नुसताच अभिमान किंवा नुसताच चिवटपणा बुद्धिप्रामाण्याविना तकलादू ठरतो, याची जाण महाराष्ट्राला विसावे शतक उजाडण्याच्याही आधीच आली होती…
… चिवटपणा, अन्यायाची चीड बाळगणारा अभिमान आणि बुद्धिप्रामाण्य या वैशिष्ट्यांची अनेक उदाहरणे अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत दिसली…
महाराष्ट्र राज्य आज एकसष्ट वर्षांचे झाले. कुठल्याही राष्ट्राच्या वा प्रांताच्या वाटचालीत काळाचा हा तुकडा फार मोठा नाही हे खरे. पण अशा टप्प्यांवर तिथवरच्या वाटचालीकडे मागे वळून पाहता येते आणि पुढच्या मार्गक्रमणाची दिशाही ठरवता येते. महाराष्ट्राच्या आयुष्यातल्या या एकसष्टीच्या टप्प्यावर असे मागे वळून पाहिल्यास काय दिसते? १९६० साली आजच्या दिवशी भाषावार प्रांतरचनेत अधिष्ठित झाल्यापासून प्रगत राज्य अशीच महाराष्ट्राची ओळख आहे. औद्योगिक भरारी या राज्याने घेतलीच; पण शिक्षण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतही लक्षणीय कामगिरी महाराष्ट्राच्या प्रगतिपुस्तकात नोंदलेली आहे. आजघडीला देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नात जवळपास १४ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. विकासमापनाचा एक आधारभूत घटक म्हणजे वीजवापर, त्यातही देशात महाराष्ट्राचा वाटा जवळपास १२ टक्के आणि औद्योगिक गुंतवणुकीत देशामधील १८ टक्के मंजूर प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. यावरून या राज्याच्या भारदस्तपणाचा अंदाज यावा. तो दाखविण्यासाठी कुठल्या ‘व्हायब्रण्ट’ प्रचाराची गरज या राज्याला नाही, इतका तो दृश्यमान आहे. पण आर्थिक प्रगती ही काही महाराष्ट्राची खरी ओळख नव्हेच.
या राज्याची खरी ओळख इतकी वरवरची नाही. त्यामुळे तिचे आत्मिक स्वरूप जाणून घ्यायचे तर या राज्याच्या इतिहासात डोकवावे लागेल. नामदेव, ज्ञानेश्वर ते एकनाथ, तुकाराम आदी संतमंडळींनी घालून दिलेली वारकरी परंपरा असो किंवा चक्रधरांचा महानुभाव संप्रदाय असो; शिवछत्रपतींसारखा मध्ययुगात आधुनिकता आणणारा संवेदनशील राजा असो वा भारताची घडी बसवू पाहणारे पेशवे किंवा महादजी शिंदेंसारखे मर्दुमकी गाजवणारे मुत्सद्दी असोत; आधुनिक काळात प्रबोधनाचे वारे महाराष्ट्रीयांच्या शिडात भरणारे न्यायमूर्ती रानडे वा लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख असोत; वंचितांच्या न्याय्य हक्कांचा आवाज बुलंद करणारे महात्मा फुले वा राष्ट्रीयत्वाचा चेहरा झालेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असोत; सुधारकी विवेक सांगणारे गोपाळ गणेश आगरकर वा संस्थानी बडेजाव टाळणारे लोककल्याणकारी शाहू महाराज वा या देशाची राज्यघटना लिहिणारे विद्वत्तेचे मेरुमणी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असोत… अशा अनेकांच्या कार्याने या राज्याचे आत्मिक स्वरूप भारलेले आहे. त्याची जाण होती म्हणूनच, भाषावार प्रांतरचनेत आपल्यावर झालेला अन्याय पाहून मराठीजनांनी ‘संयुक्त महाराष्ट्रा’चा लढा उभारला आणि हे राज्य मिळवले. महाराष्ट्रीय म्हणजे ‘अहिमाण (अभिमानी)’, ‘दिण्णले- गहिल्ले (दिले-घेतले)’ करणारे असे वर्णन आठव्या शतकात उद्योतनसुरीने करून ठेवले होते, त्याचा प्रत्यय या पाच-सहा वर्षे चिकाटीने लढलेल्या लढ्यातून महाराष्ट्राने देशाला दिला.
महाराष्ट्राचा स्वभाव हा असा अभिमानी. पण तो पोकळ नाही. त्याची अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यातला पहिला गुण म्हणजे अन्यायाविरुद्धची चीड. म्हणूनच अन्याय होत असेल तर त्याविरोधात परिणामांची पर्वा न करता उभे राहण्यासही महाराष्ट्रीय कधी डगमगला नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील. अगदी औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या बाणेदारपणापर्यंत मागे जाता येईल. पण इथे आधुनिक इतिहासातील दोन उदाहरणे देणे उचित ठरेल. पहिले उदाहरण चिंतामणराव द्वारकानाथ अर्थात सी. डी. देशमुखांचे. संयुक्त महाराष्ट्राऐवजी त्रिराज्य योजना महाराष्ट्राच्या माथी मारली जाते आहे, हे पाहून पंतप्रधान नेहरूंच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्रिपदाचा राजीनामा सी.डीं.नी दिलाच; पण महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाबद्दल नेहरूंना खडे बोल सुनावण्यासही ते कचरले नाहीत. दुसरे उदाहरण त्याही आधीचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे. कायदेमंत्री असणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी कष्टाने आकारास आणलेल्या हिंदू कोड बिलाबाबत धसमुसळेपणा होताना पाहून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. वर्तमानात असा नि:स्वार्थी सडेतोडपणा दाखविण्याचे धाडस किती जण करू धजतील?
महाराष्ट्रीय मातीचा दुसरा गुण म्हणजे चिवटपणा. कितीही प्रतिकूल स्थितीत खचून न जाता मार्ग काढण्याचा या राज्याचा स्थायीभाव आहे. तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्रीयांनी दाखवलाच; पण आजच्या करोनासंकटातही तो दिसतो आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत या साथीत महाराष्ट्रासमोर उभे राहिलेले आव्हान मोठे होते आणि आहे. पण त्याचा सामना करताना चिवटपणा हा गुण महाराष्ट्राच्या पथ्यावर पडेल, हे नक्की. गेल्या शतकातली स्पॅनिश फ्लूची साथ असो वा त्याआधीचा प्लेगचा कहर, त्या वेळी महाराष्ट्रीयांचा चिवटपणाच कामी आला, हे विसरता येणार नाहीच; पण या चिवटपणास लाभलेले करकरीत बुद्धिप्रामाण्याचे अधिष्ठानही विसरता कामा नये.
याचे कारण नुसताच अभिमान किंवा नुसताच चिवटपणा बुद्धिप्रामाण्याविना तकलादू ठरतो, याची जाण आपल्याकडे विसावे शतक उजाडण्याच्याही आधीच आली होती. पुढील काळात आधी सामाजिक की आधी राजकीय- असा किंवा कला की जीवन असा वाद भलेही आपल्याकडे रंगला होता, तरी त्यांतील दोन्ही बाजूंना बुद्धिप्रामाण्याचे वावडे नव्हते. या बुद्धिप्रामाण्यास विवेकाची कृतिशील जोड मिळाली आणि तो अधिक झळाळून उठला. ‘सुधारक’कार आगरकरांपासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे ध्येय उराशी बाळगलेल्या नरेंद्र दाभोलकरांपर्यंत ही परंपरा सांगता येईल. ती इथल्या मातीत घट्ट रुजली आहे म्हणूनच ऐन करोनाकाळात आलेल्या दोन वाऱ्या फारशी खळखळ न करता इथल्या वारकरी संप्रदायाने रद्द केल्या. कुंभमेळ्यासारखा प्रकार इथे घडला नाही. राज्य सरकारही वारी रद्द करण्यास फारसे कचरले नाही, याचे कारणदेखील वरील विवेकी परंपरेचे भान.
ते महाराष्ट्रात आहे याचे कारण आधुनिकता. ब्रिटिशांच्या आगमनाने इथे दोन शतकांपूर्वी नवशिक्षणाचा ओनामा झाला. अनेकानेक विद्याशाखांचा परिचय होऊन जीवन जगण्याची नवी रीतच इथल्या मातीत रुजली. प्रबोधनाचे पर्व बंगालसह महाराष्ट्रातच सुरू झाले. त्यामुळे राजकारण असो वा समाजकारण वा अर्थकारण, विज्ञान असो वा गणित वा कला; जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील आधुनिक काळातला देशातला नवा प्रवाह महाराष्ट्रातच उदयाला आला. त्या त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करायचे आणि ते करताना देशाचा विचार अग्रस्थानी ठेवायचा, हे व्रत महाराष्ट्रीयांनी कायम पाळले. म्हणून देशाला दिशादर्शक ठराव्यात अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रातच प्रथम झाल्या. उदाहरणार्थ, रोजगार हमी योजना. तिचे राष्ट्रीय स्वरूप म्हणजे मनरेगा. जिच्यावर टीका करत विद्यमान केंद्रीय धुरीण सत्तेवर आले खरे, परंतु आजही तीच योजना स्थलांतरित मजुरांच्या पथ्यावर पडत आहे. पण असे नवे देऊन त्याबद्दल न मिरवता महाराष्ट्र आणखी नवे काही करण्यात कायम मग्न राहिला. हे सारे घडले ते महाराष्ट्राने आधुनिक विचार स्वीकारला म्हणून. त्या आधुनिक विचारात नागरी समाज म्हणून राहायचे व्रत अंतर्भूत आहे. त्यासाठी सांविधानिक आणि मानवी मूल्यांची चाड आहे. ती मूल्ये पायदळी तुडवली जात असतील तर त्यांच्या रक्षणार्थ उभे राहण्याची आच आहे. समर्थ रामदासांपासून ते राजारामशास्त्री भागवतांपर्यंत अनेकांनी सांगितलेला ‘महाराष्ट्रधर्म’ तो हाच. हा ‘महाराष्ट्रधर्म’ वाढवण्याची जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीयावर आहे, याचे स्मरण आजच्या एकसष्टीला व्हावे इतकेच.