‘द बोस्टन ग्लोब’ या अमेरिकी वृत्तपत्राने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या उद्याच्या अमेरिकेचा वृत्तान्त हा उपहासात्मक असला तरी त्यात प्रचंड गांभीर्यही होते..
वाचाळशिरोमणी ट्रम्प यांच्या भाषणांनी, चेकाळलेल्या अमेरिकी जनतेला जणू कोरा चहा पाजून भानावर आणण्याचा तो प्रयत्न होता. ट्रम्प यांच्यासारख्या सौदागरांच्या एका हाती तराजू असतो आणि दुसऱ्या हाती तलवार. परंतु तो तराजू व्यापाराचा आणि तलवार ही द्वेषाची हे या वृत्तान्तातून दाखवून दिले.
वृत्तपत्रांनी निष्पक्षपाती असावे, असा एक सनातन समज समाजमानसात रुजलेला आहे, त्यास ‘द बोस्टन ग्लोब’ या अमेरिकी वृत्तपत्राने जोरदार धक्का दिला असून, त्याबद्दल त्या दैनिकाचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. या वृत्तपत्राने गेल्या आठवडय़ात त्यांच्या ‘विचार’ भागामध्ये एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी तेथे एक ‘पहिले पान’ प्रसिद्ध केले. अगदी रोजच्या दैनिकातील पहिल्या पानासारखे. तशाच बातम्या, तशीच मांडणी. फरक एवढाच की, रोजचे वर्तमानपत्र आपणांस काल घडून गेलेल्या घडामोडींच्या बातम्या देत असते, या पानात उद्याच्या अमेरिकेचा वृत्तान्त होता. ही अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांची होती. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीचे एक प्रबळ दावेदार. त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी सध्याची हवा आहे. त्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले तर त्यानंतरची अमेरिका कशी असेल, याचे चित्र या पानात रेखाटले होते. आपल्याकडची वृत्तपत्रे पूर्वी ‘मनावर घेऊ नका, होळी आहे’ असे म्हणत अशा गमतीदार, विनोदी बातम्यांनी होलिकोत्सव साजरा करीत असत. पण हा त्यातला प्रकार नव्हता. त्यात उपहास होता, परिहास होता, परंतु तरीही प्रचंड गांभीर्य होते.
अमेरिकी राष्ट्रवादाचे नवमक्तेदार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेली विधाने, घोषणा, मांडलेली धोरणे यांचा अमेरिकी जीवनावर प्रत्यक्षात परिणाम कसा होईल, हे कल्पून या बातम्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या बातम्या म्हणजे ट्रम्प यांच्या धोरणांवरील सर्वात मोठा वृत्तपत्रीय हल्ला होता. वाचाळशिरोमणी ट्रम्प यांच्या भाषणांनी, किंवा – आपल्याकडे सध्या प्रचलित असलेला शब्द वापरायचा तर – जुमलेबाजीने भारावलेल्या, चेकाळलेल्या अमेरिकी जनतेला जणू कोरा चहा पाजून भानावर आणण्याचा, आजच्या तथाकथित उष:कालात कसा रात्रीचा गर्भ लपलेला आहे, हे दाखविण्याचा तो प्रयत्न होता. ट्रम्प यांच्यासारख्या सौदागरांच्या एका हाती तराजू असतो आणि दुसऱ्या हाती तलवार. यातून आपण न्याय-मूर्ती, धर्म-मूर्ती असल्याचे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु तो तराजू व्यापाराचा असतो आणि तलवार द्वेषाची हे या बातम्यांतून बोस्टन ग्लोबने दाखवून दिले. अमेरिकेतील घुसखोरांबद्दलची, दहशतवादाविरोधातील लढाई संदर्भातील, देशातील गरीब, महिला, अल्पसंख्याक, गोरेतर यांच्याविषयीची ट्रम्प यांची मते आणि धोरणे अखेर देशाला खड्डय़ात नेणारी ठरतील हे ग्लोबने लखलखीतपणे समोर मांडले आणि या ‘पहिल्या पाना’बरोबरच प्रसिद्ध केलेल्या खास संपादकीयातून, ट्रम्प यांना उमेदवारी न देण्यातच कसे देशाचे आणि रिपब्लिकन पक्षाचेही हित सामावले आहे हेही स्पष्ट सांगितले. एवढेच नव्हे, तर ग्लोबने ट्रम्प यांच्यासह अन्य सर्व रिपब्लिकन उमेदवारांच्या नावावर काट मारून मिट रॉम्नी आणि पॉल रायन असे दोन ‘सभ्य’ पर्याय मतदारांसमोर ठेवले. या सगळ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने ‘नेहमीची नीचतम’ पातळी गाठून टीका केली, ते पाहता ‘बोस्टन ग्लोब’ची ही टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते. या टीकेचा नेमका परिणाम काय होतो, मुळात तसा परिणाम होईल का, की रिपब्लिकन मतदार ट्रम्पभक्तीमध्ये वाहवत जातील हे लवकरच दिसेल. मात्र यानिमित्ताने एखाद्या वृत्तपत्राने एखाद्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात अशा प्रकारे भूमिका घ्यावी काय हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आजच्या तंत्रक्रांतीयुगात नाना माध्यमपीठे तयार झाली आणि होत असताना, औद्योगिक क्रांतीतून प्रसवलेल्या वृत्तपत्र या माध्यमविशेषाने नेमके वागावे कसे या व्यापक सवालाचाच तो एक भाग आहे. हा सवाल जसा पत्र-कारांसमोरचा आहे तसाच तो माध्यमांचा ग्राहक (आणि कच्चा मालही!) असलेल्या वाचकांसाठीही महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो समजून घेणे आवश्यक आहे.
याचे एक कारण म्हणजे एखाद्या वृत्तपत्राने एखाद्या पक्षाच्या बाजूने वा विरोधात भूमिका घेणे यात अमेरिकी वाचकाला काही विशेष वाटण्याचे कारण नाही. तेथे ती प्रथा आहे. निवडणुकीच्या काळात वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाइम्स यांसारखी मातब्बर वृत्तपत्रेही एखाद्या पक्षाच्या बाजूने उभी राहतात. आपल्या संपादकीयांतून त्या पक्षाच्या धोरणांचा प्रचार करतात. ही तेथील माध्यमरीत बनलेली आहे. तेव्हा त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ वृत्तपत्रांच्या बदलत्या कार्याचा असू शकतो. भारतीय मनास मात्र हे सगळेच अजब वाटणारे आहे. आपल्या दृष्टीने पक्षनिरपेक्षता हेच माध्यमांचे सर्वात मोठे मूल्य आहे. माध्यमांनी निष्पक्ष असावे, कोणा एकाची बाजू घेऊ नये हा आदर्श आपण समोर ठेवलेला आहे आणि त्या कसोटीवर आपण एखाद्या दैनिकाची किंमत ठरवत असतो. त्यात काही गैर आहे असे आपणास वाटत नाही. कारण या निष्पक्षपातीपणामध्ये आपण न्याय या संकल्पनेचे प्रतिबिंब पाहत असतो. निष्पक्षपातीपणा म्हणजेच न्याय असे आपण मानत असतो. वस्तुत: न्याय हा नेहमीच सुष्टाचा, सत्याचा पक्षपाती असतो. परंतु जेथे सत्य आणि सुष्ट हेच अनेकदा सापेक्ष असते तेथे न्याय तरी कोठून निरपेक्ष असणार? मराठी वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास पाहिला, तर त्यात या तथाकथित निष्पक्षपातीपणाला स्थान नव्हते हेच दिसते. आपल्याकडे टिळक-आगरकर यांची वृत्तपत्रीय परंपरा सांगण्याचा प्रघात आहे. त्या दोन काचांच्या चष्म्यातून आपण प्रत्येक संपादकाकडे पाहात असतो. पण टिळकांचा ‘केसरी’ आणि आगरकरांचा ‘सुधारक’ हा निष्पक्षपाती असता, तर त्याचे प्रयोजनच शून्यवत झाले असते. टिळक हे स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे पक्षपाती होते, आगरकर हे सामाजिक सुधारणांचे पक्षपाती होते. प्रत्येक मनुष्य आपापल्या विचारांचा, भूमिकांचा, मतांचा पक्षपातीच असणार. जे तत्त्व मनुष्याला लागू होते, तेच वृत्तपत्रालाही. आणि ते वैचारिक पातळीवरच नाही, तर घटनांच्या बाबतीतही खरे असते. कोणतीही घटना मांडली जाते ती, ती पाहणाराच्या नजरेतूनच. या ‘राशोमान परिणामा’पासून माणसे मुक्त नसतात, माध्यमे कशी असतील? तरीही वाचक म्हणून आपण जेव्हा वृत्तपत्रे निष्पक्ष असावीत असे म्हणतो, तेव्हा त्याचा इतकाच अर्थ असतो, की त्या वृत्तपत्राने माझ्या पक्षाची – म्हणजे बाजूची – भूमिका घ्यावी. त्या विपरीत वागणारे वृत्तपत्र हे मग पक्षपाती, विकले गेलेले, देशद्रोही ठरते आणि ते पत्रकार ‘प्रेस्टिटय़ूट’ या विशेषणास प्राप्त ठरतात.
परंतु वृत्तपत्र व्यवहाराशी निगडित असलेल्या सर्वानाच हे समजून घ्यावे लागणार आहे, की औद्योगिक क्रांतीत निर्माण झालेल्या मूल्यविवेकाच्या फुटपट्टय़ांवरील रेघाच तंत्रक्रांतीत बदलत चालल्या आहेत. माध्यमांचे कार्य आणि भूमिका बदलत आहेत. आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रे बातमीदार बनली होती. पण वृत्तवाहिन्या आल्या आणि त्या ते काम ‘सर्वात आधी’ करू लागल्या. ते सुरू असतानाच अचानक दूरसंचार क्रांती झाली आणि हातातल्या मोबाइलमध्ये दर सेकंदाला बातम्या टुणटुण वाजू लागल्या. अशा काळात वृत्तपत्रांना बातमीची ‘बातमी पवित्र असते आणि मत स्वतंत्र’, ही व्याख्या सोडून देणे भाग पडले. या ठिकाणी भूमिका घेणे आले. मतपत्र या आद्य भूमिकेकडे जाणे आले आणि मग केवळ मढेच निष्पक्षपाती असू शकते हे समजून घेणे आले. वृत्तपत्रांचा हा पक्षपातीपणाचा सद्गुण त्यांच्या बातम्यांच्या निवडीतून जसा दिसतो, तसाच तो संपादकीयातून. तसा तो दिसला पाहिजे. ‘बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी’ हे मनी वागवत, आपल्या बुद्धीस जे योग्य वाटते ते आपल्या वाचकांस सांगणे हेच वृत्तपत्राचे आद्यकर्तव्य आहे. वृत्तपत्र आणि सोंगाडे वा भाट या संस्थांमध्ये फरक आहे. बोस्टन ग्लोबचे ते ‘पहिले पान’ अमेरिकी मतदारांना अन्य काही सांगत असले, तरी आपणांस मात्र त्याने हाच संदेश दिला आहे.
ते ‘पहिले पान’..
तो तराजू व्यापाराचा आणि तलवार ही द्वेषाची हे या वृत्तान्तातून दाखवून दिले.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 16-04-2016 at 02:42 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hillary clinton donald trump and headlines the boston globe