या मंत्रिमंडळात बच्चू कडू किंवा सुनील केदार यांचा समावेश असणे जितके भुवया उंचावणारे, त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचे नसणे..
अजित पवार यांच्याबाबत ‘हे तर तुमचेही उपमुख्यमंत्री होते’ असे भाजपला सुनावण्याची सोय हा एक बरा भाग. मात्र शपथविधीतील नि:संशय सुखद बाब म्हणजे अनेक मंत्र्यांनी वडिलांसह आईच्याही नावाला दिलेले स्थान!
उद्धव ठाकरे-चलित शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामुळे एक ऐतिहासिक सत्य अधोरेखित झाले. ते म्हणजे लोकशाहीत सर्व समान असले तरी काही अधिक समान असतात. हे सत्य राजकीय पक्षांनाही लागू होते हे हा मंत्रिमंडळ विस्तार दाखवून देतो. राजकीय पक्षांतील अशा अधिक समानांना इतरांच्या तुलनेत सर्व काही अधिक मिळते आणि त्यांचे सर्व प्रमादही अधिक प्रमाणात पोटात घातले जातात. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील अजित पवार, आदित्य ठाकरे अशा तब्बल १८ मंत्र्यांना हे सत्य लागू पडते. यातील आदित्य ठाकरे यांची कारकीर्द तर प्रमाद घडण्याइतकी मोठी नाही. निवडणूक लढवण्याची त्यांची पहिलीच खेप. कोणा ठाकरे कुटुंबीयासाठी कोणा सेना आमदाराने सुरक्षित मतदारसंघ रिकामा करून देण्याचीही ही पहिलीच वेळ. त्यांचे निवडून येणेदेखील पहिलेच आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या आपल्या वडिलांच्या मंत्रिमंडळात थेट मंत्री.. तेदेखील कॅबिनेट दर्जाचे.. होणेदेखील पहिलेच. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे पहिल्यांदाच घडत असावे. शिशुवर्गात प्रवेश घेतल्या घेतल्या पहिल्या छूट थेट पदव्युत्तर पदवीच दिली जावी असेच हे.
हे असे पण वेगळ्या प्रकारचे पहिलेपण अजितदादा पवार यांच्याबाबतही आढळेल. मराठीत ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी म्हण आहे. ती सर्वसामान्यांस लागू पडते. अजितदादा असे अर्थातच सर्वसामान्य नाहीत. काहीही केले तरी सर्व काही पोटात घेणारा शरद पवार यांच्यासारखा काका कोणास लाभतो? तो अजितदादांना लाभला. त्यामुळे अजितदादांबाबत ही म्हण ‘दोन्ही घरचा पाहुणा तुपाशी’ अशी करावी लागेल. शरद पवार यांच्या कृपेने आणि कष्टाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिरंगी सरकार सत्तेवर आले तरी अजितदादा उपमुख्यमंत्री आणि या सरकारला धोबीपछाड घालून भाजपचे सरकार सत्तेवर आले असते तरीही अजितदादाच उपमुख्यमंत्री, ही अशी करामत अन्य कोणास जमणार? आणि जमली तरी ती पोटात घेऊन माफ कोण करणार? असे हे अजितदादांचे वेगळेपण. महाराष्ट्राच्या इतिहासात, आणि वर्तमानातही, पुतण्यावर अन्याय करणारे काका सर्वाना ज्ञात आहेत. पेशवाईतील ‘काका, मला वाचवा,’ ही आर्त किंकाळी तर मराठी मनामनांत रुतलेली आहे. आता तीच किंकाळी ‘काका, आम्हाला वाचवा,’ अशी होण्याची दाट शक्यता नजीकच्या भविष्यकालात दिसते. किमान तीनदा गायब होणे, दोन राजीनामे, एक ‘अश्रूंची झाली फुले’ पत्रकार परिषद आणि एक थेट बंड, वर भाजपशीच हातमिळवणी आणि नंतर राजकारण संन्यासाची भाषा! आता इतके झाल्यानंतरही उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर अशा पुतण्यापासून वाचवा असे म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांवरच येण्याची शक्यता दाट. तशी ती आलीही असेल. पण बोलणार कोण? तसे कोणी बोललेच आणि घेतली डोक्यात राख घालून यांनी तर पुन्हा नवे संकट. त्यापेक्षा गप्प बसलेले बरे असाच विचार राष्ट्रवादीतील सुज्ञ करत असण्याची मोठी शक्यता आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चिरंजीवाने काहीही उद्योग केले, कितीही व्रात्यपणा केला तरी वर्गात त्याचा आपला पहिला क्रमांक असे अनेकदा पाहायला मिळे. येथे पोराऐवजी पुतण्या इतकाच काय तो फरक. बाकी सर्व तेच.
अर्थात हे सारे असले तरी अजितदादांच्या नावे एक पुण्याई मात्र निश्चित नोंदली जाईल. ती म्हणजे विरोधी पक्षाचा फणा ठेचण्याची. विरोधी पक्षांत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन परत त्यांचेच सरकार पाडून स्वगृही येऊन पुन्हा तेच पद मिळवण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे घायाळ झालेल्या भाजपची- आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांची- जखम अजूनही भरून येताना दिसत नाही. आणि हे सरकार जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत ती तशी भरून येण्याची शक्यताही नाही. याचे कारण असे की अजितदादांनी काहीही (आणि कितीही) केले तरी त्यांच्या नावे बोटे मोडणे, आरोप करणे आता भाजपला शक्य होणार नाही. तसा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी ‘हे तर तुमचेही उपमुख्यमंत्री होते’ असे म्हणण्याची सोय राष्ट्रवादीस राहील. ही एका अर्थी अजितदादांचीच पुण्याई. राजकारणात एखाद्याचे घेऊन जसे त्यास संपवता येते तसे त्यास देऊनही निष्प्रभ करता येते. अजितदादांनी भाजपस यातील दुसऱ्या प्रकारे निष्प्रभ केले असे म्हणता येईल. सत्तास्थापनेची शक्यता नसलेल्या भाजपच्या मनात त्यांनी ती जागवली आणि तशी संधी देऊन पुन्हा त्याच पक्षाच्या फुग्यातील हवा काढून घेतली. मंत्रिमंडळ विस्तार समारंभावर बहिष्कार घालून भाजपने आपल्या या जखमेचेच प्रदर्शन केले. ते टाळता आले असते. कारण त्यातून भाजपचाच किरटेपणा दिसून आला.
या मंत्रिमंडळाचे वेगळेपण आणखी एका बाबतीत दिसते. मंत्रिपदाची शपथ घेताना आईचा उल्लेख करणाऱ्या मंत्र्यांची संख्या हे ते वेगळेपण. ही खऱ्या अर्थी सकारात्मक बाब. एरवी आपले राजकारणी आजोबा-वडिलांकडून आलेला राजकीय वारसा पुढे नेताना दिसतात. महाराष्ट्राच्या पुरुषप्रधान राजकारणात ही बाब नवी नाही. पण या वेळी किमान अर्धा डझन राजकारण्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना तीर्थरूपांच्या जोडीने आपल्या आईचे नावही घेतले. ही बाब निश्चितच स्वागतार्ह. आज शपथ घेतलेल्या अनेकांच्या वडिलांचा परिचय महाराष्ट्रास होता. त्यांच्या सर्व ‘कर्तृत्वाची’ जाणीव जनतेस आहे. पण मागे राहून पुढच्या पिढीसाठी कष्ट करणाऱ्या त्या राजकारण्यांच्या अर्धागिनी आणि या मंत्र्यांच्या मातोश्री अनेकांसाठी अपरिचित आहेत. या मंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या आईचाही नामोल्लेख करून तो परिचय करून दिला, ही चांगली बाब. आपल्या नावात आईचाही उल्लेख करणाऱ्यांची संख्या वाढेल, ही आशा.
या मंत्रिमंडळात सामील झालेल्यांइतकेच किंबहुना सामील न झालेले अधिक महत्त्वाचे ठरतात. सामील झालेल्यांतील भुवया उंचावणारे नाव म्हणजे बच्चू कडू. आपल्या विविध आंदोलनांच्या निमित्ताने अधिकारी वर्गावर हात उचलणाऱ्या बच्चू कडूंना आता याच अधिकाऱ्यांसमवेत काम करावे लागणार. कडूंना आता आपल्या हातांचा अन्य काही उपयोग शोधावा लागेल. सुनील केदार हे होम ट्रेड घोटाळ्यातील बिनीचे आरोपी. तुरुंगवास भोगून आलेले. त्यांना मंत्री करण्यातील शहाणपण शोधणे अवघड. अनुपस्थितीने महत्त्वाचे असलेले नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. काँग्रेसचे हे माजी मुख्यमंत्री या सरकारात नाहीत हे त्यांचे वैयक्तिक मोठेपण दाखवणारे खरेच. पण पक्ष म्हणून काँग्रेसची एकंदरच राज्य सरकार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत नक्की भूमिका काय, हा प्रश्न पडतो. याचे कारण तूर्त तरी काँग्रेसने या सरकारात दुय्यम भूमिका स्वीकारलेली आहे, ती तशीच राहणार का आणि काँग्रेसची वाटचाल कोणत्या दिशेने होणार ही बाब त्या पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाची.
बाकी मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या ३६ पैकी १८ मंत्री हे राजकीय घराण्यांतील आहेत. त्यांचे वाडवडील राजकारणात होते. आधीचे सात पाहता, एकंदर ४३ पैकी २० राजकीय घराण्यांचे वारस. यामुळे घराणेशाहीचा मुद्दा कायमचा निकालात निघावयास हरकत नाही. घराणेशाही ही फक्त गांधी/ नेहरूंपुरतीच असे मानून त्या पक्षावर टीका करणाऱ्या भाजपनेही ती पूर्णपणे आता आत्मसात केल्याचे वेळोवेळी सिद्ध होतेच. तेव्हा आता या मुद्दय़ास कायमची मूठमाती द्यावी हे बरे. एरवी या मंत्रिमंडळाविषयी बरेवाईट मत व्यक्त करणे तूर्त घाईचे ठरेल. सांगे वडिलांची कीर्ति ते येक.. ते कोण हे म्हणायची वेळ येणार नाही, ही आशा.