शंकर श्यामराव भुसारी यांनी कॉ. डांगे यांच्यापासूनची साम्यवादाची वाटचाल जवळून पाहिली. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘अजय भवन’या कार्यालयाचे काम पाहण्याचा क्रम त्यांनी सोडलेला नाही.. महाराष्ट्रीयांबद्दल आणि कम्युनिस्टांबद्दलही त्यांची मते स्पष्ट आहेत..
दिल्लीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अजय भवन या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एक वयोवृद्ध व्यक्ती सदैव कार्यमग्न असते. त्यांचे नाव एस. एस. भुसारी. भाकपची साम्यवादी विचारधारा तेवत ठेवण्यासाठी आयुष्य वाहून घेणारे भुसारी म्हणजे कुठलीही अपेक्षा न बाळगता दिल्लीच्या राजकारणातील अनेक वलयांकित नेत्यांच्या पाठीशी असलेल्या, मोजक्या बिनचेहऱ्याच्या कार्यकर्त्यांचे रास्त प्रतिनिधी. राजकारणातील वाढत्या व्यापारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्याग आणि समर्पणाची भावना लुप्त होऊन राजकीय पक्षांचा पाया खिळखिळा होत असताना पडद्यामागच्या राजकारणात भुसारी यांच्यासारखे मोजकेच कर्मठ आहेत.
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एस. एस. भुसारी म्हणून परिचित असलेले शंकर श्यामराव भुसारी यांचा जन्म २० जुलै १९३० चा, नागपूरचा. त्यांचे वडील श्यामराव भुसारी कोंढाळीचे, तर आई लक्ष्मीबाई वर्धेपाशी मोठी आंजी या गावच्या राहणाऱ्या. नागपुरातील नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करून त्यांच्या वडिलांनी म्युनिसिपल शाळेत नोकरी धरली. सुरुवातीला भाडय़ाच्या घरी राहणाऱ्या भुसारी दाम्पत्याने १९३७ मध्ये नागपुरात इतवारी हायस्कूलजवळ संती रोड येथे स्वत:चे घर घेतले. भुसारींचे थोरले बंधू रामराव यांचे धाकटे पुत्र राजेंद्र आणि त्यांची बहीण सुनीता दिल्लीत भुसारींसोबत राहिले. दिल्लीत सवरेदय हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले राजेंद्र आणि त्यांच्या पत्नी भुसारींच्या देखभालीची जबाबदारी पार पाडत असतात; तर लग्नानंतर सुनीता आणि त्यांचे पती प्रदीप खेडेकर नागपुरात माधवनगरला व भुसारींची बहीण शांता नाशिकला राहतात.
भुसारींचे शिक्षण नागपुरातील म्युनिसिपल प्रायमरी स्कूल आणि सी. पी. अॅण्ड बेरार शाळेमध्ये झाले. सी. पी. अॅण्ड बेरारचे कर्तव्यदक्ष अधीक्षक जी. एस. गोखले त्यांच्या आजही स्मरणात आहेत. भुसारींना राष्ट्रभक्तीचे बाळकडू शाळेतच मिळाले. सी. पी. अॅण्ड बेरार शाळेतील समर्थ मास्तर विद्यार्थ्यांना इन्कलाबजिंदाबादच्या गजरात सीताबर्डीच्या किल्ल्यावर घेऊन जायचे. १९४२ साली ऑगस्ट महिन्यात मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन झाल्यानंतर सर्वत्र धरपकड झाली. महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर नागपुरात गडबड झाली. त्या वेळी लागलेल्या संचारबंदीदरम्यान खासगी वितरणासाठी काढल्या जाणाऱ्या बुलेटिनच्या आठवणींनी ते अजूनही मोहरतात. नागपूरच्या रस्त्यांवर सर्वत्र शीख आणि महार रेजिमेंटचे सैनिक तैनात होते. हलणाऱ्या कुठल्याही वस्तूवर गोळीबार करण्याचे महार रेजिमेंटला आदेश होते. अशा तणावाच्या वातावरणात भुसारी आणि अन्य सहकारी विद्यार्थ्यांनी बुलेटिन पोहोचविण्याचे काम पार पाडले. जी. एस. कॉमर्स महाविद्यालयातून बी. कॉम केल्यानंतर भुसारी लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षांपर्यंत शिकले. पण वडील निवृत्त झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून भुसारींना नोकरी करणे भाग पडले. नोकरीसाठी ते प्रथम जबलपुरात पोहोचले. तिथे डाव्या कामगार संघटनांच्या नेत्यांशी त्यांची घनिष्ठता वाढली. जबलपुरातील प्रा. एस. वाय. ताम्हणकर आणि लेखक, व्यंगचित्रकार हरिशंकर परसाई यांच्या परिचयाने ते बिलासपूरमध्ये आले. तिथे रेल्वेतील कॉम्रेड मुश्ताक यांनी भुसारींना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यासोबत दिल्लीत काम करण्याचा सल्ला दिला आणि डांगे नावाने तसे पत्रही दिले. १९६३ साली भुसारी दिल्लीत पोहोचले. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले कॉम्रेड डांगे त्या वेळी खासदार आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) सरचिटणीस होते. त्या काळात चेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्रागमधील वल्र्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनमध्ये आयटकच्या प्रतिनिधींची सचिवपदी नियुक्ती व्हायची. या जागतिक संघटनेत डांगेंचा दबदबा होता. डांगे यांचे स्वीय साहाय्यक या नात्याने त्यांचे कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय विषयांशी संबंधित लिखाण, पत्रव्यवहार, शोधनिबंध, व्याख्याने तयार करण्याची जबाबदारी भुसारी पार पाडायचे. डांगे यांच्या प्रयत्नांमुळे दिल्लीच्या आयटीओ परिसरातील इंद्रजीत गुप्ता मार्गावरील विस्तीर्ण भूखंडावर १९७१ साली ‘अजय भवन’ नावारूपाला आले. या भवनाचे डिझाइन मुंबईचे आर्किटेक्ट झाबवाला यांचे आहे. १९६२ साली भारत-चीन युद्धादरम्यान संघ व जनसंघाच्या समर्थकांनी असफ अली रोडवरील भाकपच्या कार्यालयावर हल्ला केला होता. तो अनुभव लक्षात ठेवून प्रसंगी तुफान दगडफेक झाली तरी वास्तूची हानी होऊ नये म्हणून अजय भवनला सिमेंटच्या जाळ्यांचे संरक्षण कवच देण्याची कल्पकता झाबवाला यांनी दाखविली. १९६४ साली भाकपमध्ये फूट पडली. पण या फुटीचे पडसाद आयटकमध्ये उमटले ते अनेक वर्षांनंतर. त्या वेळी फुटीर गट अजय भवनाचा ताबा मिळविण्यासाठी इमारतीवर हल्ला करू शकतो, हा धोका हेरून डांगे यांनी कार्यालय २४, केनिंग्ज लेनमध्ये हलविले. भुसारींनी १९७७ पर्यंत आयटकमध्ये काम केले. त्यानंतर पक्षाने त्यांना मंगोलियन दूतावासात पाठविले. तिथे ते १९८४ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर भुसारी १९८४ साली अजय भवनात आले. कॉम्रेड डांगेंनंतर सी. राजेश्वर राव, इंद्रजीत गुप्ता आणि ए. बी. बर्धन आणि सुधाकर रेड्डी या भाकपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी एकरूप होताना ते सदैव मदतीसाठी तत्पर राहिले. निष्ठेने कर्तव्यपूर्ती करताना आपल्या मर्यादा ओळखून भुसारी कधीही ज्येष्ठ नेत्यांच्या भांडणात पडले नाहीत. बर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तऱ्हेच्या पत्रव्यवहाराची देखरेख तसेच सर्व प्रकारचे मसुदे तयार करण्यात त्यांचा प्रदीर्घ अनुभव पक्षासाठी महत्त्वाचा ठरला आहे. डांगे, गुप्ता आणि बर्धन यांच्याविषयी भुसारी विशेष आस्थेने बोलतात. त्यांच्या मते कॉम्रेड ए. बी. बर्धन हे डाव्या आघाडीतील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. आज बर्धन यांच्या ज्येष्ठतेची व उंचीची व्यक्ती डाव्या आघाडीतील चारपैकी कोणत्याही पक्षात नाही. त्यांचे विचार, धोरणे, आणि वागणूक वाखाणण्यासारखी आहे. बर्धन यांनी कुठल्याही मुद्दय़ावर पत्र लिहिले तर स्वत: पंतप्रधानांना उत्तर द्यावे लागते, एवढा त्यांचा दबदबा आहे.
दिल्लीत मराठी लोक मोठय़ा संख्येने राहतात. पण अन्य प्रांतीयांप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांचे मराठी भवन (सांस्कृतिक सभागृह) किंवा साधे मराठी पुस्तकांचे ग्रंथालयही दिल्लीत स्थापन होऊ शकले नाही. त्यासाठी कुणी पुढाकारही घेत नाही, ही त्यांची खंत आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असला तरी मराठी लोकांमध्ये एकजूट दिसत नाही. मला त्याचे काय, ही प्रवृत्ती दिल्लीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या मराठी माणसात अधिक जाणवते, असे कडवट मत ते व्यक्त करतात.
पक्षाचे अहोरात्र काम करताना एके काळी सर्वत्र दबदबा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झपाटय़ाने होत गेलेले राजकीय पतनही भुसारींनी अनुभवले. दिल्लीतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या वास्तव्यादरम्यान भाकपची प्रत्येक निवडणुकीत पीछेहाटच होत गेली. पक्ष संघटना बळकट करून त्यातून मार्ग काढण्याचा पक्षाचे नेतृत्व प्रयत्न करीत आहे. पक्षाचे भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्याचा मसुदा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषद आणि पक्षाच्या काँग्रेसमध्ये या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर भाकपचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यांच्या मते डाव्या पक्षांच्या दुरवस्थेस धोरणात्मक गोष्टी कारणीभूत ठरल्या. डाव्या आघाडीचे तीन राज्यांत सरकार होते. पण त्यांची कामगिरी उत्साहवर्धक ठरली नाही. सत्तेत आल्यानंतर जे रोग काँग्रेसमध्ये बळावले तसेच डाव्या आघाडीच्या बाबतीतही घडले. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये डाव्या आघाडीची वाताहत झाली याचे त्यांना दु:ख आहे. सर्वसामान्य लोक केवळ पुस्तकी विचारांनी प्रभावित होत नाहीत. पूर्वीच्या जमान्यात कार्यकर्ते घरचे खायचे आणि पक्षाचे काम करायचे. आता नव्या पिढीसाठी राजकारण हे चरितार्थाचे माध्यम झाले. त्यामुळे वैयक्तिक निष्ठा कमी होऊन पक्ष निस्तेज झाल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून डोकावते.
पन्नास वर्षांपूर्वी, १९६३ साली कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे मदतनीस म्हणून एस. एस. भुसारी दिल्लीत दाखल झाले तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला होता. वर्षभरानंतर त्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आणि डावी विचारसरणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी अशा चार प्रवाहांमध्ये विभागली गेली. डाव्या पक्षांच्या विलीनीकरणासाठी भाकपने भरपूर प्रयत्न केले. पण पक्षाचे नियंत्रण कुणापाशी असावे यावरून मतैक्य होणे शक्य नाही. डाव्या आघाडीत सध्या माकप मोठय़ा भावाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या आवाजाला महत्त्व आहे. एकीकरणाला आमचा कधीच विरोध नव्हता आणि आमच्या पक्षात या आणि विलीन व्हा, अशी माकपची भूमिका आहे. पण एकत्र कसे यायचे, पक्षाचे धोरण काय असेल याविषयी ठोस पावले उचलायला हवीत, अशी भावना भुसारी व्यक्त करतात.
दिल्लीच्या राजकारणात भाकपचे शक्तिस्थान ठरलेल्या अजय भवनचे कार्यालय प्रभारी म्हणून भुसारी यांनी बजावलेली भूमिका सदैव पडद्यामागचीच राहिली. प्रपंचाच्या मोहात न पडता पक्षकार्यासाठी उभे आयुष्य समर्पित केलेल्या भुसारी यांना पश्चिमपुरीतील जनता फ्लॅटने दिल्लीत स्थैर्य दिले. पक्षाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण दिल्लीत आलो. त्यात खंड पडला नाही, या सार्थकतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात. दिल्लीत येऊन पक्षकार्याला वाहून घेण्याचा उद्देश साध्य झाल्याची भावना भुसारींना वयाच्या ८३ व्या वर्षीही अहोरात्र काम करण्यासाठी प्रेरित करीत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा