देवळात झालेला अपघात हा आजार नाही. आजार आहे तो तिसऱ्या जगातील मानसिकतेचा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केरळमधील मंदिरात रविवारी जे काही झाले ती शुद्ध बेफिकिरी होती. स्थानिक प्रशासनाने केलेली मनाई झुगारून मंदिर प्रशासनाने उत्तररात्री आतषबाजी केली. याहीनंतर सहानुभूतीची भावना समजून घेता येईल. परंतु जो अपघातच स्वनिर्मित असेल तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा भरुदड इतरांनी का सोसावा?

आजपर्यंत धार्मिक स्थळी झालेल्या अपघातांत जिवाला मुकलेल्यांची संख्या भारत-पाकिस्तान, भारत-चीन आदी युद्धांत बळी पडलेल्या सैनिकांपेक्षाही अधिक असेल. त्यात केरळातील देवळात रविवारी मेलेले साधारण सव्वाशे पकडले तर ती चांगलीच घसघशीत होईल. युद्धात जे हुतात्मा होतात त्यांच्या मरणास काही अर्थ तरी असतो. देवदर्शनाच्या चेंगराचेंगरीत प्राण सोडतात त्यांचे मरण अगदीच फुकाचे. ना अर्थ ना स्वार्थ. अशा बळी पडलेल्यांचे नातेवाईक आपला आप्त स्वर्गलोकी गेला म्हणून आनंद मानतीलही कदाचित. पण ते म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार वाटते असे म्हणण्यासारखे. या मंडळींच्या मतास मान देऊन स्वर्ग वगैरे थोतांडे खरी आहेत असे मानले तरी असल्या पद्धतीने हकनाक मरणाऱ्यांना तेथे तरी प्रवेश का मिळावा? या अशा अपघातांमागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यात एक धागा समान आहे. धर्मस्थळ. मग कधी कथित देवाच्या डोक्यावरील दिव्य ज्योती पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होते, कधी दर्शनात गोंधळ उडून माणसे गांगरतात अािण त्यांचे प्राण कंठाशी येतात तर कधी देवदर्शनासाठी पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरची वाहने कुस्करून टाकतात. या आणि अशातून जे वाचतात ते केरळातील अपघातात बळी पडतात. म्हणजे व्यावहारिक जगण्यातील तापहनन व्हावे, भौतिक संघर्षांतून दमलेल्या मनाला उभारी यावी या हेतूने माणसे धर्मस्थळाचा आसरा घेतात. वास्तवात या धर्मस्थळ दर्शनाने वैयक्तिक जगण्यात काहीही फरक पडणार नसतो हे मान्य केले तरी जगण्याचा धर्माधार इतक्यापुरताच मर्यादित हवा. परंतु अलीकडच्या काळात तो देवाणघेवाणीच्या क्षुद्र पातळीवर येऊन ठेपला असून आपण देवास काही तरी दिले म्हणजे त्याबदल्यात आपल्याला बरेच काही मिळेल या निर्बुद्ध भावनेतून बऱ्याच जणांची पावले धर्मस्थळांकडे वळू लागली आहेत. या बऱ्याच जणांची संख्या अलीकडे अतोनात वाढू लागली असून मुदलातच बेशिस्त असलेल्या या देशात त्यामुळे धर्मस्थळी अनागोंदीच वाढताना दिसते.

केरळमधील मंदिरात रविवारी जे काही झाले ती शुद्ध बेफिकिरी होती. स्थानिक प्रशासनाने वास्तविक या मंदिर प्रशासनास फटाके वगैरे वाजविण्यास मनाई केली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुदलात फटाके उडविणे हे दिखाऊपणाचे लक्षण. विवाहास्थळी वराचे आगमन झाले.. फोड फटाके, निवडणूक जिंकली.. फोड फटाके, वाढदिवस साजरा करायचाय..? फोड फटाके, भारत कोणत्या तरी टिनपाट सामन्यात जिंकला.. फोड फटाके! वास्तविक यांतील एकही कारण आसपासच्यांची डोकेदुखी वाढवावी इतके महत्त्वाचे नाही. आदिम संस्कृतीत नरपुंगव शत्रूचा विनाश केल्यास, आपल्यामुळे गर्भार राहिलेली मादी प्रसूत झाली वगैरे कारणांनी झालेला आनंद साजरा करण्यासाठी मोठा ध्वनी करीत. जेणेकरून आपल्या विजयाकडे गावचे लक्ष जावे. परंतु आजही आपल्या शरीरात ज्याप्रमाणे आंत्रपुच्छ हा निरुपयोगी आणि कालबाह्य अवयव टिकून आहे त्याचप्रमाणे आपल्यातील काहींच्या मनात आनंद साजरा करावयाची ही उपद्रवी प्रथा आजही टिकून आहे. तिचेच दर्शन केरळमध्ये घडले. उत्तररात्री या देवळाच्या मुखंडांनी शोभेचा दारूगोळा जाळण्याचा निर्णय घेतला. ही वेळ प्राणीपक्ष्यांच्या तसेच वनस्पतींच्या गहिऱ्या निद्रावस्थेची. आपण हे असले मूर्खासारखे उद्योग करून निसर्गावर अत्याचार करीत आहोत, याची कोणतीही जाणीव या देवस्थान प्रमुखांना होऊ नये? फटाके वाजले की त्या आवाजाने, अवेळी होणाऱ्या रोषणाईने प्राणीपक्षी भांबावतात आणि कित्येकदा केवळ सैरभैर झाल्याने अपघातात सापडून त्यांचे निधन होते. धर्मस्थळाच्या नियंत्रकांना याचे कोणतेही भान नसावे? तसे असेल तर हे देवस्थानातील दानवच म्हणावयास हवेत. केरळात तर ते तसेच ठरतात. प्रशासनाच्या सूचनांकडे पूर्ण काणाडोळा करून, सरकारी आदेशांची पायमल्ली करून या देवस्थानाच्या मुखंडांनी हा रोषणाईचा उद्योग केला. या गुन्ह्याबद्दल यास जबाबदार असणाऱ्या सर्वावर खुनाचाच गुन्हा दाखल करावयास हवा.

परंतु तसे होण्याची शक्यता नाही. ज्या पद्धतीने या अपघातानंतर पंतप्रधान ते काँग्रेस उपाध्यक्ष यांची पावले या संकटस्थानी वळली ते पाहता अशी काही कारवाई होण्याची शक्यता धूसरच दिसते. केरळ या राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांतील प्रचारसभांच्या निमित्ताने भाजपचे अध्यक्ष अमित शहा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अर्थात ही मंडळी परिस्थितीचा आढावा घेतात म्हणजे काय आणि हा आढावा घेऊन करतात काय, हे काहीही कळावयास मार्ग नाही. या सर्व नेत्यांनी अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना वा जखमींना घसघशीत रोख मदत जाहीर केली. या सर्वाना सदर धर्मस्थळी जमण्याचे आवाहन सरकारने केले होते काय? नसेल तर या खिरापतीचे कारण काय? मृतांच्या नातेवाईकांना केरळ सरकारकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना दोन लाख रु. दिले जाणार आहेत. मार्क्‍सवादी पक्षाच्या मते ही रक्कम कमी आहे. हा पक्ष धर्म मानत नाही. म्हणजे धर्मस्थळही नाही. मग धर्मस्थळातील अपघातात जखमींची उठाठेव त्या पक्षाने करावयाचे कारण काय? पंतप्रधान मोदी यांनीही हे मरण पावलेले जणू काही मोठय़ा राष्ट्रकार्यात बळी पडले असल्याच्या थाटात त्यांना हव्या त्या मदतीचे आश्वासन दिले. अपघातानंतर सहानुभूतीची भावना समजून घेता येईल. परंतु जो अपघातच मुळी स्वनिर्मित असेल तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा भरुदड इतरांनी का सोसावा? आपल्याकडे धर्मस्थळी इतके अपघात आतापर्यंत झाले आहेत आणि इतक्या प्रचंड रकमेचा विनियोग इतक्या अपघातांसाठी केला गेला आहे, त्याचे काय झाले? याचा हिशेब आपण करणार की नाही? खेरीज, मुद्दा असा की केरळात निवडणुका नसत्या तर इतक्या साऱ्या नेत्यांना या अपघातातील जखमींचा इतका सारा पुळका आला असता काय? आताही या ताज्या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे वगैरे आदेश दिले गेले. सुरुवातीला सहा महिन्यांची मुदत असलेला हा न्यायालयीन आयोग उत्तरोत्तर मुदतवाढ मागत राहील अािण आपले उदार सरकार ती देईलही. आता अगदीच मुदतवाढ शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर या अपघाताची कारणमीमांसा करणारा साधारण तेरा हजार पृष्ठांचा अहवाल या न्यायालयीन आयोगाकडून दिला जाईल आणि आल्या पावली तो अहवाल सरकारी फडताळांत जमा होईल. आतापर्यंत सर्वच चौकशी आयोगांच्या अहवालांचे असेच झाले आहे आणि याबाबत ते काही वेगळे होईल अशी आशाही बाळगायचे कारण नाही.

याचे कारण ही सर्व तिसऱ्या जगाची लक्षणे आहेत. कोणतीही व्यवस्था नाही, जी काही आहे तिच्याविषयी आदर नाही आणि ती मोडणे यातच पुरुषार्थ मानावयाचा ही संस्कृती. तेव्हा यापेक्षा वेगळे काही यातून कसे काय निष्पन्न होणार? ते व्हावे अशी इच्छा असेल तर मुदलात घाला घालावयास हवा तो तिसऱ्या जगातील मानसिकतेवर. देवळात झालेला अपघात हा आजार नाही. ते लक्षण आहे. तिसऱ्या जगातील मानसिकतेचा आजार किती खोलवर मुरलेला आहे, ते दर्शवणारे. ही तिसऱ्या जगातील मानसिकता बदलावी असे कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्याला वाटत नाही, ही खरी आपली शोकांतिका आहे. केरळातील अपघात याच शोकांतिकेचे प्रतीक. तो पहिला नाही. आणि शेवटचा तर नाहीच नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala temple fire