गेल्या वर्षीचा रुसवा विसरून तो नव्या आनंदाने दौडत, वाजतगाजत आपल्या भेटीसाठी निघाला आहे..
तो येणार, समरसून बरसणार हे जाहीर होताच, येऊ घातलेले ‘अच्छे दिन’ केवळ कल्पनेनेच सुखद वाटू लागतात आणि त्या दिवसांची स्वप्ने मनांना मोहरून टाकतात. यंदाच्या त्याच्या आगमनाचा थाट काही आगळाच असणार, असे संकेत तर त्याने आताच दिले आहेत.
आणखी फक्त आठवडाभराची प्रतीक्षा उरली. नंतर सारे काही बदलून जाणार आहे. त्याची आनंददायी वर्दी गेल्या आठवडय़ात मिळाली, तेव्हाच रखरखलेल्या मनांवर आनंदाचे शिडकावे सुरू झाले होते. दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता समाधानाच्या सरी बरसणार या आनंदात अवघा महाराष्ट्र पुढच्या आठवडय़ातील त्या दिवसाची प्रतीक्षा करतो आहे. नकोनकोशा आठवणींच्या पडद्यावरचे सुकलेल्या अश्रूंचे कोरडे डाग धुऊन निघणार आहेत आणि रणरणत्या उन्हात भेगाळलेल्या जमिनीवर बसून कपाळावर पंजा धरून विषण्णपणे आभाळाकडे पाहणाऱ्या, मन चिरणाऱ्या त्या भयावह दृश्यांची प्रदीर्घ मालिकाही संपुष्टात येणार आहे. दुष्काळी छावण्यांमध्ये मलूल पडलेल्या आणि आश्वस्तपणे माणसावर विसंबून तग धरून राहिलेल्या केविलवाण्या गुराढोरांचा जगण्यामरण्याचा संघर्ष संपणार आहे.. शुष्कावलेली मने या सुंदर स्वप्नाचे उद्याचे वास्तव रूप अनुभवण्यासाठी आतुरली आहेत. उरलेल्या आठवडाभराचा हा काळदेखील आता असह्य़ असला, तरी विरहाच्या आणि प्रतीक्षेतील आनंदाच्या एका आगळ्या अनुभवात हे दिवस बघता बघता सरतील. असीम आनंदात तो क्षण साजरा करण्याची मनामनाची तयारी सुरू झाली आहे. त्याने वाजतगाजत यावे, मनसोक्त बरसावे, आपण मनोमनी मोहरावे, अमाप उत्साहाने त्याचे स्वागत करावे आणि विरहाच्या साऱ्या व्यथा त्यामध्ये वाहून जाव्यात, या अपेक्षेची आस आता बळावत चालली आहे.
तसा तो दर वर्षीच येतो. आला की आनंदाच्या सरी बरसतो आणि प्रत्येक जीव त्यामध्ये न्हाऊन निघतो. आधीची सारी दु:खे, साऱ्या वेदना तो धुऊन टाकतो आणि त्याच्या पहिल्यावहिल्या स्पर्शातच, जगण्याच्या नव्या जाणिवांचे कोंब तरारून उठतात. वर्षांनुवर्षांच्या या अनुभवाला प्रत्येक वर्षीच्या पहिलेपणाची झालर मात्र नवी असते. कारण तो येण्याआधीच्या वेदनांचे चटके मात्र, दर वर्षी नवे आणि दाहक असतात. भौतिक सुखाची भुरळ घालणारी स्वप्ने त्या चटक्यांवर आश्वस्त फुंकर मारू शकत नाहीत. कारण त्या स्वप्नांमध्ये वेदना शमविण्याची शक्ती नसतेच. भविष्यात ती कधी वास्तवात येतील आणि सुगीचे दिवस दाखवतील, अशा अपेक्षादेखील वेडगळच असतात, हे शहाणपण आता अनुभवाने अनेकांनाच येऊ लागले आहे. असे सुगीचे दिवस दाखविण्याची शक्ती केवळ त्याच्याच बरसण्यात आहे, हे आता अनुभवातूनच स्पष्ट झाले आहे. म्हणूनच, तो येणार, समरसून बरसणार हे जाहीर होताच, येऊ घातलेले ‘अच्छे दिन’ केवळ कल्पनेनेच सुखद वाटू लागतात आणि त्या दिवसांची स्वप्ने मनांना मोहरून टाकतात. यंदाच्या त्याच्या आगमनाचा थाट काही आगळाच असणार, असे संकेत तर त्याने आताच दिले आहेत. ज्या अमाप उत्साहात त्याची दमदार वाटचाल सुरू झाली आहे, त्यावरूनच त्यालाही विरहव्यथांनी छळले असावे, असेच भासू लागले आहे. गेल्या वर्षी तो आला, पण अचानक रुसला आणि काय झाले कळण्याआधीच त्याने गुपचूप दडी मारली. नंतर हळूच काढता पाय घेतला आणि व्याकूळलेल्या साऱ्या नजरा पुन्हा कपाळावर हात धरून रणरणत्या उन्हात, भेगाळलेल्या जमिनीवर बसून क्षीणपणे आभाळाच्या भाळावर घनांच्या रांगोळीचा एखादा चुकार ठिपका दिसतो का, याचा अगतिक शोध घेऊ लागल्या. तो हरवला, आता सापडणारच नाही, या जाणिवेने अखेर हबकून गेल्या आणि भीषण भविष्याच्या जाणिवेने हतबल होऊन जगण्याच्या संघर्षांच्या तयारीलाही लागल्या..
गेल्या वर्षभरातील त्या भीषण संघर्षांने जगण्याला नवे शहाणपण शिकविले असे भासू लागले असले, तरी पुन्हा तो बरसू लागला, की त्या शहाणपणाचाही विसर पडेल की काय, अशी भीती उगीचच मनात घर करू लागते. त्या भुलविणाऱ्या सरी फक्त आनंद देतात, दु:ख, व्यथा, वेदनांवर मायेचा शिडकावा करतात आणि साहजिकच, आनंदाच्या त्या सरींमध्ये न्हाऊन निघताना आधी सोसलेल्या त्या वेदना-व्यथांचाही विसर पडू लागतो. या नव्याने बरसणाऱ्या आनंदात मागे सरलेल्या दु:खाच्या आठवणींचे विरजणदेखील पडू नये, असे वाटू लागते आणि ती दु:खे विसरण्याच्या नादात, दु:खद अनुभवांचे ते गाठोडेही मेंदूतील विस्मृतींच्या कप्प्यात कुलूपबंद होऊन जाते. हा अनुभवही नवा नाही. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याआधीच्या ग्रीष्माचे चटके असह्य़ होऊ लागले, की पुढच्या वर्षी त्याच्या झळा तीव्र राहणार नाहीत यासाठीच्या उपायांचा शोध सुरू होतो. कायमस्वरूपी उपाययोजनांच्या जंत्रीने फायली फुगून जातात, अभ्यास, दौरे, संशोधने आणि अहवालांच्या कागदांचे पेव फुटते. कुठे कुठे चुकार आडगावात एखादा प्रयोग होऊनही जातो आणि त्याचे गोडवेही गायिले जातात. त्याचे अनुकरण करावे यासाठी एखाद्या जलयुक्त शिवाराशेजारी ढोल-ताशांच्या गजरात दुष्काळ नावाचा एक ‘इव्हेन्ट’ साजरा होऊ लागतो.. ज्या घरांना, जनावरांना त्याचे चटके बसलेले असतात, तेथे या सणाचे वारे समाधानाचा आनंद देत नसले, तरी त्रयस्थपणे त्यात सामील होणे मात्र सक्तीचेच होऊन बसते आणि दु:खाच्या दिवसांनाही असा उत्सवी साज चढविण्याच्या सरकारी कौशल्याचे चौघडे सर्वत्र दुमदुमू लागतात. लाखोंची खैरात होत राहते आणि त्यामध्ये कुणाची नशिबेही अनपेक्षितपणे उजळून जातात. चहूबाजूंना पसरलेल्या शुष्क निष्पर्ण रखरखाटातही, एखाद्या झाडावर हिरवीगार पालवी फुटावी तशी काही आयुष्ये या उत्सवात न्हाऊन निघतात. ‘अच्छे दिन’ आल्याचा त्यांचा हा आनंद इतरांच्या आयुष्यावर मात्र, डागण्या देत वाकुल्या दाखवत असतो.. आपले नशीब त्या आभाळातल्या काळ्या ढगात साठलेल्या थेंबाथेंबाशी जोडले गेले आहे, याची जाणीव असलेल्या क्षीण आयुष्यातील अंधारापर्यंत हा झगमगाट पोहोचतच नाही. अशी मने मग आणखीनच वैफल्यग्रस्त होतात आणि तो आल्यावर सारे काही सुरळीत होईल हे माहीत असूनही, आयुष्याकडेच पाठ फिरवितात..
एकीकडे अशा गाजावाजांची जत्रा सुरू असतानादेखील महाराष्ट्राला याच वैफल्याच्या लाटेने ग्रासले. काळ्या आईच्या कपाळावरल्या भयाण भेगांनी अनेकांच्या जगण्याची उमेदच खचून गेली आणि आत्महत्यांच्या आकडय़ांना जणू विक्रमाची ओढ लागली. एका वर्षांतच हजारो जणांनी दुष्काळाची हाय खाऊन जगाचाच निरोप घेतला आणि पावसाची प्रतीक्षा आणखीनच तीव्र झाली. आता तो बरसला नाही, तर माणूसच नव्हे, तर माणसाच्या भरवशावर जगणाऱ्या प्रत्येक सजीवाला जगण्याच्या लढाईची तरी ताकद उरेल की नाही, अशा शंकेची वादळे भणाणू लागली असतानाच, त्याच्या आगमनाची वर्दी आली आहे. गेल्या वर्षीचा रुसवा विसरून तो नव्या आनंदाने दौडत, वाजतगाजत आपल्या भेटीसाठी निघाला आहे. पुढच्या दोन-चार दिवसांतच एखाद्या सकाळी आभाळाच्या भाळावरल्या घनांच्या रांगोळ्यांमधून त्याच्या अस्तित्वाचे ध्वनी उमटू लागतील आणि अवघी सृष्टी मोहरून उठेल, तेव्हा त्या क्षणाचा अनुभव नक्कीच नेमेचि होणाऱ्या त्याच्या आगमनक्षणाहून नवा, वेगळा असाच असेल. त्याच्या स्वागतासाठी उत्सुक असलेली झाडे आपल्या फांद्यांच्या चवऱ्या ढाळू लागतील, आकाशात चौघडे झडू लागतील आणि सारी तयारी झाली, की शुष्कावलेल्या जगाला संजीवनी देण्यासाठी तोदेखील सारे काही विसरून समरसून बरसू लागेल. त्या क्षणाचा आनंद अवर्णनीय असाच असेल. पुढच्या वर्षी दुष्काळाचे सोहळे साजरे करण्याची वेळ येऊ नये यासाठी तो यंदा थोडा जास्तच बरसणार आहे. जे सोसले त्याच्या आठवणी त्यामध्ये धुऊन जाणार नाहीत, याची जाणीव ठेवायची जबाबदारी मात्र आपली असेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा