अमेरिका आणि मित्रराष्ट्राचं लष्कर परत गेल्यास अफगाणिस्तानात काय होईल, याची काळजी सर्वाना वाटते. तालिबान परत एकदा सत्ता काबीज करणार की तालिबानातील उदारमतवाद्यांना सत्तेत सहभागी करून घेणार? अशाश्वतेच्या फेऱ्यात सापडलेली तेथील माणसं..
‘गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंझिल..’ काबूल विमानतळाच्या बाहेर पडलो आणि काबूल स्टार हॉटेलच्या गाडीत बसताच हे गाणं सुरू झालं. अफगाणिस्तानच्या राजधानी काबूल शहराच्या पाच दिवसांच्या भेटीत हिंदी गाणे व संगीत सतत माझ्यासोबत होतं. हिंदी फिल्म व गाण्याचं अफगाणी जनतेला वेड असल्याचं मला प्रकर्षांने जाणवलं.
फिनिक्स पक्ष्यासारखं काबूल शहर उभं राहत आहे. रस्त्यात वाहनांची वर्दळ सतत सुरू असते. शुक्रवारी विमानतळाहून हॉटेलात जाताना रस्त्यात फारसा ट्राफिक दिसत नव्हता. ‘बरं आहे. इथे फारसा ट्राफिक नाही,’ असं ड्रायव्हरला विचारताच तो म्हणाला, ‘आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ट्राफिक नाही. उद्या तुम्ही पाहा.’ खरंच. दुसऱ्या दिवशी ट्राफिक पाहून कंटाळलो. रस्त्यावर आणि बाजारात तरुण मुलं मोठय़ा संख्येने दिसतात. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वाच्या अंगावर गरम कपडे दिसतात. रस्त्यावर मुली किंवा महिला खूप कमी दिसतात. खाण्याच्या वस्तूंनी बाजार भरलेला असतो. अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर ड्रायफ्रूट्स येतात. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता यांनी बाजाराला वेगळंच आकर्षण मिळालं होतं. बुरख्यात काही महिला भीक मागताना दिसत होत्या. या महिला काबूल शहराच्या बाहेरच्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबात कोणी शिल्लक राहिलं नसल्यानं, तेथे भीक मागून आपलं आयुष्य चालवत आहेत, असं विचारल्यावर कळलं.
सायंकाळी सहा-साडेसहा वाजल्यापासून दुकानं बंद व्हायला लागतात. साडेसातनंतर शुकशुकाट असतो. बाहेरनं काही कामासाठी आलेल्या लोकांना सायंकाळनंतरचा वेळ कसा घालवायचा, हा मोठा प्रश्न असतो. अफगाणिस्तानात युरोपियन आणि अमेरिकनांसोबत भारतीयदेखील बऱ्या प्रमाणात आहेत. अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीच्या कामात भारत मोठय़ा प्रमाणात आहे. सर्व परकीय नागरिकांना काबूल शहरातदेखील काळजी घ्यावी लागते. सुरक्षितता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी आणि काही मित्र मात्र दिवसभराचं काम झाल्यानंतर सायंकाळी कधी टॅक्सीत तर कधी पायी हिंडत बाजारात नेमके जायचो. बाजारात आपल्याला त्या देशाची वस्तुस्थिती कळते. बाजारात सर्व भागातील लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कळतात.
युरोपियन, अमेरिकन बऱ्या प्रमाणात असल्याने अफगाणी गालिचा, ज्वेलरीसारख्या वस्तूंची किंमत दुकानदार डॉलरमध्ये सांगतो. डॉलर, युरो, पाऊंडसारखी करन्सी कुठल्याही रस्त्याच्या कोपऱ्यात अफगाणीमध्ये बदलतादेखील येते. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात काबूल बेचिराख होत राहिलं आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं. तालिबानला हाकलून लावल्यानंतर २००२ पासून काबूल परत उभं राहत आहे. सगळीकडे बांधकाम सुरू असल्याने सर्वत्र धूळ आढळते. वेगवेगळ्या वंशाचे लोक अफगाणिस्तानात राहतात. पख्तून आणि ताजिकांची संख्या जास्त आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या पख्तून लोकांची. नोकऱ्यांत मात्र ताजिक पुढे. पुश्तू आणि दरी भाषा सर्वत्र बोलली जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली डुराण्ड लाइन दोन्ही देशांना वेगळी करते. डुराण्ड लाइनच्या दोन्ही बाजूला पख्तून मोठय़ा संख्येत राहतात. त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत आणि त्यांच्यात येणं-जाणं सतत चालू असतं. ११ सप्टेंबर २००१ रोजी तालिबानने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यानंतर अल् काईदा आणि तालिबानींनी पाकिस्तानातील पख्तुनांचा आश्रय घेतला.
अहमद शाह मसूदचे फोटो काबूलमध्ये सर्वत्र दिसतात. एका महत्त्वाच्या रस्त्याला मसूदचं नाव देण्यात आलं आहे. नॉर्दन अलायन्सचा हा नेता तालिबानच्या विरोधात उभा राहिलेला. बुऱ्हानुद्दिन रब्बानी सरकारात मसूद संरक्षणमंत्री होते. १९९६ ला तालिबान काबूलमध्ये घुसले, तेव्हा रब्बानी आणि मसूदला पळावं लागलं. पंजशेरच्या खोऱ्यात जाऊन मसूद तालिबानशी लढत राहिला. स्वाभाविकच, भारताचा मसूदला पाठिंबा होता. अमेरिकेत करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी ९ सप्टेंबर २००१ रोजी दोन आत्मघाती हल्लेखोरांनी मसूदची हत्या केली. हल्लेखोर पत्रकार म्हणून मसूदला भेटायला गेलेले. भारताने मसूदला मदत केलेली ही वस्तुस्थिती अफगाणी जनता विसरलेली नाही. रब्बानीला पण भारताचा पाठिंबा होता. कालांतराने तालिबानने रब्बानीची पण हत्या केली.
भारत-अफगाणिस्तानचे खूप जुने संबंध आहेत. दोन्ही देशांत व्यापार मोठय़ा प्रमाणात होत असे. बाबरची समाधी काबूलमध्ये आहे. हजारो अफगाणी पठाण भारतात नोकरी-व्यवसाय करतात. पुण्यात जवळपास २,००० अफगाण विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारताने आता केलेल्या मदतीला अफगाणी जनता विसरणार नाही. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे भारताबद्दल अफगाणी जनतेत असलेली आपुलकी. भारताबद्दल लोकांमध्ये प्रेम आढळते तर पाकिस्तानबद्दल नाराजी. पाकिस्तान, अमेरिका आणि साऊदींनी मिळून आपल्या देशाचं वाटोळं केलं, अशी लोकांमध्ये मानसिकता जाणवते.
याचादेखील अनुभव आला. एका सायंकाळी उशिरा एक पाकिस्तानी महिला सहकारी हॉटेलात परत येत होती. सोबत कारमध्ये दोन भारतीय महिला आणि एक अफगाण महिला होती. तीन-चार ठिकाणी त्यांची कार पोलिसांनी चौकशीसाठी अडवली. प्रत्येक ठिकाणी अफगाण महिला कारमध्ये अफगाण आणि हिंदुस्थानातील लोकअसल्याचं सांगत होती. कारमध्ये पाकिस्तानी आहे, असं म्हटलं असतं तर पोलिसांनी जास्त चौकशी केली असती, असंही अफगाण महिला म्हणाली. डुराण्ड लाइनबद्दल अफगाणिस्तानात वेगवेगळी मतं आहेत. डुराण्ड लाइन न मानणारेदेखील अफगाणिस्तानात आहेत. तालिबानचा जन्म पाकिस्तानात झाला आणि त्यांना अफगाणिस्तानात पाठविण्यात आलं. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाण संस्कृती संपवली. महिलांना गुलाम केलं. मुस्लीम नसलेल्या लोकांना देश सोडावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण केली. काबूलच्या काही दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे काबूल शहरात शिखांची वस्ती बऱ्यापैकी होती. शीख समाज प्रामुख्याने व्यापारात होता. तालिबानच्या अत्याचाराला कंटाळून बहुसंख्य शिखांनी भारतात किंवा इतर देशात आश्रय घेतला. आता नावापुरते शीख शिल्लक राहिले आहेत.
रस्त्यावर फिरत असताना युरोपियन, अमेरिकन आणि भारतीय आढळतात. परदेशातील महिलादेखील रस्त्यावरून चालत असताना हिजाफ घालतात. ही अफगाण संस्कृती आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे, असं एका अमेरिकन महिलेने सांगितलं.
हॉटेलात हिंदी फिल्मी गाणं म्हणणं, ही सामान्य बाब झाली आहे. काबूल स्टार हॉटेलात रोज सायंकाळी तीन कलाकार हिंदी गाण्यांनी जेवायला येणाऱ्यांचं मनोरंजन करतात. ओपन सोसायटीच्या जज लैलानी सुफी नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीचं जेवण ठेवलं होतं. मोहमद खान गोगारी नावाचा गायक परंपरागत अफगाण वाद्य रुबाबात घेऊन ‘जिसकी बिबी मोटी, उसका भी बडा नाम है’, ‘सुहाना सफर और मोसम हंसी.’ गात होता. गिटाराला मिळतंजुळतं पण लहान असं रुबाबदार वाद्य आहे. आपण दिल्ली आणि कोलकाता येथेदेखील कार्यक्रम केला असल्याचं खानने म्हटलं. तालिबानच्या राजवटीत सुफीसारखी हॉटेलं चालणं शक्यच नव्हतं. गाणं आणि संगीतावर तालिबानने बंदी लादलेली. आता गाणं आणि संगीताला परत स्थान मिळू लागलं आहे.
जज लैला ही महिला मजेदार आहे. कुठलीही तडजोड न करता आपलं म्हणणं बिनधास्तपणे ती मांडते. तालिबानच्या राजवटीतदेखील आपण अफगाणिस्तान सोडलं नव्हतं. बुरख्यात राहावं लागत असे. घराबाहेर निघता येत नव्हतं. बाहेर काही कामानिमित्ताने पडायचं झालं तर पुरुष नातेवाईकांशिवाय बाहेर पडता येत नव्हतं. पण हे दिवस फार चालणार नाहीत. अफगाण जनता फार काळ तालिबानच्या अत्याचाराला सहन करणार नाही, याचा जजला विश्वास होता. या कारणामुळेच उच्चशिक्षित जजने काबुलात राहणं पसंत केलेलं. घरातदेखील भीतीने राहावं लागत असे, कारण तालिबान पोलीस कधी घरात येतील याची शाश्वती नव्हती. आता जज आणि तिच्यासारख्या असंख्य तरुण मुलीला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं वाटतं. विकासाच्या आता मिळालेल्या संधी कायम राहाव्यात, असं सर्वाना वाटतं.
२०१४ च्या अखेपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिका आपलं लष्कर संपूर्णपणे मागे घेणार, अशा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच्या घोषणेने हजारो अफगाण मुली आणि इतरांना चिंता वाटायला लागली आहे. अमेरिका आणि इंग्लंडने हळूहळू आपल्या सैन्याला परत बोलवायला सुरुवात केली आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्राचं लष्कर परत गेल्यास अफगाणिस्तानात काय होईल, याची काळजी सर्वाना वाटते. तालिबान परत एकदा सत्ता काबीज करणार की तालिबानातील उदारमतवाद्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यात येईल, असे प्रश्न आज लोकांसमोर आहेत. आजही काबूलबाहेर बऱ्याच भागात तालिबानचं नियंत्रण आहे. अफगाण पोलीस आणि लष्कराला गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. अफगाण सरकारला वाटतं की अफगाण पोलीस आणि लष्कर सज्ज होत आहेत आणि त्यांच्यावरची जबाबदारी ते पार पाडतील.
चांगले तालिबान आणि खराब तालिबान असा फरक करणं योग्य नसल्याचं काहींनी सांगितलं. चांगले तालिबान असूच शकत नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. अनिश्चितता आणि गोंधळाच्या परिस्थितीमुळे काही जण तर इतर देशांत स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानात परत तालिबानची सत्ता येऊ नये, याकरिता आंतरराष्ट्रीय समुदायाने सतर्क राहिलं पाहिजे, असं अफगाण नागरिकांना वाटतं. बाहेरहून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे आणि लोकांच्या येण्या-जाण्यामुळे रोजगार आणि व्यापारात वाढ झाली आहे. लोकांच्या हातात पैसे दिसू लागले आहेत. शांतता अजून काही र्वष राहिली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तालिबानची हुकूमत परत येऊ नये, असंच सर्वाना वाटतं.
अफगाणी माणसं..
अमेरिका आणि मित्रराष्ट्राचं लष्कर परत गेल्यास अफगाणिस्तानात काय होईल, याची काळजी सर्वाना वाटते. तालिबान परत एकदा सत्ता काबीज करणार की तालिबानातील उदारमतवाद्यांना सत्तेत सहभागी करून घेणार? अशाश्वतेच्या फेऱ्यात सापडलेली तेथील माणसं..
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 30-12-2012 at 12:23 IST
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghan man