काही गोष्टींचे सातत्य राखण्याचे आणि काही गोष्टी काळानुसार बदलण्याचे समाज म्हणून आपण नेहमीच भान बाळगले… दिवाळी त्याला अपवाद कशी असेल?

बदल होत राहणारच, पण पंचतत्त्वांचा गौरव करताना वेदांतील ऋचांमधून जो स्वच्छंदी सूर आहे, तोच आजही प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आहे…

22.91 lakh vehicles sold in January says FADA report
जानेवारीमध्ये २२.९१ लाख वाहनांची विक्री – फाडा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
Thieves stole gold ornaments from a safe in a bungalow in Loni Kalbhor area Pune news
पुणे: पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला- लोणी काळभाेरमघील घटना
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

सूर्योदयाच्या आत अभ्यंगस्नान न झाल्यास नरकात जावे लागेल या काल्पनिक भीतीपोटी सर्वांस स्वहस्ते उटणे लावून फटफटायच्या आत आंघोळ घालणाऱ्या आजीच्या आंघोळीचे काय, हा प्रश्न तेव्हा पडायचा नाही. घरातल्यांच्या आवडीनिवडीनुसार फराळाचे पदार्थ करण्यासाठी कष्टणाऱ्या घराघरातल्या आज्या, आया, काकू वा मावश्या यांना काय आवडते हे कधी विचारले गेल्याचे आठवत नाही. पाडव्यास नवऱ्याकडून आणि भाऊबीजेस भावाकडून जे काही ओवाळणीत पडेल त्यातच त्यांनी समाधान मानले. काळाच्या ओघात स्त्रिया कमावू लागल्या. खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मीपूजन’ सुरू झाले आणि आज घराघरातला हा महिला वर्ग पुरुषांच्या बरोबरीने, निदान शहरांत तरी, दिवाळी पहाट घराबाहेर साजरा करू लागला. आताशा नरकाची भीती कमी झाली की स्वर्ग अनाकर्षक झाला हे माहीत नाही पण दिवाळी सणांत स्त्रियांस उसंत मिळू लागली. कारणे काहीही असोत. जे झाले ते स्वागतार्हच. त्यामुळेच एकेकाळी आईच्याच हातचा फराळ कसा चविष्ट असतो असे सांगणारा ‘मोरू’ आता दिवाळीच्या पहिल्या आंघोळीनंतर नोकरी करणाऱ्या बायकोने मागवलेला तयार फराळ विनातक्रार खाऊ लागला आहे. किंबहुना दिवाळीत फराळ तयार करून तो एतद्देशीय आणि परदेशी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे हा मोठाच गृहउद्योग गेल्या काही वर्षांमध्ये विकसित होत गेला आहे. या कामाचे कौशल्य असणाऱ्या कित्येक स्त्रियांना त्यामुळे रोजगार मिळतो आहे. ४०-५० वर्षांपूर्वी दिवाळी आली की घरोघरी होणाऱ्या स्वच्छता मोहिमा आजही होतात; पण शहरांमध्ये तरी घरातली लक्ष्मी पदर खोचून हातात झाडू घेऊन साफसफाईला उभी राहात नाही; तर ‘डीप क्लीनिंग’ करणाऱ्या कंपन्यांना आधीपासून बुक करून घरसफाईचे कंत्राट दिले जाते. दिवाळीचे चार दिवस दारात पणती लावायची आहे, तेव्हा कुणी कुठे जायचे नाही हा आग्रह विरत जाऊन त्या सलग मिळणाऱ्या सुट्ट्यांचा विनियोग बाहेर फिरायला जायला किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन चार दिवस आराम करण्यासाठी होऊ लागला आहे.

फुललेल्या बाजारपेठा आणि अमाप उत्साह घेऊन आलेल्या यंदाच्या दिवाळीने एखाद्या गोष्टीचा अभावच तिचे महत्त्व जाणवून देतो याची जणू काही साक्ष दिली आहे. संदर्भ आहे करोनाकाजळीने काळवंडलेल्या मागील वर्षीच्या दिवाळीचा. महासाथीत आलेल्या त्या दिवाळीत घराबाहेर पडण्यावर, फटाके वाजवण्यावर, गर्दी करण्यावर, एकमेकांना भेटण्यावर अशा सगळ्यावरच निर्बंध होते. वातावरणच असे होते की कुणालाच मनासारखी दिवाळी साजरी करता आली नाही आणि त्यामुळेच दिवाळीसारख्या सणाचे, आपल्या उत्सवप्रियतेचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले. दिवाभीतासारखे आपापल्या घरात कोंडून घेऊन बसणे याला कोण दिवाळी म्हणेल का? खरेदी, उत्साह, सजावट, आतषबाजी, दिवाळी अंक, फराळाची रेलचेल, जिवलगांना भेटणे, चार दिवस आनंदात घालवणे म्हणजे दिवाळी. मागील वर्षी ती साजरी करता आली नाही याची कसर यंदा लोकांच्या दुप्पट तिप्पट उत्साहाने भरून निघाली आहे. दिवाळीचा सणच तसा आहे. भारतीय समाजासारखा, हिंदू संस्कृतीसारखा… सर्वसमावेशक. तो संस्कृतीच्या अंगाने जातो आणि कुठल्याही धार्मिक कर्मकांडापेक्षा एकमेकांना भेटणे, चार दिवस एकत्र येणे, खाणेपिणे, आनंदाने जगणे याला जास्त प्राधान्य देतो. या चार दिवसांच्या साजरीकरणात अमुकतमुक झाले म्हणूनही कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत की अमुकतमुक झाले नाही म्हणूनही कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळी हा खराखुरा निधर्मी भारतीय सण म्हणायला हवा. सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांना जोडून घेणारा. जगण्याचा उत्सव करणारा. अंधारातून प्रकाशाकडे जा, जगणे साजरे करा, तुम्ही आनंदात जगा आणि इतरांनाही आनंद द्या हेच त्याचे सांगणे. तसेही माणसाला जगताना खरे तर आणखी काय हवे असते? सुखाच्या, आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात हे खरे असले तरी त्याच्या मुळाशी जगण्याची असोशीच तर असते. त्यातूनच तर उत्सवांची आणि जगणे साजरे करण्याच्या वेगवेगळ्या कल्पनांची निर्मिती झाली आहे.

मात्र या सणांचे सांस्कृतिक महत्त्व टिकवून ठेवताना बाजारपेठीय आणि प्रतिगामी क्लृप्त्यांना बळी न पडण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. स्त्रियांनी टिकली न लावल्यामुळे आणि मीठी जुबाँ उर्दूसारख्या भारतातच जन्मलेल्या भाषेचा वापर केल्यामुळे आभाळ कोसळावे इतकी आपली सांस्कृतिक परंपरा कधीच संकुचित नव्हती आणि नाही. यापुढेही ती संकुचित होऊ न देण्याचे कसब आपल्याला साधावे लागणार आहे. खरे तर काही गोष्टींचे सातत्य राखण्याचे आणि काही गोष्टी काळानुसार बदलण्याचे समाज म्हणून आपण नेहमीच भान बाळगले आहे. दिवाळी पहाट तर आपण एव्हाना स्वीकारलीच आहे. दिवाळीच्या काळात फटाके वाजवून हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण करण्याबरोबरच आपल्या वातावरणाचा भाग असलेल्या पशुपक्ष्यांनाही आपण त्रास देतो हा विचार शालेय पातळीपासूनच बिंबवला जाऊ लागला आहे. दिवाळी अंकांच्या परंपरेला डिजिटल आणि दृक्श्राव्य माध्यमही जोडले गेले आहे. हेही बदलच!

पन्नासेक वर्षांपूर्वी साजरी केली जात होती तशी दिवाळी आज नाही हे खरेच; पण आपण तरी कुठे ५० वर्षांपूर्वी होतो तसे आहोत? बदल हीच एकमेव चिरंतन गोष्ट असल्यामुळे व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही आपले सगळ्यांचेच जगणे ३६० अंशांत बदलले आहे. त्या बदलांचे प्रतिबिंब जसे आपल्या जगण्यात आहे तसेच आपल्या सणांमध्ये असणार. त्या काळात घरी फराळ बनवला जात असेल तर आज तो विकत आणला जातो. त्या काळात हाताने तयार केलेली शुभेच्छापत्रे पाठवली जात असतील तर आज एका सेकंदात सातासमुद्रापार जाणारा डिजिटल शुभेच्छासंदेश आहे. त्या काळी कापसाच्या वाती करून त्या तेलात भिजवून मातीच्या पणत्या लावल्या जात असतील तर आज विजेचे बटण दाबल्यावर लुकलुकणारे पणतीसदृश दिवे आहेत. पण सण साजरे करण्याचा, जगण्याचा उत्सव करण्याचा उत्साह तोच आहे. आणि हेच आपले माणूसपण आहे. गेल्या ५० वर्षांत आपण काय काय नाही बघितले? नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित कारणांमुळे निर्माण झालेली संकटे आपण झेलली, राजवटी बदलल्या, मोठे वाटावेत असे आधार निखळले. तंत्रज्ञानाने माणसाचे जगणे उलटेपालटे करून टाकले. सगळे जग एखाद्या खेड्याएवढे होईल असे म्हणता म्हणता ते हाताच्या मुठीत कधी सामावले ते कळलेदेखील नाही. आपल्या डोक्यावरचे आभाळ कुठे जाऊन पोहोचते त्याचा थांगपत्ता नसताना जगण्याच्या शोधात भारतवर्षात येऊन पोहोचलेल्या आर्यांचे वर्णन त्यांचे अभ्यासक धाडसी असे करतात. त्याच धाडसी वृत्तीने आजचा माणूस त्याच्या आजच्या जगण्यातल्या सगळ्या संकटांचा सामना करत जगण्याचा उत्सव साजरा करतो.

निसर्गातल्या पंचतत्त्वांचा गौरव करताना वेदांतील ऋचांमधून जो स्वच्छंदी सूर आहे, तोच आजचा हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आहे. त्रास, अडचणी, संकटे, आघात, नकोसे बदल, अभाव हे सगळे आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यात कालही होते, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण ते सगळे आपल्याला झेलावे लागते कारण मनुष्यजन्माचा हा परीस न मागताच आपल्या सगळ्यांच्या हाती लागलेला आहे. परिसाच्या शोधात निघालेला माणूस हातात तो आल्यावरही दगड समजून त्याला टाकून देतो अशी एक गोष्ट सांगितली जाते. आपल्या जीवनाचा परीस इतरांच्या आयुष्याचे सोने करणारा नसला तरी तो किमान स्वत:च्या आणि जमल्यास इतरांच्या जीवनातला अंधकार दूर करणारा आणि वाट उजळवणारा असायला हवा.

‘त्या’ दिवाळीचा हा अर्थ आहे. तो गवसावा यासाठी शुभ दीपोत्सव!

Story img Loader