कालगणनेनुसार गायक अरुण दाते रविवारी निवर्तले. त्यांचा काल याआधीच गेला होता. दुटांगी धोतर आणि वर कोट अशा वेशातला मराठी नायक सैल पाटलोण घालू लागला आणि ना. सी. फडके यांच्या कादंबरीतली नायिका खऱ्या जीवनात शोधू लागला तो अरुण दाते यांचा काळ. पापभीरू. १० ते ५ या वेळात कार्यालयात कारकुनी करून आल्यानंतर गृहिणी पत्नीच्या हातचे कांदेपोहे खाऊन तिला सायंकाळी फिरायला नेऊन मोगऱ्याचा गजरा घेणारा काळ अरुण दाते यांचा. अव्यक्तपणे व्यक्त होणाऱ्या या काळावर अरुण दाते यांचे नाव सुरेल पण त्यांच्या आवाजासारख्या कापऱ्या अक्षरांत कोरले गेले आहे. त्यांच्या आधीच्या तरुणांनी बबनराव नावडीकर वा गजानन वाटवे वा जी एन जोशी यांच्या भावगीतांतला गगनी उगवलेला सायंतारा अनुभवला. त्या काळातली ‘रानारानात’ गेलेली शीळ या पिढीने ऐकली.
नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी गं..
दुसरे तिसरे नव्हते कोणी,
तुझेच हसले डोळे दोन्ही
अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी गं..
पुरुषी आवाजातल्या या गाण्यातला ‘बाई’ वा ‘उरात भरली बिजली’ हा उल्लेख बायकी वाटत नव्हता तो हा काळ. काळाच्या विशालपटावर प्रत्येक पिढीचे पाऊल आधीच्या पिढीपेक्षा कांकणभर पुढेच पडते. तसेच हवे. अरुण दाते यांची पिढी ही वाटवे, जोशी वा नावडीकर यांच्यानंतरची आणि डोक्यात राख घालून अवतरलेल्या आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, हृदयनाथ मंगेशकर यांच्या आधीची. आधीच्या पिढीपेक्षा ती थोडी तशी धीट होती. त्यामुळे ‘शुक्रतारा मंद वारा’ असे म्हणत ‘आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा’ असे ती सांगू शकली. ‘सखी शेजारिणी तू हसत रहा’ असे म्हणू शकली. ‘पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची’, ‘डोळ्यात सांज वेळी, आणू नकोस पाणी’ ..असे म्हणायची तिची तयारी होती. आधीच्या पिढीच्या तुलनेत ही नक्कीच धिटाई होती. ही पिढी जे काही म्हणायचे ते थेट म्हणत होती. परंतु हे म्हणणे मध्यमवर्गीय आणि विशेषत: ब्राह्मणी अशा संस्कारांच्या महिरपीतून व्यक्त होणारे. अदबशीर आणि संयत. प्रत्येक काळास अनुरूप असे कवी, गायक आदी कलाकार मिळत असतात. त्या काळास अरुण दाते मिळाले. सुधीर फडके, सुमन कल्याणपूर, मालती पांडे, माणिक वर्मा, मंगेश पाडगावकर असे मिळाले. पुढच्या काळाशी जोडणारा सेतू असलेले श्रीनिवास खळे मिळाले. तो काळ एक प्रकारच्या तृप्ततेचा होता. मर्यादित सांस्कृतिक आणि सामाजिक गरजांच्या काळात माणसे खाऊनपिऊन सुखी होती. अधिकाची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे अपेक्षाभंगाच्या दु:खाचा प्रश्नच नव्हता. गणपती उत्सवाच्या काळात पोराबाळांना शब्दश: डोक्यावर बसवून गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जाणारे पालक होते त्या काळाचे अरुण दाते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांत एक प्रकारचा शांतपणा भरून राहिलेला. कदाचित हा शांतपणा दाते यांना रक्तातून आणि त्यांच्या इंदौरी मातीतूनच मिळालेला असावा. महाराष्ट्राचे काकाजी साक्षात रामूभय्या दाते हे त्यांचे तीर्थरूप. त्यामुळे ‘निखारे कसे मस्त फुलून राहिलेत..’, असे म्हणणारा मोकळाढाकळा संस्कार घरातनंच आलेला. अरुण दाते यांनी लहानपणापासून घरात ऊठबस पाहिली ती कोणाची? तर थेट कुमार गंधर्व, पु ल देशपांडे, वसंतराव, भीमसेन, मल्लिकार्जुन मन्सूर अशा एकापेक्षा एक कलारत्नांची. इतक्या श्रीमंतीत बालपण गेलेले असले की काही मिळवायची अभिलाषा राहात नाही. हे इतके असे भरभरून मिळालेले असते की त्यापुढे मिळविण्याची अभिलाषा बाळगणे हा क्षुद्रपणाच ठरतो. अरुण दाते यांच्या व्यक्तिमत्त्वातून तो क्षुद्रपणा कधीही डोकावला नाही. त्यांना आपली पट्टी आणि काळ या दोहोंचे कायमस्वरूपी भान होते. ते कधीही सुटले नाही. रामूभय्या दाते यांच्यावर बेतलेला ‘काकाजी’ ‘तुझे आहे..’मध्ये सांगतो, ‘बेटा न पेलणाऱ्या पट्टीत कधी गायला जाऊ नये.’ हा सल्ला अरुण दाते तंतोतंत जगले. त्या काळाचे योग इतके बलवान की अरुण दाते यांच्या स्वरांवर तरंगणारी तरल शब्दकळा त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांची गाणी विलक्षण गाजली. मोजकीच आहेत ती. पण ती आजही ऐकली जातात. ‘जेव्हा तिची नि माझी’ गाण्यातला हुंकार, ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’मधली प्रामाणिक आर्तता, ‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’मधली तुटक न वाटणारी अलिप्तता, ‘दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे’, म्हणणारी सुसंस्कृतता, ‘दिवस तुझे हे फुलायचे’मधला ‘झोपाळ्यावाचून झुलणारा’ आनंद, ‘मान वेळावुनी धुंद होऊ नको, चालताना अशी वीज सोडू नको’ म्हणताना अंतर राखणारी सभ्यता, हे सगळे सगळे अरुण दाते यांच्या आवाजास शोभणारे. खरे वाटणारे. ते तसे होतेच. हेच अरुण दाते यांचे वैशिष्टय़ आणि तीच त्यांची मर्यादाही. हे वैशिष्टय़ त्यांच्या व्यक्तिमत्त्वास इतके चिकटलेले होते की ‘अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जयराम जयजयराम’, हा अभंगसुद्धा त्यांच्या आवाजात भावगीत वाटू लागतो. हिंदी चित्रपट संगीतात आवाज आणि व्यक्तिमत्त्व दोन कलाकारांना ढळढळीतपणे लाभले. मुकेश आणि तलत मेहमूद. त्यामुळे ‘शाम ए गम की कसम’ असे जेव्हा तलत गातात तेव्हा प्रत्यक्षातही त्याची संध्याकाळ उदासच असेल याची आपणास ठाम खात्री असते. तलत यांच्या गाण्यातली कातरता मराठीत अरुण दाते यांच्या आवाजात होती. वास्तविक मराठी गाणे आणि शब्द या कातरतेस शोभणारे नाहीत. मराठीत सगळे काही सरळसोट आणि कोरडेठक्क. दाते यांच्या आवाजातली ही कातरता आणि भावविवशता माळव्याच्या मातीतला सुगंध दाखवते. क्षिप्रेचे शिंपण झालेला त्यांच्या आवाजातला ओलावा म्हणून आजही स्पर्शून जातो.
गेली काही वर्षे अरुण दाते थांबले होते. योग्यच केले त्यांनी. आपला काळ मागे पडल्यावर उगाच नव्या काळाशी जुळवून घेण्याच्या नादात त्यांनी स्वत:ची केविलवाणी दमछाक होऊ दिली नाही. शंकर वैद्य यांची एक अप्रतिम कविता अरुण दाते गाऊन गेलेत-
या विश्वाच्या कणाकणांतून
भरून राहिले अवघे मीपण
फुलता फुलता बीज हरपले
आज हृदय मम विशाल झाले..
आयुष्यभराच्या कोवळेपणाचा वर घेऊन आलेले हे स्वरांचे बीज काल आपल्यातून हरपले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.