समाजमाध्यमांनी आपल्या पाठीराख्यांवर घातलेली बंदी पक्षपाती आहे, असे म्हणून फेसबुक, ट्विटर आदींवर ‘नियंत्रण ठेवण्या’ची भाषा करणारे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचेही असेच झाले. पण तेथे समाजमाध्यमे झुकलेली नाहीत..
विज्ञान वा तंत्रज्ञानातील प्रत्येक नवनव्या शोधामुळे सनातन्यांनाच बळ मिळते असा इतिहास आहे. पूर्वी धर्मग्रंथ वा वाङ्मय मुखोद्गत असावे लागे. परंतु जेव्हा छपाईची कला विकसित झाली तेव्हा त्यावर पहिली छपाई झाली ती धर्मग्रंथाचीच. आजही सरकारी कार्यालयांत संगणकादी आधुनिक सुविधांची सुरुवात श्रीफळ वाढवून केली जाते आणि विज्ञान प्रयोगांचा ‘श्रीगणेशा’ केला जातो. तात्पर्य जुने हे नव्या शोधांत आपल्याच धारणा बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. या जुन्या वा जुनाट परंपरावाद्यांना आव्हान मिळते तेव्हा संघर्ष अटळ असतो. समाज जेवढा सजग तेवढा हा संघर्ष फलदायी. नव्याची कास धरू पाहणाऱ्यांना अभिव्यक्तीची उसंत ज्या समाजात अधिकाधिक मिळते तो प्रांत अधिकाधिक प्रगत, असे हे साधे समीकरण आहे. परंतु अशा मुक्त आधुनिक अभिव्यक्तीवादी समाजातही जेव्हा जुन्यांचीच कास धरणाऱ्यांहाती सत्ता येते तेव्हा त्या समाजाची काळजी वाटू लागते. उदाहरणार्थ अमेरिका. त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांतील आधुनिक अभिव्यक्तीविरोधात थयथयाट केला असून ही समाजमाध्यमे परंपरावाद्यांची मुस्कटदाबी करतात अशी त्यांची तक्रार आहे. हा तक्रारदार अमेरिकेचा अध्यक्ष असल्याने त्यांच्या प्रतिपादनास महत्त्व येते. त्याचे आणखी एक कारण म्हणजे समाजमाध्यमांच्या नियंत्रणाची त्यांनी बोलून दाखवलेली गरज.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे. त्या पक्षाने विज्ञानाकडे पाठ फिरवली त्यास बराच काळ लोटला. त्यामुळे स्कंदपेशी संशोधन, स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार आदी मुद्दे त्या पक्षीयांना मान्य नसतात. या मंडळींची बौद्धिक समजही तशी बेताचीच आणि तशाच मतदारसंघांत त्यांचे प्राबल्य. २०१६ सालच्या निवडणुकीत एका रिपब्लिकन पक्षीय उमेदवाराचा मोबाइल ऐन प्रचारसभेत वाजला तर त्याने थेट आकाशाकडे हात करून प्रभूचा फोन असल्याची बतावणी केली. आश्चर्य हे की त्यावर श्रोतृवृंदाने टाळ्या वाजवून त्याचे अभीष्टचिंतन केले. यावरून या मंडळींचा एकंदर वकूब लक्षात यावा. ट्रम्प अशांचे प्रतिनिधित्व करतात यातच काय ते आले. त्यावरून सध्या त्यांच्या संतापाचे कारणही लक्षात यावे.
ते आहे अमेरिकेतील काहींवर फेसबुक, ट्विटर आदींनी घातलेली बंदी. योगायोग असा की हे बंदी घालण्यात आलेले सर्वच्या सर्व अतिउजवे आहेत आणि विरोधकांविरोधात हिंसेचा प्रयोग करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. यात आहे जर्मनीतील नाझीवादाचे समर्थन करणारा पॉल नेहलेन, कट्टर वंशवादी/ अतिउजव्या ब्रेटबार्ट वृत्तसेवेचा वृत्तसंपादक मिलो यिआनोपोलस, गूढवादाचा पुरस्कर्ता अलेक्स जोन्स, नेशन ऑफ इस्लाम पंथाचा लुईस फराखान तसेच अन्य धर्मीयांविरोधात सतत गरळ ओकणारा सनातनवादी पॉल जोसेफ वॉटसन आदींवर विविध समाजमाध्यमांनी आपापली व्यासपीठे वापरण्याची बंदी घातली. ट्रम्प यामुळे दुखावले गेले असून हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समाजमाध्यमांतील धुरीण एकाच अशा विचारधारेविरोधात कशी काय कारवाई करू शकतात, असा प्रश्न अमेरिकी अध्यक्षांना पडला असून त्याचे उत्तर शोधण्याचा मार्गही त्यांनी हुडकल्याचे दिसते.
समाजमाध्यमांवर बारीक नजर ठेवणे आणि पक्षपाती वर्तन आढळल्यास त्यावर ‘नियंत्रण’ आणणे हा त्यांचा मार्ग. वरवर पाहू गेल्यास एका मोठय़ा वर्गास ट्रम्प यांचे काय चुकले असेच वाटेल. किंबहुना अनेकांची धारणा समाजमाध्यमेच चुकली अशी असेल. तथापि यातील मेख अशी की बंदी घालण्यात आलेले केवळ युक्तिवाद करून थांबणारे नाहीत. म्हणजे एखाद्याचे मत मान्य नाही, असे मानणे, त्याच्या मताचे खंडन स्वतंत्र मत मांडून करणे असा या बंदी घालण्यात आलेल्यांचा मार्ग नाही. ते हिंसेस उत्तेजन देतात. आपल्या मतास विरोध करणाऱ्याचा गळा घोटला जायला हवा ही या उजव्यांची विचारधारा. ती ते समाजमाध्यमांतील व्यासपीठांवरून सातत्याने प्रसृत करीत होते. त्याबाबत वारंवार सूचना, इशारे दिले गेल्यानंतरही त्यांच्या समाजमाध्यमी वर्तनात सुधारणा झाली नाही. तेव्हा अन्य सर्व उपाय खुंटल्यानंतर ट्विटर, फेसबुकादी माध्यम संचालकांनी या मंडळींना प्रवेश बंदी केली. ट्रम्प यांच्या संतापाचे हे कारण.
यावरून मुक्त आविष्कार स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. अशा वेळी एक वर्ग ‘‘..पण त्यांनाही मते मांडण्याचा अधिकार नाही काय,’’ असा प्रश्न विचारतो. त्यात शहाणपणापेक्षा साळसूदपणा अधिक. वास्तव समजून घ्यायचे तर यामागील लबाडी लक्षात घ्यायला हवी. हा काही केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा नाही. अमेरिकेसारख्या देशात तर हे स्वातंत्र्य मुबलक म्हणता येईल असेच आहे. त्या देशात माध्यमांना लक्ष्य करणारा बदनामीचा कायदादेखील नाही. त्यामुळे कोणीही उच्चपदस्थ वास्तव सांगू पाहणाऱ्याची मुस्कटदाबी अब्रूनुकसानीचा खटला भरून करू शकत नाही. पण तरीही या आविष्कारस्वातंत्र्याची अट एकच. ते हिंसक असता नये. जोपर्यंत ही मतमतांतरे खंडनमंडनाच्या पातळीवरच आहेत तोपर्यंत कोणीही कोणाहीविरोधात काहीही मत मांडण्यास अमेरिकेत ना नाही. प्रश्न येतो तो हिंसेस उत्तेजन दिल्यास. ज्यांच्यावर तेथे बंदी घातली गेली ते असे हिंसेस उत्तेजन देताना आढळले. तसेच समाजमाध्यमांतील त्यांची भाषादेखील सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी होती. तेव्हा त्यांच्यावरील बंदी अयोग्य ठरवता येणार नाही.
तथापि यामुळे समाजमाध्यमे आणि एकूणच अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मुद्दय़ाची व्यापक चर्चा व्हायला हवी. याचे कारण असे की समाजमाध्यमांतील अभिव्यक्तीस काहीही धरबंध नाही. ती निर्गुण नसली तरी निराकार असते. म्हणजे ज्याच्याविषयी मत व्यक्त करावयाचे ती घटना वा व्यक्ती एक वेळ माहीत असेल. परंतु त्यावर भाष्य करणारा हा पूर्णपणे अनभिज्ञ असू शकतो. समाजमाध्यमांनी जनसामान्यांस चेहरा दिला हे खरे. कोणीही कोणाहीविरोधात काहीही मत व्यक्त करू शकतो हे यामुळेच शक्य झाले. परंतु पारंपरिक माध्यमांतून अभिव्यक्त होताना त्या माध्यमाचे म्हणून काही संकेत वा नियम असतात, ते पाळावे लागतात. समाजमाध्यमांतील अभिव्यक्तीस याची गरज नसते. त्यामुळे कानात वारे गेलेले वासरू ज्याप्रमाणे कोणत्याही दिशेस कसेही धावू शकते त्याप्रमाणे डोक्यात वारा गेलेली मंडळी समाजमाध्यमांत कशीही व्यक्त होऊ शकतात. नव्हे होतातही.
या माध्यमांमुळे मोठे आव्हान निर्माण झाले ते उजव्या सनातन्यांसमोर. डावे हे साधारण माध्यमस्नेही असतात. त्यांनी चटकन समाजमाध्यमांची मूलतत्त्वे अंगीकारली आणि त्याप्रमाणे ते अभिव्यक्त होऊ लागले. उजव्यांना हा खेळ लक्षात येण्यास त्यामानाने वेळ लागला. जेव्हा त्यांना तो उमगला तोपर्यंत या माध्यमांतील पस डाव्यांनी व्यापल्याचे आढळले. यामुळे संतापून उजव्यांनी समाजमाध्यमांतून अद्वातद्वा व्यक्त होण्यास सुरुवात केली. समाजातील बहुसंख्य हे सनातनी असतात कारण तसे असणे बौद्धिकदृष्टय़ा सोपे असते. हा बहुसंख्य वर्ग मोठय़ा प्रमाणावर समाजमाध्यमांत आला आणि तेथील समधर्मी सनातन्यांच्या आविष्कारास भुलत गेला. त्यामुळे हे नव्याने आलेलेही ताळतंत्र सोडूनच व्यक्त होत राहिले. परिणामी समाजमाध्यमे ही आततायी, एककल्ली, अर्वाच्य भाषेत वाटेल ते बरळणाऱ्यांनी भरून गेली. नेमस्तांपेक्षा जनसामान्यांना आक्रस्ताळ्यांचेच आकर्षण असते. तेव्हा समाजमाध्यमांतील अशा आक्रस्ताळ्यांचे प्रस्थ त्यामुळे वाढत गेले असल्यास नवल ते काय?
अमेरिकेसारख्या देशात हे असे झाले. तेव्हा अन्यत्र काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा काहींवर अखेर अमेरिकेत बंदी घालावी लागली. ते बरेच झाले. समाजमाध्यमे महासत्तेच्या अध्यक्षालाही भीक घालत नाहीत, हे दिसले. तेव्हा ट्रम्प यांच्या बंदीविरोधी इशाऱ्याचा काहीही परिणाम होणार नाही. समाजमाध्यमांतील सनातन्यांना आपली अभिव्यक्ती-समज बदलावीच लागेल.