देव म्हणजे जादूगार नव्हे,’ असं सांगत सृष्टी उत्पत्तीचे वैज्ञानिक सिद्धांत योग्य आहेत, असं म्हणू लागले आहेत. इथे थोडी गफलत आहे. जिथे कार्य असते तिथे कारण आणि कर्ता असलाच पाहिजे. विज्ञानानं सृष्टी उत्पत्तीची कारणपरंपरा शोधायचा अविरत प्रयत्न चालविला आहे, ‘कर्त्यां’चा नव्हे! सृष्टी कशी उत्पन्न झाली, याचा जो शोध विज्ञान घेत आहे तो योग्यच आहे. आपण श्रीखंड बनवतो, ते बनविण्याची काही प्रक्रिया असतेच ना? मग ‘श्रीखंड’ कसं बनलं, याचं उत्तर ती प्रक्रिया मांडणं एवढंच असू शकत नाही, ते बनवणारा नसेल तर प्रक्रिया आपोआप होणार नाही. तर आपलं सनातन तत्त्वज्ञान काय सांगतं? की सृष्टी देवाच्या इच्छेतून निर्माण झाली. ही इच्छा काय होती? तर जो ‘एकोऽहम्’ होता त्याला इतका आनंद झाला, की तो भोगण्यासाठी त्याला दोन व्हावंसं वाटलं! त्या इच्छेतून अर्थात् आनंदाच्या विस्फोटातून ही सृष्टी उत्पन्न झाली. आता आपलं हेच सनातन तत्त्वज्ञान माणसाला सांगतं की, इच्छा असणं हे अपुरेपणाचं लक्षण आहे! आनंद भोगण्यासाठी कारणाची गरज भासणं, अर्थात आनंद कारणावर अवलंबून असणं, हीदेखील मर्यादा आहे! भगवंताच्या या दोन ‘मर्यादा’ इथे उघड होतात! तिसरी मर्यादा अशी की, या विश्वाचा पसारा त्याला पुन्हा स्वत:मध्ये विलीन करता आला नाही. विश्व विस्तारतच आहे. चौथी मर्यादा ही की, तो आनंदस्वरूप असूनही त्याच्यातून उत्पन्न झालेलं हे विश्व सुख-दु:खयुक्त अशा मिश्र स्वरूपात आहे. मग हा जो भगवंतापासून दुरावत चाललेला विश्वाचा ‘पसारा’ आहे, तो आवरायला सद्गुरू आले आहेत! भगवंत निश्चिंत मनानं आनंदकोषात असून सद्गुरू हे कार्य अखंड करीत आहेत. हीच ती परमसेवा आहे!! या पसाऱ्याचं मूळ कशात आहे? ते इच्छेत आहे. माणसाचा स्थूल प्रपंच मर्यादित असतो, पण ज्या इच्छेतून तो साकारतो तिचा अंतर्मनातला सूक्ष्म पसारा अमर्याद असतो. माणूस एकच घर इच्छेच्या जोरावर मिळवतो, पण ते कधीच त्याच्या इच्छेप्रमाणे झालेले नसते! काही तरी न्यून उरतेच. तेव्हा इच्छेतूनच कृती होत असली तरी इच्छा कधीच शमत नाही. त्यामुळे सद्गुरू बाहेरचा पसारा प्रथम आवरत नाहीत, ते अंतर्मनातला पसारा कमी करू लागतात. त्यासाठी अंतर्मनातील इच्छेचा विस्तार रोखावा लागतो. श्रीनिसर्गदत्त महाराजांचं वाक्य आहे, ‘इच्छा वाईट नाही, तिचा संकुचितपणा वाईट आहे. तुमच्या इच्छा इतक्या व्यापक करा, की त्यांच्या पूर्तीसाठी तुम्हाला व्यापकच व्हावं लागेल!’ तेव्हा सद्गुरू मुक्तीची व्यापक इच्छा माझ्या मनात रुजवू पाहतात. ती रुजली तर जे जे मला बंधनात पाडतं त्यातून माझी ओढ कमी होईल. संकुचिताला व्यापक करणं ही मोठीच सेवा नाही का? स्वामींच्या चरित्रातही याच सेवेचा तर दाखला मिळतो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा