आजकाल आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडणे, प्रसंगी समोरच्यावर चाल करून जाणे हेच प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. त्याला साधुसंत तरी कसे अपवाद असणार?

गदाधारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रामभक्ताच्या समर्थनार्थ कुणी हातात गदा घेण्याचा पवित्रा घेतला तर त्यात चूक काय? या साधूंजवळ नसेल गदा, त्यांनी त्वेषात एखाद्या वाहिनीचा बूम गदा म्हणून उचलला तर काय बिघडले?

असे म्हणतात की मोह, माया, मत्सर, क्रोध यावर जो विजय मिळवतो तो साधू. आता हे म्हणणे जुने झाले. या साऱ्या विकारांनी लिप्त असलेले पण भगवे कपडे परिधान केले तरीही साधूच, हीच सांप्रतकाळातील नवी ओळख. त्याला अनुसरून त्यांचे वर्तन घडत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? या वर्तनाला कारणीभूत असलेला प्रश्नही काही साधासुधा नाही. पौराणिक काळातील सारी तथ्ये तर्काच्या कसोटीवर घासून सत्यशोध  घेतला जात असताना केवळ हनुमानाच्याच जन्मस्थळावरून वाद का? त्याचा सोक्षमोक्ष का लावला जात नाही? हनुमान ज्या प्रभू रामचंद्रांचा भक्त होता त्यांच्याशी संबंधित सारे वाद निकाली निघालेले असताना त्यांच्या भक्तावरचा अन्याय किती काळ सहन करायचा? असे वाद निकाली काढण्यासाठी सध्या सुयोग्य वातावरण असूनसुद्धा किती काळ गप्प बसायचे? यांसारख्या प्रश्नांनी साधू, संत, महंत अस्वस्थ होत असतील तर वावगे ते काय? म्हणूनच भरवली त्यांनी नाशिकला शास्त्रार्थ सभा. आता त्यात प्रचलित परंपरेनुसार झाला थोडासा वाद तर त्याचा एवढा बागुलबुवा करायचा? हनुमान हा केवळ शक्तीचे प्रतीक नव्हता तर बुद्धीचेसुद्धा होता हे खरे, म्हणूनच तर त्याने वानरसेनेचा राजा वालीची साथ सोडून सत्यवचनी रामासोबत जाण्याचा मार्ग पत्करला, हेही खरे.. पण आजच्या या आधुनिक काळातील साधू, संत व महंतांना त्याच्या केवळ शक्तीचेच आकर्षण वाटत असेल तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार? प्रश्नच जर हनुमानाचा चर्चिला जात असेल तर अंगात बळ दाटून येणे साहजिकच. शिवाय हा रामभक्त गदाधारी म्हणून ओळखला जातोच ना! मग त्याच्या समर्थनार्थ आवेशात येऊन हातात गदा घेण्याचा पवित्रा घेतला तर त्यात चूक काय? या साधूंसमोर नसेल गदा ठेवलेली, मग त्यांनी त्वेषात येत एखाद्या वाहिनीचा बूम उचलून फेकून मारायला धरला तर त्यात इतरांना वाईट वाटून घेण्याचे कारणच काय?

आता काही नतद्रष्ट म्हणतात की त्यांनी संत म्हणून प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर धर्माची प्रतिष्ठा राखण्यासाठी करायला हवा होता. किती कालबाह्य युक्तिवाद हा! आजकाल आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडणे, प्रसंगी समोरच्यावर चाल करून जाणे हेच प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. त्याला साधुसंत तरी कसे अपवाद असणार? हे खरे की ही शास्त्रार्थ सभा होती व त्यात भांडण अपेक्षित नव्हते. यासाठी काही लोक आठव्या शतकात झालेल्या शंकराचार्य व मंडनमित्र यांच्यात झालेल्या सभेचा संदर्भ देतात. मंडनमित्र यांची पत्नीच या सभेची अध्यक्ष असूनसुद्धा मंडन यांचा पराभव झाला व नंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे शंकराचार्याकडून अद्वैताची दीक्षा घेतली. हा संदर्भ देणारे जे लोक आहेत ते कुठे आठवे शतक व कुठे एकविसावे हा दीर्घ कालखंड लक्षात घेत नाहीत. काळानुरूप सर्वच गोष्टी बदलत असतात. तसे या सभेचे स्वरूपही बदलले तर त्यात गैर काय? त्यामुळेच तर या नाशिकच्या सभेचे अध्यक्ष असलेल्या महंतांनी या वादात कुणीही हरले नाही व कुणीही जिंकले नाही हे दर्शवण्यासाठी हनुमानाचा जन्म अंजनेरी व किष्किंधा या दोन्ही ठिकाणी झाला असे जाहीर करून टाकले. आता काही विज्ञानवादी लोक यावरही आक्षेप घेत आहेत. एकाच जीवाचा जन्म दोन ठिकाणी कसा काय होऊ शकतो? ही पळवाट झाली, संधिसाधूपणा व लबाडी झाली असेही लोक म्हणू लागलेत. खऱ्या धर्माभिमानींनी याकडे लक्ष देण्याची अजिबात आवश्यकता नाही. ही सभा म्हणजे धर्मपीठाचेच एक अंग. त्यामुळे त्यातून जे अंतिमरीत्या बाहेर आले तेच सत्य. त्यावर समस्त धर्मजनांनी विश्वास ठेवणे गरजेचे. तशीही आजकाल धार्मिक मुद्द्यांची चिकित्सा अग्राह्यच मानली जाते. अशी चिकित्सा करणाऱ्यांची संख्याही हळूहळू कमीच झाली आहे. आता जे थोडेफार उरले आहेत त्यांच्या ओरड्यांकडे लक्ष न देता हा निर्णय साऱ्यांनी स्वीकारणे यातच देशाचे हित. आता काही जण याला तडजोड म्हणताहेत. हेही चूकच. शेवटी धर्मातले वादाचे मुद्दे याच पद्धतीने मिटवावे लागतात. वाद वाढवत न्यायला हा परधर्मीयांशी संबंधित प्रश्न थोडाच आहे? या वादाचे स्वरूप तसे काही असते तर सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जाता आले असते. तसे नव्हते म्हणूनच तर सभेत न्यायालयात जाण्याची भाषा करणाऱ्या दोन महंतांना सभाध्यक्षांनी तातडीने शांत केले. काही जण म्हणतात हा वाद अचानक उफाळून आला नाही तर तो आणला गेला. तिकडे कर्नाटकात निवडणुका आहेत हे लक्षात घेऊन किष्किंधापासून नाशिकपर्यंत यात्रा काढली गेली. यातही तथ्य नाही. गेली अनेक वर्षे सुरू असलेला हा वाद किमान शास्त्रार्थ सभा आयोजित करून तरी सुटेल याच प्रामाणिक हेतूने ही यात्रा महाराष्ट्रात आली. त्यामुळे याचा राजकारणाशी संबंध जोडणेच चूक. याच सभेत हमरीतुमरी सुरू असताना एका महंताने दुसऱ्यावर काँग्रेसी असल्याचा आरोप केला. हे राजकारण नाही तर काय, असा सवाल आता काही जण करताहेत.

मुळात सध्याचा काळच साऱ्या साधू, संत, महंतांनी राजकीयदृष्टय़ा प्रेरित होण्याचा. धर्माचे सारे प्रश्न निकाली काढायचे असतील तर राजकीय दृष्टिकोन अंगी बाळगायलाच हवा ना! अशा परिस्थितीत रागाच्या भरात आल्यावर निघाले एखाद्या पक्षाचे नाव तर त्याचा फार बाऊ कशाला? सध्याच्या काळात देशभरातील बहुतेक साधुसंत एका बाजूला वळलेच आहेत. दुसऱ्या बाजूचा कड घेणारे काही शिल्लक उरले असतील तर ते समोर दिसल्याबरोबर तोंडून स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणारच. त्याचा एवढा बभ्रा कशाला? शेवटी ही मंडळीसुद्धा हाडामांसाचीच हे लक्षात घेणे गरजेचे. आणखी काही जण म्हणतात या वादाचा संबंध केंद्राच्या ‘रामायण सर्किट योजने’शी आहे. साऱ्या भारतवर्षांला रामनामाच्या सुरात एकत्र बांधून ठेवण्याची ही योजना. हनुमानाचे जन्मस्थळ एकदा निश्चित झाले तर या योजनेतून त्या स्थळाचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल. या गजबजीचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर होऊन सारे सामान्यजन भक्तिरसात न्हाऊन निघतील. अंतिमत: त्याचा फायदा देशावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांनाच होईल. आता तुम्हीच सांगा, यात चूक काय? याच हेतूने कर्नाटकचे साधू नाशिकला आले असतील तर त्यामागील धर्मप्रेमाची उदात्त भावना लक्षात घ्यायची की नाही? आणि हाच हेतू ठेवून नाशिकच्या साधूंनी अंजनेरीचा बचाव प्राणपणाने केला असेल तर त्यांच्याही भावनेला सलामच करायला हवा. चर्चा, वाटाघाटीतून हा वाद सुटत नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा. दोन्ही स्थळांचा समावेश या सर्किटमध्ये करू असे तातडीने जाहीर करायला हवे. शेवटी काहीही झाले तरी प्रश्न एकटय़ा हनुमानाचा नाही तर धर्माच्या प्रतिष्ठेचा आहे. म्हणूनच तर सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या काशीच्या महंतांनी दोन्ही ठिकाणे ही जन्मस्थळेच असे मोठय़ा चतुराईने जाहीर करून टाकले. धर्मशास्त्रातील नोंदीनुसार अशा सभेत केवळ एकाच पक्षाचा विजय होत असतो हे ठाऊक असूनसुद्धा! तेव्हा या प्रश्नावर उगीच चर्चाचर्वण करणाऱ्यांनी नुसती खुसपटे काढून झालेला वाद चघळत बसण्याऐवजी ही घडामोड राष्ट्रहितासाठी कशी योग्य होती व तडजोडीने का होईना पण त्यातून हित कसे साधले गेले यावर विचार करावा. राहिता राहिला साधू, संत, महंतांच्या वर्तनाचा प्रश्न. त्याकडे लक्ष देण्याची आता तरी गरज नाही. गेली आठ वर्षे अष्टदिशांना यांचा उत्साह दिसतो आहे. त्या भरात नकळत काही चुका होतात. म्हणून काही त्यांची महती कमी होत नाही. शेवटी या मंडळींच्या आशीर्वादावरच सारे काही सुरळीत चालले आहे,  वादाचे मुद्दे, मग ते स्वधर्माशी संबंधित असो वा अन्य धर्मीयांशी संबंधित त्याची तातडीने उकल करून देशाला स्थैर्य देण्याचे प्रयत्न या मंडळींकडून सतत होत आहेत. त्याचे स्वागतच करायला हवे.