लक्ष्मण यांचे दालन हे येथे होणेच अनाठायी आहे आणि या असल्या कल्पना लढवत राहण्यापेक्षा मूळ चित्रठेव्याच्या संग्रहालयाकडे जरा अधिक लक्ष पुरवा, या मागणीपासून सरकारने दूर राहणे हास्यास्पदच ठरेल..
व्यंगचित्रांसाठी तुम्हाला विषय सुचतात तरी कसे, असे प्रख्यात दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना कुणीसे विचारले, तेव्हा ‘मला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. आपले राजकारणी भरपूर विषय पुरवतात’ असा हजरजबाब लक्ष्मण यांनी केल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे. लक्ष्मण व्यंगचित्रकार म्हणून थोर होतेच आणि आपल्या कलेबद्दल सजगही होते. असे किस्से खरे की खोटे हा नेहमीच वादाचा विषय ठरू शकतो. पण आज लक्ष्मण आपल्यात नाहीत तरीही त्यांचे ते वाक्य अमर ठरेल.. कारण राजकारणातील व्यंगे काही थांबत नाहीत. देशातील- किंबहुना दक्षिण आशियातील एक महत्त्वाची कलाशिक्षण संस्था असलेल्या सर जमशेदजी जिजिभाई कला महाविद्यालय म्हणजेच ‘जे जे’ संकुलात आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे विशेष दालन करू, अशी घोषणा करून राज्याची उच्चशिक्षण व सांस्कृतिक कार्य खाती सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी अशाच व्यंगाचे प्रदर्शन अलीकडे केले. मग जे जेवर प्रेम करणाऱ्या आणि लक्ष्मण यांचाही आदरच करणाऱ्या अनेक चित्रकारांनी वाईटपणा पत्करून जे जेच्या आवारात लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे संग्रहालय करण्याचे काहीही कारण नाही, असे सुनावले. हे सरकारने ऐकायचे की नाही, हा सरकारचा प्रश्न आहे. सरकार दूर उभे राहून गंमत पाहत बसणार आणि कोणीही विरोध केला की या मुद्दय़ाशी त्याचा संबंधच काय, त्याने पूर्वी काय केले, तो भंपकच कसा ठरतो असे युक्तिवाद करणाऱ्या जल्पकांच्या फौजा मैदानात उतरणार, अशीही सोय हल्ली असतेच. परंतु जे जेत लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी संग्रहालय वगैरे करण्याच्या फंदात खरोखरच सरकार पडणार असेल, तर त्यांना या जल्पक सुविधेचा फार लाभ घेता येणार नाही.
याची मुख्य कारणे दोन आणि अन्य कारणे अनेक. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांऐवजी जे जेच्याच संग्रहात १८७० पासून असलेल्या चित्रठेव्याचे रूपांतर जे जेच्या आवारामध्ये संग्रहालयात झाले पाहिजे, यासाठी गेली सुमारे दहा वर्षे अनेक चित्रकार सातत्याने झगडत आहेत. सरकार बदलले तरीही त्यांचा झगडा संपत नाही याचा अर्थ आधीच्या सरकारने जी बेमुर्वतखोरी आणि ज्या चुका केल्या तसेच करण्यास आजचेही सरकार उत्सुक आहे, असा होतो. चित्रकारांनी पूर्वी काय केले, ते गप्प का होते वगैरे प्रश्न गैरलागू ठरतात. एवढे होऊनही अपप्रचार करण्यासाठी अज्ञानाची झूल कोणी पांघरलीच, तर आज विरोध करणाऱ्या चित्रकारांपैकी काही जणांचा राजकीय रंग आधीपासून भगवाच कसा होता, याचीही आठवण करून देता यावी. तशी वेळ येऊ नये, यात या चित्रकारांना झटकून टाकू पाहणारांचे हित आहे. आपापले राजकीय रंग बाजूला ठेवून कलाक्षेत्राच्या भलाईसाठीच अनेक चित्रकार जे जेमधील चित्रठेव्याचे संग्रहालय करा अशी मागणी करीत होते आणि आहेत. दुसरे कारण असे की, आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृती संग्रहालय रूपाने जपायच्याच असतील, तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वत: पुढाकार घेण्याची गरजच काय? त्यासाठी जे जेच्याच आवाराची निवड करण्यामागे कोणते तार्किक कारण आहे? आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळणार नाहीत. मुळात लक्ष्मण यांच्या पूर्वप्रकाशित व्यंगचित्रांची अनेक पुस्तके आजही रसिकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा ठेवा पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचावा वगैरे हेतू जर कोणाचे असतील, तर या पुस्तकांच्या आवृत्त्या निघत राहिल्यास भले. या पुस्तकांचे प्रकाशक किंवा आज लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे हक्क ज्यांच्याकडे आहेत ते आर. के. लक्ष्मण फाऊंडेशन यांनी सरकारकडे मदतीची कधी याचना केल्याचे ऐकिवात नाही. लक्ष्मण यांनी रंगविलेले कावळे, व्यवस्थापनशास्त्राच्या पुस्तकांसाठी तसेच ‘मालगुडी डेज’ कथांसह आर. के. नारायण यांच्या काही पुस्तकांसाठी रंगविलेली चित्रे अशी अन्य चित्रसंपदाही लक्ष्मण यांच्या स्मृतींचा अमोल ठेवा आहे आणि असे असताना ‘लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे संग्रहालय जे जेत उभारू’ असे पुटपुटणेदेखील हास्यास्पदच. ‘जे जे’शी लक्ष्मण यांचा काय संबंध होता यावर जाणकारही मौन आहेत आणि पुण्याच्या सिम्बॉयसिस या संस्थेशी या थोर व्यंगचित्रकाराचा जितका संबंध आला, तितकाही जे जेशी कधी नव्हता हे उघड आहे. तेव्हा लक्ष्मण यांच्याबद्दल सर्वाच्याच भावना आदर, प्रेम आणि कृतज्ञता अशाच आहेत हे मान्य करूनही, त्या भावना व्यक्त करण्याची जे जे कला महाविद्यालय संकुल ही जागा नव्हे.
..अन् पुन्हा साकारला ‘कॉमन मॅन’
जवळपास पावणेदोनशे वर्षांचा वारसा सांगणाऱ्या या संकुलाची खरी दुखणी निराळी आहेत. त्यांवर संग्रहालय ही निव्वळ फुंकर मानली, तरी तीदेखील केवढी तरी मोठी ठरेल. ‘सर ज. जी. कला महाविद्यालय’ या संस्थेकडे आजघडीला जी चित्रे आणि शिल्पे आहेत, त्यांचे कायमस्वरूपी संग्रहालय हवे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांत चित्रकारांनी वारंवार केली आहे. या कलाकृतींची संख्या सध्या किमान दोन हजार आहे. यापूर्वी या कलाकृतींना पाय फुटले – म्हणजे यापैकी काही कलाकृती राज्य सरकारच्या अखत्यारीतील या संस्थेतून लांबवल्या गेल्या किंवा खरे तर चोरीस गेल्या- असे चिखलफेकवजा आरोप झालेले आहेतच. याबाबतची पोलिसी तक्रार न करता निव्वळ चिखलफेकीत रस घेणारे दोन गट आजही आहेत. आम्ही नाही- त्यांनीच हे केले, असा पवित्रा आजही हे दोन्ही गट घेतात. यातूनच, या कलाकृतींची संख्या तीन हजार, साडेतीन हजार अशीसुद्धा सांगितली जाते. या चिखलफेकूंपैकी एकही जण आज जे जेत अध्यापन करीत नाही. आज जे या संस्थेत आहेत, त्यांच्या अंदाजांनुसार ‘चित्रठेवा’ म्हणावे अशा चित्रांची संख्या पावणेतीन हजारांवर सहज जाईल. परंतु सध्या तरी अन्य चित्रांची मोजदाद झालेली नाही. जेवढी चित्रे उपलब्ध आहेत, त्यांच्या संधारणासाठी ज. जी. कला महाविद्यालयाच्या विद्यमान अधिष्ठात्यांनी पिरवानगी व निधी मागितला. सन २००८ पासून ही प्रक्रिया सुरू झाली. २०११ पासून लखनऊच्या ‘नॅशनल रीसर्च लॅबोरेटरी’ या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कामही होऊ लागले. यातून आज ६५० चित्रे आणि ३० शिल्पे यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संधारण झालेले आहे. सन १८७० ते १९७० या शंभर वर्षांतील या निवडक कलाकृती आहेत. म्हणजे सरकारच ज्या चित्रांच्या संधारणासाठी खर्च करून या कलाकृतींचे ऐतिहासिक महत्त्व मान्य करते, त्याच कलाकृतींचे संग्रहालय करण्यास मात्र अक्षम्य टाळाटाळ सुरू राहते.
जे जेच्या चित्रठेव्याचे हे संग्रहालय ‘डीनचा बंगला’ किंवा लॉकवूड किपलिंग हे १८६६ सालच्या सुमारास जेथे राहत, त्या ‘किपलिंग बंगल्या’त उभारले जावे, असा प्रयत्न आहे. हा जोडबंगला आहे आणि तो अद्यापही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचा आहे. सारे सोपस्कार पूर्ण करून आम्ही तेथे संग्रहालय उभारणार, असे राज्य सरकार म्हणते. परंतु प्रत्यक्षात यादृष्टीने पावले टाकली गेलेली नाहीत. लक्ष्मण यांचे ‘विशेष दालन’ करण्यासाठी नोकरांच्या चाळी वापरणार, अशी कल्पना आता पुढे आणली जात आहे. ते का वापरणार, या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सहकुटुंब हुसकावण्यासाठी कोणकोणत्या नियमांवर बोटे ठेवणार, हे प्रश्न चित्रकार विचारत नाहीत. चित्रकारांचे म्हणणे एवढेच आहे की आर. के. लक्ष्मण यांचे दालन हे येथे होणेच अनाठायी आहे आणि या असल्या कल्पना लढवत राहण्यापेक्षा मूळ चित्रठेव्याच्या संग्रहालयाकडे जरा अधिक लक्ष पुरवा.
विशेष संपादकीय: कसे बोललात लक्ष्मण!
भारताच्या कला-इतिहासात अजरामर झालेले आबालाल रहिमान, पीठावाला, हेब्बर, गायतोंडे आदी चार गत पिढय़ांतील चित्रकार ज्या संग्रहात आहेत, तो सध्या कडीकुलपात बंद आहे. राज्य सरकारच्या मालकीचा हा चित्रठेवा म्हणजे महाराष्ट्राच्या कलेतिहासाचा आरसा आहे. तो कलाप्रेमींना आणि कलाविद्यार्थ्यांना दिसायला हवा. इत:पर सरकारला लक्ष्मण यांचे दालन आम्हीच कसे करून दाखवणार अशा वल्गनांत रस असेल तर त्यांनी स्वत:पुरता कोणताही आरसा पाहावा.. त्यांना उत्कृष्ट व्यंगचित्र दिसेलच, याची खात्री देण्यासाठी चित्रकलेच्या जाणकारीची गरज नाही!