कमला हॅरिस यांचा हा आजवरचा प्रवास हे अमेरिकी व्यवस्थेचे यश आहे. पण आज त्या व्यवस्थेत आणि जगभरही सहिष्णुता, सहअस्तित्व यांची वीण उसवली जात आहे..

अमेरिका केवळ गोऱ्यांची नाही, तिचा विकास केवळ गोऱ्यांमुळे झालेला नाही. स्थलांतरितांनीच वसवलेला हा देश, तेव्हा मूळचे कोण नि उपरे कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. तरी तो तसा निर्माण केला जातो..

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

भारतीय-आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन कमला देवी हॅरिस यांना अमेरिकेत डेमोकॅट्रिक पक्षातर्फे उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळते यात लिंगभावात्मक आणि वांशिक-वर्णीय नवलाई वाटते तितकी अपवादात्मक नाही. बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे पहिले गौरेतर, मिश्रवर्णी अध्यक्ष बनले ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या छत्राखालीच. शिवाय हिलरी क्लिंटन या गत अध्यक्षीय निवडणुकीत पहिल्या महिला उमेदवार होत्या आणि पहिल्या महिला अमेरिकी अध्यक्ष बनण्याच्या समीप होत्या. त्याही डेमोक्रॅटिक पक्षाच्याच. अमेरिकेत गत काही दशके पुरोगामी, मध्यम-डाव्या विचारांचा पगडा डेमोक्रॅटिक पक्षावर वाढलेला दिसतो. त्यातूनच अध्यक्षीय उमेदवारासंदर्भात गौरवर्णीय आणि अँग्लो-सॅक्सनवंशीय चौकटीपलीकडे पाहण्याचे या पक्षाच्या नेतृत्वाचे प्रयत्न सूचित होतात. सलग चौथ्या निवडणुकीत गौरेतर किंवा महिलेची आणि आता तर उपाध्यक्षपदासाठी गौरेतर महिलेची निवड या पक्षाने केलेली आहे. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीकडे या परिप्रेक्ष्यापलीकडे जाऊन पाहावे लागेल.

अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी कमला यांना केवळ ‘निवडणूक साथी’ (रनिंग मेट) म्हणून निवडलेले नाही. ७७ वर्षांचे बायडेन २०२४ मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे ५५ वर्षांच्या कमला हॅरिस यांना त्यांनी निवडणूक साथीच नव्हे, अप्रत्यक्षपणे उत्तराधिकारी म्हणूनही घोषित केले आहे. कारण ते स्वत:ला ‘संक्रमण उमेदवार’ मानतात. अमेरिकी आणि जागतिक राजकारणाला ही घटना खऱ्या अर्थाने कलाटणी देणारी ठरू शकते. कारण या निमित्ताने आधुनिक अमेरिकेचा अविभाज्य भाग असूनही उपेक्षेविरोधात आजही झगडणारा आफ्रिकी-अमेरिकन समाज आणि भारतीयांसारखे नवस्थलांतरित यांना अमेरिकी राजकारणात निर्णायक भूमिका बजावण्याची संधी प्रथमच मिळणार आहे. कमला या दोन प्रभावशाली गटांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची आई तमिळ, तर वडील जमैकन. डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ममग्न, स्थलांतरित-विरोधी, गौरेतरांविषयी असहिष्णू अमेरिकीवादाचा चुकीचा पायंडा त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत आणि नंतरच्या चार वर्षांत पाडला होता. या प्रतिगामित्वाला टक्कर देऊ शकेल अशा डेमोक्रॅटिक पक्षाच्या या बायडेन-हॅरिस यांच्या पुरोगामित्वास यश आले तर ती जगभरच्या पुरोगाम्यांसाठी संजीवनी ठरेल. म्हणून कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे महत्त्व.

‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही कृष्णवर्णीयांची संतापी आक्रोश चळवळ प्रामुख्याने अमेरिकेत आणि काही प्रमाणात अमेरिकेबाहेर सक्रिय असताना कमला यांची अशा प्रकारे निवड होणे ही आशावाद आणि उत्साह वाढवणारी घटनाच. ‘झाले ते पुरे झाले. आता येथून पुढे निव्वळ सहन करत बसणे नाही..’ असा नारा देत अमेरिकेत मोठय़ा संख्येने आफ्रिकन अमेरिकन महिला रस्त्यांवर उतरल्या. त्या पाठिंब्यासाठी पुरुष किंवा गोऱ्यांची वाट पाहात बसल्या नाहीत. या चळवळ्या आफ्रिकी वंशाच्या महिलांसाठी कमला हॅरिस या ‘ट्रम्पवादाची चौकट’ उधळून लावू शकतील असे शक्तिशाली प्रतीक ठरतात. कमला हॅरिस यांच्याविषयी भारतीयांना ममत्व असले, तरी त्यांनी कॅलिफोर्निया राज्यात सार्वजनिक जीवनात वावरताना स्वत:ला ‘आफ्रिकन-अमेरिकन’ म्हणवून घेणेच अधिक पसंत केले हे महत्त्वाचे. त्यामुळे उगाच त्यांच्याभोवती भारतीयत्वाचा पिंगा घालणे बावळटपणाचे ठरेल. शिवाय वंशाने भारतीय म्हणून कौतुक करणाऱ्यांचा कमला यांची काश्मीरबाबतची मते ऐकल्यास हिरमोड होण्याचाच धोका अधिक. सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी, मग कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल, नंतर चार वर्षे कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रॅटिक सिनेटर ही त्यांची राजकीय वाटचाल. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्या सुरुवातीला सरकारी वकील होत्या. त्यामुळे त्यांच्या युक्तिवादामध्ये वकिली नेमकेपणा आणि आत्मविश्वास असतो. अमेरिकेच्या राजकारणामध्ये समोरासमोर युक्तिवादाची परंपरा मोठी. त्यामुळे संवादात भाग घ्यावा लागतो. ‘आत्म्याचा आवाज’ वा ‘मन की बात’ यांना तेथे थारा नाही. त्या महत्त्वाकांक्षी आहेत आणि गेल्या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडफेऱ्यांमध्ये (प्रायमरीज) त्यांनी थेट बायडेन यांच्यावरही शरसंधान केले होते. यानंतरच्या काळात कमला हॅरिस यांच्या प्रचाराची धार कमी होत गेली. त्यांना कडवी डावी विचारसरणी पसंत नव्हती आणि मध्यममार्गी योजना त्यांच्या हाताशी नव्हत्या. नेमक्या भूमिकेबाबतचा हा गोंधळ डेमोक्रॅटिक मतदारांनी हेरला आणि कमलांची उमेदवारी मागे पडू लागली. त्यांच्या तुलनेत अधिक डाव्या मानल्या गेलेल्या एलिझाबेथ वॉरन काही आठवडे टिकून राहिल्या. परंतु कमला या प्रायमरींमध्ये प्रभाव पाडू शकल्या नाहीत, तरी त्यांचे महत्त्व बायडेन आणि माजी अध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे सल्लागार बराक ओबामा, तसेच आणखी एक प्रभावी नेत्या हिलरी क्लिंटन यांनी ओळखले होते.

आफ्रिकन-अमेरिकन आणि तरुण मतदार हा डेमोक्रॅटिक पक्षाचा सर्वात मोठा आधार. पण सातत्याने पाठिंबा मिळूनही डेमोक्रॅटिक पक्षाने आमच्यासाठी म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही, अशी तक्रार अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. २०१६च्या निवडणुकीत कृष्णवर्णीय आणि युवा मतदारांची उदासीनता ट्रम्प यांच्या पथ्यावर पडली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर यंदा बायडेन यांच्या बरोबरीने आफ्रिकनवंशीय, महिला आणि ऊर्जावंत हे तिन्ही निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी देणे डेमोक्रॅटिक पक्षासाठी आवश्यक आणि राजकीयदृष्टय़ा शहाणपणाचे होते. त्यातूनच कमला हॅरिस यांची निवड झाली. बायडेन निवडून आल्यास (नोव्हेंबरमध्ये ते ७८ वर्षांचे होतील) ते अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष बनतील. त्यांच्या बरोबरीने धारदार आणि आक्रमक प्रचार करण्यासाठी कमला हॅरिस याच योग्य आहेत असे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला वाटते.

कमला हॅरिस यांचा हा आजवरचा प्रवास हे अमेरिकी व्यवस्थेचे यश आहे. पण आज त्या व्यवस्थेतच आणि जगभरही सहिष्णुता, सहअस्तित्व आणि साहचर्य यांची वीण उसवली जात आहे. अमेरिकेत पहिला आफ्रिकी गुलाम येऊन ४०० वर्षे उलटली. आफ्रिकी वंशाच्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळून १०० वर्षे लोटली. तरीही आज ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ उद्भवू आणि उफाळू शकते, कारण द्वेषमूलक, संकुचित आणि अभिजनकारी राजकारण हे नवे चलनी नाणे ठरू लागले आहे. असे राजकारण करणारे सत्तेवर येत आहेत आणि टिकूनही राहात आहेत. मूलभूत मुद्दय़ांकडून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी अस्मिताधारित राजकारण (आयडेंटिटी पॉलिटिक्स) हा हुकमी एक्का ठरू लागला आहे. या विचारसरणीला छेद देणे, आव्हान देणे आवश्यक होते. अमेरिका केवळ गोऱ्यांची नाही, तिचा विकास केवळ गोऱ्यांमुळे झालेला नाही. स्थलांतरितांनीच वसवलेला हा देश, तेव्हा मूळचे कोण नि उपरे कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. तरी तो तसा निर्माण केला जातो. वर्णवाद, वंशवाद आणि काही ठिकाणी धर्म कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, तेव्हा तो मागील दाराने निवडणूक प्रचारात किंवा समाजमाध्यमांसारख्या इतर व्यासपीठांवर उकरून काढला जातो. अनेकांसाठी ही विचारसरणी हमखास यश देणारी. पण ती ऱ्हासाकडे नेणारी आहे याचे भान त्यांना नाही आणि त्यांच्यामागे जाणाऱ्यांनाही ते नाही. तथापि अशा ऱ्हासापासून अमेरिकेला वाचवण्यासाठी बराक ओबामा, कमला हॅरिस यांच्यासारख्यांनी तेथील मूळ प्रवाहात येणे आवश्यक होते. कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली गेली यामागचा हा अर्थ आहे. तो लक्षात घेऊन त्यांची ‘आईकडून भारतीय वंशाच्या’ ही ओळख किती मिरवायची याचा विचार करावा लागेल.

Story img Loader