यंदाच्या आयपीएलने कितीतरी उत्साहवर्धक घटनांची मालिका सादर केली.. सचिनने ही आपली शेवटची आयपीएल असल्याचे सांगून टाकले, राजीव शुक्ला, कमलनाथ आदींना नैतिकतेची आठवण झाली अन् कोणत्याही गोष्टीत जाहिरातमूल्य शोधणाऱ्या काही वृत्तसमूहांपुढे झुकणार नाही असा राणाभीमदेवी अवतार बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन धारण करते झाले. अशा चतुर आणि चाणाक्ष माणसांचा उपयोग खरेतर सरकारनेच करून घेण्यास कोणाची हरकत असणार !
आयपीएलच्या यशास तोड नाही. जे जे अभद्र आणि अपवित्र ते ते सर्व एकत्र आणणे सोपे नसते. आयपीएलने ते करून दाखवले. सहारा, डीएलएफ यांच्यासारखे ओवाळून टाकलेले उद्योगसमूह, शाहरुख खान, प्रीती झिंटा वा शिल्पा शेट्टी आदींसारखे तिसऱ्या दर्जाचे तारेतारका आणि ललित मोदी ते राजीव शुक्ला अशी याला झाकावा आणि त्याला काढावा अशी व्यक्तिमत्त्वे आयपीएलमुळेच तर एकत्र आली. अनेक तिसऱ्या दर्जाच्या क्रिकेटपटूंचे कर्तृत्व फुलले ते आयपीएलच्या २२ यार्डाच्या खेळपट्टीवर आणि अन्य अनेकांच्या कर्तृत्वास बहर आला तो ही खेळपट्टी मॅनेज करण्याची संधी मिळाल्यावरच. खेळाशी संबंधित अर्थव्यवस्थेसही या स्पर्धेमुळे चालना मिळाली हे नाकारता येणार नाही. तर अशा या आयपीएलची सहावी आवृत्ती रविवारी अखेर संपली. तीत मुंबईने चेन्नईला मागे टाकल्यामुळे अनेक मुंबईकरांचा ऊर आनंदाने भरून आला असून त्या भरतीमुळे पावसाआधीच मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे ओसंडून गेले आहेत. या आयपीएलमध्ये आणखी एक उत्साहवर्धक घटना घडली. ती म्हणजे सचिनने निवृत्तीची घोषणा केली. आपल्यासाठी ही शेवटची आयपीएल असे सचिनने जाहीर केले. त्याचे स्वागत करावयास हवे. निदान आयपीएलमधून तरी का होईना आपली निवृत्तीची तयारी आहे, हे सचिनने दाखवून दिले. अन्यथा तो क्रिकेटमधील मनमोहन सिंग बनू लागला होता. केवळ प्रतिक्षिप्त क्रियेवरदेखील दिवस कसे काढता येतात हे मनमोहन सिंग यांनी शासकीय स्तरावर दाखवून दिले आहे. सचिन ते क्रिकेटमध्ये करून दाखवत होता. हात दुखावलेला, पाय जडावलेले आणि गती हरवत चाललेली. तरीही शिंगे मोडून आणि लपवून आयपीएलच्या पोराटोरांच्या कळपात सामील होण्याचा मोठेपणा सचिनने दाखवला. आता पुढील आयपीएल तो खेळणार नाही, हा क्रिकेट चाहत्यांसाठी अर्धा दिलासा म्हणावयास हवा. अर्धा अशासाठी म्हणावयाचे की, पूर्ण आयपीएल मालिकाच जर बंद झाली तर ही दिलाशाची भावना पूर्णत्वास जाऊ शकेल. गावातील चार रिकामटेकडय़ा पण धनिक बाळांनी काही मनोरंजनाच्या माकडचेष्टा आयोजित कराव्यात आणि अन्य रिकामटेकडय़ांनी -दुसरे बरे काही करण्यासारखे नसल्यामुळे – त्या पाहण्यास गर्दी करावी तसे या आयपीएल मालिकेचे आपल्याकडे झाले आहे. यात गावाची जागा देशाने घेतली इतकाच काय तो फरक. आपल्याकडे धनिकांच्या बाळांना कोणताच नियम आणि कायदाकानू पाळावा लागत नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था आहे. आयपीएलने ती अधोरेखित केली. इतकी की दुष्काळाने हैराण झालेले महाराष्ट्र सरकार या आयपीएलवरील मनोरंजन कर माफ करून करपलेल्या शेतीच्या जखमांवर आयपीएलमधील चीअरलीडर्सची फुंकर घालू शकले. आयपीएलच्या सामन्यांसाठी जी सुरक्षा पुरवली गेली तिचा मोबदलाही या मंडळींनी चुकवलेला नाही. एरवी रस्त्यावरच्या हवालदाराने वाहतूक नियमाचा भंग करून गाडी जप्त केल्यास सामान्य नागरिकास पैसा आणि नाकदुऱ्या खर्च केल्यावरच ती परत मिळते. परंतु येथे आयपीएलने पोलिसांना लाखो रुपयांना गंडा घातला तरी पोलीस मनगटे चावीत शांत बसून राहिले. अर्थात, पोलिसांनी मनगटे चावतच बसायचे असते असा संदेश विधानसभेने दिलाच आहे. असो. या सगळ्यांचा म्होरक्या क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी ही श्रीमंती बाळे काय करू शकतात हे दाखवून दिले आहे. या श्रीनिवासन यांच्या मालकीचा आयपीएल संघ आहे. तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघातून के. श्रीकांत यांचा मुलगा खेळतो आणि श्रीकांत राष्ट्रीय निवड समितीतही आहे. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन यांच्या संघासाठी सामने विकताना पकडला गेला आहे आणि त्यांचा मुलगा अश्विन श्रीनिवासन याने आपला बाप नेहमीच असे उद्योग करत आला आहे, असे सांगत आईवडिलांचे चांगलेच पांग फेडले आहेत. तरीही आपला या सगळ्याशी काहीही संबंध नाही आणि त्यामुळे आपण पदत्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्वच्छ भूमिका श्रीनिवासन यांनी घेतली आहे.
त्यांचेही तसे बरोबरच म्हणावयास हवे. या श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा यासाठी जोर लावणाऱ्यांत आहेत राजीव शुक्ला हे नामांकित गृहस्थ. भावी अमरसिंग असे ज्यांचे रास्त वर्णन करता येईल त्या शुक्ला यांना नैतिक वगैरे भूमिका घ्यावी लागते, हेही या आयपीएलचेच यश म्हणावयास हवे. भारतात अनेक जणांच्या बाबत हा माणूस नक्की काय करतो, असा प्रश्न विचारता येतो. त्यात शुक्ला यांचे नाव आघाडीवर असेल. या आधीचे आयपीएल प्रमुख ललित मोदी यांच्या खुर्चीवर सध्या शुक्ला बसतात. मोदी सध्या परदेशात लपून आहेत. तेव्हा त्या मोदी यांची खुर्ची बळकावण्याइतका मोठेपणा शुक्ला यांच्याकडे आहे यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज यावा. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनीही o्रीनिवासन यांच्यावर तोफ डागताना त्यांना क्रिकेट नियामक मंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे विधान केले. आयपीएलच्या निमित्ताने असेल, पण कमलनाथ यांचाही नैतिकता या शब्दाशी तरी निदान संपर्क आला, ते बरेच झाले. या मंडळींच्या जोडीला काही वृत्तसमूह हेदेखील नैतिकतेच्या मुद्दय़ावर श्रीनिवासन हटाव या मोहिमेत सामील झाले आहेत. ज्यांनी वृत्तांकनाची जागा जाहिरातीच्या दरात आयपीएलला विकली आणि ज्या वृत्तपत्रांत आयपीएलसंबंधित वृत्तांकन हे जाहिरात म्हणून प्रसिद्ध केले जाते तेही आता श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी अधिक जोरात बोंब ठोकताना दिसतात. तेव्हा या मंडळींसाठी आपण राजीनामा का द्यावा, हा श्रीनिवासन यांचा सवाल रास्तच म्हणावयास हवा. प्रसिद्धी माध्यमे निर्णय घेण्याबाबत आपणास जबरदस्ती करू शकत नाहीत, असे श्रीनिवासन म्हणू शकले, कारण यातील बऱ्याच मंडळींचा आयपीएलच्या पैशावर डोळा आहे हे त्यांना माहीत आहे. भारतीयांनो, सर्व समस्या विसरा, आता आयपीएल सुरू होत आहे, असे सांगत आयपीएलचा फुगा फुगवण्यात या प्रसिद्धी माध्यमांतीलच काही कसे आघाडीवर होते हे न ओळखण्याइतका चतुरपणा श्रीनिवासन यांच्याकडे नाही, असे स्वप्नातही म्हणता येणार नाही. तेव्हा ही माध्यमे बोंब ठोकतात म्हणून राजीनामा न देण्याचा श्रीनिवासन यांचा निर्णय योग्यच म्हणावयास हवा.
वास्तविक श्रीनिवासन, राजीव शुक्ला यांसारख्या चाणाक्ष आणि चतुर मंडळींचा उपयोग आपले सरकार पुरेसा करवून घेत नाही, असे आमचे म्हणणे आहे. शेजारील चीन, पाकिस्तान आदी समस्यांनी जर्जर झालेल्या मनमोहन सिंग सरकारने हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी श्रीनिवासन यांच्यासारख्या कर्तबगारांवर टाकायला हवी. त्यातही विशेषत: चीनची समस्या श्रीनिवासन यांच्याकडे द्यावीच. तेथेही एखादी लीग मालिका सुरू करून श्रीनिवासन आणि शुक्ला दोन देशांतील वादग्रस्त भूभागाचा प्रश्न सहज मिटवू शकतील याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. तसे झाल्यास श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणारे वर्तमानपत्र चीनमधील जाहिरातसंधीच्या शोधात भारत-चीन यांच्यात नवी ‘चमन की आशा’ अशी काही योजना जाहीर करणारच नाही, असे नाही. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निदान एवढे तरी करावेच. तसे त्यांनी ते केल्यास सोनिया गांधी यांचा त्यास पाठिंबा राहील याची हमी राजीव शुक्ला घेतीलच. त्याचमुळे तूर्तास श्रीनिवासन आगे बढो.. अशी घोषणा कोणी दिल्यास.. हम तुम्हारे साथ है असे म्हणण्याची तयारी आपण ठेवावी, हे बरे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा