दुर्गाबाईंनासुद्धा नवे ‘ऋतुचक्र’ लिहावे लागेल अशी परिस्थिती सरत्या वर्षांत दिसू लागली आणि या नव्या ऋतुचक्राची जाणीव करून दिली ती एका बालदुग्रेने..

‘ती’ येणार की नाही आणि ‘तो’ जाणार की नाही? ज्याच्या त्याच्या तोंडी अगदी अलीकडेपर्यंत हे दोनच प्रश्न होते. त्याचे पूर्ण उत्तर अद्याप मिळायचे आहे. ‘तो’ पूर्ण गेलेला नाही. पण ‘ती’ मात्र आली आहे. नेहमीसारखीच वातावरणात उत्फुल्लता घेऊन. वर्षांचा शेवटचा सप्ताहान्त उजाडला, अवघ्या तीन दिवसांनी २०१९ संपेल. पुढला आठवडा ऐन भरात येत असताना मध्येच या वर्षांचा शेवट होणार ही आधीच वेदनादायी बाब. ज्याच्याकडे पाहात कसेबसे वर्ष ढकलायचे असा ३१ डिसेंबर हा वर्षांतला अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मंगळवारी येतोच कसा या विचाराने अनेकांच्या घशाला कोरड पडली असणार, अनेकांची चिडचिड झाली असणार आणि ते दु:ख कशात तरी बुडवण्यासाठी त्यांना या अखेरच्या शनिवारचा आधार असणार. आणि त्यात ती अजून आली नव्हती. ती यंदा येणारच नाही की काय, या एका कल्पनेनेच अनेकांना घाम फुटला होता. पण आली एकदाची ती. वर्षांस निरोप देण्यासाठी का असेना ती आली.

ती म्हणजे थंडी. डिसेंबर संपून पुढचे वर्ष उंबरठय़ावर येऊन ठेपले तरी आपली वाट हरवून बसलेली थंडी अखेर आपल्या गुलाबी पावलांनी आली म्हणायची. खरे तर सर्व काही नियमित असते तर एव्हाना ती बहरली असती. वर्षभर एरवी माळ्यावरच्या बॅगेत वा वॉर्डरोबच्या तळाशी इतका काळ निपचिप पडून राहिलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या तिच्या स्वागताला मिरवू लागले असते. पण तिचा पत्ताच नव्हता. यंदा या उबदारांना मुक्ती मिळणार की नाही अशी परिस्थिती होती अगदी अलीकडेपर्यंत. पण उशिरा का असेना आली म्हणायची ती.

पण तो काही जायला तयार आहे, असे दिसत नाही. खरे तर शिशिरातील सकाळ किती प्रसन्न असते. दुलईतून बाहेर यावे की न यावे असा संभ्रम आणि खिडकीतून येणारे कोवळे, उबदार असे त्या संभ्रमाचे उत्तर. ती सोनेरी किरणे यंदा अलीकडेपर्यंत करडीच राहिली. कारण त्यांचे उगम असलेल्या सूर्याला झाकणारे ढगांचे पांघरूण काही हटता हटत नव्हते. कारण तो अजूनही होता. तो म्हणजे पाऊस. यंदा आपला परतीचा रस्ताच विसरलेला आणि चिकट पाहुण्यासारखा जायचे नावही काढायला तयार नसलेला. आणि ‘तो’ होता म्हणून ‘ती’ यायला तयार नाही, अशी परिस्थिती. त्याच्या सततच्या असण्याने कंटाळलेले आपले चेहरे पाहून अखेर दया आली असावी तिला. कारण ‘तो’ असतानाच ‘ती’ आली.

तो, ती आणि त्यांचा जन्मदाता निसर्ग हे खरे तर या वर्षांचे खरे मानकरी. तो निसर्ग आणि ती नियती यांच्या आनंदी संसारातून वसंत फुलतो. पण यंदा काही असे झाले नाही. दोहोंतील विसंवादाच्या झळा वसुंधरेने भोगल्या. इतक्या की त्यामुळे या वर्षांची संस्मरणीय, लक्षात राहायलाच हवी अशी एखादी गोष्ट कोणती या प्रश्नावर निसर्ग असे उत्तर निर्वविादपणे यावे. खरे तर स्मरणकुपीतील मानाच्या स्थानासाठी यंदा किती तगडे स्पर्धक होते! भारतापुरते बोलायचे तर नरेंद्र मोदी सरकारचा दणदणीत विजय, काश्मिरातील अनुच्छेद ३७० चे हटणे वा वर्ष संपता संपता तापलेले नागरिकत्वाचे मुद्दे. महाराष्ट्रापुरते सांगायचे तर पराभवापेक्षाही केविलवाणा वाटावा असा देवेंद्र फडणवीस यांचा विजय, अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग, नाताळाच्या तोंडावर ब्रिटनमधे नाठाळ बोरीस जॉन्सन यांचे जिंकणे.. अनेक गोष्टी सांगता येतील. पण या सर्व तात्कालिक. प्रत्येक वर्षी कोठे ना कोठे तरी निवडणुका होतच असतात. कोठे दिग्गज.. पहिलटकरण्यासदेखील दिग्गज म्हटले जाते ही बाब वगळली तरी.. निवडून येतात तर कोठे पराभूत होतात. ते काही त्यामुळे याच वर्षांचे वैशिष्टय़ असे काही म्हणता येणार नाही.

असा केवळ या वर्षांचा लक्षात राहणारा आणि आणि पुन:पुन्हा आठव करून देणारा घटक म्हणजे निसर्ग. या वर्षांचा मानकरी कोण असे कोणी विचारलेच तर बेलाशक निसर्ग असे उत्तर देता यावे इतके निसर्गाचे अनेक विनाशकारी विभ्रम या वर्षांने पाहिले. इतके दिवस येणार येणार म्हणून ज्याचे केवळ इशारे दिले जात होते ते हवामान बदल अखेर आपल्यावर आदळले आणि निसर्गाच्या तऱ्हेवाईकपणाने वसुंधरेवर चांगलेच कोरडे ओढले. अश्विनाचा चंद्र पावसाच्या ढगांनी गिळंकृत केला. कार्तिक पौर्णिमाही तशीच गेली आणि काकडआरत्यांची वात दमटच राहिली. ऐन शिशिरात पानगळीऐवजी या पावसाचे धारानृत्यच या वर्षांत पाहायला मिळाले. पण त्यातही सातत्य शोधू जावे, तर पुन्हा फसगतच. म्हणजे एरवी शिशिरागमानंतर गावोगावच्या वातावरणात फरक असलाच तर तो तापमापकातील पाऱ्याच्या उंचीचा. असे तर होत नव्हते कधी की एखादा प्रदेश उन्हात होरपळतो आहे आणि दुसरीकडे नावरते पावसाचे पाणीच पाणी. यंदा मात्र तसेच वारंवार घडत गेले. मराठवाडा कोळपतोय उन्हात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावर शेवाळ चढेल इतका पाऊस.  पलीकडे आशिया खंडातील काही बेटांच्या नाकातोंडात पाणी तर युरोपातील अनेक हिमखंड वाहू लागलेले. दुर्गाबाईंनासुद्धा नवे ‘ऋतुचक्र’ लिहावे लागेल अशी परिस्थिती.

या नव्या ऋतुचक्राची जाणीव करून दिली ती नव्या बालदुग्रेने. ग्रेटा थुनबर्ग असे तिचे नाव. अवघ्या १६ वर्षांची आहे ती. पण जगातल्या एकमेव अशा महासत्तेच्या प्रमुखास, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यास या ऋतुचक्र रक्षणासाठी चार शब्द सुनवायला तिने कमी केले नाही. या ऋतुचक्राचे रक्षण करायचे म्हणजे वसुंधरेची कवचकुंडले असलेल्या ओझोनच्या थराची काळजी घ्यायची. मानवी कर्मामुळे हा ओझोनचा थर पातळ होऊ लागला आणि त्यातून येणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली. म्हणून वसुंधरा तापू लागली आणि ऋतुचक्राचा फेरा बदलू लागला. हे कशामुळे होते आहे हे आता सर्वाना कळून चुकले आहे. पण कोणामुळे होते आहे त्याची जबाबदारी घेण्यास मात्र कोणी तयार नाही. ग्रेटा थुनबर्गसारखी पुढची पिढी लढू पाहते आहे ती या मुद्दय़ावर. ‘‘तुम्ही पुढच्या पिढय़ांसाठी काय ठेवणार आहात?’’ असा तिचा प्रश्न.

खरे तर असे प्रश्न पडायचे तिचे वय नव्हे. शरीरात होणारे बदल मनाच्या जिन्याने प्रत्यक्षात उतरविण्याची स्वप्ने या वयात पडू लागतात. पण या ग्लोबल वॉर्मिगमुळे केवळ वसुंधरेच्याच नव्हे तर तिच्या आधारे राहणाऱ्या मानवी कळपांच्या मनोव्यापारातही बदल होत असावा. किती लवकर मोठी होतात हल्ली ही मुले! ज्या वयात गुलाबी रंगाचे महत्त्व कळू लागते त्या वयात वसुंधरेच्या भविष्याची ती चिंता करतात, ज्या वयात झाडांभोवती निर्बुद्ध पिंगा घालणाऱ्या नायकनायिकांना पडद्यावर पाहून हरखून जायचे त्या वयात ही मुले त्या झाडांना वाचवण्यासाठी मिठय़ा मारतात आणि काही घटनांनी प्रभावित होण्याच्या वयात ही मुले ‘घटना’ वाचवण्यासाठी रस्त्यावर येतात.

लहान वयात येणारे हे मोठेपण हा ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम म्हणायचा का? तसेच असावे बहुधा. नामदेव ढसाळ म्हणून गेला आहे त्याप्रमाणे ‘हे वर्ष तुझे हॉर्मोन्स बदलणारे..’