प्रसंग आल्यावर आपण (मीसुद्धा) किती संवेदनहीन व ढोंगी असतो याचे प्रदर्शन आपण नकळत करत असतो. पंढरपूर वारी, दिंडी, संत तुकाराम यांच्याविषयी आपण इतके नुसते हळवे आध्यात्मिक बनून जातो की दैनंदिन व्यवहारात या गोष्टींचा बोध आपण कसा घेऊ शकतो याचा साधा विचार करण्याचे भान आपण ठेवत नाही. गावात भीषण दुष्काळ पडला असताना संत तुकाराम यांनी भुकेलेल्या गावकऱ्यासाठी आपले धान्याचे कोठार मुक्त केले याचे आपण अगदी माना डोलवत कौतुक करतो. ‘‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पिड पराई जाणे रे’’ हे नरसिंह मेहतांचे भजन तल्लीन होऊन ऐकतो. ‘जीव भावे शिव सेवा’ हा रामकृष्ण परमहंस यांनी दिलेला संदेश प्रत्येक प्रवचनातून न चुकता ऐकतो आणि कानात साठवून ठेवतो. पण हे उपदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा विचार मात्र आपण करत नाही. तसे करण्यापासून आपण स्वत:ला कसल्यातरी सबबीखाली नियंत्रणात ठेवत असतो किंवा केल्यासारखे काहीतरी करत समाधानात राहत असतो. यासाठी दोन उदाहरणे देतो.
काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भूकंप होऊन मोठी हानी झाली. अनेक बिनसरकारी परदेशी स्वयंसेवी संघटनांनी तेथे जाऊन पुनर्वसनाचे काम व्यवस्थित केले व अल्पकाळात मायदेशी परतल्या. पण सेवाभावी म्हणवून घेणाऱ्या एका बापू संघटनेने (महात्मा गांधी नव्हे) मुंबईहून जुने फाटके कपडे आणि बाद ठरलेली औषधे नेऊन ती तेथे वाटण्याचा प्रयत्न केला. पण तेथील काही जागृत स्वयंसेवकांनी तसे होऊ दिले नाही. दुसरे उदाहरण ताजे : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी पूर्णतया संकटात सापडले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच संवेदनहीन असलेल्या शासनाच्या पथ्यावर पडेल हे लक्षात घेऊन माझ्या नागपूर येथील स्नेह्य़ाने पुणे, नागपूर व मुंबई येथील ‘रामकृष्ण मिशन’ पीडित शेतकऱ्यांना कसे सहाय्य करू शकेल याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या त्या प्रयत्नास मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक होते. ‘रामकृष्ण मिशनच्या महाराष्ट्रातील वरील शाखा साभार देणग्या स्वीकारत असल्या तरी मदतकार्याविषयीचे निर्णय प. बंगालमधील बेलूर येथील रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयातूनच घेतले जात असतात. त्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत.’ असे ते उत्तर समजल्यावर परमहंस यांच्या ‘जीव भावे शिव सेवा’ या संदेशाचा प्रत्यक्ष कृतीशी संबंध नसावा अशी समजूत झाली.
– श्रीराम गुलगुंद, कांदिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा