साहित्य संमेलनाचे आयोजक वा त्यांचे यजमान यांनी कुणालाही उद्घाटनास बोलवावे वा रोखावे; त्यावर संमेलनाध्यक्षांचा काहीही अधिकारच नाही?

साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेतल्याने जी काही नामुष्की ओढवली तीवरून साहित्य महामंडळ नावाचा डोलारा किती बिनबुडाचा आणि पोकळ आहे, हेच दिसून येते. यातून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यांना हात घालायला हवा.

नयनतारा सहगल यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय नक्की कोणाचा? वास्तविक नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिल्यापासून ताजा वाद उद्भवेपर्यंत त्यांच्याबाबत नव्याने काही घडलेले आहे, असे नाही. तेव्हा ज्या अर्थी एखाद्या लेखकाची निवड इतक्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी केली जाते तेव्हा त्या लेखकाची जातकुळी आयोजकांना माहीत असायला हवी, ही किमान अपेक्षा. म्हणजेच सहगल या काय स्वरूपाच्या लेखिका आहेत, त्यांची जीवनविषयक भूमिका काय आदींची माहिती त्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेणाऱ्या मुखंडांना असायला हवी. हा काही नगाला नग निवडण्याचा निर्णय नाही. त्यामागे काही विचार आहे. निदान असायला हवा. तो सहगल यांना बोलावण्यामागे तो केला होता की नव्हता? केला असेल तर तो काय होता आणि केलाच नसेल तर प्रश्नच खुंटला. दुसरे असे की नुसते साहित्य प्रसवावयाचे आणि जगताना काहीच भूमिका घ्यायची नाही वा घेतलीच तर बोटचेपीच घ्यायची असे करायला त्या काही मराठी साहित्यिक नाहीत, हे आयोजकांना माहीत असणार. निदान असायला हवे. मग सहगल यांच्याबाबत घोडय़ाने पेंड नक्की खाल्ली कोठे ?

दुसरा प्रश्न अ. भा. मराठी साहित्य महामंडळ नामक व्यवस्थेचा. डॉ. वि भि कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय यांच्याकडे या संमेलनाचे यजमानपद आहे. हे दोन वेगळे विषय. यजमान कोण हे ठरवण्याचा अधिकार महामंडळाचा. आणि तो यजमान एकदा ठरला की पुढचे सर्व ठरवण्याचा अधिकार यजमानाचा अशी ही साधारण व्यवस्था. एवढय़ाने भागत नाही. यजमान संस्थेला मागे एखादा धनाढय़ यजमान लागतो. कारण बहुतेकदा यजमान संस्था तुलनेने दरिद्रीच असते. त्यामुळे बऱ्याचदा स्वागताध्यक्ष अशा गोंडस नावाने हा यजमान संस्थेचा यजमान संमेलनाचे नियंत्रण करीत असतो. यवतमाळच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणवून घेणारे यजमान आहेत स्थानिक राजकारणी आणि राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार. या येरावार यांची वाङ्मयीन जाण यावर भाष्य करण्याइतका आमचा अधिकार नाही. परंतु राजकीय जाण चांगली असावी. कारण सहगल बाई येऊन आपल्यालाच चार शब्द सुनावण्याची शक्यता त्यांच्या लक्षात आली असणार. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खुंटी वापरून आयोजकांनी सहगलबाईंचा काटा काढला. यात विनाकारण आपल्या पक्षाचा मोरू झाल्याचे राज ठाकरे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपल्या अतिउत्साही नेत्यांचे कान उपटून सहगल यांच्या स्वागताची भूमिका घेतली. ते योग्य झाले.

तेव्हा प्रश्न असा की या साऱ्यांत साहित्य महामंडळ नामक व्यवस्थेची नेमकी भूमिका काय? महामंडळाचे पदाधिकारी याबाबत खाका वर करताना दिसतात. ते नुसते लाजिरवाणेच नाही तर या संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारे आहे. कोणी डॉ. रमाकांत कोलते यांनी सहगल यांना परस्पर पत्र पाठवून येऊ नका, असे कळवले. या कोलते यांचा वि. भि. यांच्याशी काही संबंध असेल तर नावास बट्टा लावणे म्हणजे काय, याचे ते मूर्तिमंत उदाहरण ठरू शकतील. महामंडळ म्हणते आमचा काही संबंध नाही. ते खरे असेल तर आयोजकांनी जेव्हा सहगल यांना निमंत्रणाचा निर्णय घेतला तेव्हा महामंडळाची भूमिका काय होती? आयोजकांनी कोणीही उद्घाटक निवडावा आम्हा काय त्याचे असेच जर या महामंडळाचे म्हणणे असेल तर समजा उद्या या वा अन्य कोणा आयोजकांनी अरुण गवळी यांची निवड केली असती तर हे महामंडळी ढुढ्ढाचार्य असेच शांतपणे बसून राहिले असते काय? की गवळी हेदेखील वेगळ्या प्रकारचे साहित्यिकच आहेत, असे समर्थन करीत बसले असते? आणि हे महामंडळ इतके निर्गुण / निराकार / निरपेक्ष असेल तर मग इतक्या सगळ्या उपद्व्यापाची गरजच काय? पसा टाका, संमेलन घ्या आणि वाटेल तो पाहुणा आणा असे त्यांनी एकदाचे जाहीर करून टाकावे. म्हणजे ही सगळी सर्कस तरी वाचेल. महाराष्ट्रात अशीही धनवानांची कमतरता नाही. एके काळी या धनवानांनीच कलावंतांना आश्रय दिला. आता ते साहित्यिकांना देतील. आश्रयदाता महत्त्वाचा मानल्यावर मग तो कोणी का असेना.

शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची भूमिका, जबाबदारी आणि कर्तव्य नक्की काय असते? महामंडळ आयोजक ठरवणार, एकदा का तो ठरला की तो आयोजक यजमान निवडणार आणि मग हे दोन्ही मिळून संमेलनाच्या दोन-तीन दिवसांत कोणाकोणाचे खेळ ठेवायचे ते ठरवणार. हे वास्तव. मग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने त्या मखरात तेवढे जाऊन बसायचे आणि आपले भाषण वाचायचे, इतकेच काम उरते. त्यातही आनंद मानणारे, त्यासाठी जीव टाकणारे अनेक आहेत. त्यांच्याविषयी आमचे काही म्हणणे नाही. कोणी कशात आनंद मानावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. एरवी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची तसदी आम्ही निश्चितच घेतली नसती.

परंतु यंदा संमेलनाच्या अध्यक्षपदी काहीएक साहित्य मूल्य मानणाऱ्या कवयित्री अरुणा ढेरे आहेत. चांगल्या साहित्यिकाचा एक गुण असतो. त्याची कलाविषयक मूल्ये आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान यांत अंतर नसते. अरुणा ढेरे व्रतस्थ रा चिं ढेरे यांचा समर्थ साहित्यिक वसा तितक्याच समर्थपणे आणि अधिक सात्त्विकतेने पुढे नेते आहेत. तेव्हा अरुणा ढेरे यांच्यासारखी साहित्यावर जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती अध्यक्षपदी असताना वेगळ्या ढंगाच्या पण साहित्यावर तितकेच उत्कट प्रेम करणाऱ्या उद्घाटिकेला दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा अभद्रपणा आपण करू नये, इतका समजूतदारपणा आयोजकांकडे नसेल. तो नाहीही. पण मग संमेलनाध्यक्ष म्हणून अरुणा ढेरे यांचे यावर मत काय? आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनात अशा तऱ्हेने एका विदुषीचा अपमान होत असताना त्यावर केवळ खंत व्यक्त करून थांबणे योग्य नाही, याची जाणीव अरुणा ढेरे यांना निश्चितच असणार. तेव्हा अरुणा ढेरे या काय करणार? गैरसोयीचे वास्तव मनातल्या मनातच दाबून टाकणे हा एक मार्ग असतो. साहित्य वर्तुळातील अनेक लेखकराव आदी त्या मार्गाने पुढे जातच यशस्वी आयुष्य जगत असतात. परंतु साहित्यविषयक कार्यक्रमासाठी अजूनही एसटीच्या लाल डब्यातून जाण्यात काहीही कमीपणा न मानणाऱ्या अरुणा ढेरे तितक्या निबर नाहीत आणि बनचुक्या होतील अशी तूर्तास लक्षणे नाहीत.

अशा प्रसंगातून सहीसलामत सुटण्याचा आणखी एक मार्ग असतो. सामान्य साहित्य रसिक, व्यापक हित नावाच्या अदृश्य घटकाकडे बोट दाखवीत झाला प्रसंग विसरायचा आणि मनातील उद्वेग दाबून उत्सवाचे लेझीम वाजवण्यात सहभागी व्हायचे. तोच चोखाळला जाईल बहुधा. पण याच सामान्य साहित्य रसिकाला दुर्गा भागवत वा पु ल देशपांडे अजूनही का आठवतात आणि आदरणीय का वाटतात याचा विचार करायला हवा. तो केल्यास जाणवते की मानवी देहाप्रमाणे वाङ्मयासही कणा असावा लागतो. तो नसेल तर मानवी देहाप्रमाणे साहित्याचाही पालापाचोळाच होतो. बाकी पुढचे अरुणा ढेरे यांच्या हाती.

Story img Loader