भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पडद्याआडच्या वाटाघाटींचा इतके दिवस कुजबुजीतील तपशील एका पुस्तकात सविस्तर येतो.. यात धक्का आहे तो अधिकृततेच्या दाव्याचा!
मूळचे एकसंध; पण राजकीय-धार्मिक दुभंगातून एकाचे दोन झालेल्या आणि अपरिहार्य भौगोलिक वास्तवामुळे एकाच वेळी एकमेकांचे शेजारी आणि शत्रूही असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील वास्तवाची ही नव्याने उजेडात येत असलेली कहाणी. फाळणी नावाच्या विलगीकरणानंतर हे दोन्ही देश आपापले राष्ट्रीय दिन साजरे करीत असताना प्रकट होत असलेली ही कहाणी एकमेकांतील कटू वास्तवाची जाणीव करून देते. ती समोर येते या आठवडय़ात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातून. अ‍ॅड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क यांनी ही कथा अधिकृत दाखले देत, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांस अधिकृतपणे उद्धृत करीत लिहिली आहे. म्हणजे ती सांगोवांगी नाही. म्हणून ती दखलपात्र. तिची चर्चा करण्यापूर्वी या लेखकद्वयीविषयी. यातील अ‍ॅड्रियन लेव्ही हे पत्रकार-माहितीपटकार असून ते लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या ‘द गार्डियन’ या कडव्या उदारमतवादी दैनिकासाठी बातमीदारी करतात. २००८ साली नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यांवरील त्यांचे ‘द सीज’ हे पुस्तक जागतिक राजकारणावर नजर ठेवून असणाऱ्यांनी वाचलेले असेल वा निदान ते ठाऊक तरी असेल. कॅथी यादेखील क्रियाशील बातमीदार असून त्या लंडनच्याच ‘द टाइम्स’ या तुलनेने नेमस्त दैनिकासाठी लेखन करतात. या दोघांचे सहलेखन अभ्यासकांत चर्चेचा विषय असले तरी त्यांचे हे आगामी पुस्तक त्यांच्या आतापर्यंतच्या लेखनाच्या तुलनेत अधिक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कारण या द्वयीने निवडलेला विषय आणि त्यातील त्यांचा निष्कर्ष. ‘‘२०१९ साली बालाकोट घडायचे होते तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत पडद्यामागे सतत संवाद सुरू असून उभय देशांचे सर्वोच्च गुप्तचर अधिकारी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत’’, अशा खळबळजनक तपशिलासह अन्य अनेक मुद्दय़ांवरील महत्त्वाचे दुवे या पुस्तकातून समोर येतात.

‘स्पाय स्टोरीज : इनसाइड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ द रॉ अँड द आयएसआय’ अशा नावाचे हे पुस्तक एरवी पत्रकार-कल्पना म्हणून सोडून देता आले असते. पण ते तसे नाही. कारण भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित दोभाल यांनी या पुस्तकातील तपशिलास दुजोरा दिल्याचा लेखकांचा दावा आहे. यातील महत्त्वाचा भाग असा की या पडद्यामागच्या मध्यस्थीसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या यंत्रणांनी या पत्रकारद्वयीचा मध्यस्थ म्हणून वापर केला आणि ही सारी माहिती प्रकाशित करण्यास त्यांची ना नाही. पुलवामा येथील कुख्यात दहशतवादी हल्ला घडल्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेने यातील आपला सहभाग अधिकृतपणे झटकला. हा हल्ला पाक सहभागाने नव्हे तर स्वतंत्रपणे ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनेने आखला आणि त्या कटाची आखणी पाकिस्तानात नव्हे तर अफगाणिस्तानातील हेलमंड येथे झाली, असे भारतास त्यानंतर अवघ्या काही तासांत कळवले गेले. अजित दोभाल आणि रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग, म्हणजे आपली ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचे राजिंदर खन्ना यांचा अर्थातच यावर विश्वास बसला नाही. या हल्ल्यानंतर या लेखकद्वयीशी पाकच्या ‘आयएसआय’साठी काम करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल नुसरत नयीम यांनी संपर्क साधला आणि हल्ल्यातील मसूद अझर याच्या सहभागाची माहिती त्यांनी दिली. या हल्ल्यामुळे अमेरिकेशी सुरू असलेल्या चर्चेवर होणाऱ्या वाईट परिणामांची काळजी पाकिस्तानला अधिक होती. ही चर्चा लक्षात घेता भारतावर हल्ला करून आम्ही आमच्याच पायावर धोंडा का मारून घेऊ, असा त्यांचा युक्तिवाद. ‘जैश- ए- महंमद’ने स्थानिक पातळीवर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण व्हावा या एकमेव उद्देशाने पुलवामा हल्ला घडवून आणला याची कल्पना भारतीय गुप्तचरांस होती हे लेखकद्वयीचे निरीक्षण धक्कादायक. तथापि अधिकृतपणे भारतास अर्थातच हे मान्य असणे शक्य नव्हते हे पुढील घटनांवरून दिसते. हा हल्ला पाकिस्तानच्या इंटर सव्‍‌र्हिसेस एजन्सी (आयएसआय) आणि/वा पाक लष्कर यांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही, असेच भारताचे मत होते. त्यास आधार होता किंवा काय यावर या पुस्तकात तपशील नाही. पण या हल्ल्यामुळे ‘पाकिस्तानी लष्कराचे गर्वहरण करण्यासाठी’ सडेतोड प्रत्युत्तर देणे भारतास गरजेचे वाटले. म्हणून मग बालाकोटवर झालेले हवाई हल्ले. भारताच्या या हवाई हल्ल्याच्या ‘यशा’बाबत पुस्तक अधिक भाष्य करीत नाही. तो त्याचा उद्देशही नसावा.

Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
isis history
न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?
Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण
new orleans attack isis again Active
विश्लेषण : ‘आयसिस’ पुन्हा सक्रिय झाली आहे का? अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स हल्ला कशाचे निदर्शक? धोका किती गंभीर?
the last book store
बुकमार्क : ‘ऑनलाइन’च्या महापुरातून वाचलेले लव्हाळे…

त्याआधी २ जानेवारी २०१६ साली घडलेल्या पठाणकोट लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याबाबतही हे पुस्तक महत्त्वाचा तपशील देते. या दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाच्या अत्यंत संवेदनशील केंद्रात खोलवर दहशतवादी घुसले. त्यांचा पाडाव करण्यासाठी संपूर्ण भारतीय सुरक्षा यंत्रणेस दोन दिवस लागले यातूनच या हल्ल्याचे गांभीर्य कळावे. या संदर्भात या पुस्तकातील गौप्यस्फोट म्हणजे स्थानिक पोलिसांचे चार दहशतवाद्यांस मिळालेले ‘सहकार्य’. याबाबतही महत्त्वाचा मुद्दा असा की स्थानिक सुरक्षा यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे होते हाच उल्लेख या हल्ल्याबाबतच्या आरोपपत्रात नाही. ही बाब अशीच्या अशी खरी असेल तर क्लेशदायक ठरते. याचे कारण ‘स्थानिक गुंतवणूक’ या मुद्दय़ाकडे सतत काणाडोळा करण्याचा आपला प्रयत्न. यातून आपल्या हेरगिरी यंत्रणांचे ढळढळीत अपयश समोर येतेच पण त्याचबरोबर स्थानिक अस्वस्थतेवर मार्ग काढण्यातील राजकीय अपयशही त्यातून दिसते. नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर आपले लष्कर मात करते आणि ‘कारगिल विजय दिवस’ वगैरे नगारावादनातून वास्तवाचे भान येणार नाही, याचे प्रयत्नही होतात. पण तरीही गुप्तवार्ता-अपयश आणि स्थानिकांचा सहभाग हे नाकारता येणारे नाही. हे पुस्तक याची जाणीव करून देते. तसेच पाक तुरुंगातून सोडवण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही त्या कुलभूषण जाधव यांच्यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला असून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने त्यांना कसे जाळ्यात ओढले हे समोर येते. जाधव हेरगिरी करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप किती अस्थानी आहे हे कळते. तथापि जाधव यांस ‘भरती’ करण्यासाठी आपल्या विविध गुप्तचर यंत्रणा किती उत्सुक होत्या त्याचाही तपशील पुस्तकात आढळतो.

या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकद्वयीस दोभाल यांच्यासह अनेकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. यासाठी दिल्ली आणि रावळपिंडी अशा अनेक फेऱ्या त्यांच्या झाल्या आणि ते आवश्यक ठिकाणी दोभाल आणि अन्यांस उद्धृत करतात. तसेच हे दोघे या देशांतील तुटलेला संवाद पुन्हा सुरू होण्यासही एक प्रकारे कारण ठरतात, असे यातील तपशिलावरून दिसते. तसेच या दोघांव्यतिरिक्त सौदी अरेबियासारख्या इस्लामी राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या जागतिक शक्तीनेही भारत-पाक यांच्यातील संवादकाची भूमिका कशी पार पाडली याचाही साद्यंत उलगडा यातून होतो. तो म्हटल्यास धक्कादायक आहे आणि नाहीही. आहे अशासाठी की हा इतके दिवस कुजबुजीतील तपशील पुस्तकात अधिकृतपणे येतो. आणि नाही असे म्हणायचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांनी कितीही इन्कार केला तरी पडद्यामागील अनेक शक्ती दोन्ही बाजूंनी कार्यरत आहेत हे अनेकांस आताही माहीत आहे. म्हणून तो धक्कादायक राहात नाही. धक्का आहे तो हे सर्व आपण अधिकृतपणे सांगत आहोत या त्यांच्या दाव्यात.

हा दावा वास्तव वा अतिशयोक्त असा काहीही मानला तरी त्यातून एक सत्य ढळढळीतपणे समोर येते. ते म्हणजे या दोन देशांस संवादाखेरीज पर्याय नाही. त्यातही पाकिस्तानला आपल्या देशातील धर्माधांना आवर घालणे किती महत्त्वाचे आहे हे यातून दिसते. त्याच वेळी धर्म या मुद्दय़ावर भारतानेही आपली संयमित वाटचाल किती अधिक सावधपणे करायला हवी हे यातून कळते. तात्पर्य: मागचे आणि पुढचे असे काही न करता या देशांनी अधिकृतपणे हातमिळवणी करावी आणि प्रगतीचा मार्ग धरावा. हे पाकिस्तानसाठी अधिक अवघड असले तरी त्यातच त्या देशाचे भले आहे. इतका समंजसपणा आणि शहाणपणा दिसला तर उभय देशांचे ध्वज भविष्यात अधिक ताठ मानेने फडकू शकतील.

Story img Loader