बहुविध विषय, आशय, सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार लीलया हाताळूनही मतकरींना जे मानसन्मान मिळायला हवे होते ते मिळाले नाहीत..

maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
sharad pawar ajit pawar (4)
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
maharastra vidhan sabha election 2024 jitendra awhad vs najeeb mulla in mumbra kalwa constituency
Maharashtra Assembly Election 2024 : जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे नजीब मुल्लांसमोर आव्हान
vidhan sabha election 2024, Mira Bhayandar,
मुख्यमंत्र्यांची साथ आमदार गीता जैन यांना ठरली मारक ?
waris pathan Bhiwandi, vidhan sabha election 2024 Bhiwandi, Bhiwandi, Congress Bhiwandi,
एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

सामाजिक बांधिलकीची म्हणून एक किंमत द्यावी लागते. ती मतकरींनी मोजली. म्हणूनच इतके मोठे नाटय़कर्तृत्व गाठीशी असूनही ते नाटय़संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ शकले नाहीत..

लता मंगेशकर असताना सुमन कल्याणपूर असणे वा बिशनसिंग बेदी असताना पद्माकर शिवलकर असणे हे सतत कसोटी पाहणारे असते. रत्नाकर मतकरी यांच्यासाठी ही कसोटी दुहेरी होती. एका बाजूला पारंपरिक, प्रस्थापित नाटय़जाणिवांना खुलवणारे वसंत कानेटकर आणि दुसऱ्या बाजूला विजय तेंडुलकर हे प्रस्थापितविरोधी आविष्काराचे कलाकेंद्र बहरात असताना मतकरी यांनी आपली स्वत:ची रंगमुद्रा निर्माण केली. ही साहित्य विश्वातील खूप मोठी बाब.

मतकरी चांगल्या अर्थाने व्यावसायिक लेखक होते. दररोज बैठक मारून ते लेखन करीत. वयाच्या १७व्या वर्षांपासून ते आजपर्यंत तब्बल ६४-६५ वर्षे सतत लेखन करणे हे ‘आतमध्ये’ मजकूर असल्याखेरीज आणि तो सांगण्याची आच असल्याखेरीज जमणे अशक्य. मतकरींना ते जमले. १९५५ साली आकाशवाणीसाठी त्यांनी ‘वेडी माणसं’ ही श्रुतिका लिहिली तेव्हा मतकरी अवघे १७ वर्षांचे होते. त्या वेळी आकाशवाणीसाठी अनेक मातबर लिहीत आणि लोक ते चवीने ऐकत, ही बाब लक्षात घेतल्यास त्यांच्या या यशाचे महत्त्व कळेल. पुढे भारतीय विद्या भवनच्या एकांकिका स्पर्धासाठी विजय तेंडुलकर आणि मतकरी प्रथमत: लिहिते झाले. त्यांची पहिली एकांकिका ‘शर्वरी’ ही तेंडुलकरांच्या संपादनाखालील ‘वसुधा’ मासिकात प्रथम प्रसिद्ध झाली. त्याबद्दलची कृतज्ञता त्यांनी ‘अस्वस्थ रात्र आणि इतर एकांकिका’ हा संग्रह तेंडुलकरांना अर्पण करून व्यक्त केली आहे. तेंडुलकर हे मतकरींचे समकालीन. गंमत म्हणजे दोघांनीही विविध विषयांवरची नाटके विविध रूपांत लिहिली. दोघेही उत्तम नाटककार म्हणून सुविख्यात झाले. तरीही त्यांच्यात एक सुप्त स्पर्धा होती. तेंडुलकरांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या प्रचंड मानमान्यतेबद्दल मतकरींच्या मनात असलेली ईष्र्या त्यांच्या बोलण्यातूनही क्वचित डोकावत असे. तेंडुलकरांच्या तोडीचे- किंबहुना त्यांच्याहूनही बहुविध विषय, आशय, सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार लीलया हाताळूनही आणि सांख्यिकदृष्टय़ा तेंडुलकरांपेक्षा सुमारे दुप्पट नाटय़कर्तृत्व गाजवूनही मतकरींना जे मानसन्मान मिळायला हवे होते ते मिळाले नाहीत, याबद्दलची खंत मनाच्या एका कोपऱ्यात त्यांना नक्कीच असणार. ही मानवी जीवनातील कलात्मक अपूर्णता.

सुमारे ७० हून अधिक नाटके, २२ बालनाटय़े, असंख्य एकांकिका, २० कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह, ‘माझे रंगप्रयोग’सारखे आपल्या रंगभूमीवरील कामाचे आत्मचिंतनपर पुस्तक, वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाटय़’ व ‘सूत्रधार’ या नाटय़संस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे सर्वेसर्वा, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते.. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते. बालनाटय़ांतही ते तितकेच रमले. ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्माशिम्मा राक्षस’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ यांसारखी मुलांच्या भावविश्वाला कल्पनेचे पंख लावून त्यांच्यावर काहीएक संस्कार करणारी नाटके त्यांनी लिहिली आणि सादर केली. मुलांच्या रंगभूमीवरचे त्यांचे प्रेम कधीच आटले नाही. ‘टी-बॉक्स थिएटर’ ही संकल्पना त्यातूनच जन्माला आली आणि बालनाटय़ चळवळ गरीब-वस्त्यांपर्यंत गेली.

लेखनासाठी त्यांना कोणतेही विषय वर्ज्य नव्हते. माणूस आणि त्याचे जगणे हा त्यांच्या नेहमीच कुतुहलाचा व जिज्ञासेचा केंद्रबिंदू राहिला. महाभारतकाळातील प्रमुख व्यक्तींच्या जीवनाचा अन्वयार्थ लावू पाहणारे ‘आरण्यक’सारखे नाटक आणि त्यात हेतुत: योजलेले काव्यात्म सादरीकरण आजही कौतुकाचा विषय आहे. ‘लोककथा’ ७८’ हे त्यांचे नाटक दलित-शोषितांच्या वंचनेला वाचा फोडणारे. ज्या काळात ते लिहिले गेले, त्या काळातला आजूबाजूचा माहोलही या वंचनेने अस्वस्थ झालेला होता. डोंबिवलीतील एका सत्य घटनेवर आधारित ‘जौळ’ ही कादंबरी आणि त्यावर आधारित ‘माझं काय चुकलं?’सारखे किंवा स्त्री-पुरुष संबंधांचा अन्वय लावणारे ‘खोल खोल पाणी’सारखे नाटक असो, अथवा मग एड्ससारख्या रोगाचा मानसिक-भावनिक आलेख चितारणारे ‘तन-मन’सारखे नाटक असो.. मतकरींनी त्या- त्या विषयाचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विषयाचे वैविध्य त्यांच्यातील कायम जिवंत लेखकाचे दर्शन घडवते. काही विषयांकडे ते खेळकर दृष्टिकोनातूनही पाहताना दिसतात. ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही!’सारखी नाटके याचा प्रत्यय देतात. तर ‘घर तिघांचं हवं’ हे नाटक ताराबाई मोडक यांच्यासारख्या बाल-शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या महनीय व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्यथावेदना चित्रित करते. इंदिरा गांधींसारख्या वादळी राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या एका विशिष्ट कालखंडाचा वेध ते ‘इंदिरा’ या नाटकात घेऊ बघतात.

माध्यमांतर हा मतकरींचा एक विशेष प्रांत. पुलंच्या ‘असा मी असामी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ यांसारख्या कथात्म लेखनाचे उत्तम नाटय़रूपांतर करण्यात ते यशस्वी झाले. पुलंसारख्या बहुआयामी, चतुरस्र लेखकाला नव्या रूपडय़ात आणताना त्यांनी मूळ वास्तूला जराही धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी तर घेतलीच; शिवाय ते लेखन पुलंनीच केले असावे असे वाटावे इतके ते अस्सल उतरले. यास ठसठशीत अपवाद म्हणजे पुलंवरील दोन भागांतील ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट. त्याने पुलंना तर न्याय दिला नाहीच, पण मतकरींची लेखनपुण्याईही आटवली.

मतकरींनी लेखनाचे विविध प्रकार हाताळले असले, तरी त्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी त्या त्या लेखनप्रकारावर इतर लेखनप्रकाराचे कधीच कलम केले नाही. त्या त्या लेखनप्रकाराची मूलभूत तत्त्वे लक्षात घेऊन आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहत त्यांनी सर्व लेखन केले. त्यामुळेच कथा, कादंबरी, सदरलेखन असो; हे त्यांचे लेखन त्या त्या माध्यमांची निकड पूर्ण करणारे राहिले. त्यांची संमिश्र भेळ झाली नाही. अगदी एकांकिका आणि पूर्ण लांबीचे नाटक यांच्या वेगळ्या गरजा आणि वैशिष्टय़े यांचीही त्यांनी कधी गल्लत केली नाही. गूढकथा हा प्रकार त्यांनी मराठीत रुजवायचा प्रयत्न केला. परंतु तो कथाकथनाच्या कार्यक्रमांपलीकडे वाचकांत रुजला नाही. मराठी वाचकांची त्याप्रति असलेली अनास्था याला कारण असावी. याच्या जोडीला मतकरी हे तीव्र सामाजिक भान असलेले लेखक होते ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी अशी. तेंडुलकर आदी लेखकांनंतर मराठी साहित्यविश्वात जी एक सार्वत्रिक शांतता नांदू लागली, तिचा अत्यंत हवाहवासा भंग मतकरी यांनी केला. ते मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाओ आंदोलनात सक्रिय होते. त्याचप्रमाणे ‘निर्भय बनो’ आंदोलनाचेही ते एक आघाडीचे कार्यकर्ते होते. तीव्र सामाजिक व राजकीय विषयांवरील आपली परखड मते व्यक्त करताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. लेखन आणि हे सामाजिक कार्य यांचा संगम पुढे ‘गांधी : अंतिम पर्व’ या नाटकात झालेला दिसतो.

अशा बांधिलकीची म्हणून एक किंमत द्यावी लागते. ती मतकरींनी मोजली. म्हणूनच इतके मोठे नाटय़कर्तृत्व गाठीशी असूनही ते नाटय़संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ शकले नाहीत. साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना खूप उशिरा- म्हणजे तब्बल पंचाहत्तरीत मिळाला. सतत कार्यरत असणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचे लेखन-वाचन-चिंतन-मनन कायम होते. ‘लोकसत्ता’च्या अनेक कार्यक्रमांना ते पत्नी प्रतिभा यांच्यासह आवर्जून येत आणि विविध प्रासंगिक विषयांवर आनंदाने लिहीत.

मतकरींचे ‘लोककथा’ ७८’ हे जातव्यवस्थेवर भाष्य करते. त्यानंतरच्या ४२ वर्षांत सामाजिक भेदव्यवस्था बदलत गेली. तिला धर्माचा आणि अर्थाचाही आधार मिळाला. सध्या करोना विषाणूच्या सुन्न करणाऱ्या वास्तवातून हीच नवी जातव्यवस्था उठून दिसते. श्रीमंतांनी विमानातून आणलेला विषाणू उपाशीपोटी मायगावी निघालेल्या शेकडो अभागींना रस्त्यात चिरडत असतो, तेव्हा २०२० सालची लोककथाच लिहिली जात असते. या लोककथेत मूळच्या ‘लोककथा’लेखकाचे मिसळून जाणे ही काव्यात्म शोकांतिका. तिच्या या नायकास ‘लोकसत्ता’ची आदरांजली.