गेल्या १३५ वर्षांच्या वातावरणाच्या इतिहासात २०१४ हे गतवर्ष सर्वात उष्ण असल्याचे नुकतेच जाहीर झाले. अमेरिकी सरकारच्या संस्था असलेल्या- नॅशनल ओश्ॉनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नोवा) आणि नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या दोन्ही संस्थांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर हे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी वातावरणाचे सरासरी तापमान, ‘नोवा’च्या नोंदींनुसार १४.६ अंश सेल्सिअस, तर ‘नासा’च्या नोंदींनुसार १४.७ अंश सेल्सिअस इतके होते. ते गेल्या शतकातील सरासरी तापमानाच्या तुलनेत तब्बल ०.६८ अंशांनी अधिक होते. तापमानवाढ आणि उष्मा हे एकविसाव्या शतकाचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. कारण हे शतक सुरू होऊन इनमीन चौदा वष्रे झाली आहेत; पण या काळात (१८८० सालापासून) आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण १० पकी नऊ वर्षांची नोंद झाली आहे, अशी ‘नोवा’ची आकडेवारी सांगते. त्यामुळे त्यात ‘आणखी एका वर्षांची भर’ असेच वर्णन करावे लागेल. अमेरिकी संस्थांनी ही आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी जपानच्या हवामान संस्था आणि कॅलिफोíनया-बर्कले विद्यापीठाच्या स्वतंत्र अभ्यास गटानेही असाच निष्कर्ष जाहीर केला होता. तापमानाच्या या उच्चांकाचे वैशिष्टय़ असे    की, हे घडले आहे ते ‘एल-निनो’ नसतानाच्या वर्षांत. एल-निनोची स्थिती असेल तर पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान मोठय़ा प्रमाणावर तापते. त्याचा परिणाम म्हणून वातावरणाचे तापमानही जास्त नोंदवले जाते. या वर्षी अशी स्थिती नसतानाही हे घडले आहे. म्हणूनच ते अधिक लक्ष द्यावे असे आहे. यानिमित्ताने आता तापमानवाढ आणि हवामानबदलाच्या चच्रेला नव्याने सुरुवात होईल. हवामानबदलामागे असलेल्या माणसाच्या संबंधांवर पुन्हा भाष्य केले जाईल, त्याचे गांभीर्य सांगितले जाईल. मात्र, हे होत असताना आपण या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी काय करतो आहोत, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना       यश येताना दिसत नाही. गेल्याच महिन्यात पेरूची राजधानी लिमा येथे याबाबत परिषद झाली. त्यात कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपायांबाबत एकमत झाले नाही. आता पुढच्या वर्षी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथेही अशीच परिषद होणार आहे. त्यात याबाबतचा मार्ग काढण्याचे लक्ष्य जागतिक समुदायाने ठेवले आहे. मात्र, आतापर्यंतची वाटचाल पाहता या परिषदेतही विशेष काही होईल, याबाबत            तज्ज्ञ आशावादी नाहीत. या पाश्र्वभूमीवर २०१४चे आतापर्यंतचे उष्ण वर्ष म्हणून नोंद होणे हे चिंताजनक आहे. त्याचे गांभीर्य जाणून पावले टाकली नाहीत, तर पुढेसुद्धा तापमानवाढीचे असे उच्चांक होतच राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा