ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता दाणी-चतुर्वेदी यांना सामाजिक न्यायात महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या भूमिकेचा अर्थ बिहारमध्ये गेल्यावर उमगला. त्यामुळे समाजात किती फरक पडतो, हे लक्षात आले. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारने महाराष्ट्राचे अनुकरण केले तर देश खूप पुढे जाईल, असे त्यांना वाटते.
‘आधार’ म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या उपमहासंचालक सुजाता दाणी चतुर्वेदी या महाराष्ट्राच्या. पण त्यांना महाराष्ट्राचा खरा अर्थ उमगला तो बिहारला गेल्यावर. शाळेत असताना महात्मा जोतिबा फुले, महर्षी कर्वे, रमाबाई रानडे या नावांचा त्यांना पाठय़पुस्तकांतून परिचय घडला. पण तो कोरडाच होता. उपेक्षित आणि वंचित अवस्थेत जगणाऱ्या बिहारमधील महिलांकडे बघून या समाजसुधारकांनी महाराष्ट्रात महिलांसाठी नेमके काय केले याची जाणीव त्यांना झाली.
महाराष्ट्रात महिला शिक्षणाची परंपरा स्थापित झाली. महिलांसाठी विद्यापीठे झाली. त्यांना स्वीकारार्हता लाभली. मुलगी शिकली पाहिजे, काम केले पाहिजे, ही सकारात्मकता समाजात दृढ झाली. महिलांच्या शिक्षणाचा पाया रचल्यामुळे महाराष्ट्राला उर्वरित भारतावर शंभर-दोनशे वर्षांनी आघाडी घेण्याची संधी मिळाली. सामाजिक न्यायात महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या भूमिकेचा अर्थ बिहारमध्ये गेल्यावर उमगला. त्यामुळे समाजात किती फरक पडतो, हे लक्षात आले. या सर्व गोष्टींचे बाळकडू असलेल्या महाराष्ट्राचा अर्थ सुजाता दाणींना बिहारमध्ये गेल्यावर कळला आणि स्वत:चीही खऱ्या अर्थाने ओळख पटली. ही गोष्ट आता बिहारमध्ये यायला लागली आहे. बिहारमध्ये क्रांतिकारी बदल घडत आहेत. अनेक मुली इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत आणि नोकऱ्याही करीत आहेत. गरिबीतही सर्वात गरीब महिला आणि त्यांची लहान मुले असतात. महिलांना गरिबीतून वर यायला सर्वाधिक वेळ लागतो. मुली आणि महिलांना त्यांचे रास्त स्थान मिळत नाही, तोपर्यंत समाजाचे उत्थान होणारच नाही, या भावनेने सुजाता दाणी-चतुर्वेदी आपल्या परीने शक्य तितकी धडपड करीत असतात. ग्रामीण भागात कामानिमित्त गेल्यावर मुलींना सायकलवर किंवा पायी शाळेत जाताना पाहिले की त्या हरखून जातात. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारने महाराष्ट्राचे अनुकरण केले तर देश खूप पुढे जाईल. प्रत्येक मुलीने व बाईने घरातून बाहेर पडून काम केले पाहिजे. महिला स्वावलंबी बनल्या तर पूर्ण समाजच बदलून जाईल, असा त्यांना विश्वास वाटतो. बिहारमध्ये महिला-पुरुष भेदभाव कधीच नव्हता. अनेक बाबतीत मागासलेपणा आणि लोक पुरेसे शिक्षित नसले तरी तिथे महिलांना प्रचंड आदर मिळतो. सुजाता यांना नागपुरात राहून हिंदूी चांगली येत असल्यामुळे बिहारमध्ये फायदा झाला. त्यांना मैथिली, मगधी, भोजपुरी, अंगिका या भाषा चांगल्या प्रकारे समजतात आणि आवडतातही.
सुजाता दाणींचा जन्म अकोल्याचा. दाणी कुटुंब मूळचे मोर्शीचे. आजोबा विनायक रामचंद्र दाणी इंग्रजांच्या काळात हेडमास्तर होते, तर वडील डॉ. गोविंदराव विनायक दाणी पंजाबराव कृषी विद्यापीठात प्राध्यापक. रसायनशास्त्रात बी.एस्सी. झालेल्या त्यांच्या आई मंगला कुलकर्णी यांचे कुटुंब नागपुरातील गोकुळ पेठेतील. अकोल्याच्या न्यू इरा शाळेतून सुजातांनी दहावी केल्यानंतर दाणी कुटुंब नागपूरच्या गिरिपेठेत स्थिरावले. १९८५ साली नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून बी. ए. आणि इतिहासात एम.ए. करीत असताना सुजाता रशियन भाषा शिकल्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची शिष्यवृत्ती मिळवून रशिया आणि युरोपलाही जाऊन आल्या. पुरोगामी विचारांच्या वडिलांचा त्यांच्यावर लहानपणापासूनच प्रभाव होता. तुला आयएएस व्हायचेच आहे, असे ते सुजातांना अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला दाखवून नेहमी सांगायचे. विविध भाषांवर कमालीचे प्रेम असल्यामुळे त्यांनी सुजातांना इंग्रजी, संस्कृत, हिंदूी भाषांसह अनेक गोष्टी हसत-खेळत शिकवल्या. दुर्दैवाने सुजातांच्या सतराव्या वाढदिवसापूर्वीच त्यांचे बुलढाणा मुक्कामी निधन झाले. सरकारी नोकरीत असलेले थोरले भाऊ डॉ. रविप्रकाश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एम.ए.च्या शेवटच्या वर्षांत त्यांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि १९८९ मध्ये त्या बिहार कॅडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या. पित्याच्या निधनानंतर तीस वर्षांनी गेल्या वर्षी त्यांचे भाऊ डॉ. रविप्रकाश यांनी पंकृविच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांना पुन्हा अकोल्याला जाण्याचा योग आला. त्या वेळी सुजाता यांच्यापेक्षा बरेच कनिष्ठ असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी परिमल सिंह त्यांना भेटायला आले आणि जिल्हाधिकाऱ्याचा बंगला बघण्याची त्यांना विनंती केली. त्या क्षणी वडिलांच्या आठवणींनी सुजातांना गहिवरून आले. आई-वडिलांच्या सत्कृत्यांची फळे मुलांना मिळतात. आपले आई-वडील खूप सहृदयी आणि चांगले होते. त्यांनी नेहमीच लोकांचे भले केले. मुलांवर प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, नैतिक वर्तनाचे संस्कार केले. एका मर्यादेपलीकडे कुठलीही गोष्ट गांभीर्याने न घेता हसायला शिकवून घरातील वातावरण तणावमुक्त ठेवले. आपण मेहनत करतो. पण यश मिळताना आई-वडिलांचा कुठेतरी आशीर्वाद असतो. व्यक्तिगत जीवनात त्यांना हा अनुभव आला. आपण चांगली कामे का करावी याचे हेच कारण आहे, असे त्यांना वाटते. आई-वडिलांचा आणखी सहवास लाभायला हवा होता, अशी भावना त्या व्यक्त करतात. सुजाता यांचे बंधू डॉ. रविप्रकाश यांचे कुटुंब अमेरिकेतच स्थायिक झाले आहे. त्यांची सून गुजराती आहे. थोरल्या भगिनी शोभा अरोरा हृषीकेशला सुरू झालेल्या एम्समध्ये ऑर्थोपेडिक्स विभागाच्या प्रमुख. दिल्लीतील गुरु तेगबहादूर इस्पितळात ऑर्थोपेडिक्स विभागाच्या सर्जन आणि दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून त्यांनी २५ वर्षे काम केले. आयएएसचे प्रशिक्षण पूर्ण करून १९९० साली सुजाता बिहारला गेल्या तेव्हापासून त्यांचा महाराष्ट्राशी संपर्क संपुष्टात आला. त्या महाराष्ट्रात शिकल्या. पण नोकरीची सुरुवात त्यांना बिहारमध्येच करावी लागली. नोकरीतील रौप्यमहोत्सवी वाटचालीत त्यांना विविध अनुभव आले. बिहारमध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासह विविध पदांवर काम केले. दिल्लीत १९९८ ते २००२ दरम्यान माहिती व नभोवाणी मंत्रालयात, २००७ मध्ये शहरी विकास मंत्रालयात संचालक म्हणून आणि सध्या गेल्या दोन वर्षांपासून त्या आधार प्रकल्पात उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत. मूळचे उत्तराखंडचे, पण बिहार कॅडरचे आणि सध्या केंद्रीय सचिवालयात संयुक्त सचिवपदावर असलेले आलोक चतुर्वेदी यांच्याशी त्यांचा २२ वर्षांपूर्वी विवाह झाला. अर्थशास्त्रात बी.ए. ऑनर्स करून मुंबईत नोकरी करण्यासाठी सज्ज झालेली थोरली तुलिका आणि अकरावीत असलेला धाकटा तनय अशी त्यांना दोन अपत्ये आहेत. सुजाता दाणींचे नागपूरला जाणे-येणे फारसे नसले तरी नागपूरच्या आठवणींमध्ये त्या गढून जातात. नागपूरचे रस्ते आणि एकूण पायाभूत सुविधांचे त्यांना आकर्षण वाटते.
नागपुरात त्यांचा मोठा गोतावळा आहे. गिरिपेठेत त्यांचा सहा मैत्रिणींचा पक्का ग्रुप होता. सर्व मैत्रिणी एकाच रंगाच्या बीएसए एसएलआर सायकलींनी एकत्र हिस्लॉपला जायच्या. त्या मैत्रीचे भावना मनात आजही टवटवीत आहे. त्याच गटातल्या अंजली सिंह हिस्लॉपमध्येच शिकवतात. नीना चटर्जी आता नीना समजदार झाल्या. नागपूर टाइम्सवाल्या यमुताई शेवडेंच्या नात श्रुती बेलापूरकर आचार्य रजनीशांच्या शिष्या. इंग्लंडमध्ये त्यांचा स्वत:चा स्पा आहे. मैत्रीण शैलजा प्रसाद यांचे रामनगरला बुटिक आहे. अनिता विजयकर या एच. आर. तज्ज्ञ. त्यांच्या आई, नागपूरच्या माजी महापौर कुंदा विजयकर यांच्याविषयी त्यांना प्रचंड जिव्हाळा आहे.  सी. पी. अ‍ॅण्ड बेरारमधून प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या डॉ. छाया कुलकर्णी, त्यांचे पती अरुण, भंडाऱ्यातील शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या कल्पना व्यवहारे, वेकोलितील हेमंत आणि अर्चना दाणी, रिझव्‍‌र्ह बँकेतील संध्या वैरागडे, वकिलीच्या व्यवसायात असलेले नितीन खांबोरकर या भावंडांचा त्या आवर्जून उल्लेख करतात. १९ जून १९६५ चा जन्म असलेल्या सुजाता दाणींना आयुष्यात खूप इंटरेस्टिंग मैत्रिणी मिळाल्या. मैत्रिणींच्या वैयक्तिक जीवनात डोकावले तर एकाहून एक सरस गोष्टी बाहेर येतील आणि खूप वाचनीय ठरतील म्हणून त्यांच्याविषयी कधीतरी लिहायचा त्यांचा विचार आहे.
त्यांच्या मते महिलांसाठीोयएएसमध्ये महिला म्हणून नोकरीचे आणि वैयक्तिक आव्हान असते. आई, पत्नी, सून, अशा भूमिका पार पाडायला जास्त ऊर्जा लागते. कारकिर्दीच्या सुरुवातीला २४-२४ तास काम करावे लागते.  कायदा आणि सुव्यवस्था, निवडणुका, पूरस्थितीसारख्या परिस्थितीत सतत काम करावे लागते. घर आणि नोकरीचे संतुलन साधताना डोके स्थिर ठेवावे लागते. आपल्याला चांगली अधिकारी तसेच पत्नी, सून, आई व्हायचे आहे, हे लक्ष्य सतत ठेवावे लागते, असे त्या सांगतात. समस्यांचे चांगल्या प्रकारे निराकरण करण्यासाठी आयएएस दाम्पत्य एकमेकांना व्यावसायिक आणि उत्तम सल्ला देऊ शकतात. पण कधी कधी त्यापोटी घरात सरकारी गोष्टींच्या चर्चेचा अतिरेक होतो, असे त्या सांगतात. सुजाता दाणी यांची काहीही वाचायची तयारी असते. नवनव्या गोष्टींविषयी खूप कुतूहल वाटते. धर्माविषयी वाचायला आवडते. देवदत्त पटनाईक यांचे प्रत्येक पुस्तक वाचतात. ‘आधार’मध्ये सुजाता दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल अशा सहा राज्यांचे काम सांभाळतात. त्यांच्या मते कोटय़वधी लोकांना ओळख प्रदान करणाऱ्या ‘आधार’ प्रकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागावे ही अभूतपूर्व गोष्ट आहे. देशातील गरीब आणि नि:शक्त लोकांना एवढय़ा मोठय़ा संख्येने ओळखपत्रे देण्याचे काम देशात प्रथमच होत असून या प्रकल्पातील आश्वासकता प्रत्यक्षात उतरली पाहिजे, असे त्यांना वाटते.  २०१४ पर्यंत ६० कोटी लोकांना आधार कार्ड प्रदान करण्याचे आहेत. हा प्रकल्प संपवून सरकारमध्ये परत गेल्यावर संथपणा जाणवेल, या जाणिवेने त्या अस्वस्थ होतात.

Story img Loader