गावावरून ओवाळून टाकलेल्या अनेकांना भाजपने याआधी पक्षात घेतले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेत सेनेने घोडेबाजार केल्याचा त्यांचा आरोप हास्यास्पद ठरतो..

भ्रष्ट, गुंड राजकारणी एक तर तुरुंगात तरी हवेत किंवा आपल्या पक्षात या भाजपच्या राष्ट्रीय बाण्यास शिवसेनेने चांगलाच शह दिला असे म्हणावे लागेल. मुंबई महापालिकेत बहुमतापासून दूर असलेल्या शिवसेनेने एका बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना गटवले आणि एका दगडात दोन पक्षी घायाळ केले. पहिला म्हणजे अर्थातच मनसे. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर काढलेल्या प्रचंड मोर्चानंतर मनसेत चांगली धुगधुगी निर्माण झाली होती. सत्तेत असूनही अधिकारशून्य असलेली शिवसेना, चाचपडणारी काँग्रेस आणि बेरजेच्या राजकारणात सातत्याने वजाबाकी वाटय़ास आलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भाऊगर्दीत मनसे विरोधकांची जागा घेऊ  शकेल असे वाटत असतानाच सेनेच्या शस्त्रक्रियेमुळे त्यास काही काळ तरी जायबंदी राहावे लागेल. यात दुसरा घायाळ झालेला पक्ष म्हणजे भाजप. किंबहुना भाजपला घायाळ करण्यासाठीच सेनेने ही बुद्धिबळी खेळी केली. मनसे हे केवळ जाता जाता झालेले नुकसान. सद्य परिस्थितीत भाजपच्या नगरसेवकांना फोडणे अगदीच अशक्य असल्याने सेनेने सोपा मार्ग निवडला आणि मनसेत फूट पाडली. साहजिकच यामुळे मनसेइतकाच किंबहुना अधिकच भाजप संतप्त झाला. या सहा नगरसेवकांना फोडून बहुमताच्या जवळ जाण्याच्या सेनेच्या प्रयत्नांचे वर्णन भाजपने घोडाबाजार असे केले.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी

ते खरेच. परंतु प्रश्न असा की मग भाजप इतके दिवस राष्ट्रीय ते ग्रामीण पातळीवर तुम्हास नको असेल ते आम्हास द्या असे म्हणत इतर पक्षांतील गणंग घेत सुटला आहे, ते कसले राजकारण? गावावरून ओवाळून टाकलेल्यांना आपले म्हणा असा जणू पण केल्यासारखे भाजपचे अलीकडचे वागणे आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांत साधारण कमीजास्त प्रमाणात हीच स्थिती. गंगेच्या विशाल प्रवाहास जाऊन मिळणाऱ्या गटाराचे तीर्थात रूपांतर होते, अशी हिंदू धर्मीयांची धारणा असते. त्या धर्मास मानणाऱ्या भाजपलादेखील आपल्या पदरी कोणीही पडला तरी तो पवित्रच होतो, असे वाटत असावे. परंतु अलीकडे गंगा ही भारतातील सर्वात अस्वच्छ नदी आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. म्हणजे गंगेस मिळावे आणि पवित्र व्हावे ही धारणा काही खरी नाही. तद्वत भाजपत गेले की सर्व पापे नष्ट होतात हेदेखील खरे नाही हे आता देशांतील मतदारांस जाणवू लागले आहे. गंगा नदी निदान विशाल तरी आहे. अलीकडच्या भाजपचे तसे नाही. म्हणजे मुळात तो पक्ष म्हणून संकुचित. आणि त्यात ही गावगन्ना घाण घेत जाण्याची वृत्ती. त्यामुळे तो पक्ष एक विशाल डबके होण्याच्या मार्गावर मोठय़ा जोमाने प्रगती करीत असून आपले हे लक्ष्य तो लवकर पूर्ण करेल यात शंका नाही. तेव्हा अशा भाजपने अन्य पक्षांवर फोडाफोडीचे राजकारण केल्याबद्दल टीका करणे म्हणजे स्वत:च्या अंगास दुर्गंधी येत असणाऱ्याने इतरांच्या तोंडाच्या वासाची तक्रार करण्यासारखेच. तेव्हा भाजप इतरत्र जे करीत होता ते शिवसेनेने मुंबईत करून दाखवून भाजपस तोंडघशी पाडले. त्यामुळे भाजपचा संताप झाला असेल तर तो समजून घेण्यासारखा आहे. पण हा संताप सात्त्विक नाही. पक्ष फोडणे आदी आमची मक्तेदारी असताना शिवसेनेस हे साध्य झालेच कसे, या भावनेतूत आलेला हा उद्वेग आहे. आपल्याच कर्माने भाजपने तो ओढवून घेतला आहे.

या मनसेफुटीच्या आदल्याच दिवशी मुंबईच्या यत्किंचित उपनगरातील महापालिका निवडणुकीत भाजपचा कोणी उमेदवार जिंकला तर त्या पक्षाने जणू काही अंतिम लढाईच जिंकली अशा प्रकारचा विजयोत्सव साजरा केला. बेगाने शादी में दीवाने असलेल्या अब्दुल्लासारखे यात आघाडीवर होते किरीट सोमय्या. राज्याच्या राजकारणात आपल्याला फारच स्थान आहे, असा त्यांचा एकूण आविर्भाव असतो. नैतिकता हादेखील त्यांचा आव आणण्याचा विषय. त्यामुळे या टिनपाट निवडणुकीनंतर त्यांनी जी भाषा वापरली ती आघाडीच्या राजकारणास शोभा देणारी नक्कीच नव्हती. मुंबई महापालिकेत सेना आणि भाजपची आघाडी आहे. तशी ती व्हावी यासाठी नागरिकांनी काही चळवळ केली, भाजपवर दबाव आणला असे काही घडल्याचे ऐकिवात नाही. म्हणजेच सेनेबरोबर महापालिकेत शय्यासोबत करण्याचा भाजपचा निर्णय हा आपखुशीचा आहे. मुंबईचे भले व्हावे यासाठी भाजपने हा काही मुंबईवर केलेला उपकार नाही. तेव्हा ऊठसूट शिवसेनेस धडा शिकविण्याची भाषा करण्याची मुळात भाजपला काही गरज नाही. मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी समजा शिवसेना लाचार असेल तर महाराष्ट्रातील सत्ता टिकविण्यासाठी भाजप असहाय आहे, हे सत्य आहे. म्हणजेच महापालिकेत सेनेला सत्तेसाठी भाजपची गरज आहे आणि राज्यात भाजपला शिवसेनेची. अशा तऱ्हेने हे दोन्ही पक्षांचे सोयीचे राजकारण सुरू आहे. अशा वेळी सेनेसमोर नाक खाजवून दाखवण्यात काय मोठे आले आहे शहाणपण? तेदेखील किरीट सोमय्या यांनी करावे हे फारच झाले. शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणात आपले खूप वजन आहे असे मानण्याचे त्यांना निश्चितच स्वातंत्र्य आहे. परंतु ते तसे नाही हे सत्य समजून घेण्याचे आणि देण्याचे स्वातंत्र्य इतरांनाही आहे. शिवसेनेने ते दाखवून दिले. ते तसे नाही असे सोमय्या यांना दाखवून द्यायचेच असेल तर त्यांनी मातोश्रीवर केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावावीत. शिवसेना आणि शिवसेनेचे नेतृत्व यांच्यावर निवडणुकांआधी सोमय्या यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्यांचे पुढे काय झाले? आपले वजन वापरून त्यांनी या भ्रष्टाचार चौकशीच्या तसेच भाजप लवकरच नवा घरोबा करीत असलेल्या नारायण राणे यांच्याविरोधातील चौकशीच्या प्रकरणांना गती द्यावी. शिवसेनेबरोबर सुखाने, काटकसरीने स्वच्छता आणि टापटिपीचे दर्शन घडवीत संसार करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सेनेविषयी काही म्हणणे नाही. असले तरी ते जाहीर कधी त्यावर भाष्य करीत नाहीत. अशा वेळी किरीट सोमय्या आणि अन्यांना ही नसती उठाठेव सांगितली कोणी? सूर्यापेक्षा वाळूच जास्त तापावी त्याप्रमाणे मुख्य नेत्यांपेक्षा भाजपचे दुय्यम नेतेच सेनेच्या मुद्दय़ावर अधिक बोलताना दिसतात. या सगळ्यांना सेनेच्या कृतीतून चांगलीच चपराक बसली. एरवी अलीकडे बोलघेवडय़ांचाच पक्ष म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या सेनेने या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर काही चतुर राजकारण केले.

परंतु मनसे फोडण्याच्या सेनेच्या या कृतीचे आगामी काळात अनेक गंभीर परिणाम संभवतात. एक म्हणजे आगामी निवडणुकांत भाजपचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी शिवसेनाच असेल. भाजप जर सोकावला तर तो पहिला वरवंटा आपल्यावर फिरवेल हे आता तरी शिवसेनेस कळाले असून त्यामुळे जमेल तेथे भाजपचे नुकसान करणे हा आता या पक्षाचा कार्यक्रम असेल. हे भाजपचेच पाप. केवळ वाचाळपणामुळे त्यातल्या त्यात निरुपद्रवी मित्र पक्षाचे रूपांतर भाजपने शत्रूत केले आहे. याची गरज नव्हती. परंतु अलीकडच्या काळात भाजपची वृत्ती माझे ते माझेच आणि तुझे तेही माझेच अशी होत चालली असून त्यामुळे देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष भाजपच्या मार्गातील मोठा अडथळा ठरतील. कसे ते शिवसेनेने दाखवून दिले आहे. याचीच पुनरावृत्ती अन्य अनेक शहरांत आणि राज्यांतही होईल. तेदेखील कसे घडेल ते नांदेड या शहराने दाखवून दिले आहे. वाटेल ते गणंग पक्षात घेऊन, जंगजंग पछाडूनही भाजपला ही महापालिका काही जिंकता आली नाही. वाईट चाललेल्या राजकारणास अपेक्षित चांगले वळण देणे दूरच. भाजप ते अतिवाईट करू इच्छितो. त्याची परिणती वाईटातच होईल.