यंदाच्या पॅरालिम्पिकमधील आपल्या देशाच्या कामगिरीचे कौतुक करण्याची आपली धाटणी, आपली मनोभूमिका नेमकी कशी आहे?
पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेले यश साजरे व्हावेच, पण ते अपंगांची इतरांशी तुलना करणारा तराजू हाती घेऊन नव्हे. सिंधू व साक्षी यांनी पदके मिळवल्यानंतर, ‘बघा पुरुषांना पदके नाही मिळवता आली..’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशा प्रतिक्रियांच्या मुळाशी आहे तो जाणते-अजाणतेपणी मनात रुजलेला विषमतुलनी विचार.
यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले भारताचे – आपल्या देशाचे पथक होते ११७ खेळाडूंचे. त्या पथकाच्या हाती लागली दोन पदके. त्यात एक रौप्यपदक बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे आणि एक कांस्य कुस्तीपटू साक्षी मलिकचे. त्याच रिओमध्ये सध्या चालू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या आपल्या देशाचे पथक आहे १९ खेळाडूंचे आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारची रात्र होईपर्यंत या पथकाने पटकावलेल्या पदकांची संख्या होती चार. ‘११७ खेळाडूंना दोन पदके, तर १९ खेळाडूंना किती?’ असा गुणोत्तरीय हिशेब आज अनेक जण मांडत आहेत. तो तसा मांडला तर, १९ खेळाडूंच्या पथकाला एक पदक मिळाले असते तरी अख्खे भारतवर्ष आनंदाने बेभान होण्यास हरकत नव्हती. त्याचसोबत, उलटा हिशेब मांडणाऱ्यांचीही काही वानवा नाही. ‘म्हणजे १९ खेळाडूंनी चार पदके पटकावली तर ११७ खेळाडूंनी किती पटकावयास हवी होती,’ तर त्याचे उत्तर ‘किमान २४’ असे. नकोसे उत्तर येणार याची खात्रीच असेल तर एक सोप्पी पद्धत आहे आपली. संबंधित प्रश्न जणू समोर आलेलाच नाही, अशी मनाची समजूत करून घेणे. या असल्या मनाच्या समजुती करून घेण्यात किंवा दुसऱ्याच्या करून देण्यात आपण भारतीय वाकबगार आहोतच. हे असे गुणोत्तरीय हिशेब मांडण्यामागील मानसिकतेचा आढावा घेण्याचे, पदकांच्या आकडय़ांकडे लक्ष देण्याचे, त्या अनुषंगाने पडणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे आणि या क्रीडा स्पर्धाच्या निमित्ताने आपल्या मनातील विचारक्रीडांची चाचपणी करण्याचे आजचे प्रयोजन म्हणजे उद्या, रविवारी होत असलेला पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप.
पॅरालिम्पिक म्हणजे अपंगांसाठी क्रीडाकौशल्य जोखण्याचे आणि जगाला दाखवून देण्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक भलेथोरले आणि सन्मानाचेही व्यासपीठ. याचा इतिहास तसा ६८ वर्षे जुना. दुसरे महायुद्ध लढताना कायमचे जायबंदी झालेले, शरीराच्या एखाद-दुसऱ्या अवयवास न्यूनत्व आलेले काही ब्रिटिश अधिकारी, सैनिक यांनी ठरवले की आपणही आपल्या क्रीडा स्पर्धा भरवू या. सन १९४८ मध्ये त्यांच्या या पहिल्या क्रीडा स्पर्धा रंगल्या. आज पॅरालिम्पिकचे जे विस्तारित स्वरूप दिसते त्याचे बीज होते ते त्या स्पर्धामध्ये. अधिकृतरीत्या पहिले पॅरालिम्पिक झाले ते १९६० मध्ये रोम येथे. सुरुवातीची काही वर्षे या स्पर्धासाठीची प्राथमिक अट असायची ती खेळाडू व्हीलचेअरला जखडून असलेला हवा, अशी. नंतर अपंगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला म्हणा, बाजारपेठीय दबाव म्हणा किंवा आणखी काही म्हणा, ही अट शिथिल झाली आणि विविध प्रकारच्या दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेची दारे खुली झाली. हा झाला या स्पर्धाचा अगदी ढोबळ व त्रोटक इतिहास. हा इतिहास जीर्णशीर्ण काळातील नाही. त्याचा पट आणि वर्तमानाचा पट एकमेकांच्या इतके निकट, परस्परांना इतके बिलगलेले आहेत की वर्तमानापासून इतिहास वेगळा करणे तसे अवघडच.
पॅरालिम्पिकच्या तुलनेत ऑलिम्पिकचा इतिहास खूपच जुना. आपल्या, म्हणजे भारताच्या कामगिरीच्या, यशाच्या दृष्टीने तो अगदीच सुमार म्हणावा असा. त्यात यंदा ऑलिम्पिकला कुणी जायचे यावरून नळावरील भांडणे असावीत अशी भांडणे होतात काय, एखाद्या खेळाडूचे नाव ऑलिम्पिकवारीसाठी निश्चित होते काय, तो उत्तेजक सेवन प्रकरणात अडकतो काय, त्यावर कोर्टबाजी होते काय, ‘कुणी तरी माझ्या खाण्यात उत्तेजके मिसळली’ असे तो खेळाडू सांगतो काय, त्याची ऑलिम्पिकवारी हुकते काय.. साराच प्रकार अत्यंत अशोभनीय आणि देशाची इभ्रत आंतरराष्ट्रीय पातळीवर धुळीस मिळवणारा. अशा परिस्थितीत एखादी सिंधू बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवते, एखादी साक्षी कांस्यपदक पटकावते याचे कौतुक करण्यात काहीच गैर नाही. पण ऑलिम्पिक म्हणजे केवळ वैयक्तिक गुणदर्शन स्पर्धा नव्हे. जागतिक पातळीवरील ते एक विराट व्यासपीठ आहे. त्या स्पर्धेच्या सरतेशेवटी जाहीर होणारी पदकतालिका असते ती देशांनी मिळवलेल्या पदकांची आणि ती खूप काही सांगत असते. ते ऐकण्याची हिंमत एक देश म्हणून आपल्याकडे आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. अशा वेळी प्रारंभीच उल्लेख केलेला गुण आपल्या कामी येतोच मग. एखाद्या प्रश्नाचे उत्तर नकोसे येणार याची खात्री असेल तर मग तो प्रश्न परीक्षेला आलाच नव्हता, अशी स्वत:ची समजूत करून टाकणे. आणि ज्या प्रश्नांची उत्तरे हवीशी आली आहेत त्यासाठी दुखून येईल इतका वेळ स्वत:च्या हातांनी स्वत:ची पाठ थोपटत बसणे. व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठी मानण्याचा जो अंगभूत अवगुण आपल्या समाजात आहे त्याचे प्रच्छन्न दर्शन अशा वेळी घडत असते. दुसरे, ‘जिंकणे महत्त्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते खेळणे, खेळातील आनंद घेणे.. हार-जीत तर होतच असते,’ हा आध्यात्मिक पातळीवर जाणारा विचार प्रत्यक्ष आयुष्यात लागू करू बघण्याची आपली पलायनवादी सवय. या अशा पाश्र्वभूमीवर यंदाच्या पॅरालिम्पिकमधील आपल्या देशाच्या कामगिरीकडे आपण कसे बघत आहोत? आणि मुख्य म्हणजे त्या कामगिरीचे कौतुक करण्याची आपली धाटणी, आपली मनोभूमिका नेमकी कशी आहे?
उंच उडीमध्ये थंगवेलू मरियप्पन आणि भालाफेकीमध्ये देवेंद्र झाझरिया या दोघांना सुवर्णपदके, गोळाफेक स्पर्धेत दीपा मलिकला रौप्यपदक, वरुणसिंग भाटीला उंच उडीत कांस्य ही आपली यंदाच्या पॅरालिम्पिकमधील, शुक्रवार संध्याकाळपर्यंतची कामगिरी. पॅरालिम्पिकमध्ये आपल्याला सुवर्णपदक एका तपानंतर मिळालेले आणि दीपा मलिकच्या रूपाने भारतीय महिलेला या स्पर्धेत पदक मिळण्याची ही पहिलीच खेप. चार पदकांची ही कामगिरी निश्चितच अगदी पुरेपूर आनंददायी आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे जे काही तथाकथित कर्तृत्व होते त्याच्या वेदनादायी आठवणींवर फुंकर घालणारी. त्याचे कौतुक अगदी खुल्या दिलाने आणि नितळतेने व्हायला हवे. त्याहीपेक्षा त्यात हवी ती शुद्ध निरपेक्षता. मात्र प्रत्यक्षात आज होत असलेल्या कौतुकाची धाटणी ही खिल्ली उडवण्याच्या सुरात आहे. ‘यापुढे ऑलिम्पिक नकोच खेळू या आपण, पॅरालिम्पिकलाच पाठवू या आपले खेळाडू.’ वगैरे. या अशा शब्दांतील भावनामांडणी म्हणजे परखडबिरखड असे वाटत असेलही कित्येकांना, मात्र एका रीतीने ती काहीशा असंवेदनशील मानसिकतेचे रूप आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेले यश साजरे व्हावेच, पण ते असे अपंगांची इतरांशी तुलना करणारा तराजू हाती घेऊन नव्हे. सिंधू आणि साक्षी यांनी ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावल्यानंतर, ‘बघा पुरुषांना पदके नाही मिळवता आली.. ती या महिलांनी मिळवून दाखवली,’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अपंगांबाबत व्यक्त होणारी प्रतिक्रिया म्हणजे त्या प्रतिक्रियांचा वाढावाच. या असल्या सारणीच्या प्रतिक्रियांच्या मुळाशी आहे तो जाणते-अजाणतेपणी मनात रुजलेला विषमतुलनी विचार. अमक्या घटकांमध्ये इतरांच्या तुलनेत काही न्यून आहे, हा या विचाराचा पाया. मग त्या घटकांनी असे काही यश मिळवले की त्या पायाच्या आधारावर त्यांचे कौतुक करणे हे ओघाने आलेच. हे कौतुक नितळ नव्हे, निरपेक्ष नव्हेच नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे. या अशा धाटणीचे कौतुक, अशा धाटणीचा आनंद वरवर पाहता निखळच वाटू शकेल. पण तो तसा नाही, हे मनी उमजायला हवे. ज्या अपंग खेळाडूंच्या बाबतीत ही पाठथोपटणी आहे ते खेळाडू अचाट जिद्द व मेहनत यांच्या बळावर स्वत: या न्यूनभावनेतून बाहेर पडले आहेत, वा बाहेर पडण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवणारी सिंधू, साक्षी यांच्या डोळ्यांत विजेतेपदक स्वीकारताना जो अभिमान झळकला असेल अगदी तस्साच अभिमान मरियप्पन, देवेंद्र, दीपा, वरुणसिंग या पॅरालिम्पिक पदक विजेत्यांच्या डोळ्यांतही खात्रीने झळकला असेल. त्या आनंदउजेडाला तराजूत तोलण्याचा अव्यापारेषु व्यापार कशाला? ही उठाठेव म्हणजे खरे तर आपल्याच मनीचे न्यूनत्व. या अपंग खेळाडूंबाबत बोलायचे तर ‘न्यूनत्व मनीचे पुरते सरले,’ अशी त्यांची मुक्त स्थिती. त्यांचे गुणगान गाताना आपण ‘न्यूनत्व मनीचे पुरते सरू दे..’ अशी प्रार्थना कुणापाशी नाही, तरी स्वत:पाशी तरी करायला हवी. त्यातून नस्ती उठाठेव करणारा हातचा तराजू गळून पडेल कदाचित, जे आज गरजेचे आहे.