अत्यंत कौशल्यवान फुटबॉलपटू व कर्णधार हा मिशेल प्लॅटिनींचा ऐंशीच्या दशकातील लौकिक मागे पडला.. ते आता ‘भ्रष्ट पदाधिकारी’ ठरले.. 

मिशेल प्लॅटिनी या फ्रान्सच्या असामान्य फुटबॉलपटूचे, कर्णधाराचे आणि संघटकाचे नाव गेली काही वर्षे केवळ भ्रष्टाचाराच्या चौकशीनिमित्तच ऐकिवात नि वाचनात येते ही फ्रेंच फुटबॉलसाठी जणू कधीही न संपणारी शोकांतिकाच. फ्रेंच पोलिसांकडून त्यांची बुधवारी तब्बल ११ तास चौकशी झाली. त्यांना अटक झाल्याचे वृत्त होते. पण बुधवारीच बऱ्याच रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. विश्वचषक २०१८ आणि २०२२ या स्पर्धा अनुक्रमे रशिया आणि कतारला बहाल करण्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना अर्थात ‘फिफा’च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी २०१०-११ या काळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. त्या काळात ‘फिफा’चे अध्यक्ष होते सेप ब्लाटर, तर युरोपियन फुटबॉल संघटना अर्थात ‘युएफा’चे अध्यक्ष होते मिशेल प्लॅटिनी. २०१० मध्ये ‘फिफा’च्या बंद दरवाजाआड झालेल्या गुप्त मतदानात २०२२ मधील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कतारला बहाल करण्यात आले. अमेरिकेला डावलून कतारला १४-८ अशी पसंती मिळाल्याने, अवघे फुटबॉलविश्व थक्क झाले. ज्या जून ते जुलै या काळात सर्वसाधारणपणे विश्वचषक स्पर्धा भरवली जाते, तो काळ कतारमध्ये प्रचंड उष्ण आणि खुल्या मैदानात कोणताही खेळ खेळण्यासाठी पूर्णतया प्रतिकूल असतो. शिवाय उत्तर आफ्रिकी अरब देशांइतके कतारमध्ये फुटबॉल लोकप्रिय नाही वा कतारला फुटबॉलची फारशी परंपरा नाही. मग कोणत्या निकषांवर कतारला इतकी मते मिळाली? की ती मिळवली गेली? याची चौकशी ‘फिफा’कडून होण्याची शक्यता नव्हतीच, कारण ब्लाटर-प्लॅटिनी यांच्या संगनमतानेच हे घडून आले होते. पण युरोपातील प्रसारमाध्यमे आणि कालांतराने स्विस व अमेरिकी पोलीस यंत्रणांनी हा विषय उचलून धरला. झुरिचमधील ‘फिफा’ कचेरीवर छापे टाकले गेले. ब्लाटर आणि प्लॅटिनी यांना पदत्याग करावा लागला. गंमत म्हणजे ‘फिफा’च्या अध्यक्षांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्याच संघटनेच्या नीतिमूल्य समितीला पाचारण केले गेले. त्यातून काहीही निष्पन्न होणार नव्हतेच. फुटबॉलची लोकप्रियता वाढत असतानाच, जागतिक फुटबॉल संघटनेकडून होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना कोणताही धरबंध नव्हता. अशा वेळी प्रथम स्विस आणि आता फ्रेंच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने ब्लाटर आणि प्लॅटिनी यांची चौकशी सुरू केली आहे. प्लॅटिनी यांच्या चौकशीच्या मुळाशी आहे, त्यांनी २०१० मध्ये तत्कालीन फ्रेंच अध्यक्ष निकोलस सारकोझी यांच्यासह एलिसे राजवाडय़ात घेतलेले भोजन!

नोव्हेंबर २०१० मध्ये झालेल्या त्या स्नेहभोजनाला आणखी एक जण उपस्थित होते. त्यांचे नाव तमिम बिन हमद अल-थानी. त्या वेळी ते कतारचे राजपुत्र होते. आता राजे आहेत. कतारला विश्वचषक यजमानपद देण्यासाठी ‘युएफा’ने कतारच्या पारडय़ात मत टाकावे, अशी इच्छा सारकोझी यांनी बोलून दाखवली. फ्रान्स-कतार यांच्यात आर्थिक, व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याबाबतही त्या भोजनबैठकीत चर्चा झाली. यानंतर विश्वचषक स्पर्धा तर कतारला बहाल झालीच. पण पुढच्याच वर्षी पॅरिस सेंट जर्मेन हा फ्रान्समधील अव्वल क्लब कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट कंपनीने खरेदी केला. या कंपनीच्या एका उपकंपनीत प्लॅटिनी यांचे चिरंजीव उच्च पदावर रुजू झाले. पॅरिस सेंट जर्मेनकडे आज नेयमार, कायलान एम्बापेसारखे अव्वल दर्जाचे आणि महागडे फुटबॉलपटू आहेत, कारण कतार सरकारचीच मोठी गुंतवणूक त्या क्लबमध्ये झालेली आहे. इतके होऊनही कतारला यजमानपद देण्याचा आपला निर्णय फुटबॉलच्या हितासाठीच होता, असे आजही प्लॅटिनी सांगतात. हा निर्णय ‘त्या’ भोजनापूर्वीच आपण घेऊन टाकला होता, असाही दावा करतात. ‘फिफा’ने २०१५ मध्ये प्लॅटिनींवर फुटबॉलशी संबंधित कोणत्याही संघटनेत पद स्वीकारण्यावर आठ वर्षांसाठी बंदी घातली होती. कालांतराने ही बंदी चार वर्षांवर आणण्यात आली. त्यामुळे नोव्हेंबर २०१९ पासून ‘फिफा’ किंवा इतर कोणत्याही फुटबॉल संघटनेत दाखल होण्यास ते मोकळे आहेत. म्हणजे तत्पूर्वी त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांपायी फ्रेंच पोलिसांकडून कारवाई झाली नाही, तर.

हे प्लॅटिनी एके काळी, युव्हेंटस या इटालियन फुटबॉल क्लबचे खेळाडू. त्यांनी इटालियन आणि युरोपियन क्लब फुटबॉल गाजवले होते. ऐंशीच्या दशकात त्यांच्यामुळेच युव्हेंटस क्लबचा दबदबा होता. त्यानंतर त्यांनी फ्रेंच फुटबॉललाही शिखरावर नेऊन ठेवले होते. १९८२ आणि १९८६च्या विश्वचषक स्पर्धामध्ये फ्रान्सने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. १९८४ मध्ये युरोपियन अजिंक्यपद पटकावले. स्वत: मधल्या फळीत खेळायचे, पण फ्रेंच संघाची सारी व्यूहरचना सांभाळायचे. नेतृत्वगुण वादातीत होते. पदचापल्य आणि फुटबॉलची समजही वाखाणण्याजोगी होती. फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकल्या. पण त्या दोन्ही संघांपेक्षा प्लॅटिनी यांचा संघ अधिक घोटीव आणि सूत्रबद्ध होता. पेले, युसेबियो यांच्याइतके कौशल्य प्लॅटिनी यांच्याकडे होते, तरी ते कर्णधार-फुटबॉलपटू म्हणून अधिक ओळखले जात. या भूमिकेतली त्यांची कामगिरी फ्रान्झ बेकेनबाउर, योहान क्रायुफ आणि दिएगो मॅराडोना यांच्या तोडीची मानली गेली.

ही झाली त्यांच्या प्रतिभेची एक बाजू. दुसरी, पाताळयंत्री पदाधिकाऱ्याची बाजू आता उघड झाल्याने, समाजमाध्यमांतून त्यांची कैद्याच्या काळ्या-पांढऱ्या पट्टीदार पोशाखातील छायाचित्रे दिसू लागली आहेत. ही समाजमाध्यमी टीका सवंग असली, तरी प्लॅटिनींचा प्रवास कुठून कुठे होत आहे, याविषयीचे जनमत त्यातून स्पष्ट होते. फुटबॉलच्या मैदानावर प्लॅटिनींचा उल्लेख ‘राजा’ असा केला जाई. फ्रान्सच्या सर्वात प्रसिद्ध राजाशी – नेपोलियनशी त्यांची शरीरयष्टी मिळतीजुळती होती. पण दिग्विजयी नेपोलियनचे पतन रणांगणात, शौर्यमर्दुमकी गाजवताना झाले. प्लॅटिनी यांचे पतन नैतिक आहे. ब्लाटर यांच्यापाठोपाठ ते ‘फिफा’चेही अध्यक्ष होऊ शकले असते. तसे होते, तर किमान या ‘नेपोलियन’च्या शौर्यगाथेचा सुखान्त झाला असता.

प्लॅटिनी यांचे नैतिक पतन ‘फिफा’च्या ढासळलेल्या नैतिकतेचेही निदर्शक आहे. फुटबॉलचा प्रसार युरोप-लॅटिन अमेरिकेपलीकडे व्हावा यासाठी ब्लाटर यांनी पुढाकार घेतला. यातूनच आशिया (कोरिया-जपान २००२) आणि आफ्रिकेला (द. आफ्रिका २०१०) विश्वचषक यजमानपदाचा मान मिळाला. पण असे करताना ब्लाटर यांनी अनेक भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करून ‘फिफा’ची शुचिता कायमस्वरूपी धुळीला मिळवली. प्लॅटिनी त्यांचे शिष्योत्तम! गुरूला योग्य मार्गावर आणण्याऐवजी त्यांनी गुरूंचाच अयोग्य मार्ग चोखाळला. तरीही ‘फिफा’चे विद्यमान अध्यक्ष जियानी इन्फांतिनो यांनी ‘आता चर्चा भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांची नव्हे, तर फुटबॉलची होते’, असे धाडसी विधान करून जातात. त्यात काय चूक आहे म्हणा? जेथे रशियासारखा देश अमेरिकेच्या निवडणुकीत ढवळाढवळ करू शकतो, ट्रम्प यांच्यासारखा अमेरिकी अध्यक्ष या ‘मदती’चा दोन्ही करांनी स्वीकार करतो, ज्या युगात ‘ब्रेग्झिट’सारखा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांना, सरकारला, विरोधी पक्षीयांना आणि पार्लमेंटलाही पुढील दिशाच सापडू शकत नाही, जेथे लोकशाही मार्गानी एकाधिकारशाही सत्तेवर येते तिथे ‘फिफा’चे भ्रष्टाचार किंवा प्लॅटिनींसारख्यांची चौकशी ही सामान्य बाबच ठरू लागते.

Story img Loader