कलेच्या क्षेत्रातील माणसे संवेदनशील व सुसंस्कृत असतात असा एक (गैर)समज प्रचलित आहे. परंतु सध्या रंगू लागलेल्या अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील आरोपबाजी पाहता ही नाटय़कर्मीची निवडणूक की राजकारण्यांचीच, असा प्रश्न पडेल. राजकारणी जसे विकासाच्या मुद्दय़ांवर निवडणुका लढवण्याऐवजी चारित्र्यहनन व भावनिक आवाहनावर त्या लढवतात तशाच प्रकारे या निवडणुकीत प्रचाराऐवजी अपप्रचार सुरू आहे आणि असे करण्यात उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी यांनी आघाडी घेतली आहे. विरोधी पॅनलच्या विनय आपटे यांच्यावरील आणि विद्यमान परिषदेतल्या कारभारासंबंधात जोशी यांच्या आरोपांइतकेच असंतुलित, आक्रस्ताळे प्रत्युत्तर देणे आपटे यांच्या पॅनेलमधील कुणाला शक्य झालेले नाही. मोहन जोशी यांच्या आरोपांत तथ्य नाही, असे नव्हे.. उदाहरणार्थ विद्यमान नाटय़ परिषदेचा कारभार बेकायदा सुरू असल्याची तक्रार मोहन जोशींनीच धर्मादाय आयुक्तांकडे केली होती, त्या पाचपैकी तीन वर्षांचा बेकायदा कारभार स्वत: मोहन जोशी यांचाच आहे. परिषदेच्या घटनेत तरतूद नसताना त्यांनी आपल्या कार्यकालास मुदतवाढ मंजूर करवून घेतली होती. जोशी यांना ज्या ‘नाशिक प्रकरणा’तील नामुष्कीमुळे अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्याबद्दलचा सत्यशोधन समितीचा अहवाल का जाहीर केला गेला नाही, असे जोशी आज विचारताहेत. परंतु याप्रकरणी अहवाल सादर करणाऱ्या हेमंत टकले यांनी केलेला खुलासा जास्त सुसंस्कृतपणाचा आहे. अहवाल प्रसिद्ध करून झाल्या घटनेचे पुन्हा चर्वितचर्वण होऊ नये आणि एका कलावंताच्या चारित्र्यावर पुन्हा शिंतोडे उडू नयेत म्हणून आपण हा अहवाल जाहीर केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. खरे तर जोशी यांनी आपल्या आठ वर्षांच्या कार्यकालात परिषदेचा कारभार कशा प्रकारे चालवला याचे आत्मचिंतन यानिमित्ताने करणे गरजेचे आहे. नाटय़ परिषदेतील त्यांचा एकही सहकारी आज त्यांच्यासोबत का नाही, इथपासून हे आत्मचिंतन सुरू होऊ शकले असते. पण एकीकडे जोशी आत्मचिंतन करीत नाहीत आणि दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात आपल्याला काडीमात्र रस नाही, असे स्पष्ट करणारे त्यांचे विरोधक, असा हा सामना आहे. विरोधी पॅनलमधील विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, राजन भिसे यांच्यासारख्या समांतर धारेतील रंगकर्मीनी नाटय़ परिषदेच्या कारभारात सक्रिय सहभागी होऊन तिला नवी, सकारात्मक दिशा देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे म्हटले आहे. असा विधायक दृष्टिकोन मोहन जोशी यांच्या आतापर्यंतच्या कुठल्याही वक्तव्यातून दिसून आलेला नाही. अर्थात विरोधी पॅनलचे विनय आपटे यांच्या वर्तनाबद्दलही नाटय़वर्तुळात काहीशी नाराजी आहे. विशेषत: बारामती नाटय़ संमेलनातील गैरवस्थेसंबंधात काही रंगकर्मीना आलेला कटू अनुभव त्यामागे आहे. काही चांगले, तरुण नाटय़निर्मातेही त्यामुळे दुखावले गेले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांतील नाटय़ संमेलनांमध्ये समांतर धारेतील रंगकर्मीना दिले गेलेले मानाचे पानही व्यावसायिक धारेतील काहींना खटकते आहे. नाटय़दिंडीचा उपक्रम रद्द केल्याने त्यात नेहमी ‘चमकोगिरी’ करणारे काही कलावंतही दुखावले गेले आहेत. या साऱ्याचे पडसाद या यंदाच्या निवडणुकीत उमटत आहेतच. परंतु या साठमारीत नाटकाच्या, नाटय़कर्मीच्या आणि पर्यायाने नाटय़रसिकांच्या  भल्याचे काय होणार, हा कळीचा मुद्दा यंदाही बाजूलाच राहील.

Story img Loader