प्रसंग आल्यावर आपण (मीसुद्धा) किती संवेदनहीन व ढोंगी असतो याचे प्रदर्शन आपण नकळत करत असतो. पंढरपूर वारी, दिंडी, संत तुकाराम यांच्याविषयी आपण इतके नुसते हळवे आध्यात्मिक बनून जातो की दैनंदिन व्यवहारात या गोष्टींचा बोध आपण कसा घेऊ शकतो याचा साधा विचार करण्याचे भान आपण ठेवत नाही. गावात भीषण दुष्काळ पडला असताना संत तुकाराम यांनी भुकेलेल्या गावकऱ्यासाठी आपले धान्याचे कोठार मुक्त केले याचे आपण अगदी माना डोलवत कौतुक करतो. ‘‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पिड पराई जाणे रे’’ हे नरसिंह मेहतांचे भजन तल्लीन होऊन ऐकतो. ‘जीव भावे शिव सेवा’ हा रामकृष्ण परमहंस यांनी दिलेला संदेश प्रत्येक प्रवचनातून न चुकता ऐकतो आणि कानात साठवून ठेवतो. पण हे उपदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा विचार मात्र आपण करत नाही. तसे करण्यापासून आपण स्वत:ला कसल्यातरी सबबीखाली नियंत्रणात ठेवत असतो किंवा केल्यासारखे काहीतरी करत समाधानात राहत असतो. यासाठी दोन उदाहरणे देतो.
काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भूकंप होऊन मोठी हानी झाली. अनेक बिनसरकारी परदेशी स्वयंसेवी संघटनांनी तेथे जाऊन पुनर्वसनाचे काम व्यवस्थित केले व अल्पकाळात मायदेशी परतल्या. पण सेवाभावी म्हणवून घेणाऱ्या एका बापू संघटनेने (महात्मा गांधी नव्हे) मुंबईहून जुने फाटके कपडे आणि बाद ठरलेली औषधे नेऊन ती तेथे वाटण्याचा प्रयत्न केला. पण तेथील काही जागृत स्वयंसेवकांनी तसे होऊ दिले नाही. दुसरे उदाहरण ताजे : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी पूर्णतया संकटात सापडले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच संवेदनहीन असलेल्या शासनाच्या पथ्यावर पडेल हे लक्षात घेऊन माझ्या नागपूर येथील स्नेह्य़ाने पुणे, नागपूर व मुंबई येथील ‘रामकृष्ण मिशन’ पीडित शेतकऱ्यांना कसे सहाय्य करू शकेल याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या त्या प्रयत्नास मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक होते. ‘रामकृष्ण मिशनच्या महाराष्ट्रातील वरील शाखा साभार देणग्या स्वीकारत असल्या तरी मदतकार्याविषयीचे निर्णय प. बंगालमधील बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयातूनच घेतले जात असतात. त्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत.’ असे ते उत्तर समजल्यावर परमहंस यांच्या ‘जीव भावे शिव सेवा’ या संदेशाचा प्रत्यक्ष कृतीशी संबंध नसावा अशी समजूत झाली.
– श्रीराम गुलगुंद, कांदिवली

राहुल नार्वेकर बळीचा बकरा होणार!
राहुल नार्वेकर शिवसेनेचे प्रवक्ते होते. ते शिवसेनेची बाजू तावातावाने मांडत. इंग्रजी-मराठीत चानेलवर संभाषण करू शकत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत, असा मोहरा दुसऱ्याच्या गळाला लागणे, म्हणजे शिवसेनेचा पाय लंगडा करणे / तोंड बांधले जाणे.
पण ते निवडून येणार का, हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर, राष्ट्रवादीचे मावळमधील आमदार लक्ष्मण जगताप शेकापच्या पाठिंब्यावर उभे राहात आहेत. सध्याचा तेथील खासदार युतीचा आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, शरद पवार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसते.. शिवसेनेचा प्रवक्ता पळवला. जगताप यांना त्यांची जागा दाखवून दिली मुख्य म्हणजे नार्वेकरांना धडा शिकवला.
नार्वेकर निवडून आले नाहीत तर त्यांना राष्ट्रवादीत स्थान नाही नि शिवसेनेचे दरवाजे बंद! निवडून आले तरी भुजबळांसारखेच. चौथाई-देशमुखीचे अधिकार मिळतील; पण काही वाटा न चुकता मुख्य खजिन्यात भरणा करावयाच्या अटीवर. पण मुख्यमंत्री म्हणून स्वप्नही बघावयाचे नाही. तो वारसा पवार घराण्यातच राहणार.
नार्वेकर यांच्या उमेदवारीचा हा अर्थ आहे.
– श्रीधर गांगल, ठाणे</strong>

‘आप’ले मोहम्मद मोर्सी
परवाच अरिवद केजरीवालांनी माध्यमांना भ्रष्ट घोषित केले. बदल हा स्वाभाविक किंवा स्वयंचलित नसेल तर काय होऊ शकते हे दिल्लीतील नाटय़ात स्पष्ट झाले. नेमका कार्यक्रम हाती नसलेल्यांची कमतरता होती म्हणून की काय, ‘आप’ची भरघोस देणगी आपणाला मिळाली आहे, जो पक्ष अशाच काहीशा बदलांवर आधारित राजकारण करू पाहत आहे. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे एका दीर्घकालीन चाललेल्या प्रक्रियेचं फळ आहे. ज्यात आधी देशाला एक राष्ट्र म्हणून नावारूपाला आणावं लागलं आणि हे जनतेला पटवून देण्यात बराच काळ लोटला तेव्हा कुठे एका स्थिर राष्ट्राचा जन्म झाला.
याउलट, तहरीर चौकातून २०११ मध्ये अचानक घडलेल्या बदलास क्रांती म्हणवणं आणि २०१२ साली मोहम्मद मोर्सी यांना सत्तापदी बसवणं इजिप्तला महाग पडलं व त्याची फळे हा देश भोगतो आहेच. बदलाची प्रक्रिया ही दीर्घकालीन असावी हे नेतृत्वाला अमान्य असल्यामुळे आंदोलनाला मिळालेली दिशा चुकते हे आपण तिथं अनुभवलं. असहिष्णू समाज व्यवस्थेला अराजकाकडे सहज वळवू शकतो.
व्यवस्थेबद्दल नकारात्मक मत केल्याने समाज असहिष्णू होऊ शकतो, हे सांगायला काही योगेंद्र यादवांची गरज नाही. असं करणारे उद्या याच व्यवस्थेचा भाग बनू पाहत आहेत हे पचवायचं तरी कसं?
चंद्रदीप दुबोले-जाधव, सांगली</strong>

भाजपसाठी हा महत्त्वाचा आधार ?
चीनशी १९६२ मध्ये झालेल्या युद्धाबाबतचा हेंडरसन-ब्रुक्स अहवाल अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. पण या अहवालाचा हवाला देऊन ‘पराभवाला नेहरू, लष्करच जबाबदार’ हे वृत्त (१९ मार्च) प्रसिद्ध झाले आहे.
नेव्हिल मॅक्सवेल यांचे ‘इंडियाज चायना वॉर’ हे पुस्तक प्रसिद्ध होऊन आता ४० वष्रे झाली. हेंडरसन-ब्रुक्स अहवालाचे भाग या पुस्तकात उद्धृत केल्याबाबत संसदेत त्या वेळी प्रचंड चर्चासुद्धा झाली होती, पण नंतर ती चर्चा थंडावली होती. आता तेच मुद्दे ४० वर्षांनंतर उपस्थित करून ही माहिती निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यामागील कारणे उघड आहेत.
ऑस्ट्रेलियातील युद्ध पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी या अहवालातील काही भाग त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे. या देशातील लोकशाही प्रक्रियेत परदेशातून ढवळाढवळ होणे हे ‘जाज्वल्य देशप्रेम’ बाळगणाऱ्यांना निश्चितच आक्षेपार्ह वाटेल. भारतातील लष्करी अधिकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. आता तर त्यातील काही सरळच राजकीय पक्षात प्रवेश घेतात.
एका नामांकित दैनिकाच्या वृत्तानुसार, पक्षांतर्गत पाहणीत भारतीय जनता पक्ष एकटा १७० पेक्षा जास्त जागा जिंकेल का, याबद्दल त्यांच्या नेत्यांनाच साशंकता वाटते. त्यामुळे अशा बातम्या हाही या पक्षाला महत्त्वाचा आधार वाटत असेल.
राजीव जोशी, नेरळ

या अहवालाचे राजकारण नको
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाची चिरफाड करणारा हेंडरसन ब्रूक्स यांचा अहवाल पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी जाहीर केल्यानंतर, भापजने त्यावरून टीकेची झोड उठवण्याचे हीन राजकारण केले आहे. या अहवालामुळे मतदार भापजला मते देतील असे या पक्षाला वाटते का? जर या निवडणुकीत सत्ता भाजपला मिळाली तर भाजप या अहवालाचा कशा प्रकारे विचार करणार आहे, हेही भापजने जाहीर करावे. मात्र, अहवालाचे भांडवल निवडणुकीसाठी करणे योग्य नव्हे. भाजपला अन्य मुद्देही आहेतच.
विवेक तवटे, कळवा

मीडियावरील टीकेत तथ्य आहेच
केजरीवाल यांनी नुकतीच मीडियावर जी टीका केली तो सध्या एक चच्रेचा विषय झाला आहे. मात्र केजरीवाल यांनी सरसकट सर्व पत्रकारांवर टीका केलेली नाही. काही पत्रकार आणि मीडिया पेड न्यूजचा वापर करून स्वार्थासाठी लोकशाहीचा गळा घोटतात हे दारुण सत्य गोिवदराव तळवलकर व पी. साईनाथ या ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या लेखांत काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले होते. राजकारणातील अननुभवामुळे केजरीवाल यांच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरी जनतेच्या मनात त्यांनी एक आशेचा किरण निर्माण केला आहे हे त्रिवार सत्य आहे.
– केशव आचार्य, अंधेरी

Story img Loader