अवयवांची चोरी करून विकणारे दोषी आहेतच, पण ते विकत घेणाऱ्यांचे काय?
हिरानंदानी रुग्णालयासारखी मूत्रपिंडचोरी आणि त्यातील डॉक्टरांच्या सहभागाचे अनेक प्रकार दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद,अकोला आदी शहरांत घडले आहेत. हे प्रकार यापुढे थांबवायचे असतील तर अशी अवयवचोरी जेथे घडते ते रुग्णालय आणि त्यातील सहभागी डॉक्टरांवर कायमस्वरूपी बंदी घालावयास हवी.
मुंबईतील उच्चभ्रूंच्या वस्तीतील हिरानंदानी रुग्णालयातून मूत्रपिंडचोरीचे जे काही प्रकार समोर आले, त्यावर ‘अलीकडे डॉक्टरदेखील कसे अनैतिक होत आहेत’ अशा छापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होतील. ती देणारे बऱ्याचदा ‘आमच्या काळी असे नव्हते’ अशा छापाचीही विधाने करताना आढळतील. परंतु मुळात हे म्हणणेच हास्यास्पद आहे. याचे कारण एका विशिष्ट काळात सर्व समाज हा नीतिमूल्यांच्या चौकटीत बांधून घेणारा असतो आणि दुसऱ्या एखाद्या काळात सर्वच्या सर्व समाज अनैतिक असतो, असे कधीही नसते. तरीही हे असे आपल्याकडे समस्या विश्लेषणाचे सुलभीकरण केले जाते. कारण तसे करणे सोपे असते आणि ते केल्याने कोणत्याही अपकृत्यांचा दोष आपल्यावर येत नाही. काळास दोष दिला की झाले. तो दोष दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर नाही आणि दोषींना शासन करण्याचे कर्तव्यही आपले नाही. तेव्हा हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरवर्गाने जे काही केले त्याचे विश्लेषण हे सुलभीकरण टाळून करावयास हवे.
क्रिकेटपटूने सामना निकालनिश्चिती व्यवहारात सहभागी व्हावे, पत्रकारांनी राजकारण्यांच्या कच्छपी लागून स्वत:च व्यवस्थेच्या सावलीत राहण्यात आनंद मानावा, लेखक-कवींनी आपले सत्त्वशील सत्ताधाऱ्यांच्या चरणी वाहावे, कलाकारांनी एखाद्या ‘पद्मश्री’ वा सरकारी घरासाठी राजकारण्यांचे पाय चेपावेत आणि दोन-पाच लाख रुपयांसाठी डॉक्टरांनी अवयवांच्या चोरटय़ा व्यापारात सहभागी व्हावे ही सर्व अप्रामाणिक व्यावसायिकतेची उदाहरणे आहेत. असा व्यावसायिक अप्रामाणिकपणा सर्व काळात सर्व समाजात होत असतोच. परंतु जो समाज व्यवस्थेच्या सुदृढीकरणावर भर देऊन अशा अप्रामाणिकपणास कठोरपणे हाताळतो तो समाज प्रगतीचे टप्पे झरझर ओलांडतो. आणि जो समाज असे न करता ही अव्यावसायिकता, नैतिकता वा पापपुण्याच्या भोंगळ गठुडय़ात गुंडाळतो त्या समाजात असे प्रकार वारंवार घडतात. हा इतिहास आहे आणि आपल्याकडे होणाऱ्या त्याच्या पुनरावृत्तीवरून त्यामागील सत्य पटते. हे ऐतिहासिक सत्य एकदा मान्य केले की हिरानंदानी रुग्णालयात वा अन्यत्रही हे असले अवयवचोरीचे प्रकार का घडतात त्याचे कारण शोधता येईल आणि ते कसे थांबवायचे याचा मार्ग शोधता येईल. तो शोधायची गरज आहे याचे कारण अशा प्रकरणांत अवयव चोरून विकणारेच जणू फक्त दोषी आहेत, असे मानून नैतिकानैतिकतेचे निवाडे केले जातात. अवयवांची चोरी करून विकणारे दोषी आहेतच, पण ते विकत घेणाऱ्यांचे काय? कोणतीही वस्तू बाजारात विकत घेणारा असल्याखेरीज विकली जातच नाही. तेव्हा हे चोरटे अवयव विकत घेणारे आहेत म्हणून अवयव चोरून विकणारे आहेत ही बाब लक्षात घ्यायला हवी.
ती घ्यावयाची याचे कारण प्रत्यारोपणासाठी अवयव कसे मिळवले जावेत, याची एक नियमावली आहे आणि कोणत्याही अन्य नियमांप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर ती आधारित आहे. म्हणजे ज्यांना कोणास काही आजार वा अपंगत्वामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे त्याने या संदर्भातील मध्यवर्ती व्यवस्थेत आपली मागणी नोंदवावयाची. जसजसे अवयव उपलब्ध होतील तसतसे या यादीतील मागणीधारकांना ते पुरवले जातात. येथे लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे अवयव हे काही कारखान्यात वा अन्यत्र तयार होणारे उत्पादन नाही. त्याची उपलब्धता पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे एखाद्याने स्वत:च्या मृत्यूनंतर आपले अवयव दान केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली नसेल तर किंवा त्याच्या निकटवर्तीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला नाही तर, किंवा अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान केले नाहीत तर कोणा तरी गरजूस प्रत्यारोपणासाठी हे अवयव मिळू शकत नाहीत. त्यामुळे हे अवयव कधी उपलब्ध होतील किंवा होणार नाहीत, हे सांगता येऊ शकत नाही. तेव्हा रांगेत वाट पाहणे आले.
परंतु आपल्याकडच्या व्यवस्थेत ज्याप्रमाणे अधिक दाम मोजले तर रांगेत उभे न राहता थेट परमेश्वराच्या(?) पायाशी लोळण घेण्याची सोय आहे त्याचप्रमाणे अधिक द्रव्य टाकून अवयवांची रांग बाजूला ठेवून आपणास हवे ते पदरात पाडून घेण्याचीही सुविधा आहे. याचा फायदा अर्थातच जनतेच्या पैशावर गबर झालेले राजकारणी किंवा स्वत:च्या कल्पनेतून संपत्तिनिर्मिती करणारे उद्योगपती वा अन्य धनिकच घेऊ शकतात. कोणत्या राजकारण्याने आपल्या ‘अमर’पणासाठी कसा हवा तो अवयव झटपट मिळवला आणि कोणाला कसे अवयवासाठी रांगेत थांबावे लागले नाही, याच्या सुरस कथा राजकीय वर्तुळात चवीचवीने चघळल्या जात असतात. म्हणजेच पैसे फेकले की हवा तो अवयव मिळवण्याची क्षमता असलेले आणि काही तरी पैसे मिळावेत यासाठी अवयव विकायची वेळ आलेले यांच्यातील व्यवहार हा या अवयवचोरी घोटाळ्याच्या मुळाशी आहे. आणि डॉक्टरांसारखा सुशिक्षित हा या व्यवहारातील मध्यस्थ आहे. व्यवहार अभ्रष्ट व्हावेत अशी इच्छा असेल तर मध्यस्थांना नियंत्रित करावे लागते. मग ते व्यवहार लष्करी साधनसामग्रीचे असोत की अन्य कोणते. परंतु व्यवस्थेचे हितसंबंध नेहमीच मध्यस्थांना मोकळे रान देण्यात असतात. कारण मध्यस्थ हे नेहमी गरजू आणि गरज पुरवणारे या दोघांनाही हवे असतात. तेव्हा त्यांच्या नियमनाची व्यवस्था केली नाही तर मध्यस्थाकडून लबाडी होण्याचा धोका नेहमीच असतो.
हिरानंदानी रुग्णालयातील घटनेने तेच तर सिद्ध केले. मुळात नियम सांगतो की कोणालाही अवयव विकण्याचा आणि म्हणून अर्थात विकत घेण्याचा अधिकार नाही. तो फक्त दान करता येतो. तेसुद्धा जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांकडूनच. या नियमाला बगल देण्याची क्लृप्ती अनेक डॉक्टरांनी शोधून काढली असून त्याचमुळे हिरानंदानी रुग्णालयात ज्यास मूत्रपिंडारोपण केले जाणार होते ती व्यक्ती आणि मूत्रपिंड देणारी व्यक्ती एकमेकांच्या पती-पत्नी आहेत, असे दाखवले गेले. वस्तुत: हा बनाव होता आणि त्यांचे एकमेकांशी काहीही संबंध नव्हते. मूत्रपिंडदानाच्या बदल्यात त्या महिलेला जी रक्कम दिली जाणे अपेक्षित होते ती दिली न गेल्याने हा बनाव उघड झाला. म्हणजे मुदलात व्यवहारच फसवणुकीचा. पण त्यातदेखील किमान प्रामाणिकपणा नाही, असा हा प्रकार. आणि या सगळ्या व्यवहारात पेशाने डॉक्टर असलेले गुंतलेले. यावरून व्यावसायिकता किती नीच पातळीवर होती, ते कळून यावे. यातही परत धक्कादायक बाब म्हणजे जे काही झाले तो प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे, असे नाही. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, आपल्याकडे अकोला आदी शहरांत असे मूत्रपिंडचोरीचे आणि त्यातील डॉक्टरांच्या सहभागाचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. तरीही ते थांबवण्याचा प्रयत्न होत नाही.
याचे कारण ते थांबवण्याचे अधिकार असलेले आणि ते न थांबवण्यात ज्यांचा फायदा आहे असे हितसंबंधी एकच आहेत. अशी अवयवचोरी थांबली तर रांगेत न थांबता अवयव कोणाला मिळू शकतील या प्रश्नाच्या उत्तरात अवयवचोरी का थांबत नाही हे सत्य दडलेले आहे. ती थांबवायची इच्छा असेल तर अशी अवयवचोरी जेथे घडते ते रुग्णालय, त्यात सहभागी डॉक्टर यांच्यावर अशा गुन्हय़ांसाठी कायमस्वरूपी बंदी हवी. तसेच देऊळ असो की दवाखाना पैसे फेकून रांग मोडणाऱ्यांनाही शिक्षा कशी देता येईल याचा विचार आणि निर्णय व्हायला हवा. रांगेचा फायदा सर्वाना हा नागरिकशास्त्राचा साधा नियम पुन्हा एकदा समाजावर बिंबवण्याची वेळ आली आहे.