सध्या काँग्रेसला दुभंग व्यक्तिमत्त्वाची पीडा जडली आहे. सरकार एक करते आणि नंतर पक्षसंघटना वा राहुलब्रिगेड भलताच सूर आळवते. पूर्वी अशा राजकारणात आपण विरोधकांचा ‘अवकाश’ कमावण्याचा सत्ताधारी मंडळीचा डाव असायचा. पण सध्या राहुलबाबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तरुणतुर्क जे काही करत आहेत, ते निव्वळ आचरट उद्योग ठरत आहेत. कलंकित राजकारण्यांना निवडणुकीपासून रोखण्याचा वटहुकूम सरकारने काढण्याची तयारी केल्यानंतर राहुल गांधींनी अचानक जाहीररीत्या त्याच्या चिंध्या करण्याचा प्रकार हा त्यातलाच होता. आता ‘आदर्श’ प्रकरणाचा अहवाल काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने फेटाळताच पृथ्वीराजबाबांच्या आणि राहुलबाबांच्या स्वच्छ सदऱ्यावर शिंतोडे उडू लागताच मुंबईतील आधुनिक आणि तडफदार खासदार मिलिंद देवरा यांनी ‘चौकशी झालीच पाहिजे आणि कितीही मोठी व्यक्ती त्यात गुंतली असेल तर सत्य बाहेर आलेच पाहिजे’ असा बाणेदार पवित्रा घेत त्यात आणखी एका प्रकरणाची भर घातली. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता यांच्याशी लढत असलेल्या काँग्रेसला त्यातही राहुलब्रिगेडला रोज नानाविध कसरती करत आपण कसे स्वच्छ कारभाराचे भोई आहोत हे सिद्ध करण्यासाठी झगडावे लागत आहे. गंमत म्हणजे त्यात त्यांना आपल्याच सरकारशी लढत राहावे लागते. ‘आपुलाचि वाद आपणाशी’ हा खेळ सारखाच रंगत आहे. पण ज्या रीतीने हे घडत आहे त्यातून अंतर्गत संघर्ष नव्हे, तर पक्षाच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन अधिक प्रकर्षांने होत आहे. विशेष म्हणजे तो वटहुकूम असो की आता आदर्शच्या प्रकरणाच्या चौकशीचा मुद्दा, दोन्ही प्रकरणांमध्ये मिलिंद यांनीच पहिला निषेध नोंदवला हा आणखी एक राजकीय योगायोग. कॅम्पा कोलानामक अनधिकृत बांधकामासाठी गाजलेल्या इमारतीमधील बेकायदा मजल्यांचे बांधकाम वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटणारे खासदार देवरा सगळय़ांनी पाहिले. आता हेच देवरा आदर्शनामक अनधिकृत बांधकामाचे वेगळेच उदाहरण देशासमोर ठेवणाऱ्या इमारतीबाबत मात्र एकदम कायदाप्रिय झाले आहेत. ‘आदर्श’चे सत्य बाहेर आलेच पाहिजे, असे ते म्हणत आहेत. या प्रकरणात आपल्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर नेते अडचणीत येऊ शकतात हे माहिती असतानाही देवरा यांनी हा सूर लावला. त्यावरून देवरा हे किती न्यायप्रिय आहेत, कायद्यासमोर कोणीही छोटा-मोठा नसतो हे तत्त्व त्यांच्या अंगात किती भिनले आहे, स्वच्छ चारित्र्याच्या अशाच राजकारण्यांची आपल्याला गरज आहे, ही मंडळी काही तरी वेगळे करू पाहत आहेत, असा समज लोकांनी करून घ्यावा अशी त्यांची अपेक्षा असावी. यानंतर अकस्मात राहुल गांधी यांनीही तसा सूर आळवत ‘आदर्श’चे सत्य सर्वासमोर आणण्याची आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर कारवाई झाली तरी चालेल अशी भूमिका घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. कॅम्पा कोलाचे अनधिकृत बांधकाम मिलिंद देवरांना चालते तर मग आदर्शचे का नाही? शिवाय मिलिंद यांचा हा चेहरा खरा की तो चेहरा खरा असाही प्रश्न निर्माण होतो. पक्षहितासाठी काही वेळा राजकारण्यांना अशा कसरती कराव्या लागतात. वेगवेगळय़ा भूमिका घ्याव्या लागतात. पण देवरा यांनी काही दिवसांत अनधिकृत बांधकामाबाबत घेतलेल्या या टोकाच्या भूमिका पाहता पक्षाप्रमाणे मिलिंद यांचे व्यक्तिमत्त्वही दुभंगले काय, असा प्रश्न पडतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा