वर्णनच असे काही करायचे की भाष्याची गरजच वाटू नये, अशा शैलीत लिहिणारे अनिल अवचट यांनी समाजकार्याइतकेच छंदांनाही महत्त्वाचे मानले… 

विचारधारा ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, प्रत्यक्ष जग नाही, हे कळण्याचे भान संबंधितांस होते, अशा काळात सहेतुकता आणि भावना यांना न्याय देणारी ही शैली घडली…

साने गुरुजींनी महाराष्ट्रात ‘धडपडणारी मुले’ घडवली. त्यातून घडलेल्या, कप्पेकरण व्हायच्या आधी समग्र देश आपला मानणाऱ्या, विचारधारा ही अडचण आणि अडवणूक नाही असे मानत जगणाऱ्या मोजक्यांतील एक डॉ. अनिल अवचट गुरुवारी निवर्तले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने किंवा मराठी संस्कृतीने नक्की काय गमावले याची मांडणी यानिमित्ताने करणे अगत्याचे. याचे कारण आयुष्याला अनेक अंगांनी भिडता येते आणि प्रत्येक भिडणे तितकेच उत्कट असू शकते याचा चालता-बोलता दाखला डॉ. अवचटांच्या निधनाने कायमचा अंतर्धान पावला. त्या काळाची उजळणी हीदेखील आजच्या तरुणांसाठी स्वप्नवत आणि तितकीच प्रेरणादायी ठरावी.

मुळात अवचट हे वैद्यकीचे विद्यार्थी. अशा काळात ते आले होते की जेथे डॉक्टर वा अभियंता होणे आणि अमेरिका गाठणे म्हणजे निर्वाण असे मानले जाऊ लागले होते. पण तरीही वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला तरी आपल्याला अन्य अनेक विषयांत रुची आहे हे मानण्याचे आणि त्या त्या विषयांची चव घेण्याचे औद्धत्य विद्यार्थी दाखवत. अरुण लिमये, जब्बार पटेल, आनंद नाडकर्णी, अनिल अवचट हे सर्व म्हटले तर शरीराचे ‘डॉ.’. श्रीराम लागूही असे ‘डॉ.’च. पण त्या सर्वांना ज्येष्ठ. या सर्वांना शरीरापेक्षा मनोव्यापारात रस अधिक. म्हणून मग कोणी रंगभूमी अनुभवण्यास गेला, कोणी चित्रकला, कोणी चित्रपट असे बरेच काही. अनिल अवचट यातलेच आणि या सगळ्यातले वेगळेही. कारण त्यांना संगीत, हस्तकला यापासून ते भटकंती आणि वृत्तांतलेखन असे सर्वच करायचे होते. ते त्यांनी केलेही. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर होत असतानाही आपल्याला नेमके काय करायचे आहे, याची पूर्ण जाणीव त्यांना झाली होती. म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू असताना आपण वैद्यकी व्यवसाय करणार नाही, अशी कुणकुण त्यांच्या डॉक्टर वडिलांना लागली. तेव्हा त्यांनी विचारताच, ‘‘मला सामाजिक काम करायचं आहे, तेही कायम तेच करीन असं नाही. जेव्हा वाटेल, की मला यात रस वाटत नाही, तेव्हा सोडून देईन,’’ असे सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्या पालकांत होती. करिअर म्हणजे एखाद्या अभ्यासक्रमाचे जू आपल्या मानेवर अडकवून घेणे नाही, असे मानले जाण्याचा मनाने मोकळा असा तो समंजस काळ.

‘डावे’, ‘उजवे’, ‘मधले’ असे विचारधारांच्या क्षेत्रातले प्रवाह तेव्हाही होते. पण विचारधारा ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, प्रत्यक्ष जग नाही, हे कळण्याचे भान संबंधितांस होते. तसे पाहू गेल्यास श्री ग माजगावकर यांचे ‘माणूस’ हे साप्ताहिक काही विचाराने समाजवादी नव्हते. पण तरीही स्वत:स समाजवादी विचारांशी जोडून घेणाऱ्या आणि एरवी ‘साधना’त लिहिणाऱ्या तरुण अवचट यांना त्यांनी बिहारातील ‘पूर्णिया’त धाडले आणि अनिल अवचटांच्या वेगळ्याच रिपोर्ताज शैलीने मराठी मध्यमवर्गासमोर एक निराळे जगच उलगडत गेले. त्या अनुभवातून मराठीस एक नवा लेखक आणि नवी शैली मिळाली.  नंतरच्या ‘माणसे’पासून त्यांची ही शैली अंग धरत गेली. नाट्यसृष्टीत विजय तेंडुलकरांच्या शैलीने जसे अनेकांना घडवले तसे गद्य लेखनात अवचटांची शैली हा नवा मापदंड ठरला. भाष्य काही करायचे नाही. पण वर्णनच असे काही करायचे की भाष्याची गरजच वाटू नये. अशा शैलीतील त्यांची पहिली काही पुस्तके हे आज मराठीतील ‘अत्यावश्यक वाचन’ ठरलेली आहेत. गर्दुल्ले, पुण्यातील देवळे आणि त्यातील दांभिकांची गर्दी किंवा तरुणीस संन्यास देताना जैन धर्मातील प्रथा यांचे अंगावर शहारे येईल असे केवळ थेट वर्णन हे त्यावरच्या टीकेपेक्षाही टोकदार होते. ही नवी अवचटी शैली. गोष्टीवेल्हाळ. प्रत्येक बारीकसारीक तपशील टिपणारी. मुक्त पत्रकार म्हणून सारा देश पालथा घालून समाजजीवन जाणून घेण्याच्या हव्यासातून त्यांनी केलेले लेखन पत्रकारितेच्या अन्य लेखनप्रकारापेक्षा वेगळ्या धाटणीचे आहे. त्यांना जगण्याशी संबंधित सगळ्याच गोष्टींमध्ये कमालीचा रस होता. त्यामुळे ते केवळ वाचनीय राहात नाही. वाचकाला अंतर्मुख व्हायला लावते. पत्रकाराकडे उपजत असलेले कुतूहल त्यांच्यामध्ये ठासून भरलेले होते. मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या या प्रकारच्या लेखनाने एका पायवाटेचा प्रशस्त मार्ग झाला आणि त्यांच्या संवादी शैलीमुळे त्या लेखनाला वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

समाजसुधारणेच्या विचारात अडकलेली व्यक्ती जगण्याच्या अन्य मनोरंजनी अंगांकडे एक प्रकारच्या तुच्छतेने बघते आणि कंटाळवाणी होते. अवचट यांचे तसे झाले नाही. सभासमारंभात व्यासपीठावर बसून इतरांची भाषणे ऐकता ऐकता हातातील छोट्या कागदातून ओरिगामी कलाकृती साकारण्यात त्यांना मौज वाटे. एखाद्या मैफलीत बसून गाणे ऐकताना किंवा कुणाशी गप्पा मारतानाही, त्यांचा हा कलेचा तंबोरा अव्याहतपणे निनादत राही.  ते बासरी वाजवत आणि कागदाच्या ‘ओरिगामी’ या हस्तकला विषयातही त्यांस गती होती.  अनिल यांच्या शब्दमांडणीच्या शैलीतून चित्र दिसे तर त्यांचे बंधू सुभाष यांच्या चित्रांस पाहून शब्दकथा स्रावतात. हे दोघे अवचट बंधू ‘लोकसत्ता’ परिवाराचे अविभाज्य घटक. अगदी अलीकडे मुलांसाठीच्या ओरिगामी सादरीकरणात आणि सामाजिक ‘सर्वकार्येषु’ उपक्रमात अनिल यांस प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहभागी होता आले नाही. त्याच वेळी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाली. ती दुर्दैवाने खरी ठरली. हवे ते हवे तसे करता यायला हवे, म्हणून एकाच वेळी सगळे करता येण्याएवढी ऊर्जा अवचटांपाशी होती, म्हणूनच, ते लेखन, वादन, सामाजिक चळवळी, समाजकार्य अशा अनेक पातळ्यांवर काम करीत राहिले.

याचबरोबरीने व्यसनमुक्तीचाही त्यांचा ध्यास कौतुकास्पद असा. व्यसनमुक्तीसाठी केंद्र सुरू करण्याची कल्पना साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांनी उचलून धरली आणि त्यातूनच ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झाली. त्यानंतरचे अनिल हे पूर्णवेळ या कामात गढून गेले. हे केंद्र हाच त्यांचा ध्यास आणि श्वास राहिला. त्यात त्यांच्या पत्नी डॉ. सुनंदा यांचा वाटा फारच मोठा. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात, सुनंदा अवचटांचा मदतनीस म्हणून सुरू झालेले काम अनिल यांनी नंतर पूर्णत्वाने अंगीकारले आणि त्यासाठी स्वत:ला झोकून देत आपल्या जगण्याची वाट आखून घेतली. डॉ. सुनंदा या मनोरुग्णालयात अधीक्षक होत्या. व्यसनमुक्तीच्या कामातील सगळी आखणी त्यांची. संस्थात्मक उभारणी करून तिथे येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचे नवे साधन मिळवून देण्यासाठी हर प्रयत्न करायचे, यासाठी सुनंदा यांनी घेतलेले कष्ट अपार होते. अनिल यांचा त्यातील वाटाही तेवढाच महत्त्वाचा. समोरच्याशी सहज संवाद साधण्याची त्यांची हातोटी या वेळी अधिक उपयोगी पडली असावी.  समाजातल्या सगळ्या स्तरांतील दु:ख, दैन्य, करुणा समाजासमोर मांडताना, त्याचे भांडवल न करता, त्याच्या तीव्रतेची झळ पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न विधायक होता. आपल्यासह समाजाला सामाजिक संवेदनांशी जोडून घेता यावे, त्यांना त्याची जाणीव व्हावी आणि त्यातून नव्या कामाची उभारणी व्हावी, हा त्यांचा लेखनामागील हेतू. तो त्यांना मिळालेल्या वाचकप्रियतेमुळे काही अंशी सफल होतो. लेखन सहेतुक असले, तरी त्यामागील त्यांच्या भावना अधिक महत्त्वाच्या ठरल्या. मस्त अनवट वृत्तीलाही सामाजिक आशय असतो आणि जगण्याचा प्रत्येक क्षण त्यासाठी वेचता येतो, याचे डॉ. अनिल अवचट हे उदाहरण ठरले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.