भारतात सध्या जे चालू आहे ते महान आहे असे ट्रम्प यांना कितीही वाटो, भारताच्या कामगिरीबाबत ज्यांच्याकडून खरी प्रशस्ती मिळावी त्यांची मते वेगळीच आहेत.
जगभरातील अर्थभाष्यकारांनी भारतात उगवू पाहणाऱ्या सूर्याचे वर्णन करावयाचे आणि ते ऐकून कारखानदारांनी आपापल्या गुंतवणूक सौर्यचुली भारताकडे वळवायच्या. असे गेले दशकभर सुरू आहे. परंतु भारतातील हा सूर्य काही उगवायला तयार नाही.
काहींच्या टीकेपेक्षा त्यांच्याकडून होणारे कौतुक धोक्याची जाणीव करून देणारे असते. म्हणजे उद्या समजा ललित मोदी यांनी सुषमा स्वराज यांना नतिकतेचे प्रमाणपत्र दिले किंवा राजीव शुक्ला यांनी अरुण जेटली यांची दिल्ली क्रिकेट असोसिएशनप्रकरणी भलामण केली किंवा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कोणा संपादकाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले, तर ते जसे या मंडळींनी त्या त्या व्यक्तींवर ओढलेल्या टीकेच्या आसुडापेक्षा अधिक घायाळ करणारे असेल तसेच काहींकडून होणारे कौतुक हे भीतिदायक असते. याचा ताजा संदर्भ म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवू पाहणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले भारताचे कौतुक. कोणाही किमान बुद्धिधारी माणसाच्या दृष्टिकोनातून ट्रम्प यांचे वर्णन एक विचारी व्यक्ती असे केले जाण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांच्याबाबत परिस्थिती इतकी हलाखीची आहे की ट्रम्प यांना जर कोणी समंजस, विचारी म्हणाले तर असे प्रमाणपत्र देणाऱ्याच्या बुद्धिमत्तेविषयी संशय यावा. अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशबंदी करावी येथपासून काहीही बोलण्यात ट्रम्प यांच्याशी स्पर्धा करू शकणारे कोणीही त्या देशात नाही. ट्रम्प यांच्याशी स्पर्धा घडवून आणायचीच असेल तर त्यासाठी भारतातून प्रवीण तोगडिया, गिरिराज सिंग, साक्षी महाराज किंवा अर्धा डझनभर साध्वी अमेरिकेत रवाना कराव्या लागतील. असो. तर अशा या ट्रम्प महाशयांनी अमेरिकेत खासगी दूरचित्रवाणी वाहिनीस मुलाखत देताना भारताची तोंडभरून प्रशंसा केली. भारतात सध्या जे काही सुरू आहे ते सर्व थोर आहे, असे हे ट्रम्प म्हणाले. परंतु जे काही सुरू आहे ते म्हणजे काय, हा मुद्दा मात्र तसा अस्पष्टच राहिला. अर्थात तो काय असू शकतो, याचा अंदाज बांधणे अवघड नाही.
कारण याच अनुषंगाने दुसऱ्या एका दूरचित्रवाणी वाहिनीस मुलाखत देताना या ट्रम्पबाबांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स हिचे वर्णन नरकस्थळ असे केले. हे सुंदर शहर नरक का? तर त्या शहरात मुसलमान निर्वासित मोठय़ा प्रमाणात राहतात म्हणून. या आधी ट्रम्प यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस, इंग्लंडची राजधानी लंडन अशा शहरांना याच रांगेत बसवले होते. त्यामागील कारणही तेच. या शहरांत मुसलमानांना मुक्तद्वार आहे म्हणून. ट्रम्प यांच्या मते या शहरांत कायदा वा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी वाईट आहे की काही परिसरांत पोलीसदेखील जाऊ शकत नाहीत. ते त्यांनी कशाच्या जोरावर केले, ते खुद्द त्यांनादेखील ठाऊक नसावे. कारण याच मुलाखतीत ते पुढे म्हणाले, मी २० वर्षांपूर्वी एकदा ब्रुसेल्सला गेलो होतो, तेव्हा ते खूप सुंदर होते. आता ते तसे नाही. दोन दशकांपूर्वी दिलेल्या भेटीच्या आधारे हे ट्रम्प आपले विद्यमान मत व्यक्त करू पाहात असतील तर यावरून त्यांच्या एकंदर वकुबाचा अंदाज यावा. हे ट्रम्प व्यवसायाने रिअल इस्टेट क्षेत्रात आहेत. म्हणजे बिल्डर आहेत. आता आपल्याकडे राजकारणातील अमुक एखादी व्यक्ती बिल्डर आहे असे सांगितल्यावर जनसामान्यांचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. त्यामुळेही असेल पण आपल्याकडे बहुसंख्य राजकारणी, तुम्ही काय करता या प्रश्नावर (शहरात राहणारे असले तरी) शेती असे उत्तर देतात. जसे की शरद पवार, लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव वा अन्य कोणीही. परंतु आपण व्यवसायाने बिल्डर आहोत असे कोणीही सांगितल्याचे ऐकिवात नाही. अमेरिकेत तसे नाही. निवडणुकीच्या िरगणात उतरल्यानंतर, त्याच्या आधीही ट्रम्प यांनी आपण बिल्डर आहोत हे कधीही लपवले नाही. किंबहुना महाराष्ट्राची राजधानी मुंबईतदेखील या ट्रम्प यांचे काही इमारत प्रकल्प सुरू आहेत. तेव्हा मुद्दा ट्रम्प यांचा व्यवसाय काय आहे हा नाही. तर ते काय बोलतात आणि कोणत्या राजकारणाचा पुरस्कार करतात, हा आहे. आता यावर काहींना ट्रम्प भारताविषयी चार शब्द बरे बोलले तर त्यात काय एवढे, असा प्रश्न पडू शकेल. तेही योग्यच. त्यांना ट्रम्प यांच्या भूत आणि वर्तमानातील काही दाखले द्यावे लागतील.
या ट्रम्प यांची सर्वात मोठी गुंतवणूक ही दुबई आणि पश्चिम आशियाच्या आखाती देशांत आहे. तेथील अनेक शेख आणि शेखचिल्ली हे दोन्ही मोठय़ा प्रमाणावर ट्रम्प यांचे भागीदार आहेत. साहजिकच हे सर्व प्रांत मुसलमानबहुल आहेत. तेव्हा या प्रदेशांत या आणि अशा भागीदाऱ्या करताना, खोऱ्याने पसा ओढताना या ट्रम्प महाशयांना मुसलमानांविषयी मत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मुस्लिम्स आर ग्रेट! म्हणजे मुसलमान महान आहेत. आता एखादा विशिष्ट धर्माचा वा जातीचा मानव समूह सगळाच्या सगळा कधी महान नसतो आणि तसाच सगळाच्या सगळा कधी निंदनीयदेखील नसतो. काळे पांढरे घटक सर्वच समाजात असतात. परंतु या साध्या तत्त्वाचा ट्रम्प यांना राजकारणाच्या आखाडय़ात आल्यावर विसर पडला आणि त्यांच्या विचारधारेचा लंबक एकदम दुसऱ्या बाजूला गेला. तो आता अशा ठिकाणी आहे की त्यांना तेथून जगातील प्रत्येक मुसलमान हा दहशतवादीच वाटू लागला आहे. उद्या त्यांना पुन्हा एकदा आखाती प्रदेशांत वा इंडोनेशिया वा ब्रुनेई वा तत्सम कोणत्या देशांत गुंतवणुकीची संधी मिळाली तर हेच ट्रम्प पुन्हा एकदा मुस्लिम्स आर ग्रेट असे म्हणणारच नाहीत, याची खात्री नाही. तेव्हा मुद्दा हा की हेच ट्रम्प बुधवारी खासगी दूरचित्रवाणीवर बोलताना ‘इंडिया इज डुइंग ग्रेट’ असे म्हणाले तेव्हा कोणाच्या मनात धडकी भरली असेल तर ते साहजिकच म्हणावे लागेल. याचाच अर्थ इतक्या हुच्च व्यक्तीकडून प्रशस्तिपत्र मिळत असेल तर त्याची गणना अप्रशस्तिपत्र अशीच व्हायला हवी.
यात लक्षात घ्यावा असा आणखी एक आंतरराष्ट्रीय विरोधाभास आहे. तो म्हणजे ट्रम्प यांच्यासारख्या उठवळ राजकारण्यास भारतात बरेच काही महान सुरू असल्याचा साक्षात्कार होत असताना अटलांटिकच्या अलीकडे आल्प्सच्या कुशीत दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नामक अर्थकुंभमेळ्यातील तज्ज्ञांना मात्र भारताविषयी काळजी व्यक्त करावीशी वाटत होती. गेले जवळपास दशकभर हा अर्थकुंभ भारताकडे आशा लावून आहे. ‘इंडिया स्टोरी’ हा या अर्थकुंभातील परवलीचा शब्द. ही भारतकथा कशी उलगडणार आहे, कशी गुंतवणूक संधी मिळणार आहे, मग कसा आíथक विकास होणार आहे याची दिवास्वप्ने या अर्थकुंभात अनेकांनी एकमेकांना इतके दिवस विकली. म्हणजे अर्थभाष्यकारांनी भारतात उगवू पाहणाऱ्या सूर्याचे वर्णन करावयाचे आणि ते ऐकून कारखानदारांनी आपापल्या गुंतवणूक सौर्यचुली भारताकडे वळवायच्या. असे गेले दशकभर सुरू आहे. परंतु भारतातील हा सूर्य काही उगवायला तयार नाही. २०१४ सालातील सत्तांतराने तरी या सूर्याभोवतीचा झाकोळ दूर होईल याबद्दल या कुंभातील सर्वानाच छातीठोक खात्री होती. परंतु आता त्यांचाही विश्वास डळमळू लागला असून नुरिएल रूबिनी यांच्यासकट अनेकांनी दावोस येथे भारताविषयी चिंता व्यक्त केली. यातील गंमत म्हणजे भारताच्या क्षमतेविषयी यांतील कोणालाच शंका नाही. परंतु त्यांची समस्या ही की भारताची कामगिरी या क्षमतेस साजेशी नाही. हे म्हणजे शाळेतील वर्गशिक्षकाकडे आपल्या पाल्याविषयी गाऱ्हाणे घालावयास गेलेल्या एखाद्या असाहाय्य महिलेसारखेच झाले. ‘तो आहे हुशार, पण अभ्यास करीत नाही,’ हे वाक्य बऱ्याच पालकांकडून शाळाशाळांत आपापल्या चिरंजीवांविषयी उच्चारले जाते. ते गेली काही वष्रे आता भारताविषयी उच्चारले जाऊ लागले आहे. ‘तो आहे हुशार,. पण अभ्यास करीत नाही.’
म्हणूनच अशा वेळी ट्रम्प यांच्याकडून होणारे कौतुक हे विषसमान आहे, याचे भान बाळगणे केव्हाही शहाणपणाचेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा