ज्याला काहीही सिद्ध करायचे नाही त्या राहुलबाबांच्या औद्धत्यामुळे मनमोहन सिंग यांचाच नव्हे, तर देशाचाही अवमान झाला आहे. मनमोहन सिंग यांची इतकी अवहेलना विरोधकांनीदेखील कधी केलेली नाही. राहुलबाबांच्या या पापाची शिक्षा मनमोहन सिंग यांनी घ्यायला हवी.
कष्टाविना सत्ता आणि अधिकार मिळाला की जगास शहाणपण सांगत हिंडण्याची चैन करता येते. काहीही सिद्ध करून दाखवायचे नसल्यामुळे झाकली मूठ कायमच सव्वा लाखाची राहणार असते. राहुलबाबा गांधी यांचे हे असे झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारला अडचणीत आणण्याखेरीज राहुल गांधी यांच्या खात्यावर जमेच्या रकान्यात काहीही नाही. आपल्याला नक्की काय हवे आहे ते कधीही सांगायचे नाही, योग्य वेळी कशावर कोणतीही भूमिका घ्यायची नाही, मामला खपून गेला तर श्रेय घ्यायचे आणि उलटलाच तर पुन्हा काखा वर करून मी नाही बाबा त्यातला.. असा शहाजोगपणा करता येतो. राहुलबाबा हेच करीत आहेत. हा गुण बहुधा त्यांच्या रक्तातूनच आला असावा. त्यांच्या वडिलांनी, राजीव गांधी यांनी हेच केले होते. एकदा नव्हे वारंवार. देशाच्या परराष्ट्र सचिवाचा जाहीर अपमान करण्याचे औद्धत्य त्यांनी दाखवले होते आणि नवीन परराष्ट्र सचिव नेमला जाईल असे सूचित करताना परराष्ट्रमंत्री वा संबंधितांना विश्वासात घेण्याची गरज त्यांना वाटली नव्हती. काँग्रेसच्या शताब्दी वर्षांत मुंबईत भाषण करताना सरकारी योजनांतील ८५ टक्के निधी हा मधल्यामधेच कसा गायब होतो, हे सांगून राजीव गांधी यांनी प्रामाणिकपणाचा आव तर मोठा आणला होता. पण ते तेवढेच. त्यामुळे राजीव गांधी हे जणू कोणी हरिश्चंद्राचे अवतारच, असा ढोल काँग्रेस आणि त्या पक्षाच्या सुमार भाटांनी पिटला. पुढे प्रामाणिकपणाचे आवरण सोयीस्कररीत्या आणि योग्य वेळी गळून पडले. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचा असाच जाहीर अपमान राजीव गांधी यांनी केला होता. पक्षातील ज्येष्ठांना अडचणीत आणण्यासाठी जनमताच्या बाजूने जात लोकप्रिय भूमिका घेण्याचा उद्योग इंदिरा गांधी यांनीही केला होता. १९६७ साली पक्षातील ढुढ्ढाचार्यानी कोंडी केल्यावर इंदिरा गांधी यांनी अचानक समाजवादी वळण घेतले आणि आपण जणू जनेतच्या उद्धारासाठीच जन्माला आलो आहोत, अशी प्रतिमा तयार केली. पुढे त्यांचे काय झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या दोघांनी निदान पक्षबांधणी तरी केली आणि लोकशाहीत क्षमता सिद्धतेची अंतिम चाचण्या असलेल्या निवडणुका तरी जिंकून दाखवल्या. राहुल गांधी यांना तेही अजून एकदाही, एकाही राज्यात करता आलेले नाही. ज्या ज्या निवडणुकांत राहुलबाबाने पक्षाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला त्या त्या निवडणुकांत काँग्रेसचा धुव्वा उडाला. बिहारसारख्या राज्यात तर राहुलबाबांच्या कर्तृत्वामुळे पक्षाची ताकद होती त्यापेक्षा कमी झाली. त्यातही चाळिशी उलटून गेलेल्या या युवक काँग्रेसी नेत्याची चलाखी अशी की या नेतृत्वाची जबाबदारी ते अधिकृतपणे घेत नाहीत. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला की टीकेचे धनी व्हावे लागत नाही. पण विजय झाला तर मात्र o्रेयावर ताव मारता येतो. उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक हेच त्यांचे आतापर्यंतचे राजकारण राहिलेले आहे. परंतु शुक्रवारी त्यांनी जे काही तारे तोडले तो आतापर्यंतच्या बेजबाबदारपणाचा कळसाध्याय म्हणावयास हवा.
गुन्हय़ाचा आरोप सिद्ध झालेल्यांना निवडणुकांत उतरण्याची बंदी सर्वोच्च न्यायालयाने घातल्यानंतर त्या आदेशाला वळसा घालण्यासाठी अध्यादेशाचा चोरटा मार्ग मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने पत्करला तेव्हा हे राहुलबाबा गप्प राहिले. वास्तविक हा निर्णय मनमोहन सिंग यांनी एकटय़ाने घेतला होता असे नाही. काँग्रेसच्या सर्वोच्च निर्णयमंडळाच्या बैठकीत या अध्यादेशास मंजुरी देण्यात आली होती आणि मुख्य म्हणजे तशी ती देताना राहुलबाबांच्या मातोo्री, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी याही हजर होत्या. या सर्वानी त्या वेळी अध्यादेश काढण्याच्या निर्णयावर माना डोलावल्या आणि पंतप्रधान सिंग यांना तो निर्णय घेण्यास भाग पाडले. तेव्हाही आपण जे करीत आहोत ते योग्य आहे हे मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीच्या लक्षात आले नसेल असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. पण गेल्या तीन महिन्यांत गांधी मायलेकांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यास मनमोहन सिंग यांना भाग पाडले. अन्नसुरक्षा विधेयकासाठी माता सोनिया आग्रही होत्या, तर जमीन हस्तांतरण कायदा राहुलबाबांना हवा होता. त्यास नकार देण्याची हिंमत मनमोहन सिंग यांच्याकडे नव्हती आणि नाहीही. त्याचमुळे या मायलेकांची भीड अधिकच चेपली आणि गुन्हेगार उमेदवारांबाबतचा अध्यादेश काढण्याचा आग्रह त्यांनी सिंग यांच्याकडे धरला. गांधी घराणे जे करेल त्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलावणे एवढेच काँग्रेसजनांच्या हाती असल्याने ते त्यांनी नेहमीच्या उत्साहाने केले. परंतु याच काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेल्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या अध्यादेशाच्या प्रश्नावर आपण ताठ भूमिका घेऊ शकतो असे दाखवल्याबरोबर काँग्रेसची भंबेरी उडण्यास सुरुवात झाली. एव्हाना जनमतही काँग्रेसच्या या निर्णयाविरोधात जाताना दिसत होते आणि एरवी यातीलच काही जणांकडून पेड-न्यूजचा मलिदा खाऊन ढेकर देणारी माध्यमगृहेही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे राहुलबाबांना अचानक उपरती झाली आणि त्यांनी माझे सरकार किती बेजबाबदार आहे, असे सांगून टाकले. राहुलबाबांच्या मते पंतप्रधान सिंग यांचा निर्णय हा मूर्खपणाचा आणि फाडून फेकून देण्याच्या लायकीचाच आहे. राहुलबाबा म्हणाले ते वस्तुत: योग्यच. परंतु या प्रश्नावर पाणी नाकातोंडाशी येईपर्यंत ते गप्प का होते, हा मुद्दा आहे आणि त्याचे उत्तर कोणीही काँग्रेसभाट देणार नाही. ते मागण्याची काँग्रेसजनांची बिशादही नाही. तेव्हा राहुलबाबांनी या प्रश्नावर वेगळा सूर लावल्यावर आतापर्यंत अध्यादेशाच्या सुरावर माना डोलावणारे नंदीबैल या नव्या सुरावटीवर बुगुबुगु करताना दिसतात. हे लाजिरवाणे आहे. जेव्हा जाग येईल तेव्हा मनाला येईल ते बरळावे हे राहुलबाबांचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. घरबसल्या उपाध्यक्षपद मिळाल्यावर अचानक त्यांना सत्ता ही विषसमान वाटू लागते आणि कोणत्याही, कसल्याही उमेदवारीची वगैरे चिंता नसल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर वाटेल ते ज्ञान पाजळता येते. इतके दिवस हे सर्व खपून गेले. कारण प्रसंग तितके गंभीर नव्हते.
परंतु शुक्रवारी त्यांनी जे काही केले त्यामुळे एक प्रकारे देशाचाच अपमान झाला आहे आणि त्याचा जाब त्यांना विचारला जायला हवा. मनमोहन सिंग हे त्यांच्या पक्षाचे असले तरी ते पंतप्रधान म्हणून साऱ्या देशाचे आहेत. कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यावर जास्तीतजास्त महत्त्वाच्या जागतिक नेत्यांचा भारताशी सुसंवाद वाढवावा या उद्देशाने मनमोहन सिंग परदेश दौऱ्यावर असताना त्यांचा असा जाहीर पाणउतारा करण्याचे राहुलबाबांचे औद्धत्य अत्यंत चीड आणणारे आहे. गेल्या काही महिन्यांतील पक्षाच्या उद्योगामुळे मनमोहन सिंग यांचा अधिकार आधीच रसातळाला गेलेला आहे. सरकारमध्ये त्यांचे काही चालत नाही, असेच चित्र आहे. त्यावर इतक्या मस्तवालपणे शिक्कामोर्तब करण्याची राहुलबाबांना गरज नव्हती. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पाकिस्तानचे नवे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी मनमोहन सिंग यांची चर्चा अपेक्षित असताना त्यांचे नाक कापण्याचा उद्योग राहुलबाबांनी केला. त्यामुळे जागतिक पातळीवर एक प्रकारे देशाचाच अवमान झालेला आहे. सत्तेच्या विषाचे रसपान करण्यात मश्गूल असणाऱ्या राहुलबाबांना याचे गांभीर्य असण्याची शक्यता नाही.
पण मनमोहन सिंग यांना तरी ते असायला हवे. आयुष्यभर नेकीने कार्यसेवा करणाऱ्या आणि वनवासात न गेलेल्या राहुलबाबांसाठी खुर्ची अडवून ठेवणाऱ्या मनमोहन सिंग यांची इतकी अवहेलना विरोधकांनीदेखील कधी केलेली नाही. ते पाप राहुलबाबांचे. त्याची शिक्षा मनमोहन सिंग यांनी घ्यायला हवी. आता तरी त्यांनी सत्तावस्त्रे ७, रेसकोर्सच्या खुंटीवर टांगून वाचन-लेखनात उरलेला काळ व्यतीत करावा. त्यांना जे भोगावे लागले त्याबद्दल जनतेच्या मनात आता कणव आहे. तरीही पदाला ते चिकटून राहिले तर कणवेचे रूपांतर घृणेत होण्यास वेळ लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा