सर्व सरकारी यंत्रणांचे एकमेकांतील सौहार्दपूर्ण सहकार्य ओदिशात दिसले, त्यामुळेच वादळातील हानी कमी झाली..

तंत्रज्ञानाचा यथोचित वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजमाध्यमांचा सकारात्मक उपयोग आणि अपवादात्मक म्हणता येईल अशी दिसलेली सरकारी यंत्रणांची कार्यक्षमता यांचा उत्तम तसेच अपूर्व संयोग म्हणजे ओदिशा राज्याकडून ताज्या चक्रीवादळाची हाताळणी. आपल्याच देशात अन्यत्र समाजमाध्यमांतून सामाजिक विकृतीचे दर्शन घडत असताना आणि निर्बुद्ध अवैज्ञानिक दृष्टिकोनांस राजमान्यता मिळत असताना ओदिशासारख्या अलीकडेपर्यंत मागास म्हणून हिणवले गेलेल्या राज्याने जे करून दाखवले ते निश्चितच अभिमानास्पद ठरते. त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे यासाठी अभिनंदन. आपले तिसऱ्या जगातील अस्तित्व नाकारण्यासारखी परिस्थिती नसताना पहिल्या जगालाही लाजवेल अशी कामगिरी ही साऱ्या देशासाठी आदर्शवत ठरते.

ओदिशा आणि पूर्व किनारपट्टीस वादळ हे नावीन्य नाही. परंतु गेल्या शुक्रवारी आदळलेले फॅनी त्याच्या विध्वंस क्षमतेसाठी अभूतपूर्व ठरते. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे ही कल्पनाच भीषण. अशा वादळांत होत्याचे नव्हते करण्याची क्षमता असते.  मोटारी आकाशात भिरकावल्या जाऊ शकतात आणि एरवी महाकाय वाटणारे मनोरे काडेपेटय़ातील काडय़ांसारखे मोडून पडतात. अनेक मोठय़ा शहरांतील गगनचुंबी इमारती १०० किमी प्रतितास इतक्या वेगास तोंड देण्याच्या क्षमतेच्या असतात. त्यावरून २०० किमी प्रतितास इतक्या वेगात घोंघावणाऱ्या या वादळाच्या विध्वंसक्षमतेचा अंदाज येऊ शकेल. अशा वादळात ओदिशा ताठ उभा राहिला ही बाब निश्चितच कौतुकास्पद. कारण नैसर्गिक संकटे ही नेहमीच प्रगत प्रदेशांपेक्षा अप्रगत आणि दरिद्री प्रदेश आणि तेथील नागरिकांसाठी अधिक जीवघेणी असतात. त्यामुळे अन्य कोणत्या प्रांतापेक्षा इतक्या भीषण क्षमतेचे चक्रीवादळ ओदिशासाठी अधिक मोठे संकट ठरते. या राज्याची लोकसंख्या साडेचार कोटी इतकी आणि दरडोई उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये वा त्याहूनही कमी. आकाराच्या मुद्दय़ावर ओदिशाची तुलना युरोपातील एकेकाळची महासत्ता असलेल्या स्पेन या देशाशी होते. परंतु दरडोई उत्पन्न स्पेनपेक्षा कित्येक पटींनी कमी. बहुसंख्य नागरिक हे पेशाने शेतकरी. या वर्गाची आर्थिक ससेहोलपट कशी होत असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा अशा प्रांतास अक्राळविक्राळ क्षमतेच्या चक्रीवादळास तोंड देण्याची वेळ येणे दुष्काळात तेरा महिने असण्यापेक्षाही अधिक मोठे संकट. या वादळाच्या क्षमतेच्या जवळ जाईल इतक्या मोठय़ा वादळाने याच राज्यात १९९९ साली १० हजारांहून अधिकांचे प्राण घेतले होते आणि कलहंडीसारख्या भूकबळींच्या घटना याच राज्यात घडल्या होत्या. इतका दुर्दैवी इतिहास असलेल्या राज्याचे हे ताजे वर्तमान निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गेल्या काही विध्वंसक चक्रीवादळांच्या तुलनेत या वेळी ओदिशा राज्यातील वादळबळींची संख्या पन्नासच्या आत आहे. अर्थात एकसुद्धा बळी न जाणे हे आपले लक्ष्य असायला हवे, हे मान्यच. परंतु तेथे पोहोचण्याच्या मार्गातील आव्हाने त्यापेक्षाही मोठी आहेत, हेदेखील मान्य करायला हवे. त्यामुळे वास्तवाचे मूल्यमापन शक्याशक्यतांच्या वास्तवातून व्हायला हवे.

ते करू गेल्यास ओदिशा राज्याची कामगिरी नि:संशय महत्त्वाची ठरते. तब्बल २ कोटी ६० लाखांहून अधिक एसएमएस संदेश, ४३ हजार स्वयंसेवक, हजारांहून अधिक वैद्यक आणि आणीबाणीच्या सेवेत उपयोगी कार्यकर्ते, साधारण १० हजार मदत छावण्या आणि तेथे नेण्यासाठी असंख्य तैनात वाहने, आत खोल समुद्रात तैनात नौदल नौका आणि मदतकार्यास सज्ज विमानतळ असा हा जगड्व्याळ व्याप या चक्रीवादळाच्या सामन्यासाठी तैनात करण्यात आला होता. या सगळ्या यंत्रणांत साधला गेलेला ताळमेळ ही निश्चितच आश्चर्याची बाब. संकटे माणसास काय शिकवू शकतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरते. अर्थात त्यासाठी डोळसपणे शिकण्याची तयारी हवी, ही बाब महत्त्वाचीच. ती ओदिशाने दाखवली. अनेक शहरांत १०० किमी प्रतितास इतक्या वेगालाही सामोरे जाऊ न शकणाऱ्या इमारती असताना ओदिशातील इमारतींनी पावणेदोनशे-दोनशे प्रतितास वाऱ्याचा दाब कसा काय सहन केला? याचे उत्तर खरगपूरच्या आयआयटीच्या संशोधनात आहे. ओदिशात विध्वंस करून गेलेल्या गत वादळांचा अभ्यास करून खरगपूर आयआयटीने या वादळांना तोंड देऊ शकेल अशा पद्धतीच्या इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान आणि इमारत आराखडे संपूर्ण देशी बनावटीचे आहेत. ते किती ताठ मानेने उभे राहिले हे या वादळात दिसले. १९९९ साली आणि नंतरच्या वादळात जेथील इमारती उद्ध्वस्त झाल्या, तेथेच या नव्या तंत्रज्ञानाने उभ्या राहिलेल्या इमारतींनी ताज्या चक्रीवादळाच्या डोळ्यास डोळा भिडवून आपला ताठ बाणा कायम ठेवला. आयआयटीच्या या विशेष आरेखनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली असून ज्या ज्या देशांत अशा वादळांना तोंड द्यावे लागते तेथील देशांकडून या संदर्भात विचारणा झाली आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद. आयआयटीसारख्या संस्थांचे महत्त्व आणि त्यांच्या स्थापनेचे द्रष्टेपणदेखील या निमित्ताने देशासमोर आले, ही बाबदेखील महत्त्वाची.

त्याच वेळी हवामान खात्याच्या कामगिरीचेही कौतुक करायला हवे. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीपर्यंत हवामान खाते हे आपल्याकडे टिंगलीचा विषय होते. त्या वेळी गांधी यांनी वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हाती हवामान खात्याची सूत्रे सुपूर्द केली. ही बाब फार महत्त्वाची. अशासाठी की पुराण काळात भारताने या क्षेत्रात किती प्रगती केली होती अशा वा तत्सम बौद्धिकदृष्टय़ा अजागळ चर्चेत न पडता त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनाचा अंगीकार करून हवामान खात्यात आवश्यक ते बदल केले. त्याही वेळी डॉ. गोवारीकरांनी हवामान शास्त्र अभ्यासाचे संपूर्ण देशांतर्गत प्रारूप तयार केले. त्यानंतरही या खात्याच्या कामगिरीतील सुधारणा वेळोवेळी दिसू लागली. या वादळप्रसंगीही तेच जाणवले. जवळपास तीसतीस मिनिटांनी या वादळाची ताजी माहिती हवामान खात्यातर्फे दिली जात होती. एरवी सरकारी जाहिराती वात आणतात. पण या वादळवाऱ्याच्या काळात सरकारी जाहिरातींनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. जनतेवर या वादळाच्या धोक्याचा इतका सातत्यपूर्ण मारा या जाहिरातींनी केला की लोकांना परिस्थितीचे गांभीर्य जाणवले. साधारण १० लाख लोकांचे स्थलांतर या काळात केले गेले. हे प्रचंड आव्हान सरकारी यंत्रणांनी पेलले. त्यांना हवामान खात्याने तयारीसाठी योग्य ती उसंत दिली. त्याची दखल घेत विमानसेवा ते रस्त्यावरील वाहनसेवा यांत योग्य ते बदल केले गेले. जवळपास २४ तास या संपूर्ण परिसरात रेल्वे आणि विमानतळ बंद केले गेले. याचा योग्य तो परिणाम दिसून आला. अशा वादळी वातावरणात त्यामुळे उगाचच कोणावर अडकून पडण्याची आणि जीवनावश्यक सेवांवर या अडकलेल्यांच्या सुटकेसाठी धावपळ करण्याची वेळ आली नाही. सर्व सरकारी यंत्रणांचे एकमेकांतील सौहार्दपूर्ण सहकार्य यातून दिसते. ते आशादायक म्हणायला हवे. या सगळ्याचा धडा काय?

वैज्ञानिक दृष्टिकोनाची अपरिहार्यता हा तो धडा. इतक्या वा याहूनही अधिक क्षमतेच्या वादळात एकही बळी पडू न देण्याचा विक्रम फक्त हाँगकाँगच्या नावावर आहे. ते आपले लक्ष्य असायला हवे. वादळ आर्थिक असो वा सामाजिक वा हे असे भौतिक. वैज्ञानिक आणि सुधारणावादी दृष्टिकोनच त्यातून तरण्यासाठी उपयोगी ठरतो हा यातील धडा आहे. भविष्यात वादळ झेलताना त्याचा विसर पडता नये.