वाङ्मयाची सूक्ष्म जाण, विचारांची शिस्त, विश्लेषणशक्ती आणि तर्कशक्ती ही त्यांची बलस्थाने. त्यास दांभिकतेविरोधातील संतापाची जोड मिळाली..
काहींच्या बंडाची सुरुवात स्वत:च्या नावापासूनच होते. उदाहरणार्थ राजा ढाले. एक बंडखोर विचारवंत, साहित्यिक, लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील झंझावाती नेतृत्व म्हणून राजा ढाले सुपरिचित आहेत. मात्र त्यांची बंडखोरी त्यांच्या नावापासून सुरू झाली. राजाराम पिराजी ढाले हे त्यांचे मूळ नाव. राजकीय मतांचे मिसरूड फुटल्यावर स्वत:च्या नावातील रामास त्यांनी निरोप दिला आणि राजा तेवढा राखला. हे बंडखोर ढाले गेल्या पाच दशकांहून अधिक काळ साहित्य आणि आंबेडकरी चळवळीत बंडाची तळपती तलवार घेऊन राजासारखेच वावरले. तो वावर आज कायमचा संपुष्टात आला.
राजा ढाले यांचा जन्म पिढय़ान् पिढय़ा जातीयतेचे चटके सहन कराव्या लागलेल्या समाजातला. सांगली जिल्ह्यातील नांद्रे या खेडय़ातल्या प्राथमिक शिक्षणानंतर ढाले शिक्षणासाठी मुंबईत आले. गावकुसाबाहेरून आलेल्या माणसाला मुंबईत झोपडपट्टीचाच आसरा असतो. त्यास ढाले यांचा अपवाद नव्हता. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच ते लेखनाकडे वळले. १९६०च्या दशकात परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या प्रस्थापित लेखक, साहित्याच्या विरोधात नवे विचार, नवी दृष्टी प्राप्त होऊ लागलेल्या तरुण-उदयोन्मुख लेखकांकडून बंडाची तुतारी फुंकली गेली होती. तीत आघाडीवर होते अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे इत्यादी. यातूनच जन्माला आली ‘लिटल मॅगेझिन’ची चळवळ. राजा ढाले तिकडे आकृष्ट झाले नसते तरच नवल. तेथे त्यांना बंडाचा सूर सापडला. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून मर्यादित आणि त्यातही पारंपरिक अनुभवविश्वात रममाण तत्कालीन मराठी प्रस्थापित वाङ्मय क्षेत्रास चांगलेच हादरे बसू लागले. दिलीप चित्रे यांच्या कवितासंग्रहावरील टीका आणि टीककारांचा घेतलेला समाचार असो, नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ या कवितासंग्रहाची समीक्षा असो किंवा वेश्यांच्या अस्तित्वावरून दुर्गा भागवत यांच्याशी झालेला वैचारिक संघर्ष असो, मराठी साहित्याच्या प्रांतात ढालेंचा एक वेगळाच दरारा निर्माण झाला. ‘सत्यकथे’ची सत्यकथा लिहून त्यांनी प्रस्थापित लेखक -कवींच्या कंपूत भूकंपच घडवून आणला.
सर्वसाधारण अनुभव असा की केवळ चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडे इतका मजकूर नसतो. राजा ढाले यांचे मोठेपण हे की ते जसे उत्तम सामाजिक कार्यकर्ते होते तितकेच या कार्याच्या निमित्ताने समोर येणाऱ्या जगाची सृजनशील मांडणी करणारे कलावंतदेखील होते. विलक्षण कल्पनाशक्ती, वाङ्मयाची सूक्ष्म जाण, विचारांची शिस्त, सखोल विश्लेषणशक्ती आणि काटेकोर तर्कशक्ती ही त्यांची बलस्थाने. त्यास दांभिकतेविरोधातील संतापाची जोड मिळाल्याने हे रसायन चांगलेच स्फोटक बनले. परंतु म्हणून ढाले केवळ साहित्याच्या चौकटीत अडकून पडले नाहीत. बंड केवळ साहित्यापुरते राहिल्यास समाजात काडीचाही बदल होणार नाही, म्हणून त्यासाठी साहित्याच्या जोडीने विचारांची लढाई रस्त्यावर येऊन लढायची तयारी असायला हवी, अशी त्यांची भूमिका होती आणि ती ते प्रामाणिकपणे जगले. ही अशी लढाई जोमात येत असतानाच दलित साहित्याची चळवळही बाळसे धरत होती. आणि त्यावरही प्रस्थापित साहित्यिकांकडून ‘हे कसले साहित्य’ अशी कुत्सित खिल्लीही उडविली जात होती. त्या वेळी ढाले दलित साहित्याच्या रक्षणार्थ पुढे सरसावले आणि आपल्या तर्कशुद्ध वैचारिक मांडणीने दलित साहित्याच्या टीकाकारांना त्यांनी खणखणीत उत्तर दिले. ‘दलित साहित्याच्या उगमापाशी ढाले नंग्या तलवारीसह उभे राहिले नसते तर, दलित साहित्याची भ्रूणहत्याच झाली असती,’ असे त्यांचे मित्र, लेखक ज वि पवार म्हणतात ते तंतोतंत खरे आहे.
आपल्या तार्किक युक्तिवादाने त्यांनी दलित लेखकांनाही सोडले नाही. खरे तर साहित्याला दलित हे विशेषण लावायलाच त्यांचा विरोध होता. ‘बौद्ध साहित्य’ हे वर्णनही त्यांना अमान्य होते. साहित्यामागची प्रेरणा महत्त्वाची, असे ते मानत. ती प्रेरणा आंबेडकरी विचारांत आहे. तेव्हा आपल्या साहित्यात आंबेडकरी विचारप्रणालीला गौण मानून आपले दलितत्व व बौद्धत्व प्रमुख मानणार आहात काय, असा त्यांचा परखड सवाल होता. ढाले यांची ही भूमिका एकूणच साहित्यप्रांतात वादाची ठरली. मात्र कालांतराने त्यातूनच पुढे फुले-आंबेडकरी साहित्य असा उपप्रवाह सुरू झाला. आज दलित हा शब्द जवळपास अस्तंगत होत आहे, त्यामागे ढाले यांची एकाकी लढत महत्त्वाची होती, हे नाकारता येणार नाही.
अशा ढाले यांची संगत जमली ती दुसऱ्या तितक्याच उत्कट आणि कलात्मक बंडखोराशी. त्याचे नाव नामदेव ढसाळ. त्यातूनच हे दोघे एकत्र आले आणि साहित्य ते चळवळ यांस एक वेगळेच तेज मिळाले. हा १९७२ चा कालखंड. एका बाजूला भारतीय स्वांतत्र्याचा रौप्यमहोत्सवी झगमगाट सुरू असताना दलितांवरील अत्याचाराने कळस गाठला. कोणाचे डोळे फोडले गेले, तर कोठे दलित स्त्रियांची विवस्त्र धिंड काढली गेली. यामुळे दलित तरुणांत प्रचंड असंतोष खदखदत होता. न्याय जिच्याकडे मागायचा ती व्यवस्था तर ढिम्मच. अशा वेळी दलितांवरील अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी राजा ढाले-नामदेव ढसाळ यांनी ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेची स्थापना केली. त्याच वेळी ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकात लिहिलेल्या ‘काळा स्वातंत्र्य दिन’ या लेखाने प्रचंड खळबळ उडाली. राष्ट्रध्वजाच्या अवमानाबद्दल देशद्रोही म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली. मात्र त्या लेखाने दलित पँथर प्रकाशझोतात आली. पँथरच्या झेंडय़ाखाली हजारो दलित तरुण डोक्याला कफन बांधून जातिव्यवस्थेच्या आणि जातीयवाद्यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी मदानात उतरले. दलित पँथरने देशभर एक वादळ निर्माण केले. त्यात ढाले यांचे योगदान मोठे होते.
दलित पँथरची म्हणून एक दहशत होती. वरळीची दंगल वा ढाले यांनी ‘शिवाजी पार्क’वर चातुर्वण्र्य समर्थकांना खुले आव्हान देत भगवद्गीतेचे केलेले दहन यांसारख्या कृत्यांमुळे ‘पँथर काहीही करू शकतात’, असे मानले जाऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर गटातटांत विखुरलेल्या, गलितगात्र झालेल्या आंबेडकरी चळवळीला विचारांची ऊर्जा देत तिला सतेज करून पुन्हा रणसंग्रामात आणण्याचे श्रेय ढाले यांचे. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीवर आजपर्यंत राजा ढाले यांचाच वैचारिक प्रभाव राहिला. पुढे आंबेडकरवाद व मार्क्सवाद या वादातून ढाले-ढसाळ यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि दलित पँथर दुभंगली. पण ‘मास मूव्हमेंट’ या संघटनेची निर्मिती करून ढाले साहित्य व सामाजिक चळवळीत कार्यरत राहिले. डॉ. आंबेडकर यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’वर बंदी घालण्याची मागणी झाली त्या वेळेस प्रतिकारार्थ दलित तरुण रस्त्यावर उतरले. मात्र पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा खरा वैचारिक परामर्ष घेतला तो राजा ढाले यांनीच. त्या ऐतिहासिक लढय़ाचे वैचारिक नेतृत्व ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या या अशा झगझगीत तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.
पण ढाले यांना राजकारणात रस नव्हता. चळवळीच्या नावाने राजकारण करीत काही नेते कसे आणि कोणाचे दास होतात वा कोणाच्या अंगणात प्रकाश पाडतात, हे महाराष्ट्राने पाहिले वा पाहत आहे. पण ढाले त्या वाटेने गेले नाहीत. काही काळ ते रिपब्लिकन राजकारणात सक्रिय राहिले खरे. दोन वेळा त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढविली. पण त्यांचा तो पिंडच नव्हता. ते त्यांचे क्षेत्रही नव्हे. याचे कारण त्या क्षेत्रातील धुरंधरांना कायमस्वरूपी बंडखोर परवडत नाहीत. बंडोबा लवकरात लवकर थंडोबा होऊन प्रस्थापित कधी होतील, असेच सर्वाचे प्रयत्न असतात. ढाले यांच्याबाबत ते कधीही यशस्वी झाले नाहीत. त्यामुळेच ते वयाच्या ७९ व्या वर्षीही फुले-आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहिले. स्वत:चे बौद्धिक साम्राज्य आणि त्याच्याशी अव्यभिचारी प्रामाणिकपणा यामुळे बंडखोर असूनही ढाले राजासारखे जगले. शेवटपर्यंत बंडखोरच राहिलेल्या या राजास लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली.